तक्रारी करणा-यांची संख्या वाढली तेव्हा मालकीणबार्इंनी वैतागून नारायणरावांना मानाचं पान काही दिलं नाही. नारायणराव खंतावत चालले. एवढा दणकट गडी शांत झाल्याने त्यांच्या दोन पोरांचा जीव तीळतीळ तुटू लागला..
नारायणराव नामक इसम अत्यंत अभ्यासू असेल असे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाकडे पाहिले की अजिबात वाटायचे नाही. काहीसा रागीट चेहरा असलेले नारायणराव हे तापट स्वभावाचे गृहस्थ म्हणून परिचित होते. ‘अरे’ ला ‘कारे’ असं उत्तर देणारे नारायणराव ‘मालवणचा रावडी राठोड’ या टोपणनावाने ओळखले जायचे. पूर्वी मराठमोळ्या चेह-याच्या वाड्यात ते राहायचे. पण या वाड्याची खांडे-दांडे बदलायला झाली होती, खांबांना वाळवी लागली होती. वाडा दुरुस्तीचे हे काम वाड्याच्या कारभा-याला झेपणार नाही, हे लक्षात आल्यावर त्यांनी लगेच एका टाऊनशिपमध्ये आपला मुक्काम हलवला. काँग्रेस नामक या टाऊनशिपच्या कारभा-यांना नारायणासारख्या ‘कंट्रीसाइड’ माणसाची गरज होतीच. कारण या टाऊनशिपच्या कारभा-यांना त्यांच्या भावकीतल्या लोकांचा खूप धाक होता. टाऊनशिपजवळच्या एका जागेत टाऊनशिपची मालकीण आणि त्यांची भावकी यांची संयुक्त मालकी होती. ही जागा भावकीतले लोक दादागिरी करून बळकावून टाकतील, अशी भीती मालकिणीला वाटायची. म्हणून त्यांनी नारायणरावसारख्या दमखम असलेल्या इसमाला आपल्या टाऊनशिपमध्ये राहायला येण्याचे निमंत्रण दिले. ‘तुम्ही जर आमच्याकडे आलात तर तुम्हाला मानाचे पान दिले जाईल,’ असा शब्द टाऊनशिपच्या मालकिणीने दिल्यावर नारायणरावांना त्यांना नाही म्हणता येईना. आपल्या ‘अभ्यासा’चं टाऊनशिपमध्ये नक्की चीज होईल, अशी खात्री त्यांना वाटू लागली. पण टाऊनशिपमधले लोक महाबिलंदर होते. बारा गावचं पाणी पिऊन आलेले इथले रहिवासी तोंडावर नारायणरावांशी गोड गोड बोलायचे, मात्र मागून त्यांची बारीकसारीक खोडी काढायचे. एखाद्याने खोडी काढली तर ‘बाई, माझी करंगळी मोडली’ अशी तक्रार करणा-यातले नारायणराव नव्हते. खोडी काढणा-याला ते चांगला रट्टा ठेवून द्यायचे. असे रट्टे खाल्लेले लोक मालकीणबार्इंकडे तक्रारी करू लागले. अशा तक्रारी करणा-यांची संख्या वाढू वाढली तेव्हा मात्र मालकीणबार्इंनी वैतागून नारायणरावांना मानाचं पान काही दिलं नाही. नारायणराव खंतावत चालले. अबोल झाले. एवढा दणकट गडी शांत झाल्याने त्यांच्या दोन पोरांचा जीव तीळतीळ तुटू लागला. शेवटी पोरांनी त्यांना एका समुपदेशकाकडे नेले.
‘बोला, काय होतंय तुम्हाला?’- समुपदेशक.
‘आॅफिसमध्ये कोणी बोललं का?’, ‘बॉसनं अपमान केला का?’ समुपदेशक एकापाठोपाठ प्रश्न विचारत होते. नारायणरावांच्या चेह-यावरचे भाव हळूहळू बदलत होते.
