आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय वास्तवाचे प्रतिबिंब

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतात राहून सभोवतीचे वास्तव टिपणा-यांपेक्षा भारताबाहेर राहून भारतावर दृष्टिक्षेप टाकणा-यांचा प्रयत्न वास्तवाचे चकित करणारे अपरिचित रूप समोर आणतो, याचाच प्रत्यय ‘द एलिफंट, द टायगर अँड द सेलफोन, रिफ्लेक्शन ऑन इंडिया इन दि ट्वेंटी फर्स्ट सेंच्युरी’ हे अत्यंत सहजसुंदर आणि रसाळ शैलीतले शशी थरूर लिखित पुस्तक वाचल्यावर येतो...

वेरूळ - अजिंठा भेट- प्रस्तुत पुस्तकात थरूर यांनी आपल्या कुटुंबासोबत अजिंठा-वेरूळ व औरंगाबादला दिलेल्या भेटीचेही ब-या पैकी वर्णन केले आहे. ते न्यूयॉर्कहून मुंबईमार्गे औरंगाबादला कसे आले, हेही सांगितले आहे. त्यांना कोणी एका भारतीय मित्राने न्यूयॉर्कमध्ये सांगितले की, पुढच्या वर्षीपासून (अर्थात 1999 मध्ये) ही दोन्ही प्रेक्षणीय स्थळे जनतेसाठी बंद करण्यात येत आहेत. हे समजल्यावर थरूर कुटुंब थेट अमेरिकेतून दोन्ही मुलांसह औरंगाबादला धडकले.

केंद्रीय मंत्री शशी थरूर हे विविध कारणांमुळे वर्तमानपत्रांमध्ये ‘हेडलाइन्स’ मिळवत असतात. ते आधी संयुक्त राष्ट्रातले मुत्सद्दी अधिकारी होते. न्यूयॉर्कमध्ये राहायचे. मग त्यांनी ती नोकरी सोडली. 2006 मध्ये कोफी अन्नान निवृत्त झाले, तेव्हा संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस म्हणून निवडणूक लढवली व पराभूत झाले. त्यानंतर ते राजकारणात आले आणि केरळमधून काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक जिंकून केंद्रात मंत्री झाले. मग ते ‘आयपीएल’ वादाच्या भोव-या त अडकले. राजीनामा देऊन मनमोहनसिंग मंत्रिमंडळातून काही महिन्यांसाठी बाहेर पडले. मागील वर्षी त्यांना पुन्हा एकदा मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे राज्यमंत्री म्हणून मंत्रिमंडळात स्थान मिळाले.
हे सगळे सांगण्याचा हेतू असा की, हा उच्चविद्याविभूषित राजकारणी लिखाणातही नावलौकिक मिळवून आहे. संयुक्त राष्ट्रात त्यांनी 29 वर्षे सेवा केली; परंतु त्याचबरोबर सातत्याने लिखाणही करत राहिले. त्यांची आतापर्यंत विविध विषयांवर 12 पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ‘कॉमनवेल्थ रायटर्स प्राइझ’ हा बहुमान त्यांना मिळाला आहे. ‘बुकलेस इन बगदाद’, ‘नेहरू-द इन्व्हेन्शन आॅफ इंडिया’ व ‘पॅक्स इंडिका’ ही म्हणूनच यांची गाजलेली पुस्तके. थरूर बरीच वर्षे परदेशात राहिल्याने त्यांना भारत वेगळ्या नजरेतून बघता आला. म्हणूनच भारतात राहून लिखाण करणा-या लेखकांपेक्षा वेगळा पैलू आजवर ते मांडू शकले.
‘द एलिफंट, द टायगर अँड द सेलफोन’ हे प्रस्तुत पुस्तक त्यांच्या विविध लेखांचा उत्तम संग्रह आहे. थरूर वेळोवेळी जे लेखन करत गेले, त्यातील 70 निवडक लेख या पुस्तकात समाविष्ट केले आहेत. थोडे जुने असले तरी वाचनीय आहेत. मला हे पुस्तक आवडण्याचे कारण म्हणजे भारताबद्दलचे अनेक नवे पैलू तेही नव्या दृष्टिकोनातून या लेखांतून समजून घेता आले. दुसरे कारण म्हणजे थरूर यांचे इंग्रजीवरचे प्रभुत्व. पुस्तकातील लेख छोटे-छोटे असले तरी पाच खंडांत ते विषयवार विभागल्यामुळे वाचनासाठी आपल्या आवडीच्या विषयांवरील लेखांची निवड करणे सोपे जाते. विषय म्हणाल तर अर्थशास्त्र, राजकारण व देशाची सद्य:स्थिती; तसेच आंतरराष्ट्रीय प्रश्न व राजकारण; भारताचा संक्षिप्त इतिहास, शहर नियोजन, शहरांचे वेगाने होत असलेले बकालीकरण, शहरांची बदलती नावे, मुंबई व दिल्लीची तुलना, अजिंठा-वेरूळवरील दृष्टिकोन असे बरेच काही या पुस्तकात आहे.

