आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सवंगतेचे 'झाडीपट्टी' प्रयोग!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अखेर पडदा खेचला गेला आणि लगोलग हिंदी आयटम साँग सुरू झाले. ‘ये हलकट जवानी’ म्हणत एक तरुण बाला नाचत होती. साचेबद्ध नसलेल्या तिच्या शारीरिक हालचालींवर अनेकांनी टाळ्यांचा वर्षाव केला. नाच संपला आणि नाटकाच्या पहिल्या अंकाला सुरुवात झाली. झाडीपट्टी नाट्यपरंपरेविषयी खूप काही ऐकलेल्या मला तो नाच म्हणजे रंगणार्‍या नाटकाची ‘नांदी’ होती की काय, असा प्रश्न पडला आणि कपाळावर आठ्यांचे जाळे उमटले...
अखंड रडणार्‍या बाळाला ‘आईला खाल्ले’ म्हणून नाकारणारा नायक, बाळाला छातीशी कवटाळून ओव्हरअ‍ॅक्टिंग करणारी गोरीपान कामवाली बाई, मुंबईला जाऊन पाटलाच्या जाळ्यात फसलेली नऊवारी नार, बलात्कारी पाटील, बाळाला मिळालेली सावत्र मात्र निर्व्याज प्रेम करणारी आई अशी काहीशी (की बरीचशी) कॉम्प्लिकेटेड संहिता होती. रात्रभर चाललेल्या या नाटकाला भरमसाट गाणी, नृत्ये, कॉमेडी आणि प्रेमप्रकरणाची बेचव फोडणी मात्र दिली होती. मुख्य म्हणजे नाटकातील एकाही प्रसंगाचा ‘कथासूत्राशी’ काडीमात्र संबंध नव्हता. एका प्रसंगात ती जाळ्यात फसलेली नऊवारी नार एकेक वाक्य बोलताना बराच वेळ का लावतेय, याचा शोध घ्यायला बॅकस्टेज गेल्यावर रंगमंचाच्या दोन्ही बाजूंना नाटकाचे बाड घेतलेले ‘प्रॉम्पटर्स’ तिला नाटकातले संवाद सांगत असल्याचे लक्षात आले. झाडीपट्टीत गावोगावी होणार्‍या ‘लावणीप्रधान’ नाटकांच्या लिखित संहिताच बाळगल्या जातात. तेथे ना तालमींचा पत्ता असतो, ना कथासूत्राचा! नाटकात सहभागी होणार्‍या प्रत्येक नव्या कलाकाराने आपल्या वाट्याचे प्रसंग एकदा समजून घ्यावेत. रंगमंचावर दिसत असलेल्या त्या कलाकाराचा ‘वाचिक’ अभिनय विंगेत बसलेले प्रॉम्पटर्स करतात. उत्साहाने नाटक पाहण्यासाठी बसलेली मी या नाटकाने मात्र साफ निराश झाले. एकेकाळी समृद्ध असलेल्या झाडीपट्टीच्या विद्रूप होऊ पाहणार्‍या चेहर्‍याशी माझी ओळख झाली.
‘लोकं किराणा घ्यायला जातात ना तसे ते नाटक घ्यायला जातात. नाटकाच्या धंद्यात भरमसाट पैसा मिळू लागल्याने आता महिन्याला एक या प्रमाणात नाटक लिहिणारे लेखक तयार झालेत. एकेकाळी संगीत नाटके पाहिलेल्या प्रेक्षकांना अशा प्रकारची अश्लील नाटके दाखवून पुढच्या पिढीला आपण काय पाहायला शिकवत आहोत, याकडे कानाडोळा केला जातो.’ नवरगाव येथील श्री व्यंकटेश कंपनीचे सदानंद बोरकर उद्वेगाने बोलत होते...
