आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रागतिक आचार-विचारांचा कच्छी झेंडा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

19व्या शतकात व 20 व्या शतकाच्या पूर्वार्धात कच्छी समाज समूहाने इंग्रजी भाषेचे महत्त्व जाणून ही भाषा आणि इंग्रजी व्यापार पद्धत आत्मसात केली होती. स्त्रियांनाही घरी शिक्षक नेमून इंग्रजी भाषा, गणित, सामान्यज्ञान इत्यादी विषय शिकवले. इतकेच नव्हे तर वास्तव्याचा परिसर महाराष्ट्र असल्यामुळे उत्तम मराठी शिकण्याकडेही त्यांचा प्रारंभापासून कल राहिला. त्यामुळेच पुणे, नाशिक, जळगाव, डिक्रस आदी ठिकाणचा समाज समूह मराठी माध्यमातून शिकत गेला. शिक्षणाचे अनन्यसाधारण महत्त्व या समाजाला पटले होतेच, परंतु समाजातील धनिकांनी शिक्षणाचा
सर्वव्यापी प्रसार-प्रचार होण्याच्या उद्देशाने महाराष्ट्रातील विविध शिक्षण संस्थांना वेळोवेळी घसघशीत आर्थिक मदतही केली होती.
विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात कच्छी लोकांनी वेगवेगळ्या क्षेत्रांत पदार्पण करायला सुरुवात केली. उद्योग/व्यापार करतानाच कायदा, अर्थशास्त्र, यंत्र-तंत्रज्ञान या क्षेत्रांत शिरकाव केला. या समाजात मनू सुबेदारांसारखे लौकिकप्राप्त अर्थशास्त्रज्ञ प्रसिद्धीस पावले. मुंबईच्या ‘बॅकबे एन्क्वायरी’त के. एफ. नरिमान यांच्याबरोबर मनू सुबेदारही कार्यरत होते. सुबेदार अर्थतज्ज्ञ असल्यामुळे बॅकबे रेक्लेमेशन प्रकरणातील आर्थिक घोटाळे जनतेसमोर आले होते. अर्थात, सुबेदार यांचे कार्य अर्थशास्त्रापुरतेच मर्यादित नव्हते, तर त्यांच्या प्रयत्नांनी मुंबईत अंध व्यक्तींसाठी संस्था सुरू झाली होती. त्याच सुमारास याच कच्छी समाजाने मुंबईत लोटस आय हॉस्पिटल, भाटिया जनरल हॉस्पिटल सुरू केले होते. शिवाय लोणावळा, जळगाव, नाशिक इ. ठिकाणी मोफत आयुर्वेदिक औषध वितरणाचे दवाखाने सुरू केले. याशिवाय गोकुळदास तेजपाल हॉस्पिटल, गोवर्धनदास सुंदरदास मेडिकल कॉलेज यांच्या सर्व क्षेत्रातील कार्याची साक्ष देत आहेत. याचबरोबर समाजात कानजी खिमजी, जाधवजी हंसराज वैद्य यांसारखे उत्तम दर्जाचे डॉक्टर होते, तर हरिदास जमनादास भाटियांसारखे फेलोशिप ऑफ दि रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्स अर्थात ‘एफआरसीएस’, पदवीप्राप्त सर्जनही होते. सोहनलाल भाटिया ग्रँट मेडिकल कॉलेजचे पहिले भारतीय डीन होते. असे शिक्षणाचे महत्त्व जाणून असणार्‍या कच्छींनी मुंबई शहरात आणि उपनगरात आजवर जवळजवळ वीस शैक्षणिक संस्था उभ्या केल्या आहेत. शिक्षणासोबतच महाराष्ट्राच्या आरोग्य, न्याय व विधी, बँकिंग आदी क्षेत्रांतही कच्छी समाजाने भरीव योगदान दिले. 1904 मध्ये बाई जमनाबाई नारनजी यांनी कामा हॉस्पिटलमधून ‘मिडवाइफ’चा सर्टिफिकेट कोर्स पूर्ण केला होता. डी. एम. कपाडिया हे पहिले वकील होते. 1904 पर्यंत या समाजात 3 बॅरिस्टर, 4 सॉलिसिटर्स आणि 2 डिस्ट्रिक्ट प्लिडर्स झाले होते.
