आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Rasik Articles, Vaman Kendre, Worlds Theater Day

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रवाहाबाहेरची समृद्ध नाट्यचळवळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘एनएसडी’च्या अनुभवसिद्ध प्रशिक्षणानंतर संधी आणि प्रलोभने समोर असताना, एकनिष्ठ रंगकर्मींची पिढी घडवण्यासाठी त्यांनी थेट मणिपूरमधील जन्मगावाची वाट धरली... नाटकात संगीत-नृत्याच्या जोडीला, मार्शल आर्ट्सचाही वापर करण्याचे धाडस दाखवले... इतिहासाच्या पुनर्मूल्यांकनाची आगळी नाट्यशैलीेसुद्धा आकारास आणली... अशी अलौकिक नाट्यप्रतिभा लाभलेल्या रतन थिय्याम यांच्या नाट्यचळवळीचा ज्येष्ठ दिग्दर्शक वामन केंद्रे यांनी घेतलेला वेध...

रंगभूमी आणि रतन थिय्याम या दोन भिन्न गोष्टी नाहीत, असे आजही अनेक रंगकर्मी मानतात. रंगभूमी हाच ध्यास आणि रंगभूमी हाच श्वास मानलेले, रतन थिय्याम 65 वर्षांच्या आपल्या झंझावाती आयुष्यात रंगभूमीशी कमालीचे प्रामाणिक राहिले आहेत. दिल्लीच्या ‘नॅशनल स्कूल आॅफ ड्रामा’मध्ये माझी खोली म्हणजे रतन थिय्याम यांच्यासोबतच्या गप्पांचा अड्डा असे. रात्रभर रंगणा-या या गप्पांमध्ये रंगभूमीशी निगडित अनेक गोष्टी यायच्या. ‘नॅशनल स्कूल आॅफ ड्रामा’मधून शिक्षण पूर्ण झाल्यावर हा गडी थेट मणिपूरमधील आपल्या जन्मगावी गेला. तेथे ‘कोरस रेपट्री थिएटर’च्या माध्यमातून 20 ते 25 रंगकर्मी त्यांनी तयार केले. त्यातील प्रत्येकाला गायन, वादन, अभिनय या सगळ्या कला येत होत्या. त्यामुळे कोणाविना अडवणूक होण्याचा प्रसंग त्यांच्या नाटकात उद्भवणार नाही, ही त्यांची दूरदृष्टी! मायभूमीत त्यांनी वेगळ्या पद्धतीची रंगभाषा विकसित केली. मणिपूरला जाऊन त्यांनी आपल्या स्थानिक कला सादरीकरणाच्या परंपरेला महत्त्व दिले. तटस्थपणाने आपल्या परंपरेकडे बघून, त्यातील सर्वोत्तम तेच वेचले. त्यांनी आपल्या नाटकांत संगीत, नृत्यशैली अशा सर्व पारंपरिक कलांचा; अगदी मार्शल आर्टचासुद्धा वापर केला. ख-या अर्थाने त्यांनी भारतीय रंगमंचाचे रूपच बदलले. भारतातील उत्कृष्ट दिग्दर्शकांमध्ये हबीब तन्वीर, कावालम नारायण यांच्या जोडीला रतन थिय्याम यांचे नाव जोडले गेले ते याचमुळे!

प्रत्येक नाटक ‘स्टाइलाइज’ पद्धतीने सादर करण्याचा त्यांचा अट्टहास राहिला आहे. मुळात पाहणा-या ला भारावून टाकण्याची त्यांची विशिष्ट नाट्यशैली आहे. म्हणूनच रंगभूमीची सांगड आधुनिक रंगभूमीशी घालून नवा कलाप्रकार म्हणावा असे दृश्यनाट्य जन्माला घालणारे मणिपूरचे रतन थिय्याम जगभरच्या नाटककारांपैकी एक गणले जातात. ‘चक्रव्यूह’ या नाटकाने त्यांना नाटककार म्हणून जागतिक पातळीवर स्थान मिळवून दिले.
अभिनय, प्रकाशयोजना, कपडेपट, सेट अशा सगळ्या गोष्टींत त्यांनी प्रारंभापासून समरसून भाग घेतला आणि आपले नाटक उत्तम व्हावे, यासाठी शक्य तिथे सगळीकडे लक्ष घातले. त्यांची प्रत्येक बाबतीतली लुडबुड प्रत्येक रंगकर्मीने समजून घेतली, याचे कारण प्रतिभावंत रतन थिय्याम यांच्या कलाविषयक निष्ठेवर प्रत्येकाचा विश्वास. केवळ लाइट्स करण्यासाठी एक संपूर्ण दिवस ते नाट्यगृह ताब्यात ठेवत. त्या दिवसभरात ते केवळ लाइट्सवर प्रचंड मेहनत घेत. याचा फायदा नाटक प्रत्यक्ष पाहणा-या प्रेक्षकांना होत होता. एकूणच मंगोलियन परंपरेशी सुसंगत अशी समज त्यांना आहे. थिय्याम यांचे नाटक पाहताना हे भारतातले की भारताबाहेरचे, असा संभ्रम पडतो. परंतु यातूनच भारताशी मंगोलियन संस्कृतीचा दुवा जोडण्याचे काम थिय्याम यांनी केले, हे स्पष्ट होते. एखाद्या संस्कृतीच्या पलीकडचे अस्पर्श विश्व त्यांनी आपल्या नाटकांतून दाखवले.

