आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जमिनीखालचे तांडव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्या भूकवचाची स्पंदने, ज्याला आपण भूकंपाच्या रूपात ओळखतो, ही आता नावीन्याची घटना राहिलेली नाही. भू-कंपने ज्यांनी अनुभवलेली नाहीत, असा माणूस या भूतलावर कदाचित अस्तित्वात नसेलच. भूकंपाचा विनाश मात्र दरवेळी वेगळा असतो. सजीवांचा नाश व वित्तहानीचा पाश भूकंपाच्या जागेनुसार बदलत राहतो. एका भूकंपाचा विनाश दुसऱ्या भूकंपासारखा नसतो. तो कधी कमी, तर कधी जास्त असतो. नेपाळची हानी इतरांसारखी असली तरी ती इतरांसारखी नाहीसुद्धा.
नेपाळचा भूकंप हा आकस्मिक होता का? या प्रश्नाचे उत्तर नकारार्थीच आहे. किंबहुना, पूर्ण हिमालय पर्वतराजीच्या पट्ट्यात जे भूकंप निर्माण होतात, ते सारे अपेक्षितच आहेत व असतात. ही अपेक्षा काही शास्त्रीय तथ्यांवर आधारित आहे. आपले भूकवच; ज्याच्यावर आपण शेती करतो, रस्ते बांधतो, टोलेजंग इमारती उभ्या करतो, ते दिसायला जरी टणक व कडक असले तरी ते प्रत्यक्षात तसे नसते. ते आतून काही ठिकाणी ठिसूळ झालेले आहे. या साऱ्याला कारणीभूत आहेत, पृथ्वीच्या अंतरंगात वेळोवेळी घडून येणाऱ्या हालचाली.

मानवी कालमापन संकुचित आहे. आपला हिशेब हा काही दशकांशी फार तर एखाद्या शतकाशी निगडित असतो. आपला थेट संबंध फक्त दोन-तीन पिढ्यांशी असतो. पण भूशास्त्रीय कालमापन हजारो, लाखो, कोट्यवधी वर्षांचे असते. भूवैज्ञानिक जेव्हा पृथ्वीशी संबंिधत घटनांचा अभ्यास करतात, तेव्हा त्यांना निसर्गचक्राशी सुसूत्रता साधावी लागते.
वैज्ञानिक समूहाने निसर्ग व निसर्गाच्या क्रिया कशा व कोणत्या प्रकारे पार पडतात, याचे जवळून आकलन केले आहे. पृथ्वीच्या पोटात जाऊन तिथे काय काय घडामोडी घडताहेत, हे ते स्वत: जरी जाऊन पाहू शकत नसले तरी, विविध उपकरणांच्या मदतीने तिथे काय घडते, ते नेमकेपणाने सांगणे शक्य आहे. हबल व अवकाशात बसवण्यात आलेल्या अनेक दुर्बिणींच्या साहाय्याने वैश्विक स्फोट व ग्रहांची निर्मिती होतानाच्या अनेक घटना कॅमेऱ्यात टिपण्यात आलेल्या आहेत. अशाच एका वैश्विक स्फोटातून आपल्या ग्रहाचा जन्म झाला. साहजिकच त्या स्फोटाची ऊर्जा पृथ्वी आपल्या पोटात सामावून ठेवू पाहत आहे.

पृथ्वीला अब्जावधी वर्षांचा इितहास आहे. या इतक्या मोठ्या कालखंडात तिची पूर्वीची ऊर्जा कमी कमी होत आहे. तिच्या जन्मावेळचे हजारो डिग्री सेल्सियस तापमान, आता कैक पटींनी कमी झालेले आहे. त्यामुळेच तिचे आवरण थंड झाल्यामुळे इतके टणक भासते; पण या आवरणाच्या खाली अजूनही हजारो डिग्री सेल्सियस तापमानाचा शिलारस किंवा लाव्हा धगधगतो आहे. शिलारसात आग खेळत असल्याने हा शिलारस एका जागी स्थिर बसत नाही. तो सतत वळवळत राहतो. पाणी तापवताना जसे अभिसरण प्रवाह निर्माण होतात, अगदी त्याचसारखे अभिसरण प्रवाह पृथ्वीच्या पोटातसुद्धा शिलारसाच्या धगीमुळे निर्माण होतात.

पेटलेल्या लाकूड, कोळसा किंवा गॅसच्या ज्वालांमुळे पाण्याचे काही घटक गरम होतात. गरम झालेले पाण्याचे अणुरेणू हलके होतात व वर सरकतात. थंड असलेले अणुरेणू खाली येतात व हलके झालेल्याची जागा घेतात. ही क्रिया निरंतर घडत राहिल्यानंतर अभिसरण प्रवाहांचा उगम होतो. पृथ्वीच्या पोटात असे अनेक अभिसरण प्रवाह निर्माण झालेले आहेत. काही प्रवाह एकमेकांच्या दिशेला किंवा एकमेकांच्या विरुद्ध दिशेला फिरत असतात. यांच्या माथ्यावर जो जमिनीचा तुकडा स्थिरावलेला असतो, तो हे प्रवाह ज्या दिशेला फिरतील त्या दिशेला फिरत राहताे. त्यामुळेच भारतीय उपखंड जो दक्षिण गोलार्धात काही कोटी वर्षांपूर्वी होता, तो आता उत्तर गोलार्धात येऊन पोहोचला आहे. पण हजारो मैलांचे अंतर जरी भारतीय भूतुकड्याने कापले असले तरी युरेशिया भूतुकडा एकाच जागी स्थिर आहे. तो स्थिर असल्याकारणाने भारतीय भूतुकडा त्याला मागे रेटण्याच्या प्रयत्नात आहे.