या समाजात साधारणपणे 80% लोक उद्योजक किंवा व्यापारी असले आणि हा समाजसमूह पिढ्यान्पिढ्या परंपरागत कौटुंबिक उद्योग-व्यापार करत असला तरीही व्यवस्थापनाचे रीतसर शिक्षण घेऊन कॉर्पोरेट क्षेत्रात पुढे येणारा तरुण आज या समाजात आहे. किंबहुना, परदेशात जाऊन अर्थार्जन करण्याला या समाजातील तरुण प्राधान्य देऊ लागले आहेत. स्त्रियांमध्ये शिक्षणाचे महत्त्व झपाट्याने वाढते आहे. स्त्री शिकली तर पुढची पिढी निश्चित प्रगतिशील असेल, असे समाजधुरीणांना वाटत आहे. या समाजातील स्त्रियाही आज कॉर्पोरेट क्षेत्रात आघाडीवर आहेत. उदाहरणेच द्यायची तर कल्पना मोरपारिआ आणि किशोरी जे. उदेशी यांचे देता येईल. पैकी मोरपारिया या जे. पी. मॉर्गनच्या अध्यक्ष आहेत, तर उदेशी या भारतीय रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नर पदावर होत्या व बँकिंग कोड्स अँड स्टँडर्ड बोर्ड ऑफ इंडियाच्या प्रमुख होत्या. तर वृंदा खटाव, मीनल कपाडिया यासारख्या स्त्रिया इंडियन मर्चंट्स चेंबरमध्ये महिला विभागाचे नेतृत्व करत आहेत. याच समाजातील डॉ. नीता रामैया एसएनडीटी
विद्यापीठात प्राध्यापक होत्या, तर याच समाजातील
डॉ. देवकी मोनाणी यांनी ऑस्ट्रेलियातील सिडनी विद्यापीठातून पीएच. डी. पदवी मिळवली होती. ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी ज्या 15 विद्यार्थ्यांचा सन्मान केला होता, त्यात डॉ. देवकींचा समावेश होता. आज मेलबोर्न आणि सिडनी विद्यापीठात त्या अध्यापनाचे कार्य करत आहेत. पहिल्या महायुद्धानंतर या समाजातील सर्वच उद्योजक परदेशी जाऊ लागले. अगदी सहकुटुंब परदेशी स्थलांतरित झाले. परिणामी या समाजातील मध्यम व उच्चमध्यमवर्ग काही अंशी इंग्रजाळलेला झाला. पण गंमत म्हणजे, नव्या पिढीचे प्रतिनिधित्व करणारा कच्छी तरुण वा तरुणी ऑनलाइन कच्छी शिकण्यासाठी तसेच कच्छी भाषा टिकवण्यासाठी धडपडताना दिसताहेत. कच्छी समाज हा महाराष्ट्राळलेला, इंग्रजाळलेला असला तरीही प्रगती आणि समृद्धीला पोषक ठरणार्‍या नीतिनियमांची जपणूक करणारा आहे. जाता जाता या समाजाची मराठी मातीशी एकरूप होण्याचे दर्शन घडवणारी एक गोष्ट लिहिल्याशिवाय राहवत नाही. महाराष्ट्रात मुंबईत घाटकोपर ते छत्रपती शिवाजी टर्मिनस, बोरिवली ते चर्चगेट अशा सांकेतिक ‘भाटिया लोकल’ आहेत आणि वैजापूर, औरंगाबाद येथे ‘भाटिया गल्ली’सुद्धा आहे!
(पुढील अंकापासून सिंधी समाजाच्या योगदानाची दखल घेणारी लेखमाला प्रसिद्ध होईल.)