आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कथा धीरोदात्त हिलरींची!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत हरल्याने राजकारणातल्या पाच तपांच्या तपश्चर्येचा दुःखदायक अंत झालेला असला तरीही, हिलरी क्लिंटन ही अमेरिकी समाजकारण-राजकारणातली एक धीरोदात्त महिला आहे, हे सत्य उरतेच. तेच त्यांच्या ‘लिव्हिंग हिस्टरी’ या पुस्तकातही प्रतिबिंबित होते आहे...
मागच्या आठवड्यात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतली हिलरी क्लिंटन यांची अनपेक्षित हार स्वीकारणं केवळ अमेरिकेतल्याच नाही, तर जगभरातल्या लोकांना कठीण जातंय. हिलरींची हार आणि ट्रम्प यांचा विजय यामुळे एकीकडे अमेरिकन मतदारांच्या शहाणपणावर प्रश्नचिन्ह उमटलंय, आणि दुसरीकडे लोकशाही निवडणूक प्रक्रियेबद्दलही साशंकता निर्माण झालीय. हा जगातल्या सर्वात प्रगत आणि आद्य लोकशाहीचा पराभव मानण्यात येतोय. जगातल्या सर्वात शक्तिशाली राष्ट्राच्या प्रमुखपदी या वेळी पहिल्यांदाच एक महिला विराजमान होणार होती; हिलरींच्या पराभवाने ही गोष्टही लांबणीवर पडलीय.
तरीही, हिलरी रॉडहॅम क्लिंटन या आजमितीला जगातल्या सर्वात प्रभावशाली महिला आहेत. वयाच्या ६९व्या वर्षी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार म्हणून त्यांनी सर्व ताकदीनिशी निवडणूक लढवली. सर्वाधिक लोकप्रिय मते मिळूनही त्या हरल्या, कारण राज्यांची मतं त्यांना मिळाली नाहीत. हिलरींचा पराभव हा एका महिलेचा पराभव तर आहेच, शिवाय राजकारणातल्या पाच तपांच्या तपश्चर्येचाही दुःखद अंत आहे.
पतीला पूर्ण साथ देऊन त्याच्या करिअरचे अत्युच्च शिखर त्याने गाठल्यानंतर आपले करिअर सुरू करण्याचे असामान्य धैर्य हिलरींनी राखले. अमेरिकेच्या ‘प्रथम महिला’ म्हणून आठ वर्षे यशस्वी भूमिका निभावल्यानंतर हिलरींनी २०००मध्ये न्यूयॉर्क इथून सिनेटची निवडणूक जिंकली. त्यानंतर २००६मध्ये त्या परत सिनेटवर निवडून गेल्या. २००९मध्ये राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांनी त्यांची ‘परराष्ट्रमंत्री’ म्हणजेच ‘सेक्रेटरी ऑफ स्टेट्स' पदी निवड केली. २०१३ पर्यंत त्यांनी अत्यंत प्रभावी पद्धतीने कामगिरी करत आपला कार्यकाळ पूर्ण केला.
अर्थात कनिष्ठ मध्यमवर्गीय आईवडिलांच्या पोटी जन्मलेल्या हिलरींचा जीवनक्रम वरवर पाहिला, तर एखाद्या परीकथेत शोभावा असा आहे. शिक्षणप्रेमी आईवडिलांमुळे अमेरिकेतल्या प्रतिष्ठित येल विद्यापीठातून कायद्याचे उच्चशिक्षण त्यांना घेता आले. तिथेच बिल क्लिंटनशी मैत्री झाली. या मैत्रीचे रूपांतर गाढ प्रेमात आणि विवाहात झाले. वकिली व्यवसायामध्ये अनेक वर्षे निष्णात कायदेपंडितांबरोबर निरनिराळ्या ठिकाणी कामाचा दांडगा अनुभवही हिलरींनी घेतला. राष्ट्राध्यक्ष निक्सन यांच्यावर चालवण्यात आलेल्या महाअभियोगाच्या खटल्यासाठी काम करणाऱ्या कायदेतज्ज्ञांच्या चमूमध्ये त्या होत्या. स्वतःची कायदेपंडित म्हणून कारकिर्द घडवतानाच, बिल यांच्या करियरसाठी हिलरी मोठी मदत करतच होत्या. प्रथम अर्कान्सास राज्याचे अॅटर्नी जनरल आणि नंतर गव्हर्नर म्हणून बिल क्लिंटन निवडून आले होते, तेव्हा एकीकडे कोर्टात दावे चालवणारी वकील आणि दुसरीकडे राजकीय नेत्याची पत्नी, अशा दोन्ही भूमिका हिलरी सारख्याच सामर्थ्याने निभावत होत्या. त्यांना हे शक्य झाले, कारण कुशाग्र बुद्धिमत्ता, प्रचंड अभ्यास आणि अत्यंत कष्टाळू वृत्ती. याबरोबरच माणसे जोडत राहण्याचा त्यांचा स्वभाव. सार्वजनिक क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी लागणारी खिलाडू वृत्ती आणि कुठल्याही परिस्थितीत भावनांवर नियंत्रण मिळवण्याची अफाट क्षमता.
