आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rasik Team Article On The Occasion Of The Republic Day

आगीच्या वर्तुळात आपण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यंदाच्या प्रजासत्ताक दिनाला फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष ओलांदे त्यांच्या शिस्तबद्ध नि शस्त्रबद्ध सैनिकांसह हजेरी लावणार आहेत. ही एका बलाढ्य नि संपन्न राष्ट्राने महासत्तात्सुक भारताला दिलेली दाद आहे, हे खरेच; पण महासत्तापदाकडे डोळे लावून असलेल्या भारताच्या चारही दिशा बाहेरून आगीने वेढलेल्या आहेत आणि आत धर्म आणि जातिभेदातून लागलेली आग विस्तारत चालली आहे... म्हटले तर सारे आलबेल आहे, म्हटले तर सारे दमादमाने विस्कटत चालले आहे...

नियम मोडणे, कायदा वाकवणे, पळवाटा शोधणे, सभ्यपणाची घडी न विस्कटता चोरी वा नक्कल करणे, आयएमपीच्या नावाखाली मुख्य परीक्षेआधी अख्खा पेपरच फोडणे, हे सगळे नैतिक चौकटीत बसणारे नसले तरीही, एक समाज म्हणून रोजच्या जगण्यात आपण सराईतपणे साधत असतो. अनेकदा तसे करण्यात आपल्याला एक प्रकारची फुशारकीही वाटत असते. काहीतरी भीमपराक्रम गाजवल्याचे सार्थक लाभत असते... म्हणजे, जितक्या सहजपणे आपण सिग्नल तोडतो, ट्रॅफिक पोलिसाने रोखले तर ५०-१०० रुपयांत सेटलमेंट करतो, तसेच एखादा चर्चेत असलेला बिग बॅनरचा सिनेमा रिलीज होण्याआधीच, नाना िहकमती करून आपल्या कॉम्प्युटर वा मोबाइलमध्ये डाऊनलोडही करून घेतो. चिरीमिरी घेणारे असतात, म्हणून सिग्नल तोडणारेही असतात आणि डाऊनलोड करून घेणारे तयार असतात, म्हणून सिनेमांची पायरसी करणारेही सोकावतात... यात कुणाचे काय नुकसान होईल, हा विचार दुय्यम असतो. विशेषत: सिनेमांच्या बाबतीत हे अलीकडे सर्रास घडताना दिसते. कुणी किती नवे सिनेमे डाऊनलोड केलेले आहेत, कुणाकडे रिलीज होण्याआधीच सिनेमाची प्रिंट आहे, याच गोष्टीत टेक्नो-सॅव्ही पिढीमध्ये सध्या चढाओढ लागलेली आहे. याच चढाओढीत इतर हिंदी-इंग्रजी सिनेमांप्रमाणे नाना पाटेकरांचा ‘नटसम्राट’सारखा थिएटर्समध्ये गर्दी खेचत असलेला सिनेमा लिक होऊन एक पैसा न खर्चता प्रत्येकाच्या मालकीचा होऊन जातो आहे. असे करून आपण केवळ निर्माता आणि त्याच्यावर विसंबून असलेल्यांचे नुकसान करत नाही आहोत, तर एकूण आपण जिथे राहतो, त्या समाजाशीच (मुख्यत: प्रवाहाबाहेरच्या ‘नाहीरे’ वर्गातल्या समाजाशी) पर्यायाने देशाशी प्रतारणा करतोय, याचे समूहाचे भान वेगाने सुटत चालले आहे. ‘नटसम्राट’चे उत्पन्न केवळ निर्मात्यांपर्यंत थांबणार नव्हते, तर या उत्पन्नातला काही टक्के हिस्सा मराठवाडा-विदर्भातल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठीही जाणार होता. खरे तर निर्माता-दिग्दर्शकाने तसे जाहीरही केले होते, तरीही परिस्थितीची कल्पना असूनही जाणीवपूर्वक सामूहिक पातळीवर गुन्हा घडला आहे.

