आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गांव के नांव थिएटर, मोर नांव हबीब

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘नवरंगभूमी’च्या माध्यमातून हबीब तन्वीर यांनी शहरी कलाकारांसोबतच ग्रामीण तसेच लोककलावंतांना काम करण्यासाठी एक जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून दिले. छत्तीसगडी बोलीभाषा हीच त्यांच्या नाटकांतील संवादाचे माध्यम ठरली आणि लोककलावंतांकडून त्यांनी ‘नाचा शैली’त काम करून घेतले.

जागतिक रंगभूमीदिनी रंगभूमीचा विषय निघाला आणि हबीब तन्वीर यांचे नाव येणार नाही, असे होणे केवळ अशक्य! विशेषत: नव-रंगभूमीबाबत चर्चा होत असताना तर हबीब तन्वीर यांचा नामोल्लेख हमखास होतोच. एक चालतीबोलती नाट्यसंस्था असलेले नाटककार, दिग्दर्शक, कवी आणि कलाकार हबीब तन्वीर यांना ‘परंपरांना छेद देणारा रंगकर्मी’ म्हणावे, तर त्यांनी नव्याने रूढ केलेल्या परंपरांची आपसूकच आठवण होते. भारतीय रंगभूमी ‘नट-व्यवस्थापक’ परंपरेसाठी प्रसिद्ध होती. या परंपरेच्या नामावलीतील उत्पल दत्त, पृथ्वीराज कपूर, शिशिर भादुरी या प्रसिद्ध नावांमध्ये हबीब तन्वीर हे शेवटचे नाव! त्यांच्या पश्चात या परंपरेचा वारसा चालवण्यासाठी अद्याप तरी कोणीही पुढे येऊ शकलेले नाही. परदेश दौरे करून आलेल्या लोकांच्या विचारसरणीवर पाश्चात्त्य संस्कृती आणि वर्तन व्यवहाराचा खोलवर प्रभाव पडतो. तद्वत हबीब तन्वीर यांच्यातील रंगकर्मीला नवा आयाम देण्यामध्ये त्यांच्या परदेश दौ-यांचे विशेष योगदान राहिले आहे. 1956 मध्ये बर्लिन (जर्मनी) येथील काही महिन्यांचे वास्तव्य त्यांच्या कामाला नवी दिशा देणारे ठरले. विशेषत: बेर्टोल्ट बे्रख्तची नाटके पाहिल्यावर, नाटकात स्थानिक बोलीभाषा आणि वाक्प्रचारांचा वापर करूनही जागतिक संवाद साधता येतो, याची त्यांना जाणीव झाली. कालांतराने हाच विचार हबीब तन्वीर यांनी नव-रंगभूमी आणि छत्तीसगडी ‘नाचा’ शैलीच्या नाटकांतून रुजवला. हबीब तन्वीर प्रयोगशील नाट्यकर्मी होते. ‘नव-रंगभूमी’च्या माध्यमातून त्यांनी शहरी कलाकारांसोबतच ग्रामीण तसेच लोककलावंतांना काम करण्यासाठी एक जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून दिले. छत्तीसगडी बोलीभाषा हीच त्यांच्या नाटकांतील संवादाचे माध्यम ठरली आणि लोककलावंतांकडून त्यांनी ‘नाचा शैली’त काम करून घेतले. ‘मिट्टी की गाडी’ हे नाटक नाचा शैलीतली सर्वश्रेष्ठ नाट्यरचना होती. ‘चरणदास चोर’ असो वा ‘आगरा बाजार’, त्यांच्या प्रत्येक नाटकात प्रयोगशीलता होती. त्यामुळेच त्यांची नाटके केवळ देशातच नव्हे तर परदेशातही लोकप्रिय झाली. स्थळ-काळाच्या, परंपरांच्या पलीकडे जाऊनही त्यांनी नाटकांचे प्रयोग केले. नाट्यगृहाच्या चार भिंतींपलीकडे जाऊन त्यांनी खुल्या बाजारात नाटकाचे प्रयोग केले. त्यांच्या अनेक नाटकांमध्ये एकाच वेळी दोन, पाच किंवा दहा नव्हे तर तब्बल 50, 60, 70 कलाकारांनी काम