आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
जिजाबार्इंसारखी अत्युच्च दर्जाची भूमिका केल्यानंतर मृणाल कुलकर्णीची जनसामान्यांपुढील प्रतिमा अतिशय आदरणीय अशी झाली. निवडक पण कडक भूमिका करण्यात मृणालचा हात कुणी पकडूच शकत नाही. एकाच वेळी ग्लॅमरस आणि चरित्राच्या भूमिका मिळाल्यामुळे मृणाल कुलकर्णीभोवती वेगळेच वलय निर्माण झाले होते. अशा भूमिका करणारी व्यक्ती तितकीच ‘जमिनीवर’ असेल, हा मृणालविषयीचा गैरसमज काही दिवसांपूर्वीच दूर झाला. मंदाताई आमटे या साध्वी स्त्रीच्या भूमिकेसाठी मृणाल कुलकर्णीचे नाव निश्चित झाले आणि त्यांना रंगमंचावर पाचारण केले. त्यानंतर मृणालबाई माइकवर जे बोलल्या ते ऐकून भल्याभल्यांना हसावे की रडावे हेच कळत नव्हते. ‘मी आत्ताच श्रीलंकेहून आले. विमानाने आले. तेव्हा हवेत असतानाच मला मंदातार्इंची भूमिका करण्याविषयी विचारणा झाली आणि मी लगेच होकार दिला. आता मंदातार्इंची भूमिका करायची म्हणजे त्यांच्यासारखी साधी राहणी जमली पाहिजे. मात्र माझं कपाट उघडलं आणि तिथे हजारो महागड्या चमकणा-या साड्या दिसल्या. म्हटलं, या साड्या नेसून मी कशी जाणार? त्यामुळे अगदी साधेसुधे कपडे घालून इथे आले.’ हे बौद्धिक ऐकल्यानंतर रंगमंचावर उपस्थित नाना पाटेकरनेही प्रकाश आमटेंच्या कानात कुजबुज केली. निश्चितच त्या कानगोष्टीत मृणालची अक्कल काढण्याची संधी नानाने हुकवली नसणार. अंगभर कापडाखेरीज ज्या स्त्रीने आयुष्यात दुसरा कोणताही मोह ठेवला नाही, त्या मंदाताई आमटेंच्या पुढे मृणालबाई विमान आणि साड्यांच्या गप्पा ऐकवतात, तेव्हा आत्मस्तुतीत मग्न मृणाल कुलकर्णीची सावली मोठी म्हणायची का?
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.