आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

द डेव्हिल्स डबल : कूपर आणि कूपर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रत्येक चित्रपट सर्वार्थाने जमलेला असावा अशी अपेक्षा फोल आहे. चांगल्यात चांगला चित्रपटदेखील कधी-कधी एखादा मूलभूत दोष बाळगतो आणि सामान्य वाटणारे चित्रपटदेखील एखादी छान गोष्ट करून जातात. मात्र ही झाली दोन टोके. बरेच, म्हणजे काही मोजके श्रेष्ठ आणि अगदीच टाकाऊ चित्रपट वगळता बहुतेक सारेच चित्रपट, या टोकांच्या मध्ये कुठेतरी येतात असे आपल्याला दिसते. लतीफ वाहिया या वादग्रस्त इराकी व्यक्तिमत्त्वाच्या चरित्रात्मक कादंबरीवर (?) आधारलेला लीतामाहोरी दिग्दर्शित ‘द डेव्हिल्स डबल’देखील अशामधल्या चित्रपटांतलाच एक आहे, हे पाहताक्षणीच लक्षात येते. त्यातले गोंधळ अनेक आहेत आणि ते संकल्पनेपासून ते दिग्दर्शन शैलीपर्यंत सर्वत्र पसरलेले आहेत. तरीही तो जरूर पाहावा अशाही काही निश्चित गोष्टी इथे आहेतच. डबल रोल आपल्या परिचयाचे आहेतच. लोककथा, परीकथा, साहित्य, नाटक, जगभरचे चित्रपट यामध्ये सातत्याने येणाºया ज्या प्रमुख कल्पना आहेत, त्यात एका चेहºयाच्या दोन माणसांमध्ये घडणाºया नाट्याचा नंबर बराच वर लागतो. या माणसांचे परस्परसंबंध वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात, चित्रप्रकारही पूर्ण वेगळ्या जातकुळीचे असू शकतात. मात्र एका मूलभूत पातळीवर या समान चेहºयाच्या दोन प्रवृत्तींमधला संघर्ष सर्व माध्यमांत काहीसा परिचयाचा वाटतो. कदाचित प्रत्येक माणसाच्या व्यक्तिमत्त्वातल्या दुभंगलेपणाची हा विषय आठवण करून देत असल्याने मूळ कल्पनेतच असलेल्या चमत्कृतीचाच परिणाम म्हणून कदाचित, पण बहुधा या विषयाला स्थान देणाºया कलाकृती सत्यकथनाचा दावा करत नाहीत. ‘डेव्हिल्स डबल’चा वेगळेपणा हा, की तो तसा दावा करतो. अगदी शंभर टक्के नाही. कारण मूळ पुस्तकाच्या सत्याबद्दलच अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. पुस्तकात लिहिल्याप्रमाणे लतीफ हा सद्दाम हुसेनच्या मुलाचा, उदे हुसेनचा बॉडी डबल होता किंवा नाही याचाच काही निश्चित पुरावा उपलब्ध नाही. त्याखेरीज पुस्तकदेखील पटकथाकार मायकेल थॉमस आणि दिग्दर्शक लीतामाहोरीने चित्रपटासाठी बरेच बदलले आहे. त्यामुळे हा चित्रपट सत्य घटनांवर आधारित आहे असे म्हणणे कठीणच. त्याखेरीज त्यातले काही मोजके तुकडे वगळता, दृश्य आणि सादरीकरण या दोन्ही बाबतीत चित्रपट वास्तववादी न वाटता करमणूकप्रधान व्यावसायिक स्वरूपाचा वाटतो. तरीही उदे हुसेनच्या आयुष्याचे तपशील, न्यूज फुटेजचा वापर, ऐतिहासिक घटनांचे संदर्भ, उदे आणि सद्दामसारख्या ऐतिहासिक व्यक्तिरेखा यांमुळे त्याला पूर्ण काल्पनिकदेखील मानता येत नाही.
