आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यक्ति-अभिव्यक्तीचे व्यासपीठ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेल्या सहा वर्षांत "रसिक'ने अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य हिरावून घेणारी  अनेक धोकादायक वळणे वाचकांच्या नजरेस आणून दिली. काही वळणांवर  जात आणि धर्मविचाराने पछाडलेल्या काही अविचारी व्यक्तींचा अस्मिताकेंद्री दाहदेखील अनुभवला. परंतु अशा कसोटीच्या क्षणी वाचकांमधील मोठ्या वर्गाने "रसिक'ला नेहमीच  मोलाची साथ दिली...
 
माणसांना स्वातंत्र्य हवे असते की सुरक्षितता? हा प्रश्न जसा वर्तमानाच्या संदर्भात विचारता येतो, तसाच तो भूतकाळाच्या म्हणजेच स्वातंत्र्यपूर्व काळाच्या संदर्भातही विचारता येऊ शकतो. काही जण स्वातंत्र्यपूर्व, मुख्यत: ब्रिटिश सत्तेच्या काळासाठी हा प्रश्न बेमतलब असल्याचे म्हणू शकतात. राष्ट्रविरोधी असल्याचेही म्हणू शकतात. पण त्याने मूळ प्रश्नाचे उत्तर मिळत नाही. माणसाला दोन्ही हवे असते, हे यावरचे गुळमुळीत (बऱ्याच अंशी चलाखही) उत्तर असू शकते. पण त्यामुळे दोहोंत सर्वोच्च काय, हा प्रश्न पुन्हा अनुत्तरीच राहतो. 
 

वास्तव मग ते आजचे असो वा कालचे असे सांगते की, सर्वसामान्य माणसासाठी जीवनात तगून राहणे अत्यंत महत्त्वाचे असते. माणूस वैयक्तिक स्तरावर स्वातंत्र्याची मागणी करत असला, किंवा प्रसंगी ते घेत असला तरीही, सार्वजनिक स्तरावर वावरताना त्याचा कल स्वातंत्र्याला दुय्यम स्थान देण्याकडे पर्यायाने धर्म-समाज आणि राज्यसत्तेने पुरवलेली सुरक्षितता स्वीकारण्याकडेच अधिक असतो. स्वातंत्र्याचे मूल्य सर्वोच्च खरे, पण ते पचायला जड ठरते. कारण, स्वातंत्र्य मिळाले वा मिळवले  की, निर्णय घेण्याची जबाबदारीही अंगावर पडते आणि त्या निर्णयाचे परिणाम भोगण्याचीही तयारी असावी लागते. सुरक्षिततेचे अंगण तुलनेने अधिक मोहात पाडणारे असते. 

परावलंबित्वाचे  सुख मिळवून देणारे असते. त्यात जबाबदारी घेणारा राजकीय नेता असतो, सिनेमा वा समाजातला नायक असतो, नायिका असते,धर्मगुरू असतो,  उद्योगपती असतो, नोकरशहा असतो, शिक्षक असतो आणि प्रशिक्षकही असतो. निर्णय घेण्याची जबाबदारी सर्वस्वी त्यांची असते. परिणामांचा दाहसुद्धा त्यांनीच सहन करायचा असतो. म्हणूनही त्यांना प्रश्न करणे, विरोधातले मत नोंदवणे अक्षम्य मानले जाते. परंतु याच मानसिकतेमुळे ज्याला सुपर स्ट्रक्चर म्हणजेच  सर्वोच्च रचना म्हणतात, ती अधिकाधिक बळकट, अजस्त्र होत जाते. तिचा तो अजस्त्रपणा पाहूनच सामान्य माणूस येता-जाता बिचकत राहतो. पण त्यात न बिचकणारे नसतात असेही घडत नाही. काळ कोणताही असो, असे हे न बिचकणारे, सुरक्षिततेची पर्वा न करता स्वातंत्र्याची मागणी करत राहतात. किंबहुना, दोहोंत निवड करण्याची वेळ आली तर स्वातंत्र्याचीच प्राधान्याने निवड करतात. असे व्यक्तिस्वातंत्र्य असो वा अभिव्यक्ती स्वातंत्र्य, सुपर स्ट्रक्चरला सहन होणारे नसते. त्यातून पुढे सार्वजनिक स्तरावरचा अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठीचा संघर्ष पेट घेतो. 

सुरक्षितता महत्वाची मानणारे एका उडीत सुपर स्ट्रक्चरमध्ये सामील होऊन नेता-अभिनेता-धर्मगुरूंची ताकद वाढवतात. एरवीसुद्धा चुकण्याचा मिळालेला हक्क म्हणजेच उदारमतवाद हे लोकशाहीला बळकटी देणारे तत्व तर त्यांना कधीच मान्य नसते. त्यामुळे जात-धर्म-पंथ आणि राष्ट्राच्या चौकटीत स्वातंत्र्याची सीमारेषा निश्चित केली जाते. राज्यसत्तेला प्रश्न करणे, वस्तुनिष्ठ इतिहासाचा आग्रह धरणे म्हणजे अनिर्बंध अभिव्यक्ती स्वातंत्र्य उपभोगणे अशी व्याख्या केली जाते. त्यातूनच जात-धर्म आणि पंथाच्या पातळ्यांवर अस्मितांचे राजकारण जोर पकडत जाते. ज्या क्षणापासून राजकीय नेत्यांना, सिनेमा वा समाजातल्या नायक-नायिकांना, महंत-मौलवींना, नोकरशहांना, शिक्षक-प्रशिक्षकांना प्रश्न करण्याचे स्वातंत्र्य, विरोधी विचार मांडण्याचे स्वातंत्र्य संपवले जाते, त्या क्षणापासून  ज्ञानाच्या, कलेच्या मुक्त निर्मितीला ओहोटी लागून समाजसमूहांवरचा अस्मितांचा अंमल वाढतच जातो. ज्ञान आणि जिज्ञासा गोठते. कला आणि कुतूहल कोमजते. असुरक्षिततेच्या भयाने व्यवस्थेचे आदेश पा‌ळणारी पिढी तेवढी जन्मास येत राहाते.  

