आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rasik Article On Russian Nikitins Maharashtra Tour

रशियन निकितिनची महाराष्ट्र - कर्नाटक भ्रमंती

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अफानासी निकितिन हा रशियन व्यापारी पंधराव्या शतकात भारतात येऊन गेला. भारतात त्याने पहिले पाऊल ठेवले ते कोकण किनारपट्टीवर. निकितिनने आपल्या भारतातील भटकंतीबाबत जुन्या रशियन भाषेत लिहिलेल्या ‘खट्द्येनिये झा त्री मोरेय्’ या शीर्षकाच्या प्रवासवर्णनातील महाराष्ट्र- कर्नाटकाशी संबंधित भागाचा सतीश खांबेटे यांनी अनुवाद केला असून त्यातील हा संपादित अंश...

त्वेर हे रशियातले सुमारे आठशे वर्षांपूर्वीचे प्राचीन शहर. आपल्या पुण्यासारखे म्हणा ना. ग्रँड ड्यूक मिखाईल बोरिसोविच हा 1461 ते 1485 दरम्यान त्वेरचा अधिपती होता. त्या वेळचे तिथले त्वेरचे बिशप गेन्नादी यांचा आशीर्वाद घेऊन अफानासी वोल्गा नदीच्या काठाने प्रवासाला निघाला. भारताच्या सफरीवर निघण्यापूर्वी अफानासीने पर्शियामधील होरमुझ या बंदरात आपला पहिला ईस्टरचा रविवार साजरा केला.
होरमुझबाबत अफानासी लिहितो, ‘होरमुझ हे अत्यंत स्वच्छ सूर्यप्रकाशाचे शहर आहे. मी तिथे एक महिनाभर राहिलो आणि ईस्टरनंतरच्या पहिल्याच आठवड्यात जहाजाने हिंदी महासागरमार्गे निघालो. मस्कतला आम्ही दहा दिवसांनी पोहोचलो आणि त्यानंतर चार दिवसांनी देगा इथे.’ प्रत्यक्षात आज दावे अगर पूर्वी द्वीप या नावाने प्रसिद्ध असलेल्या शहराचा उल्लेख निकितिन याने देगा या नावाने केला असावा, असे तज्ज्ञांचे मत आहे. इथे असलेल्या समुद्राचा उल्लेख अफानासी याने ‘प्राचीन रशियन भाषेत या समुद्राला ‘इंदीस्कये मोºयेइंडियन सी’ अगर दुस-या शब्दात ‘इंदोस्तानस्कये मोºये सी आॅफ हिंदुस्तान असे म्हणतात.’ या शब्दात केला आहे. देगाहून आपण गुजरात आणि नंतर खंबातच्या आखातात आलो, असे अफानासी म्हणतो. खंबातला नीळ आणि लाख हे भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत असेही त्याने म्हटले आहे. खंबातच्या आखातातून अफानासी आला तो महाराष्ट्रातील चौल येथे.
आपण खंबातहून चौलला कसे आलो याबाबत वर्णन करताना अफानासी म्हणतो, ‘खंबातहून आम्ही चौलला दाखल झालो. हा ईस्टरनंतरचा सातवा आठवडा होता. म्हणजे एकूण सहा आठवड्यांची सागरी सफर झाली होती. इथूनच इंडियाची खरीखुरी भूमी सुरू होते. आश्चर्य म्हणजे, इथे सगळेच लोक नग्नावस्थेत असतात. अगदी स्त्रियासुद्धा. ना मस्तक झाकलेले ना छाती. केसांची एकच वेणी घालतात. स्त्रियांबरोबर मूल हे हटकून असणारच. त्या जवळजवळ दरवर्षीच एका मुलाला जन्म देतात. नवरा काय किंवा बायको काय, दोघेही काळेच. माझ्यासारख्या गो-या माणसाला पाहून ते तर माझ्या मागेच लागले.’