पायरसी करणारा हा तोच वर्ग आहे, जो अलीकडे राष्ट्रभक्ती, राष्ट्रकार्य म्हणजे काय, हे उच्चरवात सांगत ऑनलाइन-ऑफलाइन उद्दामपणे वावरू लागला आहे. त्याच्या दृष्टीने सिनेमा-नाटक सुरू होण्याआधी थिएटरात सुरू होणाऱ्या राष्ट्रगीताला उठून मान देणे, ही उच्चकोटीची राष्ट्रभक्ती आहे. जो तसे करणार नाही, तो त्याच्या नजरेत राष्ट्रद्रोही आहे. तुम्ही शरीराने धट्टेकट्टे असा, लुळेपांगळे असा, की मनोविकाराने त्रस्त; राष्ट्रगीताला मान देण्याचा नियम पाळा आणि ते एकदा झाले की, मग पडद्यावर खूनखराबा बघा, नाहीतर लैंगिक भावना चाळवणारे ‘गुड्डू की गन’, ‘हंटर’, ‘क्या कूल है हम’ यांसारखे थर्ड रेट सिनेमे बघा, नाहीतर एखादे पाणचट नाटक, त्याला त्याच्याशी देणेघेणे नाही. त्याच्या दृष्टीने हाती झाडू घेणे, किंवा आपले पुरोगामित्व सिद्ध करण्यासाठी ‘सेल्फी विथ डॉटर’ घेणे राष्ट्रकार्याचा परमोच्च बिंदू आहे. जो तसे करणार नाही, तो त्याच्या नजरेत काफीर आहे. त्याच्या दृष्टीने रूढी-परंपरा पाळणे, धर्माभिमान जपणे, मांसाहार न करणे, धर्माधिष्ठित राजकारण करू पाहणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या धर्माशी आणि विचारांशी बांधिलकी जपणे हा देशभक्त असल्याचा सगळ्यात मोठा पुरावा आहे. जो ती बांधिलकी जपणार नाही, सत्ताधाऱ्यांच्या विचारांच्या विरोधात उभा ठाकेल, तो सरळसरळ देशद्रोही आहे.

पण, सिनेमा-थिएटर ही काय राष्ट्रभक्ती सिद्ध करण्याची जागा आहे का? रूढी-परंपरा आणि धर्माभिमान जपणे म्हणजेच, राष्ट्रकार्य साधणे आहे का? ‘पॅट्रिऑटिझम इज दी लास्ट रेफ्युज ऑफ ए स्काऊड्रल्स’ म्हणजेच, ‘राष्ट्रवाद हा बनेल लोकांसाठीचा हुकमी नि अखेरचा पर्याय आहे,’ अशा आशयाचे सॅम्युअल जॉन्सनचे विधान आता आसपास घडणाऱ्या घटना-प्रसंगांतून वेळोवेळी अंगावर येऊ लागले आहे. भारतीय प्रजासत्ताकाचे वय जसे वाढत चालले आहे, तसतशी या प्रजासत्ताकाचे राष्ट्राभिमानी म्हणून मिरवणाऱ्यांची समज अधिकाधिक बालिश होत चालली आहे. ज्यांनी ज्यांनी धर्मकार्य हेच राष्ट्रकार्य मानले, त्या बहुतेक सगळ्या देशांच्या चिरफळ्या उडताना दिसत आहेत. बेसावध माणसांची शरीरे एका क्षणात बेचिराख होत आहेत.
शेजारी पाकिस्तान तर रोजच धर्माच्या आगीत होरपळतो आहे. हे रक्तरंजित वास्तव दर दोन दिवसांआड भीषण रूपात समोर येत असूनही देशातल्या ज्या महाभागांनी या वाट चुकलेल्यांना ताळ्यावर आणायचे, ते ताकदवान लोक धर्म आणि राष्ट्राचे धोकादायक मिश्रण पुन:पुन्हा नव्या लेबलसह बाजारात आणण्याचा धंदा करत आहेत. त्याचमुळे धर्माच्या नावाने बोंब ठोकणे म्हणजेच राष्ट्रकार्य करणे, अशी धारणा एका वर्गात पक्की होत चालली आहे. हा बोंब ठोकणारा वर्ग अजूनही पुराणातल्या किस्से-कहाण्यांना प्रमाण मानून जगतो आहे. हा वर्ग अजूनही लोकशाही संकल्पनांपेक्षा धर्मवचन श्रेष्ठ मानून चालतो आहे. त्याला बुलेट ट्रेनमध्ये बसून हनुमान चालिसा वाचायची आहे. त्याला अॅपलच्या सर्वात महागड्या आयफोनवरून जातीय विद्वेषाची बीजे व्हायरल करायची आहेत. धर्म वेगळा आणि राष्ट्र वेगळे, ही लोकशाहीवाद्यांनी केलेली मांडणी त्याला एका झटक्यात लाथाडून टाकायची आहे. नव्हे, तेच जणू त्याचे जीवितकार्य बनल्यासारखे झाले आहे.

