आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

स्त्रीशक्तीचा उठाव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अबला ही जिथे शक्तिशाली असते, राजा अल्पवयीन असतो आणि मंत्री निरक्षर असतो; तिथे धनाची आशा तर सोडाच जीविताची आशादेखील उरत नाही, अशा अर्थाचं एक जुनं संस्कृत वचन आहे. पुरुषप्रधान संस्कृतीचाच तो आविष्कार आहे. परंतु ‘जिथे पुरुष अत्याचारी, विलासी आहे, जिथे पुरुष अरेरावीच्या मागे आपला कमकुवतपणा लपवतो, जिथे पुरुषामध्ये विचार करण्याची ताकदच नाही अशा समाजाला स्त्रीशक्तीशिवाय तरणोपाय नसतो’ अशा नव्या वचनाला वरील वचनाची जागा घ्यावी लागेल.

फेब्रुवारी 1996. बिहारमध्ये बिलासपूर नावाच्या गावात गंगा नावाची तरुणी आणि तिची आई अशा दोन स्त्रियांना गाव पंचायतीनं कुलटा आणि चेटकीण ठरवून अमानुषपणे ठार मारलं. या बातमीवरून प्रेरित झालेल्या शैवाल यांच्या कथेवरचा प्रकाश झा यांचा चित्रपट ‘मृत्युदंड’ म्हणजे वरील नव्या वचनाचा उद्गार होय. या स्त्रीशक्तीची ज्योत पेटवते ती लग्न होऊन शहरातून गावात आलेली केतकी (माधुरी दीक्षित).

ती एका सुशिक्षित, सुसंस्कृत पित्याची सुशिक्षित, सुसंस्कृत, सरळमार्गी मुलगी आहे, एवढंच चित्रपटाच्या सुरुवातीवरून कळतं. तिच्या तडफदारपणाच्या पर्वाची सुरुवात होते ती लग्नानंतर गावात आल्यावर. त्या तडफदारपणाला तिच्या बुद्धिमत्तेची जोड मिळते आणि सहृदयतेचीही, त्यामुळेच मोठ्या जावेसहित गावातला पीडित स्त्रीवर्ग तिच्या प्रेरणेनं अन्यायाविरुद्ध उठून उभा राहतो.
केतकीचं लग्न गावातल्या प्रतिष्ठित, पण आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेल्या जमीनदाराच्या धाकट्या मुलाशी-विनयशी-होतं. जमीनदार-बाबूजी-सज्जन, पण परिस्थितीनं आणि मोठ्या मुलाच्या म्हणजे अभयच्या अरेरावी वागण्यापुढे हतबल झालेले. मोठा मुलगा अभय (मोहन आगाशे) हा सत्तालोलुप, पण आपलं नपुंसकत्व अरेरावीमागे लपवणारा, त्याची पत्नी चंद्रावती (शबाना आझमी) ही वंध्यत्वाची बदनामी कपाळी लेवून विझल्यासारखी वावरणारी. विनय उमदा, देखणा तरुण.

लग्नाच्या रात्रीच मोठा दीर भांडण उकरतो. कर्ज काढून समारंभ साजरे करणार्‍या मोठ्या दिरानं लग्नानिमित्त रात्री वाड्यात कलावंतिणीचा नाच ठेवला आहे. एरवी व्यवसायात आणि राजकारणात एकमेकांवर कुरघोडी करताना अमानुषपणे वागणारी माणसंदेखील आणि संन्यासी मठाधिपती महंतदेखील हिडीस नृत्याची मौज लुटण्यासाठी आमंत्रित आहेत. गावातल्या रांगड्या, पुरुषी अरेरावीच्या संस्कृतीशी केतकीचा परिचय होऊ लागतो. तरी ती सासरच्या या संस्कृतीशी जुळवून घेताना दिसते. तिरपत सिंग (मोहन जोशी) या गब्बर आणि दांडग्या कंत्राटदाराच्या वाढत्या राजकीय महत्त्वाला शह देण्याची ताकद आपल्यात नाही, हे ओळखून अभय मठातल्या महंताचा खून करवून स्वत: संन्यास घेऊन महंत बनतो आणि गावातलं सत्तेचं एक केंद्र काबीज करतो, तसंच आपल्या नपुंसकत्वावरही कायमचं पांघरूण घालून घेतो. आधीच वांझ चंद्रावती त्याच्या संसार सोडून जाण्यानं अधिकच केविलवाणी, संसारविन्मुख होते आणि घराची जबाबदारी केतकीला सोपवते. केतकीला घराच्या आर्थिक पारिस्थितीची कल्पना येऊ लागते.

