आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रेरिख मेमोरियल ट्रस्ट :जागतिक कला वारशाची हेळसांड

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कलेला अध्यात्माची जोड मिळाल्यावर कशा प्रकारच्या सौंदर्याची निर्मिती होते, याचा प्रत्यय माझ्यासारख्या चित्रकलेचा गंध नसलेल्या विद्यार्थिनीला केवळ रेरिख पिता-पुत्रांच्या चित्र प्रदर्शनाने येतो. आपल्या आयुष्यातील 20 वर्षे चित्रकार निकोलाई रेरिख यांनी हिमालयात वास्तव्य केले. असंख्य चित्रे काढली. याच तपस्व्याने आपला अंतिम श्वासही तिथेच घेतला आणि त्यांची समाधीही हिमाचल प्रदेशमधील नग्गर येथेच आहे... मुख्य म्हणजे भारत भेटीवर आलेला रशियन बुद्धिजीवी हमखास त्यांच्याविषयी विचारतोच... मुळात, निकोलाई रेरिख आणि स्वेतास्लाव रेरिख ही नावे रशियन कलाविश्वाचा परिचय असलेल्या भारतीयांना आजिबातच नवीन नाहीत. वडील निकोलाई आणि स्वेतास्लाव त्यांचा मुलगा... निकोलाई रेरिख चित्रकार, तत्त्वज्ञ, लेखक, शास्त्रज्ञ असे बहुविध प्रतिभेचे रसायन होते... लहानपणापासूनच त्यांना चित्रकला, इतिहास, पुरातत्त्वशास्त्र यात रस वाटू लागला... आणि आयुष्यभर त्यांनी यात स्वत:ला झोकून दिले. पुढे या रशियन परिवारातील सर्व सदस्य पुरातत्त्वतज्ञ, चित्रकार, विद्वान झाले. या परिवाराने भारतात वास्तव्य करून तिला आपली ‘दुसरी मातृभूमी’ मानले. 1917मध्ये झालेल्या रशियन क्रांतीनंतर रेरिख यांनी रशिया सोडला आणि ते एक ‘प्रवासी कलाकार’ म्हणून विविध देशांमध्ये वास्तव्य करू लागले. 1917 ते 1919मध्ये रशियाला लागूनच असलेल्या फिनलँड, स्कॅन्डिनेव्हिया देशांत त्यानंतर 1919 ते 1920 लंडनमध्ये तर त्यानंतर 1923पर्यंत अमेरिकेत त्यांनी वास्तव्य केले. या काळात एक चित्रकार म्हणून परदेशात त्यांना चांगलीच ख्याती प्राप्त झाली. मात्र आयुष्यात एकदातरी भारतात विशेषत: हिमालयात जाऊन एक वैज्ञानिक अभियान करण्याचे उराशी बांधलेले स्वप्न पूर्ण करायचे म्हणून ते भारतात आले... त्यांची असंख्य चित्रे या त्यांच्या यात्रेतून प्रेरित झाल्याने निर्माण झाली आहेत. ही यात्रा त्यांच्यासाठी एक दीर्घ आध्यात्मिक यात्राच ठरली. पूर्वेच्या तत्त्वज्ञानाने रेरिख यांच्यावर अशी काही मोहिनी घातली की, पुढे अखेरच्या श्वासापर्यंत म्हणजे 1947 पर्यंत त्यांनी आपले कार्य भारतातच सुरू ठेवले. कला आणि संस्कृतीचे ‘दूत’ म्हणून आज त्यांच्या स्मृति आदराने दोन्हीही देशात जपल्या जातात. त्यांच्या पश्चात आज त्यांची सात हजार चित्रे संपूर्ण जगभरातील विविध संग्रहालयाची शोभा वाढवत आहेत. तर याबरोबरच त्यांची स्वत:ची डझनभर पुस्तके, लेखांचा ठेवा ते मागे सोडून गेले आहेत. मॉस्कोतील ‘रेरिख संग्रहालय’ यातील अनेक मोहवून टाकणाºया अनमोल ठेव्याचे जतन करत आहेच. रेरिख परिवारातील शेवटचे सदस्य चित्रकार, पद्मभूषण स्वेतास्लाव रेरिख (अनेक वर्षे भारतात वास्तव्य, सुप्रसिद्ध हिंदी चित्रपट कलाकार देविकारानी यांच्याशी विवाह. भारत सरकारतर्फे ‘पद्मभूषण’ पुरस्काराने सन्मानित) यांच्या पुढाकाराने या ठिकाणीच ‘आंतरराष्ट्रीय रेरिख मेमोरिअल ट्रस्ट’ सुरू करण्यात आले आणि त्यांनीच भारतातील रशियाचे राजदूत, पुरातत्त्व विषयक तत्त्वज्ञ आलेक्झांडर कदाकीन यांना या ट्रस्टचे आजीवन सभासदत्व बहाल केले. संग्रहालयाचे सर्व काम या ट्रस्टच्या माध्यमातून चालते. भारतीय तसेच देशविदेशााील असंख्य पर्यटक या ठिकाणाला दररोज भेट देत असतात. हिमाचल प्रदेशमध्ये