केले. ‘आगरा बाजार’ या नाटकात तब्बल 72 कलाकार होते. असे असूनही त्यांची नाटके कधीही भरकटली नाहीत. हबीब तन्वीर यांच्या ‘पोंगा पंडित’ या गाजलेल्या नाटकाचे अनेक वर्षे प्रयोग झाल्यानंतर मध्य प्रदेशात त्याच्या प्रयोगावरून वादंग निर्माण झाले आणि हबीब तन्वीर यांच्यावर जातीयवादी असल्याचा शिक्का मारण्यात आला. एकापाठोपाठ एक अनेक शहरांतून त्यांना हिंदू संघटनांच्या रोषाला सामोरे जावे लागले. अनेक ठिकाणी त्यांच्या विरोधात निदर्शने झाली. नाटकाचे प्रयोग बंद पाडण्याचे प्रयत्न झाले. 1972 पासून सादर होत असलेल्या त्यांच्या ‘चरणदास चोर’ या नाटकाच्या प्रयोगांवर छत्तीसगड सरकारने काही वर्षांपूर्वी बंदी आणली होती. ‘बहादुर कलारिन’ नावाच्या त्यांच्या आणखी एका नाटकाच्या कथानकावर छत्तीसगडमध्ये काही ठिकाणी आक्षेप घेण्यात आला. स्वत: हबीब तन्वीरही या नाटकाच्या प्रयोगाबाबत फारसे समाधानी नव्हते. ‘बहादुर कलारिन’ हे नाटक ‘चरणदास चोर’ एवढे लोकप्रिय झाले नाही, पण तरीही हे नाटक तन्वीर यांच्या अंत:करणात खोलवर रुजले होते, ही वस्तुस्थिती आहे. या नाटकाची नायिका फिदाबाई प्रत्यक्षात एखाद्या नामवंत कलाकाराएवढीच लोकप्रिय होती. प्रचंड विरोध आणि अडचणी येऊनही तन्वीर यांच्या वर्तनात कोणताच बदल झाला नाही. ते रंगभूमीवर सातत्याने कार्यरत राहिले. हबीब तन्वीर यांनी एकदा म्हटले होते की, ‘सांस्कृतिक राष्ट्रवादा’विरोधात कलात्मक संघर्ष हे नव-रंगभूमीसमोरचे दुसरे आव्हान आहे. ते फॅसिझमला सांस्कृतिक राष्ट्रवाद म्हणत. ‘पोंगा पंडित’ आणि ‘जिन लाहौर नई वेख्या...’ या नाटकांना छत्तीसगडमध्ये झालेल्या विरोधाचे वर्णन त्यांनी याच शब्दांत केले. हबीब तन्वीर यांनी रंगभूमीवरील प्रवासात अनेक चढउतार पाहिले आहेत. ‘गांव के नांव ससुराल, मोर नांव दामाद’(1973) या नाटकाने त्यांना प्रसिद्धी तर दिलीच, शिवाय दिग्दर्शक म्हणून नवी ओळखही मिळवून दिली. आपल्याच मायभूमीत त्यांच्या नाट्यकृतींना विरोध होत असताना, जगभरात मात्र या नाट्यकृतींचे मोठे कौतुक झाले. ‘चरणदास चोर’ हे नाटक एडिनबर्ग इंटरनॅशनल ड्रामा फेस्टिव्हलमध्ये (1982) गौरवले जाणारे पहिले भारतीय नाटक आहे. श्याम बेनेगल यांनी याच नावाने मोठ्या पडद्यावर एक चित्रपट आणला. हबीब तन्वीर यांनी नऊ चित्रपटांतून अभिनयही केला. रिचर्ड अ‍ॅटनबरो यांचा ‘गांधी’ हा चित्रपट त्यापैकी एक. काही वर्षांपूर्वी त्यांचा जीवनपट आणि नव-रंगभूमी यावर एक माहितीपट बनवण्यात आला, त्याचे नाव होते - ‘गांव के नांव थिएटर, मोर नांव हबीब!’ आपले संपूर्ण जीवन रंगभूमीला वाहिलेले हबीब तन्वीर आज आपल्यात नाहीत; पण रंगभूमीसाठी दिलेल्या योगदानामुळे ते नाट्यरसिकांच्या कायम स्मरणात राहतील. हबीब तन्वीर यांच्या निधनानंतर ‘नव-रंगभूमी’ ही आस्ते कदम मरणपंथाला लागली, ही दु:खद बाब आहे. त्यांचा समृद्ध वारसा जतन करून पुढे नेण्यासाठी कुणीच धजावत नाही, त्यांची मुलगीही नाही...