आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रँडेड मालाचा आग्रह नको ! (संजय भास्कर जोशी)

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रत्येक वेळी ‘थोर’ असे औपचारिक ब्रँडिंग केलेल्या माणसांकडेच बघायला हवे, असे नाही. आजूबाजूला ‘थोर’ असे ब्रँडिंग करून इतिहासाच्या पुस्तकात स्थान न मिळवलेली अनेक माणसे असतात. त्यांना पूर्ण आदर्शपुरुष न मानता त्यांच्याकडून सुट्या सुट्या गोष्टी शिकत आपण आपले जगणे अर्थपूर्ण करू शकतो.
‘बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले’ असे म्हणत आपण चटकन एखाद्याला देवतास्वरूप मान देऊन त्याचा दगड करून टाकतो, पण खरे तर त्यापेक्षा त्याची पावले ‘अनुसरणे’ जास्त मोलाचे असते. भवतालात उबग यावा आणि उद्विग्न वाटावे असे खूप काही आहे, कबूल. पण सारेच दीप काही मंदावले नाहीत. नक्कीच. रोज टीव्ही बघून आणि वर्तमानपत्रे वाचून भवतालाविषयीची उद्विग्नता वाढतच जाते. ‘बेताल ते बालीश’ अशा टोकात वावरणारे अनेक राजकीय नेते, अभिनेते आणि एकेक तथाकथित सुप्रसिद्ध लोक पाहून आपल्या ‘आदर्शा’च्या कल्पना एकीकडे उलट्यापालट्या होत असतात, तर दुसरीकडे तथाकथित विचारवंत जाती, धर्म, परंपरा आणि असल्या गोष्टींचे अवडंबर माजवून आपल्या मनात संभ्रमाच्या लाटा निर्माण करत असतात. एकूणात आपला फर्स्ट क्लास मोरू झालेला असतो. आपण रीतसर या भवसागरात गटांगळ्या खात असतो.

अशा वेळी मला एक मानसिक व्यायाम सुचवावासा वाटतो. आपल्या दैनंदिन जगण्यात, जगण्याच्या झटापटीत आपण सारेच कौटुंबिक, व्यावसायिक, सामाजिक स्तरावर जमेल तसे राजकारण, छक्केपंजे आणि डावपेच खेळत आणि लढवत असतोच. या गदारोळात फक्त पंधरा मिनिटे हा व्यायाम करावा. कोणता ते सांगतो.

दिवसातला बराचसा वेळ आपण तुझे हे चुकले, त्याचे हे चुकीचेच होते, तिने असे करायला नको होते - या स्वरूपाचे विचार, संभाषण आणि आरोप करत असतो. बरोबर? तर मी म्हणतो, दिवसातून बस पंधरा मिनिटे शांतपणे असा विचार करावा की, आजच्या दिवसात कुणी केलेले कोणते छान कृत्य मीदेखील करावे असे मला वाटते? उदाहरणे देतो -
१. अमक्याने काहीच कारण नसताना आज त्या तमक्याच्या एका कामाची स्तुती केली, पण त्या अमक्याला तर स्तुती करून काहीच स्वार्थ साधायचा नव्हता. पण तो तमका किती आनंदी झालेला दिसला.
२. त्या याने म्हणे सक्काळी सक्काळी टेकडीवर जाऊन काही रोपं लावली आणि रोज म्हणे त्या रोपांना पाणी घालणार आहे.
३. ती कोण ती म्हणत होती, तिने म्हणे तिच्या मोलकरणीच्या मुलाबरोबर त्याच्या चार मित्रांची घरच्या घरीच फुकट शिकवणी घ्यायला सुरुवात केलीय, आजपासून. रोज सकाळी तासभर त्या मुलांना शिकवणार आहे म्हणे...
बघा, रोज आठवून आठवून अशा गोष्टींची मनात यादी केली तर? म्हटले तर गोष्टी साध्याच असतात, पण लगेच ‘त्यांची पाऊले वंदायची’ गरज नसते. यातली एखादी गोष्ट मला करता येईल? शिकता येईल? दिवसभर आजूबाजूला बेताल वागणाऱ्यांचे चाळे पाहून वैतागलेले मन तर तुष्ट होईलच, पण जरा आपली पण परीक्षा घेतली जाईलच, यात. आपण किती कडवट झालो आहोत, तेही तपासून बघता येईल. आजूबाजूला काहीतरी छान दिसले, तर ते टिपण्याइतके आपण संवेदनशील उरलो आहोत का, तेही बघता येईल, नाही का?
