आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

10 हजारी मनसबदार!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

साधारणपणे वाचकांचे तीन प्रकार मानले, तर पहिल्यात दिसेल ते पुस्तक अधाशीपणे वाचणारा वाचक येतो, दुस-यात ब-यापैकी वाचणारा; पण वाचनाच्या दहापट खरेदी करणारा वाचक येतो, तिस-या प्रकारात विशिष्ट विषयाचा ध्यास घेऊन वाचन करणारा वाचक येतो. गिरीश टकले हे तिस-या प्रकारात बसतात. नाशिकच्या प्रसिद्ध टकले बंधूंपैकी एक असल्याने लोकांना ते जवाहिरे म्हणून माहीत आहेत. पण, दर्जेदार पुस्तकांची त्यांना असलेली पारख अद्वितीय आहे. त्यांचा स्वत:चा जवळपास दहा हजार पुस्तकांचा संग्रह आहे. त्यात मोठ्या संख्येने इतिहासाची पुस्तके आहेत. मार्टिन गिल्बर्टचे 20व्या शतकावरचे इतिहासाचे खंड मी त्यांना दिले होते. ट्रफलगारसारखे युद्धावरचे पुस्तकही. बहारीसन्ससारख्या दिल्लीतील खान मार्केटमधील प्रसिद्ध दुकानातून ते पुस्तके मागवतात. गिरीश टकले यांच्या आजोबांना वाचनाची प्रचंड आवड होती आणि ज्ञानार्जनाची प्रचंड ओढ होती.
वडील जरी जास्त शिकलेले नसले तरी ते लहानपणापासून गिरीशना पुस्तके देत. वडिलांनी त्यांना नाझी भस्मासुरासारखे पुस्तक सातवी-आठवीत असताना आणून दिले. एकूणच त्यांच्या संग्रहात अनेकविध शब्दकोश, विश्वकोश यांच्याबरोबरच हाताने लिहिलेल्या पोथ्याही आहेत. अशा जवळजवळ चारशे पोथ्या त्यांच्या संग्रहात आहेत. त्यातील काही तर पाचशे वर्षे जुन्या आहेत. हिटलर, चर्चिल, दुसरे महायुद्ध या विषयांवर बरीच पुस्तके त्यांच्या संग्रहात आहेत. इतिहासाव्यतिरिक्त प्रवास, छायाचित्रण याही विषयांवरील पुस्तके ते जमवतात.
एकदा ते म्हणाले की, ज्ञानेश्वरीत फारसी शब्दांचा इतका भरणा आहे की, ती सातशे वर्षांपूर्वी लिहिली गेली आहे, हे अशक्य वाटते. औरंगजेब, शिवकालीन इतिहास, पेशवाई अशा विषयांवरची पुस्तके त्यांनी वेचून वेचून जमवली आहेत. मुंबई, दिल्ली, बंगळुरू येथे राहणा-यांना पुस्तकांची अनेक मोठी दुकाने उपलब्ध असतात; पण अशी सोय नाशिकसारख्या शहरात नसते. म्हणूनच अशा पॅशनेट ग्रंथ संग्राहकाचा कौतुकमिश्रित अभिमान वाटल्यावाचून राहत नाही.