आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकार्यकर्तृत्वास जिवंतपणीच रास्त दाद न मिळता मरणानंतर त्रिखंडात नावलौकिक प्राप्त झालेले असंख्य कलावंत जगाने पाहिले. मराठी रंगभूमीच्या नभांगणातील तेजस्वी नक्षत्र ठरलेले राम गणेश गडकरी ऊर्फ ‘गोविंदाग्रज’ हे अवलिया अशाच कमनशिबी प्रज्ञावंतांपैकी एक होते...
मागील काही दिवसांत, जगप्रसिद्ध डच चित्रकार व्हॅन गॉगचे एक चित्र काही लाख डॉलर्सला विकले गेल्याची बातमी वाचली. हयात असेपर्यंत हा चित्रकार स्वत: अत्यंत कठीण परिस्थितीत जगला होता. उणेपुरे 37 वर्षांचे आयुष्य. पण मेल्यानंतर त्याच्या चित्रांना भली मोठी किंमत आली. हा प्रकार काही फक्त चित्रकारांच्या बाबतीतच घडला असे नाही, तर इतर अनेक कला प्रांतातल्या कलाकारांच्या वाट्याला हे भोग आलेले आहेत.
हयात असेपर्यंत कामाचा लौकिक न पोहोचता जग सोडून गेल्यानंतर नावलौकिक नशिबी आलेला मराठी रंगभूमीच्या नभांगणातील आणखी एक श्रेष्ठ कलावंत म्हणजे ‘राम गणेश गडकरी’. मराठी नाटकाचा अभ्यास करताना स्वातंत्र्यपूर्व काळातल्या सुरुवातीच्या लेखकांचा अभ्यास करायचा झाल्यास किर्लोस्कर, देवल, खाडिलकरांनंतर प्रामुख्याने नाव घ्यावे लागते ते राम गणेश गडक-यांचे. राम गणेश म्हणजे मराठी रंगभूमीला लाभलेले एक अनमोल रत्न होय.
काही योगायोग अचंबित करणारे वाटतात. उदा. विष्णुदास भाव्यांनी आधुनिक मराठी रंगभूमीवरचे पहिले नाटक ज्या वर्षी सादर केले, त्याच वर्षी 1843 ला अण्णासाहेब किर्लोस्करांचा जन्म झाला. ज्या वर्षी अण्णासाहेब किर्लोस्करांचा अकाली मृत्यू झाला, त्याच वर्षी 1885 च्या मेमध्ये 26 तारखेला राम गणेश गडक-यांचा गुजरातेत नवसारीला जन्म झाला. (याच वर्षी व्हॅन गॉगच्या चित्रांचे पहिले जाहीर प्रदर्शन भरले होते.) जन्मानंतर भावंडांबरोबर गडक-यांचे प्राथमिक शिक्षण नवसारीलाच झाले आणि वडलांच्या फिरतीच्या नोकरीमुळे त्यांचे स्थलांतर पुण्याला झाले. परंतु गडकरी नऊ वर्षांचे असतानाच वडलांचे निधन झाले आणि कुटुंबावर जणू कु-हाड कोसळली. मोठे भाऊ विनायक बी. ए. पर्यंत शिकले.
राम गणेश 1905 मध्ये मॅट्रिक झाले. गणित, मराठी, इंग्रजी, संस्कृत या विषयांवर गडक-यांचे प्रभुत्व होते. फर्ग्युसनला बी.ए.साठी त्यांनी प्रवेशही घेतला होता. व्यवस्थित शिकून घराची जबाबदारी सांभाळावी, अशी जगातल्या सर्वच आयांसारखी त्यांच्याही माउलीची इच्छा होती; पण यांचे नाटकाचे वेड त्या माउलीस न झेपणारे होते. लग्न लावून दिल्यावर तरी पोर घराकडे लक्ष देईल असे वाटणे स्वाभाविकच होते. त्यानुसार गडक-यांचा विवाह झाला. पण तो काही टिकला नाही. त्यांची पत्नी त्यांना सोडून गेली. तरुणपणात अविरत चहा आणि विडीबरोबर आणखी कुठले व्यसन गडकरींना जडले असेल, तर ते अव्याहत वाचनाचे. गडक-यांचे वाचन अफाट होते.
खगोल, गणिताच्या संस्कृत ग्रंथांपासून, कवी कालिदासाच्या मेघदूतापर्यंत, भारतीय तत्त्वज्ञान, शास्त्रे, पुराणांपासून ते पाश्चिमात्त्य साहित्यापर्यंत सर्वदूर त्यांची मजल होती. कालिदास, भास, शूद्रकाबरोबरच शेक्सपियर, मोलियर, मिल्टन, मॅकोलेही त्यांना अवगत होता. जगभरच्या प्रमुख कवी, नाटककार, निबंधकार, तत्त्वज्ञांच्या अभ्यासामुळे जगाबद्दलची व्यापक झालेली दृष्टी आणि अंगभूत लाभलेले बुद्धीचे तेज. त्याशिवाय का इतक्या कमी वयात इतके विपुल काव्यसंग्रह, ललितलेख, निबंध, टीकालेख, मुलासांठी नाटुकल्या, आणि शिवाय नाटके लिहिणे शक्य झाले असेल? त्यांचे शब्दभांडार किती अमाप, विपुल होते हे त्यांची नाटके वाचल्यावर लक्षात येतेच.