या दोन भूतुकड्यांची जुगलबंदी हजारो-लाखो वर्षांपासून सुरू आहे. काही कोटी वर्षांपूर्वी या दोन भूतुकड्यांच्या मध्ये समुद्र होता, ज्याच्यात गाळ साचत होता. भारतीय भूतुकड्याचा रेटा या गाळावर पडल्यानंतर इथे हिमालयाची पर्वतरांग तयार झाली. हिमालय पर्वताची उंची आजही काही सेंटिमीटरने वाढते आहे.

पृथ्वीच्या गर्भातला वळवळता लाव्हा व भूतुकड्यांची हालचाल, या दोन गोष्टी भूकवचाला अनेक ठिकाणी भेगा व छिद्र पाडत राहतात. या क्रिया इतक्या संथगतीने होत असतात की त्याची जाणीव आपल्याला सहजगत्या होत नाही. आधुनिक उपकरणे हाती असल्यानंतरच त्यांच्या या हळुवार क्रिया आपल्या लक्षात येतात.

हिमालयाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात भूहालचालींचा प्रभाव पडत असतो. गेल्या शनिवारचा जो भूकंप झाला, त्यामुळे एव्हरेस्ट पर्वतावरसुद्धा हिमस्खलन झाले. एका भूतुकड्याचे दुसऱ्या भूतुकड्यावर आघात करण्याचे जे प्रकार आहेत, त्याने तिथल्या प्रत्येक कडेकपारीत दाब वाढत असतो. हा दाब सहन करण्याची कुवत प्रत्येक खडकात वेगवेगळ्या प्रमाणात असते. जेव्हा हा दाब प्रमाणाबाहेर वाढतो, तेव्हा हे खडक फुटून निघतात. फुटताना जी साठलेली ऊर्जा असते, ती सगळीकडे मग भूकंपाच्या रूपात पसरते.

महाराष्ट्रातील जनता भूकंपाच्या अनुषंगाने सुखी व सुरक्षित आहे. आपला संपूर्ण भूभाग दख्खनच्या लाव्ह्याने व्यापलेला आहे. इथे भूकंप होतच नाहीत, असे नाही; पण तीव्रता कमी असते. हिमालयाच्या विशिष्ट अशा संरचनेमुळे तिथे भूकंपांची एक मािलका तयार झालेली आढळते. हिमालयाच्या संपूर्ण पट्ट्यात कोणत्या ना कोणत्या ठिकाणी एका विशिष्ट कालावधीनंतर भूकंप होत असतात. काठमांडूजवळ दर ७०-८० वर्षांनंतर भूकंप होणार, हा काही जाणकारांचा कयास आहे. महाराष्ट्रात एवढ्या कमी वर्षांत एकापाठोपाठ एक भूकंप होण्याची शक्यता कमीच आहे. पण इतके अनेक मोठे विभंग अस्तित्वात आहेत. पनवेल व कुर्डूवाडी विभंग नावाने प्रसिद्ध असणारी भूमिगत विरुपता महाराष्ट्रातील भूकंपांना कारणीभूत ठरू शकते. भूतुकड्यांच्या हालचाली होऊन जो दाब वाढत असतो, तो या विभंगांतून बाहेर पडण्याची शक्यता जरा जास्त असते. हे कमकुवत पट्टे असतात. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या ऊर्जेचा निचरा अशा ठिकाणी जरा जास्तच होतो.
शिलारसाची ऊर्जा व भूहालचाली जोपर्यंत कमी होत नाहीत, तोपर्यंत भूकंप हे होतच राहणार. आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञानाच्या मदतीने ते कसे, का, कुठे व कोणत्या पद्धतीने अपघात करणार, हे स्पष्टपणे लक्षात आलेले आहे. आता फक्त केव्हा व कधीचे कोडे उलगडणे बाकी आहे. भूकंपाची वेळ-काळ शोधून काढण्याचे कसब अजून तरी आपल्याला साध्य करणे जमलेले नाही. त्यातून भूकंपप्रवण क्षेत्रात मानवी वसाहती वाढवून, आपण भूकंपाची दाहकता आणखीनच वाढवत आहोत. एका मागोमाग एक येणाऱ्या भूकंपांचा बहुधा हाच मोठा धडा आहे.

(लेखक भारतीय भूचुंबकत्व संस्थान, नवी मुंबई येथे वैज्ञानिक म्हणून कार्यरत आहेत.)
pravin@iigs.iigm.res.in
भूकंपाच्या
तोंडावर...