माणसाचे जगणे सुसंगतीपेक्षा विसंगतीने भरलेले असते, हे विधान आपल्या चहूबाजूंना धर्माची आग पेटलेली असताना आणि आपण त्या आगीच्या बरोब्बर मध्यभागी उभे असताना भीतीने अंगाचा थरकाप उडवणारे ठरू लागले आहे. कल्पना करा, अफगाणिस्तान-पाकिस्तान-बांगलादेश-तिबेट-श्रीलंका-चीन या चहूबाजूंनी धगधगणाऱ्या कमी-अधिक उंचीच्या आगी अगोदरच लागलेल्या आहेत, आणि भारत या आगीच्या मध्यावर उभा आहे... खरे तर या आगीतून बाहेर पडताना पहिला प्रयत्न चहूबाजूंना लागलेली आग आपल्यापर्यंत पोहोचणार नाही, यासाठी होणे शहाणपणाचे ठरणारे आहे. मात्र, तसे करण्याऐवजी एका उन्मादी अवस्थेत स्वत:लाच आग लावून घेणे सुरू झाले आहे... प. बंगालमधल्या माल्दामध्ये निव्व‌ळ संशयावरून घरे जाळली जात आहेत. उत्तर प्रदेशातल्या दंगलप्रवण मुजफ्फरनगरमध्ये पुन्हा एकदा लोकांच्या मनात विष कालवण्यासाठी अत्याचाराचे जुनेच खरे-खोटे व्हिडिओ योजनाबद्धरीत्या पसरवले जात आहेत. मुस्लिम दहशतवादाविरोधाच्या नावाखाली स्वत:ला गिळंकृत करू पाहणारे राज्य आणि केंद्र सरकारच्या नाकावर टिच्चून ‘धर्म सेना’ नावाचे नवे भूत उत्तर प्रदेशात उभे केले जात आहे. या धर्म सेनेतल्या कायद्याचे शिक्षण घेतलेल्या एक बाई हिंसेचे उघडउघड समर्थन करताना दिसत आहेत आणि इकडे महाराष्ट्रात कायद्याचे शिक्षण घेतलेले दुसरे महाभाग मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांना अप्रत्यक्षपणे धमकी देत आहेत. ज्यांनी कायद्याची शिस्त कायम ठेवायची, तेच जिहादच्या मूडमध्ये आले आहेत. हे एकदा सुरू झाले नि संपले, अशा पद्धतीने नव्हे, तर आवर्तन पद्धतीने घडत आले आहे. त्यात खंड पडलेला नाही. तो पडावा, यासाठी दिल्लीपासून गल्लीपर्यंत गांभीर्यपूर्वक प्रयत्न झाल्याचे जरासेही जाणवलेले नाही.
एक आत्महत्या हैदराबादच्या बहिष्कृत झालेल्या रोहित वेमुलाची होती... एक आत्महत्या ही आहे... ती रोखायची कशी आणि रोखायची कोणी, आणि सरतेशेवटी दाद मागायची कोणाकडे? हाच या प्रजासत्ताकापुढचा सगळ्यात गहन प्रश्न आहे. असायला हवाय.

सिनेमा-थिएटर ही काय राष्ट्रभक्ती सिद्ध करण्याची जागा आहे का? रूढी-परंपरा आणि धर्माभिमान जपणे म्हणजेच, राष्ट्रकार्य साधणे आहे का? ‘पॅट्रिऑटिझम इज दी लास्ट रेफ्युज ऑफ ए स्काऊड्रल्स’ म्हणजेच, राष्ट्रवाद हा बनेल लोकांसाठीचा अखेरचा पर्याय आहे, हे सॅम्युअल जॉन्सनचे विधान आता आसपास घडणाऱ्या घटना-प्रसंगांतून वेळोवेळी अंगावर येऊ लागले आहे...
पुढे पाहा, संबंधित फोटो..