Home »Magazine »Rasik» Rasik Article On Maharashtra Politics

पोकळीच्या शोधातले ‘राज’कारण

समर खडस | Feb 23, 2013, 22:56 PM IST

  • पोकळीच्या शोधातले ‘राज’कारण

राज ठाकरे हे केवळ करिश्मा असलेले नेते नाहीत; तर राज यांना राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेना-भाजप या चारही पक्षांचे डाव आणि पेच व्यवस्थित लक्षात येतात. तसेच या पक्षांच्या डावपेचांना काटशह देण्याची त्यांच्याकडे कुवत व कल्पकता दोन्ही आहे. शिवसेनेने टाळी वाजवण्यासाठी कितीही हात पुढे केला तरी बाळासाहेब ठाकरे यांच्या पश्चात शिवसेनेतील रँक अँड फाइल मुळापासून हलली असल्याचे चाणाक्ष राज यांच्या लक्षात आले आहे. ‘लोहा गरम है, हथौडा मारने का यही सही मौका है,’ हे राज चांगलेच ओळखून आहेत. याचा अर्थ राज केवळ शिवसेनेच्याच विरोधात राहतील, असे नाही. ते काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याही विरोधात आपल्या शैलीत प्रहार करत राहतील. मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीवर प्रहार करतानाही राज यांनी त्यांची टार्गेट्स नक्की केली आहेत. ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार यांच्यावर फारशी टीका करत नाहीत किंवा काँग्रेसमध्ये सोनिया गांधी यांना टार्गेट करत नाहीत. ते राष्ट्रवादीत अजितदादा पवार व काँग्रेसमध्ये राहुल गांधी यांना टार्गेट करतात. 2014 मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य येईल, अशा भ्रमात राज ठाकरे नाहीत, हे नक्की. मग हे सगळे कशासाठी सुरू आहे? महाराष्ट्रातील जी जनता गेली 45 वर्षे बाळ केशव ठाकरे या नावाने संमोहित झाली होती, त्या जनतेच्या मन:पटलावर राज ठाकरे यांना ‘राज श्रीकांत ठाकरे’ हे नाव कोरायचेच आहे. शिवाय त्यांच्या समवयस्क असलेल्या इतर पक्षांतील तरुण नेत्यांनाही तुमचा खरा स्पर्धक उद्धव ठाकरे वा अन्य कुणी नाही तर मीच आहे, हे दाखवून द्यायचे आहे!
राज यांनी त्यांच्या सभांसाठी निवडलेली ठिकाणेही अत्यंत हुशारीने निवडलेली होती. कोल्हापुरात शिवसेनेचे तीन आमदार निवडून आलेले आहेत. तर रत्नागिरी जिल्ह्यात राष्ट्रवादी मोठ्या प्रमाणावर फोफावत असली तरी अजूनदेखील खालच्या स्तरावरील शिवसेनेचा कट्टर कार्यकर्ता या जिल्ह्यातून हललेला नाही. बाळासाहेबांच्या निधनानंतर नेतृत्वाच्या वानवेपायी चाचपडणार्‍या शिवसैनिकाला बाळासाहेबांच्याच स्टायलीत राज यांनी आवाहन केले ते त्यामुळेच!
राज यांच्या या दोन जंगी सभांमुळे येऊ घातलेल्या राजकीय बदलांचे वारे जोखणे महत्त्वाचे आहे. पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस व राष्ट्रवादी हे दोन पक्ष त्यांच्या सहकारी संस्थांच्या जिवावर पार अगदी वाड्या-वस्त्यांपर्यंत पोहोचलेले आहेत. या प्रदेशातील दररोजच्या आयुष्याशी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या या संस्थांचा मोठा हात आहे. परंतु वर्षानुवर्षे या प्रदेशामध्ये काही ठरावीक घराण्यांची सत्ता कायम आहे. याविरोधात काही प्रमाणात नव्या तरुण पिढीचा आक्रोश वाढत आहे. कोल्हापूरसारख्या ठिकाणी फारशा प्रचारसभा न घेताही व संस्थात्मक राजकारणात कोणताही प्रभाव नसतानाही शिवसेनेसारख्या पक्षाच्या जागा या ठिकाणी निवडून येतात, त्यामागे हेच प्रमुख कारण आहे. संसदीय लोकशाही पद्धतीत कुठल्याही प्रदेशात वर्षानुवर्षे सत्ता काही ठरावीक लोकांच्या हाती राहिल्यास, त्या ठिकाणी विरोधी मते तयार होतात. या विरोधी मतांच्या प्रतिनिधित्वाची पोकळी तयार झाली की ती भरून येणार, हे निश्चित असते. राज नेमके ही पोकळी भरून काढण्याचाही प्रयत्न करत आहेत. मात्र त्याच वेळी कुठल्याही परिस्थितीत शिवसेनेत असलेला तळाचा कार्यकर्ता आपल्याकडे कसा खेचला जाईल, याचेही ठोकताळे त्यांनी बांधलेले आहेत.