उमद्या नवर्‍याबरोबर संसारात रमू लागलेल्या केतकीचा आपल्या नवर्‍यातल्या स्वभावदोषांशीही परिचय होऊ लागतो. तो कंत्राटदारी करायचं ठरवतो तेव्हा ती आपलं स्त्रीधन देते. पण विनय भोळा आणि अविचारी आहे. तिरपतच्या सापळ्यात तो अलगद सापडतो. तिरपतच्या इतका आहारी जातो, की त्यासाठी इस्टेटीच्या कागदपत्रांवर भावजयीची आणि वडलांची सही घेऊ पाहतो. केतकीला त्याच्या अविचारी स्वभावाचा पहिला साक्षात्कार होतो. प्रथमच ती त्याला विरोध करते. सावध करू पाहते. विनय बायकोच्या इशार्‍याला जुमानत नाही आणि ती पाठ फिरवून आपला निषेध नोंदवते. पैसा मिळवून देणारा व्यवसाय आपण करू लागलो आणि त्यात तिरपतची मदत होते आहे, या विचारानं विनयचा उरलासुरला विवेकही संपतो. तो तिरपत आणि कंपनीनं पाजलेल्या दारूच्या आहारी जातो आणि तिरपतची गावातली ख्याती विसरून त्याला आणि त्याच्या टोळक्याला वाड्यावर आपल्या नवपरिणीत सुंदर पत्नीला पाहायला आणतो. तिरपतचं त्याच्या स्वत:च्या पत्नीशी आणि आपल्या पत्नीशीही त्याचं वागणं विनयसारख्या शिक्षित तरुणाला खटकत नाही. पण बायकोनं शहाणपणाचे सुचवलेले बोल त्याला अपमान वाटतात, तो तिच्यावर हातही उचलतो, रात्री दारूच्या नशेत ‘सॉरी’ बोललं की प्रकरण मिटलं असं समजून तिच्यावर पतीचा हक्क गाजवू पाहतो.

केतकी ही गावातल्या ‘मुकी बिचारी कुणी हाका’ पठडीत वाढलेली मुलगी नाही. ती सुनावते, ‘सॉरी बोल दिए और बिस्तर में घसीट लेंगे? औरत को का समझते हैं आप लोग?’ पुरुषाला असा प्रश्न विचारणारी गावातली ती पहिलीच स्त्री. कामवाली कांती म्हणते, ‘बैलाला शिंग असल्यावर तो काय करणार?’ ही या गावातल्या गरीब बिचार्‍या स्त्रीवर्गाची विचारसरणी. ‘हमरा मरद बनने की कोसिस मत कीजिए’, असं म्हणत पुरुषी शारीरिक ताकदीवर विनय केतकीला नमवू पाहतो तेव्हा ती मात्र सुनावते, ‘औकात को ताकत की तराजू में तौलने की कोसिस मत कीजिए। आप हमारे पति हैं। परमेश्वर बनने की भूल मत कीजिए।’

केतकीच्या धाडसानं, विचारसरणीनं नकळत गावातल्या स्त्रीवर्गात नवा विचार रुजू लागला आहे. ‘पुरुष असेच असतात, त्यांचा मान राखायला हवा’ या मोठ्या जावेच्या परिस्थितीशरण विधानाला केतकी उत्तर देते ते जावेला तिच्या अनुभवाची आठवण देतच. ‘मान तो आपने भी रखा था। का हुआ उसका?’ नकळत विद्रोह झिरपू लागतो.