त्या काळी चौल हे भारतातील एक अतिशय महत्त्वाचे बंदर होते. तिथून मजल-दरमजल करत अफानासी हा पाली आणि उमरा या छोटेखानी शहरामार्गे जुन्नरला गेला. जुन्नरबाबत आपल्या पुस्तकात अफानासी निकितिन याने विस्ताराने वर्णन केले आहे. तो म्हणतो, ‘जुन्नरला मालिक-अत-तुज्जर याचा सरदार असद खान राहतो. त्याच्याकडे मलिक- अत्-तुज्जरच्या दोन लाख सैनिकांपैकी 70 हजार सैनिक आहेत. मलिक- अत्- तुज्जर हा वीस वर्षे काफिरांशी लढतो आहे. कधी ते जिंकतात तर कधी तो जिंकतो, पण अधिक करून मलिक-अत्- तुज्जर हाच लढाया सर करत आलेला आहे. तो पालखीतून फिरतो आणि त्याच्याकडे अनेक उत्तमोत्तम हत्ती-घोडे आहेत. त्याच्या पदरी खोरासान, अरबस्तान, तुर्कस्तान तसेच जगाताई अशा ठिकाणांहून समुद्रमार्गे भारतात आणलेले सैनिक आहेत.’
हिंदू धर्मात समुद्र ओलांडणे हे एकेकाळी पाप समजले जात असे. परंतु आश्चर्याची गोष्ट अशी की निकितिन यालाही आपण तीन समुद्र ओलांडून भारतात आलो हे पाप केले असे वाटते. तो म्हणतो, ‘मी पापी इसम भारतात एक घोडा घेऊन गेलो होतो. देवाच्या दयेनेच मी जुन्नरला सुखरूप पोहोचलो. या सा-या प्रवासासाठी मला शंभर रुबल खर्च आला.’ अफानासी हा जुन्नरमध्ये दोन महिने राहिला होता. जुन्नरमध्ये व्यापार करण्याचा निकितिनचा प्रयत्न अयशस्वी झाला आणि तो पुढील वाटचालीसाठी रवाना झाला.
जुन्नर सोडल्यापासून पुढील प्रवासाचे वर्णन करताना निकितिन म्हणतो, ‘जुन्नरहून आम्ही डे आॅफ अ‍ॅझम्पशन आॅफ होली मदर या दिवशी बिदरकडे कूच केले. बिदर हे मोठे शहर असून जुन्नरहून येथे येण्यास आम्हाला एक महिना लागला. इथून पुढे बिदर ते कुलुंगीर पाच दिवस आणि कुलुंगीर ते गुलबर्गा आणखी पाच दिवस असा प्रवास आहे.’ इथे एक गोष्ट मुद्दामहून नमूद करावीशी वाटते ती म्हणजे बिदर, कुलुंगीर किंवा गुलबर्गा ही शहरे आज भौगोलिकदृष्ट्या कर्नाटकात असली तरी पूर्वीपासूनच ही शहरे म्हणजे दख्खनचा किंवा बृहन्महाराष्ट्राच्या एका व्यापक संस्कृतीचा भाग आहेत, हे अफानासीच्या प्रवासवर्णनावरून सिद्ध होते. आपल्या भटकंतीचे वर्णन करताना निकितिन म्हणतो, ‘बिदर ते गुलबर्गा या शहरांदरम्यान वाटेत अनेक छोटी छोटी गावे आहेत. दररोज आम्हाला अशी तीन किंवा कधी-कधी चार गावे लागायचीच. जितके कोस अंतर तितकी शहरे. चौल ते जुन्नर वीस कोस, जुन्नर ते बिदर चाळीस कोस. बिदर ते कुलुंगीर नऊ कोस आणि गुलबर्गाही पुढे तितकेच कोस.’
बिदर या शहराचे वर्णन निकितिन याने मुस्लिम हिंदुस्थानची राजधानी असे केले होते. तो म्हणतो, बिदर ही मुस्लिम हिंदुस्थानची राजधानी आहे. हे एक मोठे शहर असून त्याची लोकसंख्याही बरीच आहे. इथला सुलतान केवळ वीस वर्षांचा तरणाबांड असून तो स्वत: आणि त्याचे सरदारही खोरासानी आहेत. अफानासी निकितिन याने बिदरचे वर्णन मुस्लिम हिंदुस्थानची राजधानी असे केले असले तरी उपलब्ध ऐतिहासिक माहितीनुसार त्या वेळी अस्तित्वात असलेल्या बहामनी साम्राज्याची ती राजधानी होती. सुरुवातीला बहामनी साम्राज्याचा विस्तार झाल्यानंतर राजधानी गुलबर्ग्याहून बिदरला हलवण्यात आली. बिदरमधील बहामनी साम्राज्याचा नामधारी प्रमुख तिसरा महंमदशहा हा तरुण सुलतान असला तरी त्याचा वजीर महंमद गवान हाच प्रत्यक्षात सर्वेसर्वा होता. त्याने स्वत:ला ‘मलिक-अत्-तुज्जर’ व्यापा-यांचा राजा असे नामाभिधान घेतले होते.
(‘केल्याने भाषांतर’ या त्रैमासिकातून साभार)