नेपाळमधील भूकंपाने हजारो लोकांचे प्राण घेतले. परंतु भारतासह जगातील प्रत्येक देशाला कधी ना कधी भूकंपाच्या विध्वंसकारी अवताराचा तडाखा बसलेलाच आहे, भविष्यातही तो बसणे हा निसर्गचक्राचा अटळ भाग आहे. भारताच्या ६० टक्के भूभागावर भूकंपाची टांगती तलवार आहे. मुंबई, पुणे, दिल्ली, चेन्नई, कोलकाता, अहमदाबादसह देशातील महत्त्वाची ३८ शहरे भूकंपाच्या तोंडावर आहेत. भूकंपरोधक तंत्रज्ञान वापरून इमारती उभारण्यासंदर्भात ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड््सने १९६२मध्ये काही निकष निर्धारित केले होते. त्या निकषांमध्ये २००५मध्ये सुधारणा करण्यात आली. मात्र घरबांधणी करणाऱ्या बहुतांश लोकांना या निकषांची माहितीच नसते, हे विदारक सत्य आहे.
दिल्लीमध्ये भूकंपरोधक इमारती बांधण्याचे प्रमाण इतर शहरांच्या तुलनेने काहीसे अधिक आहे. २००१मध्ये गुजरातच्या भुजमध्ये विनाशकारी भूकंप झाला. त्यानंतर या शहरात उभारलेल्या इमारती भूकंपरोधक तंत्राने बांधण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रात २००३मध्ये लातूर येथे ६.४ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. त्यात १० हजारांहून अधिक लोकांचा बळी गेला. याचे कारण दगडविटांनी बांधलेली या भागातील घरे भूकंपरोधक नव्हती. त्यामुळे जीवितहानीचे प्रमाण वाढले होते. भूकंपाच्या तोंडावर असलेल्या देशातील ३८ शहरांमध्ये भूकंपरोधक इमारती कमी आहेत. या शहरांत भूकंपाचे तडाखे बसल्यास प्रचंड विनाश होण्याचा धोका असल्याचे संयुक्त राष्ट्रांनी २००६मध्ये प्रसिद्ध केलेल्या अहवालातच म्हटले आहे. हिमालय तसेच उत्तर भारतामध्ये भूकंपाचा धोका कायमच असतो. भारतात किंवा शेजारी राष्ट्रांमध्ये जरी भूकंपाचे केंद्र असले तरी त्याचे तडाखे परस्परांना बसतच असतात. भारतीय व युरेशियन भूपट्टीत झालेल्या टकरीतून पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये २००५मध्ये भूकंप झाला होता व त्यात ८० हजार लोक दगावले होते.
२००१मध्ये भारतातील गुजरात भागात झालेल्या भूकंपात २० हजारांहून अधिक लोकांनी प्राण गमावले होते. २००४मध्ये ९.३ रिश्टर स्केल क्षमतेचा विनाशकारी भूकंप होऊन त्यात जगातील १४ देशांतील दोन लाख तीस हजारांहून जास्त लोकांचा बळी गेला होता. भारतात आजवर अनेक भूकंप झाले; पण त्यांचा दिल्ली, मुंबईसह मोठ्या शहरांना तीव्र तडाखा बसलेला नाही. म्हटले तर हे सुदैव आहे. पण तरीही भूकंपाच्या तोंडावर बसलेल्या या शहरांचे नगरनियोजनकर्ते भूकंपरोधक घरांच्या बांधणीला अग्रक्रम देण्याबाबत सुस्त आहेत. बिहारमध्ये १९३४ व आसाममध्ये १९४५मध्ये भूकंपाने शहरी भागांमध्येही जे तांडव मांडले होते, त्या उदाहरणांवरून आपण शहाणे झालेलो नाही. १९३४मध्ये झालेल्या भूकंपाचे केंद्र एव्हरेस्ट शिखरापासून १० कि.मी. लांब असूनही, त्याचे हादरे मुंबईपासून ल्हासापर्यंत सगळीकडे बसले होते. बिहारमधील अनेक शहरे, गावे तसेच कोलकाता शहरामध्येही या ८.४ रिश्टर स्केल क्षमतेच्या भूकंपामुळे काही इमारती कोसळण्याचे प्रकार घडले होते. १९५०मध्ये आसाममध्ये झालेला भूकंप हा हिमालयीन पट्ट्यातील गेल्या ६५ वर्षांतला सर्वात तीव्र क्षमतेचा भूकंप होता. आता त्याहून अधिक मोठा भूकंप भविष्यात झाल्यास विनाशाचे प्रमाणही तितकेच भीषण असेल.

३ मे ‘रसिक’च्या अंकात प्रवीण गवळी यांच्या लेखासोबत ‘भूकंपाच्या तोंडावर’ या शीर्षकांतर्गत माहितीपर चौकट प्रसिद्ध करण्यात आली होती.त्यात लातूर येथे झालेल्या भूकंपाचे वर्ष अनवधानाने १९९३ ऐवजी २००३ असे नोंदले गेले, त्याबद्दल क्षमस्व ! - संपादक