वाड्याशी इमान, कृतज्ञता राखून असणारा आणि प्रसंगी बाबूजींना पैशाची मदतही करणारा मागास वर्गाचा नेता रामबरन महतो हा या गावातल्या पुरुष वर्गाला अपवाद. तो कठीण काळात दोघी जावांच्या मदतीला उभा राहतो. आजारी चंद्रावतीच्या शहरातल्या उपचारांसाठी रामबरनच उपयोगी पडतो. एवढंच नव्हे, तर आपला अपमान करणार्‍या विनयला तो इशाराही देतो, ‘तिरपत आपकी आँखों में धूल झोंक रहा है। आप भोला है।’

कुणाच्याही बोलण्यात सहज येणार्‍या विनयला हेही पुरेसं होतं. तिरपत फसवत असल्याचं कळताच त्याला बायकोशी वाईट वागल्याचाही पश्चात्ताप होतो. जावेच्या उपदेशावरून केतकीही आपल्या प्रिय, पण वाट चुकलेल्या नवर्‍याला आधार द्याायला परत गावी येते आणि आता तिच्या बुद्धिमत्तेवर विश्वास ठेवून विनय तिनं सुचवलेल्या चाली खेळत परिस्थिती सावरू लागतो.
नदीकाठच्या जमिनीत क्रशरवर कामाला येणार्‍या कांती(शिल्पा शिरोडकर)चं तिरपत आणि कंपनीनं चालवलेलं शोषण, हा या पुरुषवर्ग विरुद्ध स्त्रीवर्ग संघर्षातला महत्त्वाचा मुद्दा ठरतो. गावातल्या गरीब स्त्रियांचं शारीरिक शोषण करण्याचा उद्योग तिरपत आणि कंपनी करत असते. हे कळतं तेव्हा केतकी कांतीला धीर देते, ‘औरत है तू तो कमज़ोर मत समझ अपने को।’ आणि असा उपदेश करून ती थांबत नाही, तर थेट तिपरतच्या पुढ्यात जाऊन त्याला आव्हानच देते. ‘ये पुढे, आणि फाड कपडे कांतीचे... म्हणजे गावातल्या स्त्रिया टाळ्या वाजवून तुझं अभिनंदन करतील. हवं तर माझेही कपडे फाड. आणखी अभिनंदन करतील त्या.’ तिच्या या आव्हानाला तिरपत तर घाबरतोच, जमलेल्या स्त्रिया खरोखरीच टाळ्या वाजवून मूकपणे त्याचा उपहास करतात. तिरपतला हरवून ती परतते, ती मोठाच लढा जिंकून. गावातला प्रकार ऐकून घाबरून धावत आलेल्या विनयला ती आपली खरी मनोवस्था सांगते. म्हणते, ‘डर तो हम भी गए थे। फिर सोचा ऐसे आदमी से क्या डरना जो कमज़ोर पर हाथ उठाए? सबसे डरपोक तो वही है न?’ बुद्धिमान आणि धाडसी केतकीनं तिरपतवर त्या क्षणी मानसशास्त्रीय दबाव आणला होता. आणि गरीब, मुकाटपणे अन्याय सहन करणार्‍या स्त्रियांमधल्या समूह-शक्तीची जाणीव जागवली होती. त्या शक्तीचा प्रत्यय येताच तिरपतनं घाबरून माघार घेतली.

असं असलं तरी तिरपतचा कावेबाज स्वभाव जात नाही आणि विनयचा स्वभावगत बेसावधपणा त्याला भोवल्याशिवाय राहात नाही. त्याच्या बाइक उडवण्याचा उल्लेख करत तिरपत बाइकचा स्फोट घडवून आणून त्यालाच उडवून देतो. आपल्याला दिवस गेल्याची सुखद जाणीव ज्या क्षणी केतकीला होते, त्या पाठोपाठच्या दुसर्‍याच क्षणी वैधव्याचा लोळ तिच्या अंगावर कोसळतो. आतापर्यंत शहाणपणाचे सल्ले पतीला देत संघर्षाची सूत्रं हलवणार्‍या केतकीला इथून पुढे प्रत्यक्ष मैदानात उतरायचं असतं.
केतकीला एकटीला गाठू पाहणार्‍या तिरपतवर ती सरळ कोयताच उचलते. (माझ्या मनात ‘मिर्च मसाला’मधल्या सोनबाईची धारदार प्रतिमा नकळत जागी होते.) तिरपतच्या नव्या डावात अडकून त्याचा शत्रू महंत अभयच आता त्याच्याशी हातमिळवणी करतो आणि घरासहित सगळी इस्टेट वडलांनी मठाला द्यावी म्हणून हट्ट धरतो, तेव्हा धाकटी भावजय या नालायक मोठ्या दिराला चक्क घरातून हाकलून लावते. आणि जेव्हा महंत आणि तिरपत पुन्हा एकमेकांविरुद्ध उभे राहतात, तेव्हा बुद्धिमती केतकी सासर्‍याला सबुरीचा सल्ला देते. म्हणते, ‘दुश्मन तो आपस में लड़ ही रहे हैं बाबूजी. आप क्यों चिंता करते हैं? सही समय पर सही कदम उठाया जाएगा।’