आठवून बघा, शाळेत आपल्या इतिहासाच्या पुस्तकात गांधी, नेहरू, सुभाषबाबू, आंबेडकर, फुले, सावरकर, शिवाजी महाराज वगैरे वगैरे सर्वार्थाने थोर लोकांविषयी धडे आपण शिकलो. कल्पना करा, शंभर वर्षांनंतर म्हणजे २११६मध्ये शाळेत जाणाऱ्या मुलांच्या इतिहासाच्या पुस्तकात कुणाचे धडे असतील? भवतालात तर आसपास असे गांधी, फुले, आंबेडकर वगैरे कुणी आढळत नाहीत. मग? शंभर वर्षांनंतर, तेव्हाही जे धडे आपण शिकलो, तेच धडे असतील? याचा अर्थ देव नामक कुणी खरोखरच असेल, तर त्याने अशा थोर लोकांचे प्रॉडक्शन अचानक थांबवले की काय? स्वार्थ आणि उपयुक्ततावादाने सगळ्यांचे जगणे अधिकाधिक खालच्या स्तरावर आणले की काय? जाऊ द्या, या खोलवरच्या सामाजिक आणि तात्त्विक चिंतनाला बाजूला ठेवा.(वैसे भी वह अपने बस की बात नही) असले चिंतन करणाऱ्यांना करू देत; पण आपल्यासारख्या सामान्य माणसांनी काय करावे मग, हा खरा प्रश्न आहे. या वैफल्यदायक विचाराला उत्तर म्हणून मी तो पंधरा मिनिटांचा मानसिक व्यायाम सुचवला आहे.
मीदेखील हाच प्रयोग केला म्हणून शेअर करतोय. कॉर्पोरेट क्षेत्रातल्या उच्च्पदस्थ नोकरीचा राजीनामा देऊन लेखन वाचन करत शांत जगायला लागूनदेखील मला आता दहा वर्षे झाली. पण ज्या ग्रंथव्यवहाराच्या क्षेत्रात मी उडी घेतली, तिथेही असेच बरेचसे वैताग होतेच. प्रोफेशनल वातावरणाचा अभाव, मीडिऑकर मानसिकता वगैरे वगैरे गोष्टी खटकत होत्याच. पण मग मी ‘तो’ विचार केला. प्रकाश आमटे, अभय बंग, आनंद नाडकर्णी वगैरे अनेक माणसेदेखील भवतालात आहेत. मौज म्हणजे, या कुणाचेच धडे आम्हाला पुस्तकात नव्हते. त्यामुळे त्यांना देव करून दगडाचे रूप देऊन अडगळीत टाकायची गरज नाही. चार गुण आणि दोन दोष असणारी ही आपल्यासारखीच माणसे तर आहेत. मग मी विचार केला, यांच्या पावलांचे वंदन वगैरे न करता काय काय अनुसरता येईल? अरे वा! बरेच आहे की यांच्यात अनुकरण करावे असे. यांना गांधी, फुले आंबेडकर न करता चार चांगल्या गोष्टी तर नक्कीच शिकता येतील. शिवाय ज्या (सुरुवातीला म्हटले त्या) उबगवाण्या आणि उद्वेगजनक राजकीय, सामाजिक पर्यावरणात मी राहतो, त्यातच हेदेखील राहतात आणि तरी दोन चांगल्या गोष्टी करायचा प्रयत्न करताहेत. हे छान आहे. मी काय करू शकतो? पुण्यात पौड रोडवर आयडियल कॉलनीत या दसऱ्याला माधव वैशंपायन नावाच्या मित्राच्या बरोबरीत मी ‘पुस्तक पेठ’ नावाने एक पुस्तकाचे दुकान सुरू केले, त्याचे मूळ हे अशा विचारात होते. वाचनसंस्कृतीविषयी गेली दहा वर्षे मी लिहीत, बोलत, अनेक ठिकाणी भाषणे देत आलोच की; पण प्रत्यक्ष कृती केल्याशिवाय काही खरे नाही, हे मला या लोकांकडे बघून उमजले. नुसती बडबड काय कामाची? कर के देखो. सांगायचा मुद्दा, काही शिकायचे असेल तर प्रत्येक वेळी ‘थोर’ असे औपचारिक ब्रँडिंग केलेल्या माणसांकडेच बघायला हवे, असे नाही. आजूबाजूला ‘थोर’ असे ब्रँडिंग करून इतिहासाच्या पुस्तकात स्थान न मिळवलेली अनेक माणसे असतात. त्यांना पूर्ण आदर्शपुरुष न मानता त्यांच्याकडून सुट्या सुट्या गोष्टी शिकत आपण आपले जगणे अर्थपूर्ण करू शकतो. त्यासाठी तो मानसिक व्यायाम सुचवला. कारण अशा माणसात चक्क आपला एखादा नातेवाईक, मित्र, ऑफिसातील सहकारी... असे कोणीही असू शकते. आपला मुलगा किंवा मुलगीदेखील असू शकते, बिलीव्ह मी. बरं, एक सल्ला देऊ?
