Home »Magazine »Rasik» Rasik Article On Oscar Awards

मतस्वातंत्र्याचे दावेदार

सुजय शास्त्री | Feb 23, 2013, 23:41 PM IST

  • मतस्वातंत्र्याचे दावेदार

जगभरातल्या सिनेरसिकांमध्ये सर्वाधिक चर्चेचा विषय असलेल्या 85व्या ऑस्कर पुरस्काराची घोषणा आज (भारतीय प्रमाणवेळेनुसार 25 फेब्रुवारी पहाटे) होणार आहे. ऑस्कर सोहळ्यातील चित्रपट, त्यांचे लॉबिंग व बॉक्स ऑफिसवर या चित्रपटांनी दाखवलेली कामगिरी अशा कारणांनी ऑस्कर सोहळा चर्चेत असतो. एखाद्या चित्रपटाचे एखाद्या वर्गासाठी (कॅटेगरी) ऑस्करसाठी नामांकन होणे व त्या चित्रपटाला तो पुरस्कार मिळणे, ही एक प्रदीर्घ प्रक्रिया आहे. थोडक्यात, आपला चित्रपट इतर चित्रपटांच्या तुलनेत उत्कृष्ट आहे, हे ऑस्कर परीक्षकांच्या गळी उतरवण्यासाठी लॉबिंग करावे लागते. लॉबिंग करणे याचा अर्थ पैसे चारणे किंवा पार्ट्या झोडणे नव्हे! लॉबिंग म्हणजे चित्रपटाची कथा, त्याचे सादरीकरण, दिग्दर्शकीय शैली, अभिनय, इतर तांत्रिक बाबी यांची संपूर्ण माहिती परीक्षकांपुढे आणणे. त्यांचे मत अजमावून घेणे. ऑस्करचे परीक्षक हे जगभरातले तज्ज्ञ असतात. या परीक्षकांकडून वर्षभरात प्रसिद्ध झालेले चित्रपट पाहिले जातात व त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर ऑस्कर पुरस्कारांची अंतिम यादी बनवली जाते. या अंतिम यादीतून चित्रपट निर्मितीशी संबंधित विविध विभागांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. अनेकदा ऑस्कर पुरस्कारासाठी नामांकन झालेले चित्रपट अमेरिकेतील वादग्रस्त अशा राजकीय, सामाजिक, आर्थिक, पर्यावरण, ऐतिहासिक विषयांवर असतात. अशा वेळी लॉबिंग हे फार महत्त्वाचे ठरते. यंदा ‘अर्गाे’, ‘झीरो डार्क थर्टी’ आणि ‘लिंकन’ हे तीन चित्रपट राजकीय विषयांवर आधारित असल्याने त्यांच्याबाबत मीडियामध्ये उत्सवी नव्हे गंभीरपणे चर्चा सुरू आहे. या तिन्ही चित्रपटांच्या दिग्दर्शक, निर्माते आणि पटकथाकारांनी मतस्वातंत्र्याचा आपला अधिकार अधोरेखित केला आहे. या मतस्वातंत्र्याच्या त्यांच्या आग्रहामुळे हा सोहळा चर्चेत राहण्याची शक्यता अधिक आहे.
1979 मध्ये अमेरिकी राजनैतिक अधिकार्‍यांना इराणमध्ये ओलीस ठेवण्याच्या नाट्यावर आधारलेला ‘अर्गो’, ओसामा बिन लादेन याच्या शोधमोहिमेवर आधारित ‘झीरो डार्क थर्टी’ व अमेरिकेचे माजी अध्यक्ष अब्राहम लिंकन यांच्या कार्यकाळातील गुलामगिरी निर्मूलन कायद्यावर आधारित ‘लिंकन’ हे तीन चित्रपट सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या नामांकन यादीत आहेत. (याव्यतिरिक्त ‘लाइफ ऑफ पाय’, ‘जँगो अनचेंज्ड’, ‘ला मिझरेबल’, ‘सिल्व्हर लायनिंग प्लेबुक’, ‘बिस्ट ऑफ द सदर्न वाइल्ड’ व ‘अमूर’ हे चित्रपटही आहेत.) या तिन्ही चित्रपटांचे विषय अमेरिकेच्या राजकारणाशी संबंधित असल्याने इतर चित्रपटांपेक्षा हे तीन चित्रपट लक्षवेधी ठरले आहेत.
गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात ‘लिंकन’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. ऑक्टोबर महिन्यात अमेरिका अध्यक्षीय निवडणूक असल्याने या चित्रपटाचे प्रदर्शन लांबवण्यात आले होते. यावरून या चित्रपटाचे दिग्दर्शक स्टीव्हन स्पिलबर्ग यांच्यावर टीकाही झाली होती. ‘लिंकन’ चित्रपट निवडणुकांच्या काळात प्रदर्शित झाला असता तर त्याचा फायदा रिपब्लिकन पक्षाला झाला असता (लिंकन हे रिपब्लिकन पक्षाचे होते) पण स्पिलबर्ग हे डेमोक्रेटिक पक्षाच्या जवळ असल्याने त्यांनी चित्रपटाचे प्रदर्शन लांबवले, असा आरोप करण्यात आला होता. खुद्द स्पिलबर्ग यांनी एका मुलाखतीत असे सांगितले की, ‘हा चित्रपट अध्यक्षीय निवडणुकांच्या काळात प्रसिद्ध झाला असता तर लिंकन हे रिपब्लिकन पक्षाचे होते की डेमोक्रेटिक पक्षाचे होते यावरून या चित्रपटाचा ‘राजकीय फुटबॉल’ झाला असता आणि लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असता.’