केतकीच्या व्यक्तिमत्त्वाचाच प्रभाव म्हणजे चंद्रावतीचं परंपरांच्या बेड्या तोडून आपल्या तना-मनाची हाक मन:पूतपणे ऐकणं. तिला आजारपणातून बाहेर काढण्यासाठी सर्वथा झटलेल्या रामबरनच्या सहवासात तिचं स्त्रीत्व पुन्हा उभारी घेतं आणि ‘आपण’ वांझ नाही, हा साक्षात्कार तिला नवी ताकद देतो. चंद्रावती गावी परतते ती आत्मविश्वासाची नवी ताकद घेऊनच. प्रथमच आपल्या मर्जीनुसार जगणार्‍या मोठ्या जावेला पाहून केतकीला कौतुक वाटतं. तिच्या विचारांचा, तिच्या व्यक्तिमत्त्वाचा तो विजयच असतो. एवढंच नव्हे तर ‘पोटातलं बाळ कुणाचं आहे’ या तिच्या प्रश्नावरचं चंद्रावतीचं आत्मविश्वासपूर्ण आणि शांत उत्तर आहे ‘मेरा है।’ हे उत्तर म्हणजे तर अनायासे आपल्या शरीरावर आपला हक्क सांगणार्‍या स्त्रीवादाचा, आपल्या मर्जीची घोषणा करणार्‍या स्त्रीवादाचा शांतपणे केलेला जयघोष आहे. (पुन्हा एकदा मला आठवते ती भबेंद्रनाथ सैकिया यांच्या 1985 सालच्या ‘अग्निस्रान’ या आसामी चित्रपटाची नायिका मेनोका. असाच तिचा तो शांत, संयत आत्मविश्वास.)

एकेकाळी गंगा आणि तिच्या आईला दिला तोच मृत्युदंड केतकी आणि चंद्रावतीला द्यायचा घाट महंत, तिरपत, त्याचे हस्तक घालतात; पण केतकीच्या प्रभावानं आता गावातल्या स्त्रियांनी उठाव केला आहे. तिरपतच्या बायकोसाहित, कांतीसहित, चंद्रावतीसहित केतकीच्या नेतृत्वात स्त्रिया उठाव करतात आणि मृत्युदंडाचा डाव उलटवतात. या उठावात तिरपतच्या बायकोसहित पुरुष-अत्याचाराला आजवर बळी पडत आलेली प्रत्येक स्त्री आहे. ‘कुछ नहीं कर सकता है मरद। बढ़िए महंतजी, कम से कम एक बार तो आपका ताकत सहने का सुख भोगें’ म्हणून चंद्रावती शिरजोरी करत आलेल्या नपुंसक नवर्‍याला जिवंत मरण देते, तर केतकी तिरपतवर बंदूकच चालवते. तीन बाजूंनी स्त्रीशक्ती चालून येत असताना मागे वाहते आहे ती नदी. केतकीच्या शेवटच्या जीवघेण्या गोळीसरशी तिरपत कोसळतो तो नदीत.

इथे व्यक्तिरेखांमधल्या संघर्षापेक्षा महत्त्व येतं ते पुरुषवर्ग विरुद्ध स्त्रीवर्ग यातल्या संघर्षाला. पुरुषवर्गातले सदस्य स्वार्थासाठी आपल्या पुरुष शत्रूशीही हातमिळवणी करणारे. उदा. अभय आणि विनय सहजपणे तिरपतशी जुळवून घेतात. अपवाद निडर रामबरन आणि हतबल बाबूजींचा. स्त्री व्यक्तिरेखा या सगळ्याच इथे एकमेकींना समजून घेणार्‍या, सहानुभूती देणार्‍या, आधार देणार्‍या आहेत. त्यांना पुरुषवर्गानं करत आणलेल्या अन्यायाच्या एका सूत्रात बांधलंय.