आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारतीय जीनियस !

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ज्यांच्या कार्यामुळे जग बदललं किंवा जगावर प्रभाव पडला, अशा शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, मानसशास्त्रज्ञ, कलाकार, तत्त्वज्ञ, समाजसुधारक, समाजशास्त्रज्ञ आणि क्रांतिकारकांवर, प्रतिभावंतांवर `भारतीय जीनियस’ हा अच्युत गोडबोले-दीपा देशमुख या दोघांनी साकारला एक ग्रंथ प्रकल्प. पुण्याच्या मनोविकास प्रकाशन संस्थेकडून प्रकाशित होणाऱ्या या प्रकल्पांतर्गत दुसऱ्या टप्प्यातील तीन पुस्तकांचा संच, येत्या दिवाळीत वाचकांच्या भेटीला येत आहे.
जागतिक स्तरावरचे क्लिष्ट पण समाजहितासाठी महत्त्वाचे विषय मराठी भाषेत लिहिणे हा एक भाग झाला. त्या पलीकडे जाऊन असे विषय जाणीवपूर्वक ओघवत्या आणि प्रवाही मराठी भाषेत मांडून अगदी अरसिक वाचकांच्याही पचनी पाडण्याचे काम अत्यंत कठीण असते. नेमके हेच आव्हानात्मक लेखनकार्य अच्युत गोडबोले आणि दीपा देशमुख या लेखकद्वयींनी यशस्वीपणे सिद्ध केले आहे. म्हणूनच मराठी वाचकांच्या मनात त्यांनी आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे! मराठी साहित्यामध्ये विज्ञानवादी दृष्टिकोन असलेल्या साहित्याची एक प्रकारे वानवाच आहे. विज्ञान, कला, साहित्य अशा अनेक गोष्टींबाबत अभिजात पुस्तकांची संख्या मराठी भाषेत मोजायला गेले तर त्यांची संख्या कमीच आढळेल. ही एक प्रकारे मराठी साहित्याला पडलेली विलक्षण मर्यादाही आहे. या सगळ्या गोष्टींचे भान ठेवून तसेच वाचकांची अभिरुची अधिक संपन्न करणारी पुस्तके प्रकाशित करणे ही सध्याच्या काळाची गरज होऊन बसलेली आहे. नेमकी हीच बाब अच्युत गोडबोले व दीपा देशमुख यांनी पुस्तक लेखनाचा जो संयुक्त प्रकल्प आकारास आणला त्यावेळी ठेवली असणार हे नक्की. अशा प्रकल्पांना तितकीच दूरदृष्टी असलेले प्रकाशक मिळणे हे एकप्रकारचे सुलक्षणच असते. ती बाजू मनोविकास प्रकाशनने समर्थपणे पेलली आहे.
ज्यांच्या कार्यामुळे जग बदललं किंवा जगावर प्रभाव पडला, अशा शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, मानसशास्त्रज्ञ, कलाकार, तत्त्वज्ञ, समाजसुधारक, समाजशास्त्रज्ञ आणि क्रांतिकारकांवर, प्रतिभावंतांवर `भारतीय जीनियस’ हा गोडबोले-देशमुख द्वयींच्या लेखन प्रकल्पांतर्गत दुसऱ्या टप्प्यातील तीन पुस्तकांचा संच, येत्या दिवाळीत वाचकांच्या भेटीला येत आहे. पुण्याच्या मनोविकास प्रकाशन संस्थेकडून प्रकाशित होणाऱ्या प्रत्येकी दिडशे पानी पुस्तकामध्ये चार भारतीय प्रतिभावंतांचा समावेश असेल. ‘जीनियस’ मालिकेतील पुस्तिका लेखन प्रकल्पाच्या संकल्पनेचा जन्म कसा झाला नि त्याच्या विविध टप्प्यांची माहिती दीपा देशमुख यांनी दिली.