मात्र हिलरींचे जेवढे प्रशंसक आहेत, तेवढेच टीकाकारही आहेत. टोकाच्या टीकेला त्यांना अनेकदा तोंड द्यावे लागले आहे. जगातल्या सर्वोच्च शक्तिकेंद्रात त्यांनी तब्बल आठ वर्षे सत्ता अनुभवली आहे. पण एकूणच त्यांचे आयुष्य आणि त्यांचे अनुभव वाचकांसाठी अद्भुत वाटावेत, असे आहेत. हिलरींनी विपुल लेखन केले आहे. अमेरिकेची ‘प्रथम महिला’ म्हणून त्यांनी केलेल्या सामाजिक कामांबद्दल लिहिले आहे, अमेरिकी अध्यक्षांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या व्हाइटहाऊसची यजमान या भूमिकेतून व्हाइटहाऊस, तिथल्या चालीरीतींबद्दल लिहिले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ‘व्हाइट हाऊस’मधल्या त्यांच्या वास्तव्यावर आत्मकथनात्मक ‘लिविंग हिस्टरी’ हे भलेमोठे पुस्तक त्यांनी लिहिलेय. ‘मेनका पब्लिशिंग हाऊस’ने प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचा मराठी अनुवाद सुप्रिया वकील यांनी केलाय. व्हाइट हाऊस सोडतानाच हिलरींची सिनेटवर निवड झाली. पतीचे राजकीय आयुष्य संपले आणि पत्नीचे सुरू झाले, असे जगाच्या इतिहासातले हे एकमेवाद्वितीय उदाहरण आहे.
या आत्मकथनात हिलरींनी त्यांचे आईवडील, आजी, लहानपणीचा काळ या सगळ्यांविषयी थोडक्यात आणि मनोवेधक माहिती दिलीय. बिल, बिलची आई, वडील, भाऊ यांच्याविषयीची माहिती देतानाच त्यांच्याशी असलेले भावबंध याविषयीही मोकळेपणी लिहिलेय. हिलरींची एकुलती एक मुलगी चेल्सी हिचा जन्म आणि तिचे बालपण याविषयी लिहिलंय. चेल्सीच्या वेळी प्रसूतिगृहात बिल उपस्थित राहिला होता आणि अमेरिकेतही त्या वेळी ही फार नवलाची गोष्ट होती. चेल्सीचे संगोपन करताना बिलचा सहभाग याविषयी हिलरींनी जे लिहिलेय, त्यावरून कुटुंब हेच क्लिंटन दाम्पत्याच्या जीवनाचा अग्रक्रम राहिला, हे स्पष्ट होतं. सार्वजनिक जीवनात वावरणाऱ्या वडिलांवर होणाऱ्या टीकेला कसं सामोरं जायचं, हे छोट्या चेल्सीला कळावं, यासाठी बिल आणि हिलरी तिला खोटी खोटी नाटके करून दाखवत, ज्यात राज्याचे गव्हर्नर असलेल्या बिलवर खूप टीका केलेली असे. चेल्सीच्या गरजांना, हिलरींनी आई म्हणून सर्वाधिक प्राधान्य दिलं. कुठल्याही मुलाला कशाहीपेक्षा जास्त त्याच्या कुटुंबाची, पालकांची, घराची गरज असते, असं हिलरींचं ठाम मत होतं आणि देशाच्या बालकल्याण, स्त्रीहक्क, शिक्षणविषयक योजना आखताना त्यांनी नेहमीच मुलं आणि कुटुंब यांना प्राधान्य दिलं होतं. त्यांच्या वडिलांनी लावलेल्या काटकसरीच्या सवयीचं पालन सर्वात श्रीमंत देशाची ही ‘प्रथम महिला’ आयुष्यभर करत राहिली, त्यामागेही कुटुंबाचे संस्कार हेच कारण आहे.
