Home »Magazine »Rasik» Rasik Article On Raj Thackeray Speech

टाळ बोले 'टाळी'ला, जा 'त्याच्या'संगं...

चंद्रहास मिराजदार | Feb 23, 2013, 22:48 PM IST

  • टाळ बोले 'टाळी'ला, जा 'त्याच्या'संगं...

राजसाहेबांच्या सभेतून ‘टाळी’ दमूनभागून आली होती. तिला सभेत चांगलंच काम पडलं होतं. राजसाहेबांच्या प्रत्येक वाक्याला टाळ्या पडत होत्या. आबांना दम दे, कुणाला तरी याद राख म्हण, कधी मनमोहनसिंगांची तर कधी सोनिया गांधींची नक्कल कर... हे ‘एक’च ‘पात्र’ सगळ्यांना भारी पडताना दिसत होतं. समोरचं पब्लिक टाळ्या वाजवता वाजवता चांगलंच चेकाळून गेलं होतं. त्या सभेत ‘टाळी’ला श्वास घ्यायलाही उसंत मिळाली नव्हती. महाराष्ट्राच्या विकासाची राहू द्या, पण सभा कशी जिंकावी याची ‘ब्ल्यू प्रिंट’ राजसाहेबांकडे नक्कीच तयार होती, हे टाळीला पुन्हा एकदा कळून चुकलं होतं. हे राजसाहेब घराबाहेर नेहमी का पडत नाहीत, अटलजी जसे दोन वाक्यांच्या मध्ये मोठ्ठा ‘पॉझ’ घ्यायचे, तसं राजसाहेब दोन सभांच्या मध्ये एवढा मोठ्ठा ‘पॉझ’ का घेतात? मधूनमधून राजसाहेब कुठे गायब होतात? असेही यक्षप्रश्न ‘टाळी’च्या मनात आले होते. पण आता हे राजसाहेब महाराष्ट्रभर सभा घेत हिंडणार म्हणजे आपला पिट्टा पडणार, या कल्पनेनेच ‘टाळी’ला दमायला झालं. तरी बरं, ऑर्केस्ट्रासारखे ‘वन्स मोअर’ सभेत घ्यावे लागत नाहीत, असा विचार करत टाळी मुकाट्याने आपल्या घरात शिरली. आल्या आल्या तिनं स्वत:ला बेडवर झोकून दिलं. दहा-पंधरा मिनिटे तिला चांगलीच डुलकी लागली. तेवढ्यात तिचा रूममेट असलेल्या ‘टाळा’च्या हाकेनं ‘टाळी’ला जाग आली. ‘टाळी’नं दार उघडलं. तिच्या मागोमागच ‘टाळ’ रूममध्ये आला. ‘टाळी’ने डोळे उघडले आहेत, हे पाहताच ‘टाळा’ने तपकीर काढली आणि आपल्या नाकपुडीत भरली. ‘तपकीरफुल्ल’ झालेल्या नाकपुडीनं त्यानं दीर्घ श्वास घेतला. दोन-चार शिंका येताच त्यानं धोतरानं नाक पुसलं. त्याच्या शिंकेच्या आवाजाने ‘टाळी’ची झोप कम्प्लिट उडाली.
‘कशाला उठवलंस रे मला?’- टाळी.
‘तुझा टीआरपी हल्ली लईच वाढलाय जणू’ हातातला पेपर बाजूला ठेवत ‘टाळा’नं मनातलं बोलून टाकलं.
‘माझ्याशिवाय माणसाचं पान हलत नाही. टीआरपीचं काय घेऊन बसला आहेस तू!’ ‘टाळी’ने ठसक्यात सांगितलं.
‘ते मला माहीत आहे गं. पण एक ‘टाळी’ न मिळाल्यानं समस्त मराठी बांधवांच्या ‘वन बीएचके’ विश्वात प्रचंड खळबळ उडालीय. हे वाच...’, असं म्हणत ‘टाळा’ने वाचकांच्या पत्रव्यवहाराचे पान ‘टाळी’कडे दिले.
‘अरे वा, मराठी माणूस माझ्यामुळे अस्वस्थ होतोय, हे ऐकून बरं वाटलं. पण माझा विश्वास बसत नाही यावर. मराठी माणूस सहजासहजी अस्वस्थ होत नाही. तो फक्त ‘स्वस्थ’ असतो. म्हणून तर बाहेरच्या लोकांना इथं कामं मिळतात ना.’ टाळी अगदी ‘कृष्णकुंज’मय झाली होती. ‘तो वेगळा विषय आहे. राजसाहेब म्हणाले, मी टाळी देणार नाही. म्हणजे काय पुन्हा पूर्वीसारखाच खेळ होणार. मराठी मतात फूट पडणार. सगळीकडे त्यामुळेच बोंबाबोंब चालू आहे. हे सगळं तुझ्यामुळं घडलंय.’ टाळाच्या स्वरातून सात्त्विक संताप बाहेर पडत होता. ‘वा रे माझ्या टाळभैरवा, संत आणि बुवांच्या संगतीत राहून तू एकदम भाबडा झाला आहेस बघ. साधा विचार कर. राजसाहेबांनी टाळी दिली असती तर त्यांना ती फार महाग पडली असती.’ इति ‘टाळी’.
‘आपल्या डोस्क्यात न्हाई शिरलं. जरा डीटेलमंदी सांग की’- टाळाची टकळी सुरूच राहिली.
‘अरे ते काय म्हणाले, तुम्ही आमच्याकडं ‘मनसे’ या, तुमचं स्वागत आहे. म्हणजे काय यांनी म्हणजे ‘मनसे’नं त्यांच्याकडं जायचं. समजा हे ‘तिकडे’ गेले तर यांना जागा कुठं मिळणारं? तिकडं ‘ते’ आहेत, त्यांचे ‘युवा नेते’ आहेत. डेपोतून एस. टी. भरून आली तर फलाटावरच्या लोकांना खालीच थांबावं लागतं. आता तरी शिरलं का डोस्क्यात तुझ्या? ‘यांनी’ टाळी दिली असती तर ‘यांना’ आयुष्यभर ‘टाळ’ कुटत बसावं लागलं असतं. म्हणून ‘यांनी’ टाळी दिली नाही. कळलं?’ ‘टाळी’ने स्पष्टीकरण दिलं आणि ‘टाळा’ची बोलतीच बंद झाली!
cm.dedhakka@gmail.com

Next Article

Recommended