आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बापमाणसाची अनवट भक्तीकथा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुरहरी केळे यांनी समृद्ध आयुष्य जगलेल्या आपल्या वडिलांची जीवनकथा ‘जगी ऐसा बाप व्हावा’ या पुस्तकातून वाचकांसमोर ठेवली. पेंग्विन प्रकाशनाशी संलग्न पारट्रीज रँडम हाऊसतर्फे सिद्ध झालेला त्याचा इंग्रजी अनुवाद प्रा. ज्ञानेश्वर सूर्यवंशी यांनी ‘द इनक्रेडिबल फादर’ या शीर्षकानं केलाय. त्याचे प्रकाशन आज पुण्यात संत साहित्याचे भाष्यकार प्रा. डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते होत आहे. त्यानिमित्त हे टिपण.
हे चरित्र म्हणजे एका मुलाने आपल्या वडिलांचा साकारलेला जीवनपट आहे. लेखक मुरहरी केळे यांनी सोपान्याचा सोपानकाका केळे महाराज होण्यापर्यंतचा अपूर्व प्रवास मांडलाय. अपूर्व यासाठी की, एक लौकिकार्थाने अक्षरओळख नसलेला, हलाखीत जन्मलेला साधा माणूस कष्ट, भक्तिभाव आणि निरामय ज्ञानसाधना यांच्या बळावर काय उंचीवर पोहोचतो, याची ही कथा आहे.
वारकरी परंपरेतले विद्वान आणि नामवंत कीर्तनकार म्हणून सोपानकाका केळे हे उस्मानाबादच्या पंचक्रोशीत ओळखले जायचे. केळेवाडी या लहानशा गावात जन्मलेल्या, लोकजीवनाशी एकरूप झालेल्या या वारकरी कीर्तनकाराचं जगणं हरतऱ्हेची माणसं, चढउतार आणि नाट्यमय घटनांनी भरलेलं आहे. सोपान महाराज जन्मले तो धनगर समाज, त्यातल्या रूढी-परंपरा, गावगाड्याशी त्याचा सामाजिक-सांस्कृतिक व्यवहार, कृषी संस्कृतीसोबतचं नातं असे अनेक पदर या कथनाला आहेत. गावगाड्याच्या बंदिस्त व्यवस्थेत हा माणूस संत साहित्य पोहोचवत स्वत:सोबत अनेकांना जातीधर्माच्या जाणिवांच्या पार नेत व्यापक कसा करतो, ते सांगणारे उत्कट प्रसंगही यात वाचायला मिळतात. सोपान महाराजांच्या आयुष्यासोबतच त्यांच्या गावाचीही भौतिक-वैचारिक उन्नती कशी होत गेली, हे त्यातून समोर येतं. त्यांच्या चरित्राचा अनुवाद हे खरं तर जोखमीचंच काम. कारण त्यांचं आयुष्य विणताना अनेक लोककथा, लोकसमजुती आणि लोकसंस्कृतीचेही तानेबाने उलगडत जातात.
प्रा. ज्ञानेश्वर सूर्यवंशी यांनी हे आव्हान समर्थपणे पेललंय. दिंडी, तुळशी माळ, फेटा असे शब्द काही संकल्पना जशाच्या तशा मराठीत ठेवत, त्यांचं केवळ लिप्यंतर करण्याचं तारतम्य त्यांनी दाखवलं आहे. सोपानकाकांचा जीवनपट उलगडताना संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि इतर अनेकांचे अभंग ओघाने आलेले आहेत. मात्र अतिशय खुबीने, त्यांच्यातली काव्यात्म लय कायम ठेवत श्री. सूर्यवंशी यांनी ते इंग्रजीत नेलेत. शेवट करताना दिलेला शब्दार्थकोशही नेमका आणि चपखल अर्थवर्णन सांगणारा आहे. पुस्तक वाचताना कुठंही मूळ मजकूर, घटना आणि जिवंत अनुभव यांमधलं प्रवाहीपण आणि रसाळपणा उणावत नाही. अपार कष्ट सोसलेले
दोन पाय प्रतीकात्मकपणे दर्शवणारं पुस्तकाचं मुखपृष्ठ नजर खिळवून ठेवणारं आहे. जाणते चित्रकार श्रीधर अंभोरे यांची मोजकीच रेखाटनं पुस्तकाची उंची वाढवतात.
पुस्तक : जगी ऐसा बाप व्हावा
अनुवाद : प्रा. डॉ. ज्ञानेश्वर सूर्यवंशी
प्रकाशन : पार्ट्रीज, पेंग्विन रेंडम होम कंपनी
पृष्ठसंख्या : १३०
मूल्य : ~ ३५०/- (पेपरबॅक)
बातम्या आणखी आहेत...