आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संस्कृतशी सहजसंवाद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एखाद्या विषयाचे ज्ञान व्हावे आणि त्यातल्या अनेक सुट्या पदरांचा, पैलूंचा, गर्भित दुनियेचा आनंद, आस्वाद घेता यावा, हे फार मोठे समाधान असते. काही जण या दुनियेत अधिकाधिक पुढे जात नैपुण्य कमावतात, तर काही जण या आनंददायी, ज्ञानदायी जगाकडे येणारे मार्ग इतरांसाठीही खुले करतात. किंबहुना इथवर येण्याच्या वाटा अधिक सोप्या कशा करता येतील, मार्गातील अडथळे कसे पार करायचे, यासंबंधीचे मार्गदर्शन करतात. कल्याणमधील भाषाप्रेमी तन्मय केळकर या तरुण मित्रालाही असाच खजिना उलगडला संस्कृत भाषेचा. तरुण पिढीच्या दृष्टीने ही एक मृतभाषा. शाळकरी विद्यार्थ्यांच्या दृष्टीने झटपट गुण मिळवून देणारी भाषा; तर अर्धवट ज्ञानी लोकांच्या मते, विशिष्ट जातीची, केवळ स्तोत्र, मंत्रपठणाकरिता उपयुक्त असलेली ही भाषा, असे अनेक समज-गैरसमज या भाषेबद्दल आहेत. लेखकही नव्या पिढीचाच प्रतिनिधी. मात्र संस्कृत भाषेतील उत्तमोत्तम ग्रंथांचा अभ्यासू आणि संस्कृत प्रचार-प्रसार अभियानातील नव्या दमाचा पाईक. त्यामुळेच या भाषेतील गमतीजमती अगदी साध्या बोलीभाषेत समजावून सांगत ती कशी अवगत करता येईल, या उद्देशाने त्यांनी ‘मैत्री संस्कृतशी’ हे पुस्तक लिहिलेय. अत्यंत प्राचीन, ऋषीमुनींची, वेदांमध्ये वापरलेली भाषा म्हणून किचकट, कठीण असा शिक्कामोर्तब झालेल्या या भाषेबाबतीतले गैरसमज दूर करण्याचा हा अत्यंत शिस्तबद्ध प्रयत्न म्हणता येईल. कारण या पुस्तकातील एकेका प्रकरणामधून आपण मराठी भाषा समजून घेत संस्कृतच्या विश्वात अगदी सहज प्रवेश करतो.
संस्कृत भाषेच्या विद्यार्थ्यांना क्रमिक पुस्तकांसोबत भाषेचा अचूक अभ्यास करण्यासाठी ‘शब्द धातू रुपावली’ हे पुस्तक उपयुक्त ठरते. मात्र भाषारसिक किंवा संस्कृत भाषेतील साहित्य वाचनाची इच्छा असणाऱ्यांनी शब्द धातू रुपावली हातात घेण्यापूर्वी हे पुस्तक वाचल्यास संस्कृत रचनांचे अर्थ समजून घेणे अधिक सोपे होईल. कारण मराठी आणि संस्कृत शब्दांच्या विभक्ती, प्रत्ययांचा मेळ घालत त्यांचे अर्थ कसे काढायचे, याच्या सोप्या सोप्या ट्रिक्स या पुस्तकात दिलेल्या आहेत. शालेय विद्यार्थ्यांना यातील पाठांतराचा अधिक कंटाळा असतो. मात्र विभक्तीचे अर्थ समजून घेत अकारान्त, आकारान्त, उकारान्त इत्यादी शब्दांचे तक्ते वाचल्यास फार कष्ट न घेता ते पाठ करता येतात. किंबहुना पाठ करण्याची गरजही उरत नाही.
संस्कृत भाषेवरील काठिण्याचे मळभ दूर करणे, हा पुस्तकाचा मुख्य उद्देश असल्यामुळे यातील भाषा अत्यंत सोपी आणि प्रवाही अशी वापरण्यात आली आहे. व्याकरणातील संज्ञा समजावून सांगतानाही आजच्या पिढीतील प्रचलित संज्ञांद्वारे ती स्पष्ट केली आहेत. उदाहरणार्थ- शब्दाचं I-Card (ओळखपत्र). हे समजावून सांगताना लेखक लिहितो, आपल्या ओळखपत्रावर नाव, पत्ता, वय, इयत्ता, तुकडी, हजेरी क्रमांक, व्यवसाय इत्यादी माहिती असते. त्याचप्रमाणे शब्दांचेही ओळखपत्र असते, ज्यामुळे त्या शब्दाची पूर्ण ओळख पटते. मराठी शब्दांची अशी माहिती देणारी ओळखपत्र आपल्याला तयार करता आली की संस्कृतमध्येही ती सहज करता येतात. एकदा ही ओळखपत्र तयार करता येऊ लागली की, संस्कृत भाषा शिकणे अत्यंत सोपे होते.