राज यांच्या भाषणात पूर्वी मराठीचाच मुद्दा प्रमुख असायचा. कोल्हापूर व खेड येथीलही त्यांच्या भाषणात मराठीचा मुद्दा असला तरी बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणे त्यांनी अनेक राष्ट्रीय मुद्द्यांनाही हात घालण्याचा प्रयत्न केला. अफझल गुरूपासून ते पंतप्रधानांपर्यंत अनेक मुद्द्यांना त्यांनी स्पर्श केला. तसेच, काँग्रेस व राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष दिल्लीच्या आदेशाने चालतात, ही अस्सल बाळासाहेब शैलीतील टीकाही त्यांनी केली. राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना सभा शिवाजी पार्क येथे घेतली तेव्हा महंमद पैगंबरांच्या डॅनिश व्यंगचित्रकाराने काढलेल्या व्यंगचित्राचे प्रकरण गाजत होते. राज यांनी त्या वेळी म्हटले होते की, ज्या व्यक्तीचे मूळ चित्रच उपलब्ध नाही, त्याचे व्यंगचित्र कसे काय असू शकते. राज यांची ही भूमिका शिवसेना व बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेपासून 180 अंश कोनात विरुद्ध दिशेला होती. त्यांच्या या वाक्यावर मुस्लिम जगतामध्ये सुखद आश्चर्य व्यक्त करण्यात आले होते. त्यानंतर मनसेच्या निघालेल्या शाखा पाहिल्यास त्या मुंबईतील माहिम, वांद्रे अशा मुस्लिमबहुल इलाख्यात निघाल्याचे दिसू लागले. मात्र बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर राज यांनी हळूहळू बांगलादेशींचा मुद्दा लावून धरायला सुरुवात केली आहे. राज यांचा हा मुद्दा पुढे बाळासाहेबांप्रमाणेच ‘लांड्यांना या देशातून हाकलून द्या’, इथपर्यंत यायला वेळ लागणार नाही. त्याआधी मराठीच्या नावावर राज्यातील लुम्पेन तरुणाला मनसेच्या झेंड्याखाली एकत्र आणण्यासाठी ते इतर पक्षांची व त्यांच्या नेत्यांची टिंगलटवाळी करत आपल्या भाषणात शिव्यांचा यथेच्छ वापर करत वातावरणनिर्मिती करणार, यात वाद नाही. एकदा का खालचा स्तर मजबूत झाला की शेवटी ते बाळासाहेबांप्रमाणेच ‘हिरव्या सापांना ठेचून टाका’ या भूमिकेवरच येणार, हे त्यांच्या या दोन सभांमधून जाणवू लागले आहे. तसेच भविष्यात त्यांची स्पर्धा ज्या अजित पवार यांच्याशी होऊ शकते, त्यांच्यावरही त्यांनी धारदार टीका केली आहे. अजित पवार यांच्याकडे राज यांच्यासारखी स्टाइल नसली तरी राज्यातील बहुतांश मतदारसंघांत व विशेषत: ग्रामीण महाराष्ट्रामध्ये त्यांना फॉलोइंग मोठे आहे, याची राज यांना जाण आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या स्थानिक नेतृत्वाच्या विरोधात जी नवी पिढी तयार होते आहे, त्यांना याद्वारे संदेश देऊनत्यांचे धैर्य वाढवण्याचाही राज यांचा प्रयत्न आहे. कोल्हापूरच्या सभेत गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या घरच्यांनाही आम्हाला धमकवावे लागेल, असे बोलून तर राज यांनी आपल्या काकांच्याही पुढे एक पाऊल टाकले आहे. मात्र दुर्दैवाने संयतपणाच्या नावाखाली राज्याच्या गृहमंत्र्यांनी राज ठाकरे काय बोलतात याकडे लक्ष देण्याची गरज नाही, असे सांगून यावर भाष्य करणे टाळले आहे.
येत्या लोकसभा निवडणुकीत राज कुणाबरोबरही युती करणार नाहीत, हे खरे असले तरी भाजपसारख्या पक्षाबरोबर काही जागांवर ते छुपेपणाने समझोता करू शकतील. काही ठिकाणी आपल्याला योग्य उमेदवार न मिळाल्याचे किंवा पक्षाची ताकद नसल्याचे कारण ते त्या वेळी देतील. मात्र त्यांचे प्रमुख टार्गेट असलेल्या शिवसेनेला ते कोणतीही संधी देणार नाहीत. मुंबई, खान्देश व पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर अशी काही शहरे सोडल्यास मराठवाडा व विदर्भात त्यांच्याकडे फारसा जनाधार नाही, हे ते जाणून आहेत. त्यामुळेच ज्या ज्या मतदारसंघांमध्ये हर्षवर्धन जाधव यांच्यासारखे तगडे उमेदवार मिळतील तेथे तेथे राज जोरदार प्रयत्न करणार, हे निश्चित! कोल्हापूर व खेड येथील राज यांच्या जंगी सभांमुळे निवडणुकांना अजून वर्ष असले तरी तयारीचा बिगुल वाजायला सुरुवात झाली आहे. आता या धुमश्चक्रीत आणखी कोण कोण कसे कसे उतरतात आणि रंग आणतात, ते येत्या काही दिवसांमध्येच दिसू लागेल.
samarkhadas@gmail.com

Next Article

Recommended