स्पिलबर्ग यांनी ‘लिंकन’चा स्पेशल शो अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्यासाठी ‘व्हाइट हाऊस’मध्ये ठेवला होता. ओबामा या चित्रपटाने भारावून गेले, अशा प्रकारच्या बातम्या मीडियात आल्याच; पण ‘लिंकन’ चित्रपटाच्या माध्यमातून अमेरिकेच्या राजकारणात ‘आदर्शवादा’ची नितांत गरज आहे, असाही संदेश स्पिलबर्ग यांना द्यायचा होता, असे आरोप रिपब्लिकनांकडून झाले. ‘लिंकन’ची पटकथा टोनी कुशनर यांनी लिहिली असून ‘टीम ऑफ रायव्हल्स’ या डोरिस गुडविन या इतिहासकाराच्या पुस्तकावर ती बेतली आहे. टोनी कुशनर यांनी याअगोदर ‘म्युनिक’ या चित्रपटाची पटकथा लिहिली होती. या पटकथेवर अमेरिकेतील ज्यू समाजातून टीका झाली होती. ‘म्युनिक’मधून इतिहासाचे दर्शन घडवण्याऐवजी इस्रायल सरकारचे खुनशी राजकारण अधिक दाखवल्याचा आरोप कुशनर यांच्यावर करण्यात आला होता. ‘लिंकन’मध्येही इतिहासाचा विपर्यास केल्याचे बोलले जाते. कुशनर यांच्या मते, डोरिस गुडविन यांचे पुस्तक हे काल्पनिक पण महत्त्वाचा ऐतिहासिक दस्तऐवज आहे. कथेमधील काही तपशिलांशी तडजोड चित्रपटात केली आहे, पण ‘लिंकन’मध्ये दाखवण्यात आलेले राजकारण हा अमेरिकेच्या राजकारणातील महत्त्वाचा अध्याय असून तो प्रामाणिकपणे मांडण्यात आला आहे.
‘झीरो डार्क थर्टी’ या चित्रपटावरही रिपब्लिकन खवळले आहेत. या पक्षाचे तीन प्रभावशाली सिनेटर डायन फेनस्टेन, कार्ल लेव्हिन, जॉन मॅकेन (2008च्या अध्यक्षीय निवडणुकांमध्ये मॅकेन हे ओबामा यांच्या विरोधात उभे होते) यांनी ‘झीरो डार्क थर्टी’च्या कथेवरच टीका केली आहे. या चित्रपटाद्वारे अफगाणिस्तानात बंदिवान कैद्यांची शारीरिक छळवणूक दाखवण्याची गरज नाही. अशी दृश्ये दाखवणे हा ओबामा प्रशासनाचा डाव आहे, असाही आरोप या सिनेटरांनी केला आहे. ‘झीरो...’ची पटकथा मार्क बोवेल यांची आहे. (बोवेल यांनी या अगोदर ‘द हर्ट लॉकर’ या अफगाणिस्तानातील परिस्थितीवर पटकथा लिहून वादळ निर्माण केले होते.) या चित्रपटात कुख्यात दहशतवादी ओसामा बिन लादेनला पकडण्यासाठी सीआयएने आखलेल्या मोहिमेचे चित्रण असल्याने ही माहिती ओबामा प्रशासनाने चित्रपट निर्मात्यांना पुरवली, असाही आरोप करण्यात आला होता. ‘अर्गाे’ या चित्रपटावरही अशीच टीका झाली. अमेरिकी दूतावासातील ओलिसांना सोडवताना झालेल्या संघर्षात इराणी सैनिकांकडून अत्याचार झाल्याचे चित्रण हा इतिहासात जाणूनबुजून बदल करण्याचा प्रयत्न आहे; अमेरिकी साम्राज्यवाद किंवा तिची लष्करी ताकद दाखवताना इस्लामी जगतात उमटणार्‍या प्रतिक्रियांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे, असेही काहींचे मत आहे. ओबामा प्रशासनाने इस्लामी जगताशी सौहार्दाचे संबंध जोडण्यासाठी बरेच प्रयत्न केले आहेत. या प्रयत्नांना हॉलीवूडची साथ द्यावी का, हाही मुद्दा प्रकर्षाने या निमित्ताने पुढे आला आहे.
हॉलीवूडचे अनेक युद्धपट किंवा राजकीयपट हे सहसा अमेरिकी जनमानसाच्या विरोधातले नसतात. अमेरिकेची लष्करी ताकद आणि तिच्या साम्राज्यवादाचा गौरवपर उल्लेख करण्याची हॉलीवूड चित्रपटांची परंपरा आहे. पण गेल्या काही वर्षांत अमेरिकेच्या अंतर्गत राजकारणाचे विषय हॉलीवूड चित्रपटांमधून पुढे येत आहेत. हा बदल जाणकार चित्रपट रसिकांना सुखावणारा आहे, शिवाय मतस्वातंत्र्याबाबत हॉलीवूड चित्रपट अधिक आग्रही होत आहेत, हाही महत्त्वाचा भाग आहे. मतस्वातंत्र्याच्या या लढाईत ऐतिहासिक घटना नव्हे तर इतिहासाची मांडणी वेगवेगळ्या पद्धतीने होणार आहे आणि तेच महत्त्वाचे आहे. यंदाचे ऑस्कर कुणाही चित्रपटाला मिळो, परंतु स्पर्धेत असलेल्या तीन चित्रपटांनी पुनर्मांडणी करण्याचे दाखवलेले धाडस हेच यंदाच्या ‘ऑस्कर’चे वेगळेपण ठरले आहे.

