आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बारमध्ये सामावलेली कवितेची लय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सादरीकरणाचा खेळ सामुदायिक असतो. सामूहिक अनुभव सादरीकरणाच्या खेळाचं मर्म असतं. त्यामुळे बारच्या मंद-मादक वातावरणातही कवितेची लय सामावलेली असते...
अलीकडे एका बारमधे इंग्रजी कवितांचा कार्यक्रम अनुभवला. इथे कविता फक्त वाचून दाखविली जात नव्हती, तर सादरही होत होती. कुणी गिटारीवर होता, तर कुणी ड्रम्सवरही कविता सादर करत होता. ओघवत्या आणि तालबद्ध भाषेत कवितेतून भवताल उभा राहात होता. त्यात काही जणांनी हिंदी भाषेतून कविता सादर केल्या. पण, त्या अगदीच मोजक्या. विषयातही वैविध्य होतं. रोमँटिक, हळुवार कवितांपासून ते सौम्य आणि जळजळीत भाषेतही राजकीय आणि सामाजिक वास्तव मांडलं जात होतं. रचना आणि रूपाच्या वैविध्यातून वेगवेगळ्या काव्यशैली सादर होत होत्या. माझे काही मित्र इंग्रजी भाषेतील कविता किंवा इतर साहित्य-प्रकाराबद्दल सिनिकल असतात. एखाद्या भाषा आणि संस्कृतीचे अर्थपूर्ण आकलन करून घेतल्यावर सिनिकल व्हायला हरकत नाही. मराठी कविता जशी चांगली वा वाईट असेल, तशीच इंग्रजी कविताही चांगली आणि वाईट असू शकते. एखादी कविता ‘इंग्रजी’ आहे म्हणून तिला नाकारता येणार नाही.
तर, त्या बारमधे प्रवेश करताच डाव्या बाजूला वेगवेगळ्या प्रकारच्या मद्याच्या बाटल्या अन् ग्लासेस नीट रांगेने मांडून ठेवले होते. विशिष्ट रंगाचे आणि शैलीतील कपडे घातलेले बारटेंडर्स होते. कवितेचा कार्यक्रम सुरू होण्याच्या आधीच्या वेळेत रसिक प्रेक्षक मद्य वा इतर पेयांचा आस्वाद घेत होते. प्रवेशासाठी शंभर रुपये देणगी मूल्य होते. असे असूनही कविता ऐकायला लोक येत होते, हे माझ्यासारख्याचा उत्साह वाढवणारे होते. इथल्या एका बारटेंडरला हिंदीमधल्या काही कविता (त्याने सांगितले ‘कॉमेडी-कविता’) माहीत होत्या. वयाच्या विशीत असणारे तरुण-तरुणी या कार्यक्रमाचे आयोजक होते. कुठला भपका नसणारे कपडे घालून ते कवींची नावनोंदणी करत होते. गावोगावी कवी असतात, हे मी पाहिले होते. पण, ‘बार-बार’मध्येही कवी उत्साहाने आपल्या कविता सादर करायला येत होते, हेही मी पाहात होतो. अलीकडे माझे एक नाटक या गावात झाले होते, त्याच्या प्रयोगाला आलेला एक मित्र माझ्या शेजारी येऊन बसला होता. त्याला इथले ‘पॉप्युलर’ कवी माहीत होते. बसल्या-बसल्या त्याने बोटाने एका मुलाकडे बोट दाखवले. पांढरा आऊट शर्ट केलेला हा मुलगा एखादे एमबीए टाईप काम करत असावा. त्याने आऊट केलेला शर्ट चुरगाळलेला होता. त्याच्या पायात लेदरचे शूज होते आणि हातात हेल्मेट होते. नंतर मी त्याला ऐकले, तर त्याने मुंबईबद्दलची दीर्घ कविता सादर केली. लय-तालात सादर केलेली त्याची कविता सामान्य होती, तरी मोठी दाद घेऊन आणि वन्स- मोअर घेऊन गेली. अण्णा भाऊ साठेंच्या ‘मुंबईच्या लावणी’ची आठवण झाली. रात्रीचे दहा वाजेपर्यंत पंचवीस कवींनी प्रत्येकी दोन कविता सादर केल्या होत्या!
आता, बारमध्ये उभारायला जागा नव्हती. अधूनमधून लोक आपले ग्लासेस भरून घेत होते. कविता एन्जॉय करत होते. अर्थात, प्रत्येक कविता उत्तम होतीच असे नाही. यामध्ये कुणी ‘प्रथितयश’ कवी होता वा कुणाला मान-सन्मान मिळाले होते, असे नव्हते. माझ्यासाठी बिन-ओळखीचे चेहरे त्यांच्या सादरीकरण कौशल्यामुळे लक्षात राहात होते. यातली बरीच कविता व्यासपीठीय कविता होती. कवितेचा आतला आवाज अशा वेळी ऐकू येत नाही. या पंचवीस जणांत आपली कविता जे शांतपणे, आत्ममग्नतेने वाचत होते, ते अधिक प्रभावीपणे माझ्यापर्यंत पोहोचत होते.