आज रेरिख संग्रहालय हे एक आघाडीचे सांस्कृतिक केंद्र म्हणून ओळखले जाते. एकीकडे भारत-रशिया आपल्या राजनैतिक मैत्रिची 65 वर्षे साजरी करत असतानाच दुसरीकडे मात्र हिमाचल प्रदेश सरकारने या ट्रस्टवर कब्जा करण्याचा प्रयत्न केला. पुरातत्व तत्त्वज्ञ डॉ. आल्योना आदामकोवा या मागील दहा वर्षांपासून या संग्रहालय आणि ट्रस्टच्या कार्यकारी निर्देशक आहेत. परंतु हिमाचल प्रदेश सरकारने दोन वेळा त्यांच्याकडे संग्रहालय सोडण्याची मागणी केली. वास्तविक पाहाता मार्च महिन्यातच या ट्रस्टच्या कार्यकारीणीला कोणतीही सूचना न देता त्यावर काम करत असलेल्या रशियन सभासदांना आणि अभिरक्षकाला त्यांच्या पदांवरून हटवण्याचा आणि ‘रेरिख मेमोरीअल ट्रस्ट’ची संपलेली मुदत वाढवून न देण्याचा निर्णय एकदम वरिष्ठ पातळीवर घेण्यात आला. गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत असलेल्या डॉ. आल्योना आदमकोवा यांनी आतापर्यंत रेरिख यांच्या संग्रहालयाची उत्तमरित्या काळजी घेतली आहे. आज त्याठिकाणी सुमारे दीडशेच्या आसपास परिसरातील मुले शिकण्यासाठी येतात, या महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. याशिवाय रेरिख यांच्या चित्रांचा अल्बम तयार करणे, रेरिख यांचे दोन मुले पुरातत्त्व तज्ञ युरी रेरिख व चित्रकार पद्मश्री स्वेतास्लाव रेरिख यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनाचे काम सुरू आहे. या ठिकाणी सुरू असलेल्या कामांमध्ये स्थानिक प्रशासनाच्या मर्जीतील ठेकेदारांना वाव मिळत नसल्या कारणाने डॉ. आदामकोवा यांच्यावर राग धरून त्यांच्याकडे येऊन करारच रद्द करण्याची मागणी हिमाचल सरकारच्या जिल्हा प्रशासनातील अधिकाºयांनी केली तसेच अशा परिस्थितीत संग्रहालयात येऊन किमती वस्तूंची यादी बनवण्यासही त्यांनी नकार दिला. त्यांनी नग्गर सोडून जावे, अशी मागणी स्थानिक प्रशासनाने केल्याचे दिल्लीतील रशियन वकिलातीने भारतीय विदेश मंत्रालयाला पाठवलेल्या एका पत्रात म्हटले असून अशा प्रकारे रशियन प्रतिनिधीला काढण्याचे आम्हाला कदापिही मान्य नसल्याचे स्पष्ट केले आहे. भारतातील रशियन राजदूत आलेक्झांडर कदाकीन यांनी तर हे ट्रस्टचे काम राज्य सरकारकडून केंद्र शासनाने आपल्या ताब्यात घ्यावे, तसेच या ट्रस्टवर एक भारतीय व एक रशियन संचालक नेमावा असेही म्हटले आहे. त्याचप्रमाणे ट्रस्टींमध्ये रशियन सभासदही असावे, वास्तविक पाहता रेरिख यांच्यावर केवळ भारत किंवा रशिया यांचा अधिकार नाही तर ही संपत्ती जागतिक सांस्कृतिक ठेवा आहे. ही कला नवीन पिढीने आत्मसात करून पुढे न्यायची आहे तरच तिचा विकास होईल. प्रत्येक रशियन माणसाच्या मनात रेरिख यांच्याविषयी आदराचे स्थान आहे. भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या काही महिने आधी सोव्हिएत युनियन-भारत अशी आपल्या राजनैतिक संबंधात सुरुवात झाली होती. या संबंधांना 14 एप्रिल 2012 ला 65 वर्षे पूर्ण झाली. रशियातील तोम्स्क या शहरात काही महिन्यांपूर्वीच ‘इस्कॉन’ने प्रकाशित केलेल्या गीतेच्या अनुवादावर बंदी आणावी या याचिकेवर रशियन सरकारने त्वरीत पावले उचलून हा प्रश्न मार्गी लावला होता... आता रेरिख प्रश्नावर भारताकडून अशीच तत्परता दाखवून मुत्सद्देगिरी दाखवली जाते का? हाच सध्या भारतातील रेरिखप्रेमींना प्रश्न पडला असून, भारतानेही या आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या मुद्यावर त्वरीत पावले उचलावीत अशी मागणी जोर धरू लागली आहे...