चित्रपट सुरू होतो तो लतीफला (डॉमिनिक कूपर) उदेपुढे (पुन्हा कूपर) हजर केले जाण्यापासून. शाळेत असतानाची दोघांची ओळख, पण पुढल्या काळात रस्ते अर्थातच वेगळे झालेले. उदे आपल्या वडलांच्या सत्तेचा वाटेल तसा फायदा घेणारा क्रूरकर्मा बनलेला, तर लतीफने आजवर सैन्यात चाकरी केलेली. समोर दुसरा पर्यायच नसल्याने थोड्याफार मारहाणीनंतर आणि तुरुंगवासानंतर लतीफ उदेची धमकीवजा विनंती मान्य करतो आणि स्वत:चे अस्तित्व पुसून टाकून ऐषारामाच्या नजरकैदेत राहायला लागतो. अर्थात वेळोवेळी लतीफची जागा घेत. यापुढला चित्रपटाचा बराचसा भाग हा उदेच्या मनमानी कारभाराच्या आणि लतीफच्या हे निभावून नेत सुटकेचा मार्ग शोधण्याच्या गोष्टी सांगतो. असा मार्ग शोधणे जवळपास अशक्य असते, हे वेगळे सांगायला नकोच. चित्रपट हा प्रामाणिकपणे चरित्र मांडत नसल्याने आणि त्याबरोबरच केवळ रंजक कथानकाकडेही पाहत नसल्याने त्याच्या निर्मितीमागच्या हेतूवरच काहींना शंका आहे. त्यात एक स्पष्टपणे न कळणारा खोटेपणा असण्याची शक्यता आहे आणि तो म्हणजे लतीफचे पूर्ण सकारात्मक चित्रण. लतीफने आपल्या पुस्तकात ते तसे करणे स्वाभाविक आहे. पण हेही खरे की त्याच्या वागण्याला एकही साक्षीदार नाही. हातात सत्ता, मनमानी करण्याची शक्ती आणि संधी येताच ती पूर्णपणे झुगारून द्यायला माणूस फारच सज्जन हवा आणि लतीफ तितका सज्जन असल्याचे सर्टिफिकेट त्याने पुस्तकातून स्वत:लाच बहाल केलेय. त्यामुळे ते फारसे विश्वसनीय नाही. पण चित्रपटाकडे केवळ चित्रपट म्हणून पाहताना हे हेतू, खºयाखोट्याचे हिशेब बाजूला ठेवता येतात आणि जर तसे केले तर डेव्हिल्स डबल आपल्याला गुंतवून ठेवतो.
मायकेल थॉमसने आपल्या पटकथेत उदेच्या आयुष्यातले अनेक प्रमुख प्रसंग घेतले आहेत. कधी पुस्तकाच्या संदर्भाने तर कधी स्वतंत्रपणे. यात उदेबद्दल सांगितल्या जाणाºया बºयावाईट गोष्टी येतात (उदाहरणार्थ, शाळकरी मुलींना रस्त्यातून जबरदस्ती उचलून नेणे), त्याने सद्दामच्या खास माणसाला भर पार्टीत खलास करण्यासारख्या इतिहासात नोंदलेल्या घटना येतात आणि खास तपशील माहीत नसलेल्या, पण कथेच्या तर्कशास्त्रात बसणाºया घटनाही वेगळ्या रूपात हजेरी लावतात (उदाहरणार्थ उदेवर जवळजवळ प्राणघातक ठरलेला हल्ला). मात्र या साºयाचे जोडकाम केवळ चित्रपटाला वादग्रस्त आणि अतिरंजित करण्यासाठी वापरल्यासारखे वाटत नाही. त्यातून खरेच एक चांगली पटकथा आकाराला येते. पार्टीतल्या खुनाचा प्रसंग, कॅलिग्युलाच्या परंपरेतला लग्नाचा प्रसंग, शाळकरी मुलीच्या बापाबरोबरचा स्फोटक संवाद अशा अनेक जागा या प्रेक्षकाला विचाराला उसंत न देता खिळवून ठेवतात. काही वेळा आपण तर्कातल्या चुका हेरू शकतो, नाही असे नाही. उदाहरणार्थ शेवटाकडे उदेपासून लपताना लतीफ दाढीमिशा काढण्यासारखी उघड गोष्ट का करत नाही? घरच्यांना संकटात आणण्याचा धोका तो कसा पत्करतो? इत्यादी. पण अशा शंकांमध्ये आपण अडकून राहत नाही, ते डॉमिनिक कूपरच्या उत्कृष्ट दुहेरी भूमिकेमुळे. बहुतेक दुहेरी भूमिका मोजक्याच प्रसंगांत पडद्यावर एकत्र असतात. इथे मात्र असे मुबलक प्रसंग आहेत. उत्तम इफेक्ट्समुळे इथला कूपरचा दोन्ही भूमिकांमधला वावर सोपा झालाय हे खरे असले तरी त्याने या एकाच रूपातल्या दोन्ही व्यक्तिरेखा परस्परांपेक्षा इतक्या भिन्न रंगवल्यात, की हा एकच माणूस आहे यावर विश्वास बसू नये.
ganesh.matkari@gmail.com