आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुरुमुखी साहित्य-संवेदना

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंजाबी भाषा ही वैदिक भाषा समजली जाते. साधारणत: दहाव्या शतकापासून ती अस्तित्वात असावी, असे भारतीय भाषांचे अभ्यासक काकासाहेब कालेलकर यांनी म्हटले आहे. पंजाबी भाषेची लिपी ‘गुरुमुखी’ असून तीसुद्धा ब्राह्मीपासूनच तयार झाली, असे समजले जाते. लिपिबद्ध नसणारे मौखिक लोकसाहित्यही पंजाबीत पूर्वीपासून उपलब्ध आहे.
पंजाबी साहित्यात सुफी संस्कृतीचा प्रभाव पूर्वीपासून राहिला आहे. तरी कोणत्याही भारतीय भाषांप्रमाणे पंजाबी भाषा आणि साहित्याला आधुनिक रूप आले ते ब्रिटिशांमुळेच. ब्रिटिश अधिकार्‍यांना पंजाबी भाषा शिकता यावी म्हणून शारदा राम फिलोरी या गृहस्थाने ‘पंजाबी बातचीत’ नावाचे पुस्तक साधारणत: 1875 मध्ये लिहिले. पंजाबमधल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांतून बोलल्या जाणार्‍या पंजाबीची ओळख या पुस्तकातून होते. पुढील काळात शिखांचा इतिहास सांगणारी काही पुस्तके लिहिली गेली, तर काहींनी आधुनिक साहित्याचा मार्ग स्वीकारताना परंपरांना छेद दिला. ही गोष्ट तत्कालीन समाजाने स्वीकारली नाही.
भाई वीरसिंग (1872-1957) यांना ‘आधुनिक पंजाबी साहित्याचे जनकत्व’ बहाल केले जाते. आपल्या लेखनाला आणि साहित्यव्यवहाराला त्यांनी व्यावसायिक रूप देण्याचा प्रयत्न सर्वात प्रथम केला. ‘गुरुग्रंथकोश’, ‘गुरुग्रंथसाहिबची डिक्शनरी’ अशा ग्रंथातून कोशवाङ्मयाचा प्रारंभ केला. भाई वीरसिंगांची ओळख कवी म्हणून अधिक ठळक आहे. पंजाबी कवितेला त्यांनी नवी परिमाणे दिली आणि परंपरेतून मुक्त केले. भाई वीरसिंगांचा हा धागा पकडून पुढे ‘चैत्रिक’ (धनी राम) या कवीने पंजाबी कवितेला सौंदर्यवादाकडे नेले. त्याचबरोबर फाळणीपूर्वी आणि नंतर हिंदू आणि मुस्लिमांच्या रक्ताचे पाट ज्या पंजाबमधून वाहिले, त्यातून निर्माण झालेली अस्वस्थता चैत्रिकच्या कवितेतून व्यक्त होत आली. चैत्रिक याचा अर्थ ‘चातक’. चातक पावसाळ्यातला थेंब सोडला तर बाकी काळ दु:खद तहानलेपण सहन करतो. ही तहान चैत्रिकच्या साहित्यातून वाचकांना अंतर्मुख करत आली.
पुढील काळात कृपासागर, कर्तारसिंग कलसवालिया, पुराणसिंग, मोहनसिंग, दिवानसिंग, अवतारसिंग आझाद अशा अनेक कवींनी पंजाबी काव्याला नवा चेहरा दिला. याबरोबरच ‘जालियनवाला बाग’, ‘गदर चळवळ’ अशा अनेक घटनांचा परिणाम पंजाबी साहित्यावर झाला आहे. ‘मुसाफिर’ या टोपणनावाने कविता करणारे ग्यानी गुरुमुखसिंग यांनी पंजाबी कविता घरोघर पोहोचविली. लोकप्रिय केली. त्यांच्या कविता ऐकण्यासाठी दूरदूरवरून लोक जमा होत. याचा परिणाम म्हणून पंजाबमधील सांस्कृतिक, राजकीय आणि धार्मिक कार्यक्रमात व व्यासपीठावर त्यांना मानाचे स्थान दिले गेले. शीख धर्म आणि शीख गुरूंबद्दलच्या त्यांच्या कविता जेवढ्या लोकप्रिय तेवढ्याच सामाजिक आणि मातृभूमीच्या अभिमानाच्या व प्रेमाच्या कविता प्रसिद्ध आहेत. 70-80च्या दशकात याचबरोबर अवतारसिंग संधू ‘पाश’ यांच्या विद्रोही कवितांनी साहित्य रसिकांची मने जिंकली होती. विशेषत: त्यांच्या ‘सबसे खतरनाक’ असे शीर्षक असलेल्या कवितेने संवेदना थरारून टाकली होती.