नाटकातील आशयाबाबत ते अधिक जागरूक राहिले आहेत, त्यामुळे दुस-यांनी रचलेली नाटके त्यांनी फारशी घेतलेली नाहीत. आपल्या वेगळ्या संवेदना मांडण्यासाठी तसेच सगळ्यांशी जुळवून घेण्यासाठी नाटकात सातत्याने बदल करत दीड-दोन वर्षे तालमी घेऊन मैदानात उतरणारा, हा एकमेव दिग्दर्शक आहे. त्यांच्यावर भारतातील काव्यांचा आणि महाकाव्यांचा प्रभाव ब-या पैकी आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. पौराणिक संदर्भ असलेल्या अनेक कथांना त्यांनी आपल्या नाटकात स्थान दिले आहे. एखादी कथा मांडताना तत्कालीन परिस्थितीवर भाष्य करण्याची त्यांची पद्धत विलक्षण लोकप्रिय आहे. ‘उत्तरप्रदर्शीय’ या सम्राट अशोकाच्या संघर्षावर बेतलेल्या नाटकातून सम्राट अशोकाचा वेगळा पैलू लोकांसमोर आणण्यासाठी थिय्याम यांनी मेहनत घेतली. थिय्याम हे केवळ एकाच नाटकात रमले नाहीत, त्यांनी सातत्याने आपल्या नाटकांमध्ये वैविध्य आणले. ‘इंफाळ-इंफाळ’ या नाटकातून मणिपूरच्या सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक परिस्थितीवर थिय्याम यांनी बेधडक भाष्य केले आहे.

जागतिक रंगभूमी दिनाच्या पार्श्वभूमीवर थिय्याम यांचा विचार करताना मराठी रंगभूमीचा विषयही टाळता येत नाही. अशा वेळी आपले नाटक शरीरभाषा आणि भावभाषा कमी ठेवून शब्दप्रधानतेवर भर देण्यात पटाईत असल्याने आपण अजूनही जागतिक स्पर्धेत मागे आहोत, याची जाणीव आपण ठेवलेली बरी. आपल्याकडे स्टाइलाइज याचा अर्थ दशावतार. परंतु भरजरी कपडे, भडक मेकअप आणि उच्चरवात बोलली जाणारी वाक्ये यांच्याऐवजी आपल्याकडे ‘स्टाइलाइज’ पद्धतीने सबंध नाटक मांडण्याचा विचार फारसा झालेला दिसत नाही. ‘जांभूळ आख्यान’सारखी काही उदाहरणे मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर स्तुत्य ठरलेली आहेत. आपल्याला प्रेक्षकांच्या कल्पनाशक्तीवर भरवसा ठेवणे अधिक गरजेचे आहे. मराठी नाटकाच्या आजच्या फॅशनप्रमाणे कंसातलीही वाक्ये स्टेजवर सादर केली जातात, याला काय म्हणावे? अशा वेळी मराठी नाटकांनी आपण कुठल्या दिशेने गतिमान व्हायला पाहिजे, याचा विचार करणे गरजेचे आहे. थिय्यामसारख्या मोठमोठ्या नाटककारांनी आपापल्या मातीतल्या परंपरेला उंचावर नेले; मात्र आपण नेमके उलट्या दिशेने विचार करत आहोत, याबाबतही जागतिक रंगभूमी दिनानिमित्त चिंतन होणे गरजेचे आहे.