आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धरण- शाश्वत पर्याय?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डोंगर या जल बँका होत आणि वनसंपदा या भविष्यनिधी. डोंगर आणि वनराईशिवाय जलाशय म्हणजे, हृदय आणि रक्तवाहिन्यांशिवाय शरीर. गंगा-कावेरीसारखी विशाल योजना असो, मोठी धरणे असोत वा छोटे बंधारे, वन आणि डोंगरतोड होत राहिली तर जलसाठ्याचे गणित चुकतच जाणार. पाऊस कितीही पडो, योजनेअंतर्गत ओतलेला पैसा पाण्यातच जाणार.
आधुनिक जलव्यवस्थेत मोठ्या धरणांना खूप महत्त्व देण्यात आले आहे. हे कितपत योग्य आहे ते काळच ठरवेल. तथापि जलव्यवस्थेत धरणांचा अवलंब का करण्यात आला, यासाठी मानवविकासशास्त्राचा इतिहास जाणून घेणेही गरजेचे आहे.
जलव्यवस्थेचा इतिहास आदिमानवाच्या जीवनशैलीशी जाऊन भिडतो. थोडेफार पशूसारखेच जीवन. उदरनिर्वाहासाठी अन्य पशूंची शिकार हा उद्योग. गवत खाणारे प्राणी मानवाच्या नजरेस आले. या तृणांत बिया असतात, हे निदर्शनास आले. या बिया रुचकर असतात याचे ज्ञान झाले. तो तृणांतील बिया गोळा करून खाऊ लागला. या अन्नप्राप्तीस शिकारीपेक्षा कितीतरी कमी श्रम खर्ची पडतात, हेदेखील ध्यानी आले. बी जमिनीत पडते आणि ते रुजते हे त्याने अनुभवले. यथावकाश तृणांची ऋतुमानानुसार होणारी उगवणही त्याने टिपली. लागवणीच्या प्रयोगांना तो लागला. कृषी संस्कृतीचा पाया असा रचला गेला. कृषी ही आद्य संस्कृती होय. कृषी संस्कृती जसजशी विकसित होत गेली तसतसे माणसाचे भटके जीवन स्थिरस्थावर होत गेले. वस्ती, गावे, नगरी विकसित होत गेल्या, मानवी जीवन संस्कृतिबद्ध होत गेले. कृषीवर आधारित असल्यामुळे सा संस्कृती नदी, नाले व जलाशयांकाठी वृद्धिंगत झाल्या.
नगरे आणि शेती जसजसे विकसित होत गेले, तसतशा घरगुती तथा शेतीखातर मानवी जलव्यवस्था विकसित होत गेल्या. विहिरी खोदल्या जाऊ लागल्या, तलाव बांधले जाऊ लागले, धरणे आणि कालवे साकारू लागले. आता कळीचे बनलेले तंत्र म्हणजे रेन हार्वेस्टिंग. पण वाहत्या पाण्याची गती रोखण्याचे हे तंत्र पूर्वापार वापरात होते. तलाव, बांध बांधून पावसाळ्यानंतरही सिंचन क्षेत्र वाढवण्याचे हे तंत्र. आपल्या देशाचा अशा जलव्यवस्थांचा इतिहास पाच हजार वर्षांना जाऊन भिडतो. पाटबंधारे आणि पूरनियंत्रण ही उद्दिष्टे त्यामागे होती. भूगर्भ अभ्यासानुसार अशा तºहेची जलव्यवस्था राजस्थानात सरस्वती नदीकाठी पाच हजार वर्षांपूर्वी असल्याचे सिद्ध झाले आहे. यमुना आणि सतलज या त्या काळी सरस्वतीच्या उपनद्या होत्या. काही भौगोलिक उत्पातांमुळे या नद्यांची पात्रे बदलली. यमुना नदी गंगेला मिळाली आणि सतलज सिंधूला. परिणामत: सरस्वती कोरडी पडत गेली. वनस्पतीसह सारी जीवसृष्टी लयाला गेली. भूप्रदेशाचे वाळवंटात रूपांतर झाले. सरस्वती नदीइतकाच महत्त्वाचा टप्पा हडप्पा संस्कृतीचा. सुमारे साडेचार हजार वर्षांपूर्वीची बहरलेली ही नागर संस्कृती. सिंचन व्यवस्थेचे अनेक दाखले या संस्कृतीत मिळाले.
कृषी संस्कृतीबरोबरच विज्ञान, कला, साहित्य अशा संस्कृतीही विकसित होत गेल्या. आरोग्य विज्ञान विकसित झाले. मानवी मृत्यूदर नियंत्रणाखाली आला. त्याची परिणती म्हणजे लोकसंख्येचा स्फोट होत राहिला. माणसाच्या गरजाही वाढल्या. घरगुती, औद्योगिक आणि सिंचनासाठी वापरायोग्य पाण्याची गरज कितीतरी पटींनी वाढली आणि जगात विशाल धरण योजना साकारू लागल्या. त्यालाच ‘विकास’ हे नामाभिधान प्राप्त झाले. या विकास नावाच्या प्रक्रियेत प्रगत पाश्चिमात्य देशांचे अनुकरण वा त्यांच्याशी तुलना हा ‘विद्वानां’च्या अभ्यासाचा विषय बनला. हे अनुकरण सावधगिरीने आणि साकल्याने व्हायला हवे. पाण्याबाबतीत, विशेषत: विशाल धरण योजनेबाबतीत दोन मुद्दे विशेष करून ध्यानात घ्यायला हवेत.
1. आपला देश कमी अक्षांशाच्या प्रदेशांत मोडतो. उच्च अक्षांश प्रदेशात बाष्पीभवनाचा वेग कमी असतो.
2. आशियाई देशांची लोकसंख्या जगाच्या 60% आहे आणि उपलब्ध पाणी आहे 36%.
विशाल धरणांबाबतीत काही वास्तव जाणून घेणे आवश्यक आहे. ऐंशीच्या दशकानंतर आपल्या देशातील सुमारे 70 हजार चौ. कि. मी. जमिनीचे क्षारीकरण झाले. बहुतेक बाबतीत धरणात गाळ साचण्याची जी गती गृहीत धरली होती, प्रत्यक्षात ती त्याच्या दुप्पट-तिप्पट झाल्याचे अनुभवास आले. हिराकूड आणि भाक्रा धरणांबाबतीत ही अपेक्षेच्या दीडपट असल्याचे आढळून आले. घोड नदीबाबतीत तर ती चक्क सव्वाचारपट आहे. यामुळे धरणाची पाणी साठवणुकीची क्षमता लक्षणीय प्रमाणात घसरली. याचा परिणाम धरणाचे आयुष्यमान घटण्यात होणेही स्वाभाविक आहे. थोडक्यात काय, मोठी धरणे हा काही शाश्वत पर्याय नव्हे. पाऊस क्षेत्रातच होता होईल तेवढी खोलवर नांगरण करणे ही आपली पारंपरिक जलव्यवस्था. ती आजमितीस किती योग्य आहे, हा प्रश्न आहेच.