लेखकांनी आरंभी अशा वैश्विक प्रतिभावंतांची यादी केली, तेव्हा ती सव्वाशे होेती, ती संक्षिप्त केल्यानंतर ७२वर आली. त्यांचे वर्गीकरण करून पहिल्या टप्प्यात जगप्रसिद्ध १२ `जीनियस’ विदेशी प्रतिभावंत शास्त्रज्ञ निवडून त्यांच्यावर लेखन केले. या `जीनियस’ मालिकेतील पुस्तिकांचं ‘मनोविकास’तर्फे नोव्हेंबर २०१५मध्ये प्रकाशन झालं होतं. या मालिकेला शाळा, महाविद्यालये, ग्रंथालये, विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि सर्वसामान्य वाचकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला.
पहिला टप्पा : आधुनिक विज्ञानाचा जनक म्हटला जाणाऱ्या गॅलिलिओ गॅलिली याला केवळ खरं बोलल्यामुळे आयुष्यभर प्रचंड छळाला सामोरं जावं लागलं. आयझॅक न्यूटन याचा गतीचे नियम आणि गुरुत्वाकर्षणाचा शोध महत्त्वाचा, पण स्वभाव मात्र विक्षिप्त. अल्बर्ट आईन्स्टाईनच्या युगप्रवर्तक संशोधनाबरोबरच त्याच्या आयुष्यातला संघर्ष आणि मिश्कीलपणा वेगळाच. स्टीफन हॉकिंग यानं आपल्या असाध्य अपंगत्वावर मात करत केलेलं संशोधन जगात लक्षवेधी ठरलं. देवीच्या रोगामुळे अख्ख्या जगावर मृत्यूकळा पसरलेली असताना देवीची लस शोधून कोट्यवधी लोकांचे प्राण वाचवणारा एडवर्ड जेन्नर. पेनिसिलीनचा शोध लावणारा अॅलेक्झांडर फ्लेमिंग. सूक्ष्मदर्शकामुळे सूक्ष्मजंतूंचं आपल्या अायुष्यात होणारं अतिक्रमण पटवून देणारा आणि ते थांबवणारा रॉबर्ट कॉख. पिसाळलेल्या कुत्र्यावरची रेबीज लस असो वा पाश्चरायझेशन, या शोधांबरोबर प्रेम कसं करावं याच्या युक्त्या सांगणारा लुई पाश्चर. संपूर्ण आयुष्य प्रतिकूल परिस्थितीत जगून दोन वेळा नोबेल मिळवणारी अणुविज्ञान संशोधक मेरी क्युरी. स्त्री असल्याचं दुय्यमत्व सहन करत संशोधनालाच आपलं कर्म समजणारी लीझ माईट्नर. अॅटमबॉम्बचा जनक आणि त्यामुळे झालेल्या विध्वंसानंतर बेचैन झालेला रॉबर्ट ओपेनहायमर. अतिशय बुद्धिमान गणिती, वैज्ञानिक आणि तरीही प्रेम कसं करावं हे शिकवणारा रिचर्ड फाईनमन. ही जागतिक प्रतिभावंत मंडळी पहिल्या भागातल्या ‘जीनियस’मध्ये वाचकांच्या जिवाला चटका लावून गेली. त्यांच्या महत्त्वाच्या संशोधनामुळे आजच्या जगातील समाजाचं जगणं आणखी समृद्ध झालं. दुसऱ्या टप्प्यात केवळ भारतीय जीनियस प्रतिभावंतांचा धांडोळा घेण्यात आला आहे, जो येत्या दिवाळीत वाचकांना बौद्धिक मेजवानी घेऊन भेटीला येत आहे.
दुसरा टप्पा : ‘भारतीय जीनियस’ पुस्तकांमध्ये भास्कराचार्य आर्यभट्ट, जगदीशचंद्र बोस, विश्वेश्वरय्या, मेघनाद साहा, रामानुजन, सी. व्ही. रामन, डी. डी. कोसंबी, होमी भाभा, चंद्रशेखर, एम. एस. स्वामीनाथन, लॉरी बेकर आणि डॉ. जयंत नारळीकर या प्रतिभावंतांचा समावेश आहे.