मराठी भाषेतील अनेक शब्द थेट संस्कृत भाषेतून कसे आले आहेत, याची उदाहरणेदेखील लेखकाने विविध प्रकरणांतील संदर्भानुसार दिले आहेत. तसेच मूळ संस्कृतमधून मराठीत आलेल्या शब्दांचे अर्थ कळल्यावर आपण अनेक वर्षांपासून बिनधास्त, जाहीरपणे किती चुकीचे शब्द वापरतो, याची जाणीव होते. यासाठी लेखकाने उदाहरण दिले आहे ‘सुस्वागतम्’चे. कुणाच्या स्वागतार्थ आपण हा शब्द अगदी मोकळेपणाने म्हणतो, दरवाजावर, रांगोळीतून लिहितो, मोठमोठ्या फलकांवरही छापतो. मात्र स्वागतम् शब्दाची सु(चांगले)+आगतम् (येणे) अशी फोड होते. आपल्या आमगनाने चांगले वाटले, असा अर्थ त्यातून प्रतीत होतो. तरीही आपण सु+सु+आगमन या अर्थाचा सुस्वागतम् हा किती चुकीचा शब्द वापरतो, हे जाणवते. शब्दांचे प्रत्यय, विभक्ती, पुरुष, वचनासहित अर्थ समजून घेत गेल्यास संस्कृत भाषेची गोडी तर लागेलच, पण आपण सध्या वापरत असलेली मराठी भाषाही अधिक तावूनसुलाखून निघेल, असा विश्वास हे पुस्तक वाचल्यावर वाटतो. प्रत्येक प्रकरणाच्या अखेरीस संस्कृत भाषेतील चिरंतन ठेवा असलेल्या सुभाषितांचा अर्थ कसा समजून घ्यायचा, यासाठी काही सुभाषितांमधील शब्दांचे अर्थ कसे लावायचे, हे समजावून सांगितले आहे. त्यामुळे व्याकरणातील एकेक संज्ञा स्पष्ट होतानाच त्याचा व्यवहार्य उपयोगही लगेच कळू लागतो.
तंत्रज्ञानाच्या आजच्या युगात इंग्रजी संज्ञांना आपापल्या भाषेत शब्द शोधण्याची पद्धत पडली आहे. त्याचप्रमाणे लेखक स्वत: अभियंता असल्याने त्याने इलेक्ट्रॉनिक्स या क्षेत्रातील अनेक संज्ञांना संस्कृत शब्द शोधून काढले आहेत. त्यानुसार हे पुस्तक वाचून नव्याने संस्कृत शिकणाऱ्यांनी आपापल्या क्षेत्रातील संज्ञांनाही संस्कृत शब्द शोधून काढल्यास या भाषेतील शब्दसंपदेत आणखी भर पडेल, असे आवाहनही लेखकाने सदर पुस्तकात केले आहे. तसेच सध्याच्या संगणकीय भाषेत इंग्रजीचाच अधिक वापर होत असला तरी वाक्यरचना आणि अर्थाच्या दृष्टीने संस्कृत ही किती अचूक भाषा आहे, याचेही दाखले लेखकाने दिले आहेत. त्यामुळे केवळ जगाने स्वीकारलेली भाषा आहे म्हणून इंग्रजीला डोक्यावर मिरवतानाच आपल्या प्राचीन संस्कृत भाषेतील गोडवाही अनुभवावा, असे लेखकाचे मत आहे.
एकूणच मराठी व्याकरण समजून घेत हसतखेळत संस्कृत भाषा शिकवणारे हे पुस्तक विद्यार्थ्यांपासून आबालवृद्धांपर्यंत कुणासाठीही उपयुक्त ठरू शकेल, यात शंका नाही.
पुस्तकाचे नाव : मैत्री संस्कृतशी
लेखक : तन्मय केळकर, कल्याण (मुंबई)
प्रकाशक : रोहन प्रकाशन
पृष्ठसंख्या : २६४
मूल्य : ~ २५०/-
बातम्या आणखी आहेत...