केवळ चार जिल्ह्यांत अस्तित्वात असलेल्या झाडीपट्टी रंगभूमीवर व्यावसायिक शिस्तबद्धता देणारी ही नाटक कंपनी. झाडीपट्टीच्या सीझनमध्ये नवरगावकरांना उत्तमोत्तम नाटकांचा आस्वाद घेता यावा, यासाठी तिथे कायमस्वरूपी स्टेज उभारण्याची खटपट करण्यात बोरकर यांच्या आजोबांचा बालाजी पाटील बोरकरांचा मोलाचा वाटा होता. त्यामुळेच आज गावाच्या मोकळ्या आवारात उभारलेले सिमेंटचे कायमस्वरूपी स्टेज, रंगमंचासमोर रांगेत मांडल्या जाणार्‍या खुर्च्या, रंगमंचावर नेपथ्य उभारणार्‍यांची लगबग सुरू असतानाच स्टेजवर नाटकाची रीतसर तालीम सुरू होती. रात्री रंगणार्‍या नाटकासाठी सर्व कलाकारांची टोळी तालीम करताना दिसणे, हे झाडीपट्टीतले दुुर्लभ असे दृश्य नवरगावातच पाहायला मिळत होते. आज सदानंद बोरकरांच्या रूपाने तिसरी पिढी श्री व्यंकटेश नाट्यमंडळाची धुरा वाहत आहे. सदानंद बोरकर अभिनेता म्हणून झाडीपट्टीत प्रसिद्ध होत असतानाच दुसरीकडे चित्रकलेचे वेडही त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते. परंतु अंधश्रद्धेला बळी ठरलेल्या एका व्यक्तीमुळे त्यांच्यातला कलाकार अस्वस्थ झाला. चित्रकलेसाठी ब्रश धरणार्‍या हातांनी लेखणी उचलली आणि ‘माझं कुंकू मीच पुसलं’ या नाटकाचा जन्म झाला.
या नाटकाला पहिल्या प्रयोगापासूनच लोकांनी रांगा लावल्या. पहिल्या दिवशी लागलेला ‘हाऊसफुल्ल’चा बोर्ड पाच दिवस जागचा हलला नाही. अस्वस्थतेतून निर्माण झालेली ही संहिता आता या वर्षीपासून एम.ए.च्या पहिल्या वर्षाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आली. त्यानंतर महाराष्ट्रात होणार्‍या शेतकर्‍यांच्या आत्महत्यांच्या विषयाला हात घालणारे ‘आत्महत्या’ हे नाटक घेऊन बोरकर गावोगाव पोहोचले. हेही नाटक इतके गाजले की ‘हिंदू’चे ज्येष्ठ संपादक पी. साईनाथ यांनी त्या वेळी हे नाटक पाहून त्यावर लेख लिहिला. परिणामी 2008च्या ‘सार्क’ महोत्सवात चंद्रपूर जिल्ह्यातल्या झाडीपट्टीत होणार्‍या ‘आत्महत्या’ या नाटकाची निवड झाली. कोणी केशकर्तनकार, कोणी इस्त्रीवाला, कोणी शेतकरी, तर कोणी प्राध्यापक असे धोतरजोडीतले कलाकार पहिल्यांदाच वेस ओलांडून ‘सार्क’ महोत्सवात गेले. आंतरराष्ट्रीय पातळीवर मजल मारत असतानाच ‘नवरे झाले बावरे’ हे अस्सल झाडीबोलीतले मनोरंजनात्मक नाटकही त्यांनी लिहिले आणि दिग्दर्शित केले. नाटकाच्या गरजेनुसार पडद्याऐवजी व्यवस्थित सेट डिझाइन करून वापरण्याचा प्रयोग सदानंद बोरकर यांनी यशस्वी करून दाखवला आहे. ‘तो मी नव्हेच’ या नाटकासाठी पहिल्यांदा ‘फिरता रंगमंच’ ही कल्पना मराठी नाटकांत साकारली गेली. झाडीपट्टीतल्या मागच्या पिढीने प्रायोगिक तत्त्वावर फिरता रंगमंच तयार केला होता. आजही त्याच फिरत्या रंगमंचावर नाटकांचे प्रयोग होतात, सदानंद बोरकर कौतुकाने सांगत होते. आजघडीला एखाद्या व्यावसायिक नाटकाइतकी सुविधा त्यांनी झाडीपट्टीत उपलब्ध करून दिली आहे. नागपूर, पुणे, मुंबई येथील स्त्री कलावंतांना सदानंद बोरकर आपले घर खुले करतात. त्यामुळेच येथे काम करणार्‍या प्रत्येक स्त्री कलावंताला सुरक्षित वाटते आणि प्रेक्षकांची मिळणारी दाद (त्यांच्या एकेका नाटकाचे बुकिंग 1 लाख 85 हजार ते 4 लाखांपर्यंत पोहोचते, हे विशेष.) म्हणजे अभिनयाची पावती वाटते. झाडीपट्टी रंगभूमीवर काम करणार्‍या सर्वच कलाकारांनी एकदा तरी श्री व्यंकटेश नाट्यमंडळाच्या नाटकांत काम केले आहे. त्यामुळे दर्जा आणि शिस्त या बाबतीत कलाकारांच्या तोंडी केवळ सदानंद बोरकर यांचेच नाव असते.