‘बोला तुम्ही. मोकळेपणाने बोला. बोलल्याशिवाय तुम्हाला बरं वाटणार नाही.’- समुपदेशक.
‘कसं सांगू तुम्हाला, हल्ली माझं कुणी ऐकतच नाही हो. मी जिथे राहतो ना तिथं आसपास शेतजमीन आहे. ते शेतकरी लोक बिचारे खूप गरीब आहेत. त्यांना काम मिळावं, त्यांचं चांगलं व्हावं, म्हणून मी एक स्कीम मांडली. पण सगळ्यांनी त्याची टिंगलच लावलीय.’ - नारायणरावांनी आपले मौन सोडले.
‘शेतक-यांना त्यांच्या शेतात भरपूर कामं आहेत ना. मजूर मिळत नाहीत, असं शेतकरीच सांगत असतात. अजून कसलं काम देताय तुम्ही त्यांना?’- समुपदेशक.
‘शेतातली कामं आहेत हो. पण नुसतं धान्य पिकवून करायचं काय ? गोदामात धान्याची पोती सडायला लागलीत आणि शेतक-याच्या धान्याला भाव कुठे मिळतो?’ नारायणरावांनी शेतक-याच्या स्थितीबद्दल चांगला अभ्यास केला असल्याचे दिसत होते. ‘बरं, पुढे काय झालं?’ - समुपदेशक.
‘म्हणून मी या शेतजमिनीवर इंडस्ट्री चालू करा, अशी स्कीम मांडली. माझा मुकेश म्हणून एक मित्र आहे, तो तयार आहे इंडस्ट्री काढायला. पण पेपरवाल्यांनी, आमच्या भावकीतल्या लोकांनी माझ्या नावानं बोंबाबोंब चालू केलीय. मी एवढा ‘अभ्यास’ करून ही स्कीम मांडली, त्याची कुणाला कदरच नाहीये.’ - नारायणरावांनी आपण का अबोल झालो होतो, हे सांगून टाकलं.
‘अहो, पण हे शेतकरी लोक इंडस्ट्रीत कसली कामं करणार ?’- समुपदेशक.
‘मजुरीची. शेतीत मजुरीच करतात ना ते.’ नारायणराव.
‘त्यांच्या जमिनी तुम्ही घेणार, त्यांना मजुरी किती मिळणार?’ समुपदेशक.
‘बाजारभावाने. म्हणजे दिवसाला 300-400 रु. रोजगार मिळेल त्यांना.’ नारायणराव. ‘यात शेतक-यांचा कसा फायदा होणार?’ समुपदेशक. ‘हे बघा, त्यांना शेतजमिनीचे पैसे मिळणार. शिवाय महिन्याला 10-15 हजार नक्की मिळतील.’ नारायणरावांचा अभ्यास खरंच दांडगा असल्याचं दिसत होतं.
‘अहो, पण शेतक-यांच्या पोरांनी जमिनीचे पैसे बारबालांवर उधळून लावले तर? असं यापूर्वी अनेक ठिकाणी घडलंय म्हणून विचारतो.’ समुपदेशकाची शंका. ‘अहो पण त्यातून रोजगार निर्मितीच होईल ना. डान्स बार बंद आहेत, म्हणून बारबाला बेकार आहेत. हे लोक खासगी पार्ट्या करून त्यांच्यावर दौलतजादा करतील. म्हणजे अप्रत्यक्ष रोजगार निर्मितीच आहे ना ही.’ नारायणराव. ‘शेतक-यांच्या जमिनी जाणार, तो पैसा त्यांची पोरं उडवून टाकणार. मग तुमच्या स्कीमचा फायदा होणार तरी कुणाला?’ समुपदेशकाची आणखी एक शंका. ‘बाकी कुणाचा फायदा होईल न होईल, पण मुकेशचा तरी होईल ना!’ नारायणरावांनी उत्तर दिले आणि समुपदेशकाने सुटकेचा नि:श्वास टाकला...