कार्यक्रम सुरू असताना कवितेला दिली जाणारी दाद वाढत गेली, तसा गोंगाटही वाढला. कान रिकामे करावेत, म्हणून मी बाजूच्या टेरेसवर उभा राहून आकाशाकडे पाहात होतो. काही वर्षांपूर्वी बंगलोरमध्ये असताना रात्रीच्या काव्यवाचनांना मी हजर राहात असे. त्यात, त्या वेळची माझी सहकारी अंजूम हसन आपल्या कविता सादर करत असे. इंग्रजीत लिहिणाऱ्या अंजूमच्या कवितावाचनात कुठलाही अभिनिवेश नसे. आक्रस्ताळेपणा नसे. तिच्या काही कविता मी मराठीत भाषांतरित केल्या होत्या. या शहराच्या लखलखत्या प्रकाशाकडे पाहात असताना तिची कविता मी आठवत होतो.
काही साहित्यसंमेलने आणि काव्यवाचने ऐकली. मनात राहिलेल्या काव्य-संमेलनांसारखी ही ‘बार-कविता’, हा मयखाना आणि इथले साकी लक्षात राहणारे होते. मद्यपान आणि स्नॅक्सबरोबर कविता ऐकणारे प्रेक्षक हे प्रकरण मला विचित्र वाटतं. मला आवडलं नसतं, अशा वातावरणात कविता वाचायला. कविता ऐकताना किंवा नाटक पाहताना खाणं-पिणं हे प्रकरण मला काही रुचत नाही. मी याकडे नैतिकतेच्या भूमिकेतून पाहात नाही. तर वाचणे/ऐकणे, दाखवणे/पाहणे ही मला एक शिस्तशीर आणि एकाग्रतेची कृती वाटत आली आहे. याबद्दल, बारमध्ये येणाऱ्या एका कवी मित्राशी माझी चर्चा आणि वादही झाला. वाद झाला, कारण त्याला माझे मत पटले नव्हते आणि मला त्याचे.
त्याच्या मते, सादरीकरणाचे जिवंत स्वरूप आहे तोवर ते कुठे होते, याबद्दलच्या चौकटी उभ्या करून तो खेळ पाहण्यात काही अर्थ नसतो. तो माझ्याबरोबर वाद घालत होता की, लोक दारू पीत पीत शेरोशायरी ऐकतात, की नाही? डान्सबारमध्ये चघळत-पीत-कधी कधी पीत नाच होतो की नाही? मग, कवितेने काय घोडे मारले आहे? इथे येणारा प्रेक्षक रसिकतेच्या भावनेने आलेला असतो. त्याचे प्राधान्यक्रम ठरलेले असतात. मोकळ्या मनाने आलेला प्रेक्षक सळसळणारी ऊर्जा निर्माण करत असतो. ऊर्जेचे आदानप्रदान होत असते. जोपर्यंत आदानप्रदान असते, तोवर सादरीकरणाचा खेळ जोशपूर्ण आणि अर्थपूर्ण असतो. ‘काव्य-वाचन’ म्हणून आपण फार एलिटिस्ट भूमिका घेतो, असा त्याचा आक्षेप होता. पूर्णतः न पटणारा नव्हता त्याचा आक्षेप. ‘बार-कविते’च्या एवढ्या गर्दीतही काही मंडळी कविता समजून घेत होती आणि कवीला हव्या त्या जागी दाद देत होती. पण, काहीही म्हटलं तरी वातावरणात गोंगाट होता.
थोडं खोलवर जाऊन विचार करताना मला असं वाटलं की, सादरीकरणाचा खेळ सामुदायिक असतो. झिम्मा फुगडी, रास-दांडिया वा बारमधल्या सुंदर गाण्यावरचा तितकाच सुंदर डान्स यामधे काय फरक असतो? तर, आपण लावलेल्या नैतिकतेच्या चश्म्यात, सामूहिक अनुभव हे सादरीकरणाच्या खेळाचं मर्म असतं. प्रत्येकाचे हेतू वेगळे असतील, पण प्रत्येकात एक सामूहिक कृती असते. त्या कृतीत सामील होताना हरेक माणसाच्या आपापल्या भावना असतात. त्याच्या-तिच्या वेगळ्या शैली असतील. प्रत्येकाचे मन, अनुभव एक सामूहिक मनाचा आकार घेत असतात. सामूहिक कृतीत शारीरिक हालचालीतून त्या ‘रंगमंचा’वर जे काही घडत असते, त्यात एकतानता येत असते. ही एकतानता कीर्तनाला फेर धरलेल्या टाळकऱ्यांच्यातही असू शकते. अशा सामूहिक कृतीतून नातेसंबध अधिक बळकट आणि घट्ट होत जातात. कदाचित, एखाद्याच्या बाबतीत दर वेळेस असे होणार नाही. कारण, आपापल्या भूमिका आणि धारणा वेगळ्या असतील. आपण कसे वाढतो, काय वाचतो, कुणाबरोबर आपली ऊठबस असते, यावर आपल्या आवडीनिवडी विकास पावत असतात. आपल्या समग्र भानातून ‘आपल्यासारख्यांकडे’ पाहात असताना आपण ‘आपल्यासारखे नाहीत’ त्यांच्याकडेही पाहिले पाहिजे. समाज आणि संस्कृती बहुजिनसी नसते. त्यामुळे, संस्कृतीत बजबजलेली साहित्य संमेलने असतात तसेच ‘बार-कविता’ही असतात आणि आपल्याच धुंदीत-मस्तीत खुलणारी आतल्या आवाजाची कविताही असते. पटो वा न पटो, हे असे सगळे असते. सगळे आपले नसले तरी ते असते, हे मान्य करण्यात संस्कृतीच्या कवितेची लय सामावलेली असते.
बातम्या आणखी आहेत...