पुस्तकातील पहिला लेख भारताचे कुठेही नाव न घेता एका हत्तीची गोष्ट सांगतो. आळशी स्वभावाचा हा हत्ती म्हातारपणी स्वत:च्या सवयी बदलून वाघ बनतो आणि जंगलावर आपले अधिपत्य पुन्हा प्रस्थापित करतो. भारत एकेकाळी विशाल व बलवान राष्ट्र होते; परंतु कालौघात ते कमकुवत होत गेले व जंगलातील (जगातील) बाकी प्राणी (देश), मुख्यत्वे चीन वगैरे ताकदवान होत गेले. हे बघून हत्तीला (भारताला) समजावण्यात येते की तू सवयी बदलल्या नाहीस तर संपून जाशील. थरूर यांनी सांगितलेली ही गोष्ट म्हणजे भारतात उदारीकरणादरम्यान घडत असलेल्या आर्थिक स्थितीवरचे वेगळ्या प्रकारचे भाष्य आहे.

या पुस्तकातील एक लेख तर चक्क भारतीय साडी हळूहळू कशी दिसेनाशी झाली आणि साडीचे माहात्म्य, तिची सुंदरता यावर आहे. हे पुस्तक पूर्वप्रकाशित लेखांचे संकलन आहे आणि ते लेख केव्हा-केव्हा, कुठे-कुठे प्रसिद्ध झाले याबद्दल पुस्तकातून कळत नसले तरी त्यातला कुठलाही लेख वाचून चोखंदळ वाचक समाधान मिळवू शकतो. पूर्ण पुस्तक एका बैठकीत संपवायला वेळ नसेल किंवा स्वत:च्या आवडीचा विषय म्हणून कुठलाही लेख वाचायचा असेल, तर तेही या पुस्तकाद्वारे साध्य होते. एकूणच, अगम्य आकडेवारी किंवा तत्त्वज्ञान सांगण्याचा प्रयत्न न करता ओघवत्या शैलीत लहान-लहान लेख वाचकाला खिळवून ठेवतात. अर्थात, यातील क ाही लेख मी इंग्रजी वृत्तपत्रांतून, नियतकालिकांमधून वाचल्याचे स्मरते. कुठे कुठे लेखांमध्ये थोडे जुने संदर्भ आढळतात; परंतु भारतात एकूण काय चालले आहे, देश कुठे नि कसा जात आहे, समाजाची जडणघडण कशी होत आहे, याबद्दल अनुभवाच्या आधारे लेखकाने केलेले भाष्य वाचकाला भावून जाते. याचसाठी विविध घटना-प्रसंगांचे संदर्भ म्हणूनही हे पुस्तक उपयुक्त ठरते.

पुस्तक : द एलिफंट, द टायगर अँड द सेलफोन
रिफ्लेक्शन्स ऑन इंडिया इन द ट्वेंटी फर्स्ट सेंच्युरी
लेखक : शशी थरूर ,प्रकाशक : पेंग्विन इंडिया
मूल्य : 399 रुपये, पाने : 387