अशा अनेक कवींनी पंजाबी कवितेला मोठे योगदान दिले. अनेकांची कविता पंजाबीतून अन्य भाषांतही लोकप्रिय झाली. त्यात अमृता प्रीतम यांचे नाव अग्रणी आहे. त्यांच्या कवितेने पंजाबची सीमा ओलांडली. वयाच्या सतराव्या वर्षीच ‘अमृत लहरे’ हा त्यांचा कवितासंग्रह प्रसिद्ध झाला. प्रथम त्या अमृता कौर या नावाने कविता करत होत्या. ‘जिंदा जीवन’ (1939), ‘ट्रेल धोते फूल’ (1943), ‘ओ गीतन वालिया’ (1943), ‘बादलन दा पाले’ (1943) आणि ‘सांजी दि लाली’ (1943) एवढे कवितासंग्रह प्रकाशित झाले. पंजाबी समीक्षकांच्या मते, अमृताच्या याकविता काही फारशा प्रगल्भ नाहीत. तरीही या कविता रोमँटिक आणि प्लॅटोनिक अनुभव देणार्‍या आहेत; तेही एक धाडसच होते, जे अमृताने केले. लवचीक आणि आधुनिक शैलीमुळे अमृताच्या कवितेने लक्ष वेधून घेतले. परंतु पुढे 1944 मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘लोक पील’ या कवितासंग्रहातून त्यांनी समाजाच्या वेदना मांडतानाच आपल्या कवितेला प्रागतिक आणि आधुनिक चेहरा दिला. येथे प्रेम आणि शृंगार यांपासून त्यांची कविता मुक्त समाजाच्या उत्क्रांत होणार्‍या नव्या जीवनाकडे वळते. ‘पत्थर गीते’ या कवितासंग्रहातून अमृता यांनी सामाजिक वास्तव मांडतानाच पारंपरिक पद्धतीतील प्रेमाच्या नैतिकतेचा प्रश्न उपस्थित केला आहे. ‘अन्नदाता’सारख्या कवितेतून तर नवरा म्हणजे केवळ अन्न देऊन स्त्रीकडून प्रेम आणि शरीराची मागणी करणारा पुरुष; ज्याला फक्त त्या स्त्रीकडून शरीरच मिळू शकते, असा ‘स्त्रीवादी’ हुंकारही टाकला आहे.
अमृता प्रीतम या स्वातंत्र्यसेनानी होत्या. त्यामुळे फाळणीची शोकांतिका त्यांच्या कवितेत येणे क्रमप्राप्त आहे. स्वातंत्र्योत्तर काळात पंजाबी भाषेमध्ये लेखकांची नवी फळी निर्माण झाली. कविता, कादंबरी, लघुकथा, आत्मचरित्रे असे सगळे विषय प्रतिभावंतांनी पंजाबी भाषेत हाताळले आणि समृद्ध साहित्य निर्माण केले. नाटककारांनी पंजाबी रंगभूमीला अनेक उत्तम नाटके दिली. हा संपूर्ण स्वतंत्र लेखाचा विषय आहे. पंजाबी साहित्यात उत्तम समीक्षक आहेत. पंजाबी प्रकाशक मित्रांशी आजच्या साहित्याबद्दल चर्चा केली तेव्हा समजले की, इतर भारतीय भाषांतील लेखकांसमोर जे प्रश्न आहेत, तेच आज नव्याने लिहिणार्‍या पंजाबी भाषेतील लेखकांसमोर आहेत. विद्यापीठाची पदवी मिळविणे एवढेच माफक ध्येय आजच्या पिढीसमोर आहे. अभिजात साहित्याचे वाचन आजचे महाविद्यालयीन विद्यार्थी करत नाहीत.
एकेकाळी ‘खालसा कॉलेज अमृतसर’ ही पंजाबी लेखकांची मक्का समजली जायची. अनेक मान्यवर लेखक, कवी, समीक्षक तेथे अध्यापनाचे कार्य करत होते. आज असे प्राध्यापक तिथे नाहीत. ‘पंजाब शासनाचा भाषा विभाग’, ‘पंजाब विद्यापीठ चंदिगड’, ‘पंजाब विद्यापीठ पतियाला’ या संस्थांतून पूर्वी पंजाबी भाषा आणि वाङ्मय यासाठी मोठे वातावरण व सुविधा दिल्या होत्या. आता तेथे कामाची पातळी पार खालावली आहे. बुद्धिमान आणि प्रतिभावंतांचा शोध घेणे, त्यांच्या कलात्मक गुणांचे संगोपन व विकास करणे, त्यांना आवश्यक ती मदत देणे, या गोष्टी अशा संस्थाही करत नाहीत आणि समाजही करत नाही.
पंजाबमधील प्रकाशक मित्र दिल्लीत भेटले तेव्हा त्यांनी पंजाबमधील आजच्या साहित्यिक वातावरणाबद्दल या गोष्टी सांगितल्या. या ऐकल्यावर एकच प्रश्न मनात आला, तो म्हणजे आपल्याकडे तरी वेगळे काय घडत आहे...
arunjakhade@padmagandha.com
(पुढील आठवड्यापासून तेलगू समाजाच्या योगदानाची दखल घेणारी लेखमाला)