दुसरीकडे ‘वडसा’ हे झाडीपट्टी नाटकांचे केंद्र आज तब्बल 40 ते 42 नाटकांचा व्यवसाय करत आहे. विझली ज्योत मातृत्वाची, माया लेकराची, फाटका पदर मायेचा, माझं घर माझा संसार, ओझं कुंकवाचं अशा एक ना अनेक नावांच्या नाटकांची दुकाने झाडीपट्टीचा सीझन वसूल करत आहेत. 40 ते 45 हजारांपर्यंत नाटक उपलब्ध होत असतानाही पडद्यावरचे नाटक हा ट्रेंड मात्र याच नाटकांनी कायम ठेवला आहे. चारही जिल्ह्यांत कोणीही सोम्यागोम्या नाटक लिहून ते विकू लागल्याने नाटकाचा दर्जा कमालीचा घसरला आहे. सध्या झाडीपट्टीतली अनेक नाटके ‘तमाशाप्रधान मराठी सिनेमा’च्या वाटेवर गेली आहेत. आताशा नाटकात एखादी लावणी पाहिजेच, असा गावोगावच्या तरुण प्रेक्षकांचा धोशा असतो आणि थोडे पैसे वाढवले की त्यांची ही विनंतीवजा धमकी सहज मान्य होते. ‘ए, आयोजकांना हलकट जवानी डान्स बघायचाय; तो काळा वाला ड्रेस घाल’ असे नाटकाचा लेखक-दिग्दर्शकच सांगायला येतो, तेव्हा सावित्रीबाई फुले यांच्या फोटोमागे उभारलेल्या स्टेजवर त्यांनीच शिकवलेल्या मुली कशा पैशाच्या बोलावर नाचतात, हे पाहून नजर लाजेने खाली जाते. नाटकांच्या या भाऊगर्दीत निळूभाऊ टाइप पाटील व्हिलन दाखवला जातो. चित्रविचित्र आवाजात एंट्री मारणारा त्याचा चेला दाखवला जातो. कमरेखालचे विनोद करणारा एखादा नट विनोदी नट म्हणून या नाटकांत सहज खपतो. स्त्रियांवरील विनोदाला हमखास शिट्या पडतातच! नाटकातली एकूणएक स्त्री कलाकार दु:खी, रडवेली दाखवली जाते, हे सर्व पाहून आपण नेमके कोणत्या शतकातले नाटक पाहत आहोत, असा भास झाल्याशिवाय राहत नाही. अश्लील नाटके दाखवून गावोगावची तरुण पिढी बरबाद करण्यासाठी उठलेल्या झाडीपट्टीतल्या तद्दन बाजारू व्यापार्‍यांची चीड निश्चितच बोरकरांना येते आणि म्हणूनच झाडीपट्टीच्या बदललेल्या चेहर्‍याबद्दल बोलताना सदानंद बोरकर पेटून उठतात. झाडीपट्टीत मोजकेच पण दर्जेदार काम करणारे असल्या दर्जाहीन नाटकांबद्दल मात्र अवाक्षर काढत नाहीत. हरिश्चंद्र बोरकर यांचा बराच अभ्यास आहे; झाडीपट्टी आणि बोलीभाषेवर मात्र तेही विरोध करत नाहीत, याची खंत सदानंद बोरकरांना सदोदित वाटते.
bhingarde.namrata@gmail.com