संभाविताचा सल्ला : टीव्ही, फ्रीझ, ऑफिसात जाताना घालायचे कपडे, गॉगल वगैरे घेताना आपण शक्यतो ‘ब्रँडेड’ मालच खरेदी करतो. त्यामुळे आपल्याला गुणवत्तेची हमी मिळते. पण सज्जनहो, ज्ञान ही अशी एक गोष्ट आहे, की इथे ‘ब्रँडेड’ मालातच गुणवत्ता असेल, अशी हमी नाही. आपलं जगणं मौलिक आणि अर्थपूर्ण करायला उपयोगी पडेल ते ज्ञान मोलाचं, मग ते एअरकंडिशन्ड सभागृहात एखाद्या ज्ञानसत्रात मिळालेले असो, अथवा दारावर साबण विकायला आलेल्या एखाद्या विक्रेत्याकडून मिळालेले असो. एखाद्या वयोवृद्ध विचारवंताकडून मिळालेले असो किंवा आपल्याच सोळा-सतरा वर्षांच्या मुलीकडून मिळालेले असो. असे हवेतल्या हवेत कशाला, एक उदाहरणच देतो ना. मध्यंतरी नातवाला गोष्ट सांगत होतो. रंगवून रंगवून गोष्ट सांगितली आणि शेवटी त्याला म्हणालो, बरं का सिद्धार्थ, याचं तात्पर्य सांगतो, ऐक हं... मग त्या तात्पर्याच्या रूपात माझी विद्वत्ता वाहात राहिली. थोड्या वेळानंतर एकटा असताना सिद्धार्थची आई म्हणजे माझी मुलगी राधिका म्हणाली, बाबा, इतक्या लहान मुलांना कशाला तात्पर्य सांगावं? गोष्ट ऐकून त्याला काही नवं सुचलं तर? तुम्हीच सांगून टाकलं, तर त्याला कसं काही नवं सुचेल? हा मला मिळालेला एक उत्कृष्ट धडा होता. आपण च्यायला सगळी इसापनीतीदेखील शेवटच्या एका वाक्यातल्या तात्पर्यात बांधून टाकली. साहित्य आणि इतर कलांमधली ‘अनिर्णायकता’ वगैरे आपण म्हणतो तिची क्रूर हत्या आपणच अशी बालपणापासून करतो. बघितलंत ना, कुणाकडून कधी काय शिकता येईल त्याचा भरोसा नाही! लहानपणी जिला कडेवर घेऊन हिंडवलं तिच्यावर नक्कीच मला ‘विचारवंत’ असा ब्रँड दिसला नसता. तात्पर्य काय, तर ज्ञानाच्या बाबतीत ब्रँडेड मालाचा आग्रह धरायची गरज नाही.
(बोंबला! आत्तादेखील सवयीने काढलेच तात्पर्य. माझ्या लहानपणी जर ही मुलगी मला भेटली असती तरच काही सुधारणेची शक्यता होती!)
संजय भास्कर जोशी ९८२२००३४११
बातम्या आणखी आहेत...