ही अवस्था प्रस्थपित राज्य आणि धर्मसत्तेच्या सोयीची असली तरीही देश म्हणून धोक्याच्या वळणावर घेऊन जाणारी ठरते. याचाच प्रत्यय सद्य:स्थितीत घडणाऱ्या घटनांतून सातत्याने येऊ लागला आहे. राष्ट्रवादी विरूद्ध राष्ट्रद्रोही या दोन गटांत जणू देशाची विभागणी करण्यात आली आहे. ही मांडणी केवळ राजकारण-समाजकारण या क्षेत्रांतच नव्हे, तर शिक्षण क्षेत्रात केली जात आहे. राज्य सत्तेला प्रश्न करणाऱ्या विद्यार्थ्यांवर शाळा-महाविद्यालय पातळीवरच जरब बसावी, यासाठी विद्यापीठीय नियम आणि कायद्याचा सूडबुद्धीने वापर करून तळागाळातून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असलेला निधी रोखला जात आहे.  वलय असलेले कलावंत, संस्था-संघटनांमध्ये महत्वाची पदे भूषवणारे लोक कन्हैयाकुमारला फाशी द्या, अरुंधती रॉयना लष्कराच्या गाडीला बांधा म्हणत जाहीरपणे हिंसेचा पुरस्कार करू लागले आहेत. वलय नसलेले पण जात आणि धर्मभिमानाने पछाडलेले लोक कधी जाती-धर्माच्या नावाने तर कधी नुसत्याच संशयावरून एकेकट्या माणसांना लाठ्या-काठ्या दगडांनी ठेचू लागले आहेत. परंतु, हे सगळे किरकोळ प्रश्न आहेत, त्यापेक्षा सत्ताधाऱ्यांच्या ठायी असलेली विकासदृष्टी महत्वाची आहे, असे मीडिया-सोशल मीडियाचा राक्षसी वापर करून जनसामान्यांच्या मनावर  ठसवले जात आहे.
 
गेल्या सहा वर्षांत "रसिक'ने अशी अनेक धोकादायक वळणे वाचकांच्या नजरेस आणून दिली आहेत. काही वळणांवर  काही अविचारी व्यक्ती आणि संस्थांचा अस्मिताकेंद्री विखारदेखील  प्रत्यक्ष अनुभवला आहे. परंतु अशा कसोटीच्या क्षणी वाचकांमधील मोठ्या वर्गाने "रसिक'ला नेहमीच  मोलाची साथ मिळत गेली आहे. यात जसा औरंगाबाद, नाशिक, जळगाव, सोलापूर, अहमदनगर, अमरावती, अकोला या "दिव्य मराठी'च्या प्रभावक्षेत्रातल्या वाचकांचा समावेश आहे, तसाच मुंबई-ठाणे-पुणे-कोल्हापूर या प्रभावक्षेत्रापलीकडे वास्तव्य करून असलेल्या सोशल मीडियावरील सजग वाचकांचाही समावेश आहे. 

वृत्तपत्र तसेच साहित्यसृष्टीतल्या जाणकार-समीक्षकांनी आवर्जून "रसिक'ची दखल घेत पसंतीची मोहोर उठवली आहे. प्रसंगी विधायक स्वरुपाची टीका आणि सूचनाही केली आहे. या सगळ्या घुसळणीतून "रसिक'मध्ये प्रकाशित लिखाणातले संग्राह्य नि साहित्यमूल्यही अधोरेखित होत गेले आहे. त्याचाच परिपाक म्हणून गेल्या सहा वर्षांत, प्रशांत पवार (पालांवरच्या गोष्टी), रघुवीर कुल (खलनायक), डॉ. विजय कुलकर्णी (वात्स्यायनाचे जग), बुकशेल्फ (अभिलाष खांडेकर) आदी लेखकांच्या सदरलेखनाची पुस्तके प्रकाशित झाली आहेत. डॉ. प्रदीप आवटे (अडीच अक्षरांच गोष्ट), वीरा राठोड (रग आणि धगधग), डॉ. सुनीलकुमार लवटे (आंतरभारती), डॉ. पृथ्वीराज तौर (कवितांजली), इब्राहिम अफगाण (बात फुलों की), राजा पटवर्धन (पुनर्शोध महाभारताचा) आदी मान्यवर सदरलेखकांची पुस्तके प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. गेल्या सहा वर्षांतल्या गाजलेल्या निवडक लेखांचेही पुस्तक व्हावे, अशी इच्छा "रसिक'ची दर आठवड्याला आतुरतेने वाट पाहणाऱ्या अनेक जाणकार वाचकांनी व्यक्त केली आहे. 

या सगळ्यांतूनच रसिक आणि वाचकांत एकप्रकारचा विश्वास दृढ गेला आहे. या विश्वासाच्या बळावरच सहाव्या वर्धापनदिन विशेष पुरवणीची रचना करण्यात आली आहे. ही रचना कला आणि संवादाच्या माध्यमातून अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या सर्वोच्च मूल्यांचे, पुरोगामी नि उदारमतवादी विचारांचे महत्व अधोरेखित करणारी आहे. आमचा हा प्रयत्न  सर्वांना समाधान देणारा ठरेल, या आशेसह सर्व वाचकांचे मन:पूर्वक आभार!!
 
बातम्या आणखी आहेत...