ऑस्करचे मंडळ
अमेरिकेत निर्माण होणार्‍या चित्रपटांचा रसास्वाद व त्यांची दखल घेणार्‍या ‘द अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर ऑफ आर्ट्स अँड सायन्सेस’ची स्थापना 1927 मध्ये लॉस एंजलिस येथे करण्यात आली. या संस्थेत प्रथम 36 सदस्य होते. डग्लस फेअरबँक हे पहिले अध्यक्ष झाले. 1929 मध्ये पहिल्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. नंतर या संस्थेचा विस्तार होऊन आज सुमारे साडेसहा हजारांहून अधिक कलावंत व व्यावसायिक या संस्थेचे परीक्षक मंडळ म्हणून काम पाहतात. सध्या ऑस्करच्या बोर्ड ऑफ गव्हर्नरमध्ये 15 सदस्य असून प्रत्येक सदस्य चित्रपट निर्मितीसंबंधित विभागाशी संबंधित असतात. ऑस्करने अभिनय, दिग्दर्शन, संकलन, कला दिग्दर्शन, पटकथा, छायाचित्रण, गीतकार-संगीतकार, रंगभूषा व केशरचना, निर्माते, ध्वनी संयोजक, व्हिज्युअल्स इफेक्ट, वेशभूषा, अ‍ॅनिमेटर, लघुपट निर्माते-दिग्दर्शक व जनसंपर्क प्रमुख अशा 15 विभागांची रचना केली आहे. प्रत्येक विभागात साधारण आठ ते दहा सदस्य असतात. या सदस्यांना मदत करणारे इतर असतात. अगदी उदाहरण द्यायचे झाल्यास अभिनय विभागाचा सदस्य म्हणून प्रसिद्ध अभिनेता टॉम हँक्स हे काम पाहत आहेत, तर मायकेल मान हे दिग्दर्शकीय विभागाचे सदस्य आहेत. या 15 बोर्ड ऑफ गव्हर्नरांच्या अंतिम मतानंतर ऑस्करचे पुरस्कार घोषित केले जातात. बोर्ड ऑफ गव्हर्नरमध्ये समाविष्ट सदस्यांनी बहुतांश करून ऑस्कर पुरस्कार मिळवलेला असतो किंवा त्यांचे किमान ऑस्कर पुरस्कारासाठी नामांकन झालेले असते.

sujayshastri@gmail.com

Next Article

Recommended