आर्यभट, भास्कराचार्य, वराहमिहीर आणि माधवा या प्राचीन दूरदृष्टीच्या गणितज्ज्ञांनी काळाची पावले ओळखून लावलेले शोध चकितच करतात. सी. व्ही. रामन आणि चंद्रशेखर यांनी तर नोबेल पारितोषिक भारतात खेचून आणलं. रामानुजनसारखे गणिती जगाला आजही विसरता येणार नाही. वनस्पतींनाही भावना असतात, असं सर जगदीशचंद्र बोस या कवीमनाच्या शास्त्रज्ञाने सिद्ध केलं. होमी भाभांनी अणुऊर्जेचा उपयोग कोणकोणत्या गोष्टीत करता येईल, हे भारताला दाखवून दिलं. देशाला स्वयंपूर्ण बनवण्यासाठी अणुऊर्जेचं महत्त्व पटवून देत असतानाच भाभा यांच्यातील पर्यावरणप्रेमी सदैव जागृत असे. स्वातंत्र्याेत्तर भारताला अन्नधान्य टंचाईमुक्तीसाठी हरितक्रांतीने स्वयंपूर्णतेचा मार्ग दाखवला तो एम. एस. स्वामीनाथन यांनी! त्यांनी स्वत:च्या संशोधनाबरोबरच त्याच्या अतिरेकी वापराने होणाऱ्या धोक्यांचीही सूचना वेळोवेळी दिली, हे आणखी विशेष. मेघनाद साहा यांच्यासारखा खगोलशास्त्रज्ञ ‘साहा समीकरणां’मुळे जगप्रसिद्ध पावला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिकताना बालपणीच साहा यांना जातिभेदाचे अंगारही झेलावे लागले. विज्ञान झुगारणाऱ्या आणि ‘आमच्या वेदात हे सगळं आहेच,’ असा टाहो फोडणाऱ्या समाजाला सडेतोड उत्तर देण्यासाठी साहांनी वेद-उपनिषदांचा स्वत: सखोल अभ्यास केला. विज्ञानच जगाला तारेल, हे दाखवून दिलं. गणित आणि सांख्यिकी तज्ज्ञ दामोदर तथा डी. डी. कोसंबी हे जगप्रसिद्ध पुरोगामी विचारवंत व लेखकही. गांधीवादी लॉरी बेकर जन्माने ब्रिटिश, मात्र भारतालाच कर्मभूमी मानून किमान पैशात हवेशीर-सौंदर्यपूर्ण घर बांधणीसाठी वास्तुरचनेतून नवे आयाम सिद्ध केले. खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांनी ‘स्टेडी स्टेट’वरचं संशोधनासह खगोल विज्ञान प्रसारास्तव लेखन साहित्यात मौलिक भर घालून पुण्यात ‘आयुका’ विज्ञान संस्थेचीही यशस्वी उभारणी केली. आज ती जगप्रसिद्ध संस्था बनली आहे व भारताचे भूषण ठरली आहे.
तिसरा टप्पा : साधारण २०१७च्या जानेवारी-फेब्रुवारीत वाचकांच्या भेटीला येणाऱ्या ‘जीनियस’ मालिकेतील तिसऱ्या टप्प्यातील लेखन हे तंत्रज्ञ प्रतिभावंतांवर आधारित अाहे. त्यात सॅम्युएल मॉर्स, अॅलेक्झांडर ग्रॅहम बेल, गुलिएल्मो माकोर्नी, जॉन लॉगी बेअर्ड, एडिसन, टेस्ला, चार्ल्स बॅबेज, अॅलन ट्युरिंग, स्टीव्ह जॉब्ज, बिल गेट्स, मार्क झुकेरबर्ग अशा संगणक आणि दूरसंचार क्षेत्रातील प्रतिभावंतांचा समावेश करण्यात आला आहे.
भारतीय जीनियस (तीन भाग)
लेखक : अच्युत गोडबोले आणि दीपा देशमुख
प्रकाशक : मनोविकास प्रकाशन, पुणे
पृष्ठे : प्रत्येकी १५०, किंमत : प्रत्येकी ~ ९९/-
yashwant.pople@gmail.com
बातम्या आणखी आहेत...