आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सळसळ नृत्याची...

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘भन्नाट’ हा एकच शब्द वर्णन करण्यासाठी पुरेसा ठरावा अशा नृत्य प्रशिक्षण आणि नृत्य दिग्दर्शन या दोन्ही प्रकारांत प्रभुत्व मिळवलेल्या फुलवा खामकर यांचे हे मनोगत...

पारंपरिक नृत्यापासून आजच्या ढिंच्यॅक जमान्यापर्यंत नृत्य प्रकारात सातत्याने बदल घडत गेले. कधीकाळी मराठी चित्रपटसृष्टीत नायक, नायिका गाण्यांवर स्वत: ठरवलेल्या मूव्हमेंट्स घेत असायच्या, मात्र सुबलदांनी ख-या अर्थाने मराठीत नृत्य दिग्दर्शक ही संज्ञा रूढ केली. गाण्यांवर कामचलाऊ आणि कधीकधी हास्यास्पद ठरणारे नृत्य करण्यापेक्षा गीतांना योग्य त्या हालचाली देण्यावर सुबलदांनी भर दिला. हिंदी चित्रपटसृष्टीत तर कोरिओग्राफर्सना फार पूर्वीपासून महत्त्व होते. सुबलदांना गुरू मानून आजची माझी पिढी कोरिओग्राफर म्हणून मराठी चित्रपटसृष्टीत काही करण्याची इच्छा बाळगतेय, याला सध्याची मराठी चित्रपटांची बदललेली मानसिकता आणि बजेट कारणीभूत आहेत.
कॉलेजमध्ये असताना बेधुंद होऊन नाचायला आवडणा-या मला स्वप्नातदेखील कधी वाटले नव्हते की, मी कोरिओग्राफर म्हणून नावारूपाला येईन. आता नृत्याशी संलग्न अनेक रिअ‍ॅलिटी शो सुरू असले तरीही 1995च्या सुमारास सोनी चॅनलवर पहिल्यांदा सुरू झालेल्या ‘बुगी वुगी’ या पहिल्या डान्स शोमध्ये आमच्या कॉलेजच्या डान्स ग्रुपने सहभाग घेतला. या ग्रुपमध्ये नाचणा-यांपैकीच मीही एक होते. बक्षीस जिंकल्यानंतर थोडा धीर आला आणि मी सोलो डान्ससाठी आॅडिशन दिली. या सोलो सादरीकरणानंतर माझा स्वत:च्या नृत्यावर अधिकाधिक विश्वास बसला. नृत्यातच करिअर करण्याचे विचार मनात येऊ लागले. सलग दोनदा ‘बुगी वुगी’ जिंकल्यानंतर बराच काळ मी नृत्यापासून दूर राहिले होते. दरम्यान, मी आई झाले आणि 2006मध्ये ‘बुगी वुगी’च्या ‘मम्मी स्पेशल’मध्ये मी कमबॅक केले. चक्क जिंकलेसुद्धा! ‘बुगी वुगी’त स्पर्धक म्हणून सादर केलेल्या जिम्नॅस्टिक नृत्याने मला हिंदीत पहिला ब्रेक मिळवून दिला. ‘ताल’ चित्रपटात ऐश्वर्यावर चित्रीत झालेल्या एका जिम्नॅस्टिक नृत्याचे ट्रेनिंग देण्यासाठी मला विचारण्यात आले. विश्वसुंदरी ऐश्वर्या रॉयने पंधरा दिवसांच्या वर्कशॉपमध्ये जराही कुरबूर न करता मेहनतीने हा डान्स फॉर्म शिकून घेतला. अशा काही अनुभवांतून मला चित्रपटाची कोरिओग्राफी कशी असते, याचे धडे मिळाले. चित्रपटाची कोरिओग्राफी आणि स्टेज कोरिओग्राफी यांत जमीन-अस्मानाचा फरक आहे. चित्रपटातील गाणे बसवताना कोरिओग्राफरला कॅमे-याची लेन्स आणि अँगल्स याचे जुजबी ज्ञान तरी असायला हवे. ब-याचदा लोकेशननुसार स्टेप्स बदलाव्या लागतात. मग गाणे चित्रीत करण्याआधी लोकेशन पाहून त्यानुसार विचार करावा लागतो. चित्रपटासाठी नृत्य बसवताना हे गाणे स्क्रीनवर कसे दिसले पाहिजे याचे चित्र कोरिओग्राफरच्या डोक्यात तयार असावे लागते. नृत्याचे ‘कटिंग पॉइंट’ नोंदवत एडिटिंग करताना गाणे आकारास येते. त्यासाठी लागणारी मेहनत घेण्याची कोरिओग्राफरची मानसिक तयारी लागते. हिंदी चित्रपटात आता नायक, नायिका नृत्याच्या तालमीवर तितकासा विश्वास ठेवत नाहीत; मात्र मराठीत तरी नृत्याची तालीम घेऊन चित्रीकरण करणे शक्य असते. लावणी बसवायची असेल तर नृत्य करणा-याने किमान दोन दिवस तालीम करावी, असा माझा आग्रह असतो. तालीम असेल तर मोठे कट घेता येतात, जेणेकरून गाणे पाहताना सुखद अनुभव येतो. आताच्या गाण्यांचे छोटे छोटे कट एडिटिंगमध्ये जोडले जातात, त्यामुळे ते संपूर्ण गाणे पाहताना डोळ्यांना निश्चितच त्रास होतो. म्हणूनच आपल्याला सरोज खानने बसवलेले ‘डोला रे’ बघतच राहावेसे वाटते. या उलट आताच्या ‘चिकनी चमेली’मधले छोटे छोटे कट्स डोळे स्थिर ठेवू शकत नाहीत. ‘नटरंग’ आणि ‘एकापेक्षा एक’ यांनी मला ख-या अर्थाने कोरिओग्राफर म्हणून ओळख दिली. ‘वाजले की बारा’ सगळ्यात जास्त हिट झाले असले तरी मला स्वत:ला ‘अप्सरा आली’ची ‘सिग्नेचर स्टेप’ प्रचंड आवडते. जास्तीत जास्त तरुणांनी कोरिओग्राफी हे क्षेत्र व्यवसाय म्हणून निवडावे असे मला नेहमीच वाटते; पण केवळ पैसा आणि प्रसिद्धी यापलीकडे नृत्याच्या क्षेत्रात आपला ‘पदन्यास’ कायमचा कोरला गेला पाहिजे, यावर नव्या पिढीने लक्ष केंद्रित करायला हवे.
शब्दांकन : नम्रता भिंगार्डे