अमेरिकेची ‘प्रथम महिला’ या नात्याने हिलरींनी केलेल्या जगप्रवासांचं अत्यंत रोचक वर्णन या पुस्तकात वाचायला मिळतं. त्यातून दोन देशांचे राजकीय संबंध कसे आकार घेत असतात, हेही कळतं. बिल क्लिंटन यांच्या कार्यकाळात अमेरिका आणि रशिया या दोन राष्ट्रांत अनेक सामंजस्य करार झाले. रशियाचे राष्ट्राध्यक्ष बोरिस येल्त्सिन यांच्याशी क्लिंटन दाम्पत्याचे मैत्रीपूर्ण संबंध होते. रशियाच्या भेटीवर असताना येल्त्सिन कशा मेजवान्या देत असत, याचे फार मजेशीर वर्णन हिलरींनी केले आहे. मेजवानीच्या वेळी येल्त्सिन नेहमीच क्लिंटन दाम्पत्याच्या मध्ये बसत आणि त्यांची पत्नी बिल यांच्या बाजूला बसे. अशाच एका मेजवानीदरम्यान येल्त्सिन यांनी बिल यांच्यासाठी एक खास पदार्थ पेश केला, तो म्हणजे, स्टफ्ड पिगलेट. पदार्थ टेबलावर येताच येल्त्सिन यांनी त्याचा एक कान कापून स्वतःच्या पानात वाढून घेतला, आणि बिल यांच्या पानात दुसरा कान वाढला. हिलरींनी त्याबद्दल लिहिलंय की, पिगलेटला फक्त दोनच कान असतात, याचा मला त्या वेळी फारच आनंद झाला. त्यानंतरच्या मेजवानीला येल्त्सिन यांनी मेजवानी संपत आलेली असताना मोठ्या आवाजात घोषणा केली की, हिलरी यांच्यासाठी बनवलेली खास पाककृती आता सादर होईल. मोठ्या पसरट वाडग्यात एक वाफाळते सूप पाहुण्यांच्या समोर ठेवले गेले. ‘धिस इज युर स्पेशल ट्रीट…’ असे म्हणत बोरिस यांनी खुदुखुदु हसत हिलरींना सांगितले की, ते मूस लिप्स आहेत म्हणजे, अमेरिकी हरणाचे ओठ! हिलरींनी लिहिलंय की, मी माझ्या देशासाठी कधीही न पाहिलेले अन्नपदार्थ चाखलेत, पण ‘मूस लिप्स’ ही हद्द होती.
हिलरींनी भारत-पाकिस्तानच्या भेटींविषयीही लिहिलेय. भारत भेटीदरम्यान आपल्याला ताजपेक्षाही जास्त गांधीजींच्या आश्रमात चालणाऱ्या महिलांच्या ‘सेवा’ या संस्थेने कसे प्रभावित केले, हे त्या लिहितात. स्त्रियांचे प्रश्न, बालकांच्या समस्या, दारिद्र्य, आरोग्यविषयक कार्यक्रम या क्षेत्रात प्रथम महिला, या नात्याने त्यांनी केलेली कामे आणि हाती घेतलेल्या उपक्रमांविषयी या पुस्तकात वाचायला मिळते. स्त्री हक्कांविषयी एवढ्या जागरूक असलेल्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाच्या हिलरींनी ‘मोनिका लुइन्स्की’ प्रकरणात बिल यांची पाठराखण का केली, हा प्रश्न त्यांना अनेकदा विचारण्यात येतो. या नाजूक विषयावरही त्यांनी संयमाने यात लिहिलेय.
हिलरींविषयी माध्यमातून मिळालेल्या माहितीमुळे आपल्या मनात त्यांची जी प्रतिमा झालेली असते, ती बाजूला ठेवून हे आत्मचरित्र वाचलं पाहिजे. जगाला प्रभावित करणारे अधिकार असलेल्या माणसांच्या आयुष्याची एक सुरस सफर यातून आपल्याला अनुभवता येते. स्त्रीच्या वाट्याच्या मुलगी, आई, पत्नी या सगळ्या भूमिका निभावत आयुष्याला ताठ मानेने सामोरे जाण्याचे, अजब कसब हिलरींसारख्या व्यक्तींमध्ये असते आणि त्या जोरावर त्या यश खेचून आणत असतात. म्हणूनच त्यांच्या कथा प्रेरणादायी होतात. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर लढण्याची हिंमत दाखविणाऱ्या हिलरींना ही निर्णायक लढाई जिंकता यायला हवी होती, हिलरी निवडून यायला हव्या होत्या...
janhavip@yahoo.com
बातम्या आणखी आहेत...