आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्मठ विचारांचा व्यूह आणि दाभोलकरांचे हौतात्म्य... जनतेसाठी अविरत झुंज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक व्यवस्थेतलं मानवी शोषण हेरून त्याचं निर्मूलन करणं, हा लेखकाचा आद्य वसा नरेंद्र दाभोलकरांनी जन्मभर निष्ठेने पाळला. आपण राहतो, त्या सांस्कृतिक विश्वातल्या शोषणाच्या, हिंसेच्या आणि अन्यायाच्या भेगा बघणं हे द्रष्ट्या लेखकाचं काम दाभोलकरांनी इमानेइतबारे केलं. केवळ ‘आपल्या’ आहेत म्हणून विषम आणि हिंसक परंपरांचं त्यांना कौतुक नव्हतं. डॉ. दाभोलकर परंपरानिष्ठ नव्हते, ते बुद्धिप्रामाण्यवादी लेखक होते.

संत वाङ्मयाच्या श्रद्धाळू आणि सर्वसमावेशक वारशावर अधिकार सांगणार्‍या मेनस्ट्रीम मराठी साहित्याला परंपरेचं अतोनात कौतुक आहे. अशा परंपरोत्सुक, साहित्यिक पर्यावरणात बुद्धिप्रामाण्यवाद आत्मसात करताना विवेकनिष्ठ लेखकांना उपेक्षेची आणि अपमानाची किंमत मोजावी लागते. दाभोलकरांची माणसावर असीम श्रद्धा होती, पण माणसं धर्माच्या नावाने, परंपरेच्या नावाने जी हिंसक कर्मकांडं करतात, त्यांना दाभोलकरांचा विरोध होता.

भारतासारख्या अस्मितावादी, परंपरावादी आणि संस्कृतीवादी समाजात श्रद्धांचं रूपांतरण केव्हा अंधश्रद्धेत होईल, हे सांगता येणं अशक्य आहे. अशा पारंपरिक समाजात परंपरानिष्ठांची चंगळ, तर परंपरा चिकित्सकांची परवड होते. सुरक्षित परंपरेच्या वळचणीला उभं राहायचं की स्वत:चा जीव धोक्यात घालून विवेकनिष्ठ आत्मप्रत्ययानुसार जगायचं? हा चॉइस आधुनिक जाणिवेच्या लेखकाला चुकला नाही. दाभोलकरांनी आधुनिक जाणीव आपली मानली आणि धर्मचिकित्सेची रिस्क घेतली. ही रिस्क घेणारे लेखक मराठी साहित्यात वाढत नसून कमी होतायत, हे वास्तव आहे.

विवेकवादाचा पराभव शस्त्रांनी होत नाही. प्रखर विवेकवादी विचारसरणीला प्रखर अध्यात्मवादी युक्तिवादाने स्तब्ध करता येतं, असं मानणारे काही विचारवंत आहेत; पण विवेकवादासमोर धार्मिक युक्तिवाद मात्र कुचकामी आहे, हे सिद्ध झालं आहे. दाभोलकरांच्या हौतात्म्यातून जो सार्वत्रिक जनक्षोभ निर्माण झाला त्यातून मराठी मनावरची सनातनी पकड सैल व्हावी, अशी अपेक्षा करता येते. साहित्य हे जर चालू युगाचं न्यूट्रल वाचन असेल, तर हे वाचन करताना धार्मिक परंपरांचं वर्णन आवश्यक ठरतं. ते जर मानवी प्रगतीचं सूचन असेल तर या परंपरांची चिकित्सा आवश्यक ठरते.

विज्ञान ही एक पडताळा घेता येण्यासारखी नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्या तुलनेत ‘सनातन’ हा केवळ भाषेतला एक शब्द आहे. ‘सनातन’ अशी कुठलीही नैसर्गिक प्रक्रिया किंवा अवस्था नाही. ती काव्यात्मक कल्पना आहे. हिंदू विचारव्यूहात शब्दकेंद्रित संकल्पनांना अवाजवी महत्त्व दिलं गेल्याने जाणीवकेंद्रित अस्तित्वाकडे दुर्लक्ष झालं. त्यातून श्रद्धेचा आणि सच्चेपणाचा क्रायसिस निर्माण झाला. त्यातून जाणीवकेंद्रित मानवी श्रद्धा अंधश्रद्धेत परावर्तित झाल्या. त्यातून दुष्ट परंपरा, अन्याय्य आचारविचार आणि स्त्रीच्या शोषणाचे विविध मार्ग सनातन्यांना सापडले. दाभोलकरांच्या दुर्दैवी खुनाला ‘दैवी’ घटना म्हणण्याचं धाडस फक्त शून्यवादी म्हणजे निहिलिस्ट माणसंच करू जाणे. हा निहिलिझम निरपराध माणसांचे कसे बळी घेतो, हे डोस्टोव्हस्की त्याच्या ‘डेव्हिल्स’मधून सांगतो.

मध्ययुगीन किंवा प्रागैतिहासिक विचारसरणी आवडणारी म्युझियममध्ये शोभेल, अशी एक कर्मठ मानवी संवेदनशीलता असते. ती कायम सरलेल्या युगात रमते आणि येणार्‍या युगाचा दुस्वास करते. मराठी साहित्यात या संवेदनशीलतेला बरेच अनुयायी लाभले आहेत. मराठी साहित्यात पौराणिक आणि ऐतिहासिक पराक्रमाची परंपरा लोकप्रिय आहे. तिच्यात मनोरंजनाची गॅरंटी आहे; पण तिच्यातून मानवकेंद्रित समाज प्रबोधन होणं अशक्यच, कारण आपली पुराणं अतिरंजित, तर आपले इतिहास अतिशयोक्त आहेत. दोन्ही उच्चवर्णीयांची मक्तेदारी आहेत. दाभोलकरांनी हे ओळखून पुराण आणि इतिहासाची विरचना केली होती. आधुनिक विचारांच्या तुलनेत सनातनी विचार झटकन लोकप्रिय होतात, कारण असे विचार माणसाला सुरक्षेची बोगस कवचकुंडलं पुरवतात. ही सुरक्षा तद्दन खोटी आहे, हे सनातन्यांना माहीत असल्याने ते आपली श्रद्धा दुसर्‍यांवर लादण्यासाठी हिंसेचा आधार घेतात आणि विवेकावर विश्वास ठेवणार्‍यांना नामोहरम करतात.

लेख वाचण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...