पण अशा अफाट आणि अचाट बुद्धिमत्तेला परिस्थितीची योग्य साथ नसते तेव्हा माणसाला काय यातना सहन कराव्या लागतात, हे गडक-यांचे चरित्र अभ्यासल्यावर लक्षात येते. नाटकाच्या प्रेमाखातर त्यांनी किर्लोस्कर कंपनीत कसाबसा प्रवेश मिळवला. किर्लोस्कर कंपनीचे व्यवस्थापक शंकरराव मुजुमदार यांचा मुलगा श्रीधर हा गडक-यांचा कॉलेजमित्र. गडक-यांना शाळा, कॉलेजपासूनच कविता रचण्याचा, लिहिण्याचा नाद आहे, हे शंकररावांना माहीत होते. त्यामुळे त्यांनी गडक-यांना ‘किर्लोस्कर’च्या रंगभूमी मासिकासाठी लिखाणाची संधी दिली. गडकरी ‘किर्लोस्कर’मध्ये नोकरीला लागले ते डोअरकीपर म्हणून. महिना पगार 12 रुपये!
कंपनीत नाटकात काम करण्यासाठी म्हणून, तरुण 15-16 वर्षांची मुले कुठून कुठून दाखल व्हायची. या कोवळ्या मुलांची भाषा तितकी परिपक्व नसल्याने दुपारच्या वेळेत गडकरी या मुलांना चोरून योग्य उच्चार, भाषा शिकवायचे. हे एकदा एका नटाने पाहिले आणि एक डोअरकीपर मुलांना भाषेचे ज्ञान देतोय, हे देवलमास्तरांच्या कानावर घातले. देवलमास्तरांनी येऊन पाहिले आणि चुगली करणा-या नटालाच झापले. देवल म्हणाले, ‘हा जे काही सांगतो आहे ते बरोबरच आहे.’ त्या दिवसापासून गडकरी दिवसा मुलांना भाषा शिकवायचे आणि रात्री दरवाजावर तिकिटे फाडायचे. मुलांना ते शिकवायचे म्हणून त्यांना ‘मास्तर’ ही उपाधी सुरुवातीला हेटाळणीयुक्त चिकटली आणि नंतर रूढ झाली. याच कालावधीत त्यांचा धाकटा भाऊ गोविंद याचे अपघाती निधन झाले. गडक-यांना जबर मानसिक धक्का सहन करावा लागला. हा गोविंद त्यांना विशेष प्रिय असावा. त्याच्या अकाली जाण्यानेच त्यांनी भावाचे स्मरण राहावे म्हणून काव्याच्या प्रांतात ‘गोविंदाग्रज’ नाव लावायला सुरुवात केली. गडक-यांनी ‘विविधज्ञानविस्तार’, ‘ज्ञानप्रकाश’मध्ये अनेक लेख, निबंध लिहिले ते ‘सवाई नाटक्या’, ‘बाळक’, ‘बाळकराम’ या नावाने. काही वेळा तर बालंट येऊ नये म्हणून त्यांनी निनावीही लिखाण केले.
बाहेर इतके लिखाण चालू होते, पण नाटक कंपनीत त्यांना विशेष मान नव्हता. एकदा सकाळी गडकरी न्हाणीघरात अंघोळीला गेले असता, घंगाळ्यामधे गरम पाणी तयार असल्याने त्यांनी अंघोळीला सुरुवात केली आणि इतक्यात कंपनीचा एक प्रमुख स्त्रीपार्टी नट न्हाणीघरात अंघोळीसाठी हजर झाला. ते पाणी त्याने स्वत:साठी काढले होते. एक य:कश्चित डोअरकीपर आपण काढलेले पाणी घेऊन अंघोळ करतो आहे, हे पाहून त्याचे माथे भडकले आणि त्याने गडक-यांचा तिथेच पाणउतारा केला. खरे तर हा क्षुल्लक गैरसमजाचा भाग होता, पण त्या नटाने केलेला अपमान जिव्हारी लागल्याने गडक-यांनी ‘किर्लोस्कर’ कंपनी सोडली आणि त्या नटास सुनावले की, ‘परत जर कंपनीत पाऊल ठेवीन तर नाटककार म्हणूनच.’
जेमतेम 33-34 वर्षेच आयुष्य लाभलेल्या या अवलियाने मराठी रंगभूमीवर नेमके कोणते मानदंड निर्माण केले, ते पाहूच पुढच्या भागात....
rishijo@gmail.com
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.