आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थुकरटवाडीची रंगबेरंगी हवा...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रथेप्रमाणे वर्षातून एकदाच होळी-रंगपंचमी साजरी होते, मात्र झी मराठीवर ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने वर्षभर हास्याची धुळवड रंगत असते. डॉ. निलेश साबळेकृत या कार्यक्रमात प्रत्येक कलावंत निराळा, त्याची अिभनयाची खासियत निराळी. पण, त्यांना एका सूत्रात बांधण्याचे अवघड कार्य दर कार्यक्रमागणिक साबळे साधत असतात. डॉ. साबळेंच्या नजरेला प्रत्यक्षात हे कलावंत दिसतात तरी कसे, त्यांची कोणती स्वभाववैशिष्ट्ये त्यांना भावून जातात आणि त्यातून त्यांचे म्हणून कसे आगळे अर्कचित्र आकारास येत जाते, याचीच ही होलिकोत्सवाचा आनंद द्विगुणीत करणारी  शाब्दिक गोळाबेरीज. खास ‘रसिक’च्या वाचकांसाठी...
 
‘चला हवा येऊ द्या, चला हवा येऊ द्या...डोक्याला शॉट नको, हवा येऊ द्या...’ हे टायटल साँग खरं तर याच नावाच्या विलक्षण लोकप्रिय मालिकेचं. झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ असं काही रसिकांच्या मनात घर करून बसलंय, की त्यातील थुकरटवाडी हे गाव जणू काही आपलंच गाव आहे, असाच समस्त प्रेक्षकवर्गाचा पक्का विश्वास आहे. थुकरटवाडीतील सरपंच, त्यातील गावकरी असे सारे सारे लोक म्हणजे, मोहात पाडणारी अर्कचित्रेच आहेत.. ती शब्दांच्या माध्यमातून चितारली डॉ. निलेश साबळे याने. तोच तर या थुकरटवाडीचा खरा कर्ताधर्ता आहे. तोच या वाडीचा, त्यातील वाडीकरांचा खरा दिशादर्शक आहे. त्यामुळे एकदा का भट्टी जमली की, विनोदाचे चौकार, षटकार हाणले जातात ते याच थुकरटवाडीतून. मैदानातला रसिक मग जल्लोश करतो, त्यातल्या एकेक अदांवर. भाऊ कदम, भारत गणेशपुरे, श्रेया बुगडे, कुशल बद्रिके, सागर कारंडे असे एकेक कसलेले खे‌ळाडू आणि त्यांचा कर्णधार निलेश असे मिळून जो काही धुमधडाका लावतात, त्याचे नाव ते. हा सगळा सामना जिथे नेहमी रंगतो ती जागा म्हणजे, मुंबईच्या वेशीवरच्या मीरारोड उपनगरातला एक स्टुडिओ. तिथे अवतरलेल्या थुकरटवाडीत ‘दिव्य मराठी’ जाऊन पोहोचला तेव्हा लगबग सुरू होती, होळीनिमित्त सादर होणाऱ्या रंगीबेरंगी विशेष कार्यक्रमाची. सेटच्या आजूबाजूच्या खोल्या एकदम फुल होत्या. प्रत्येक कलाकारासाठी राखीव खोली. तिच्या दारावर या कलाकाराचे नाव डकवलेली कागदी पट्टी. एका खोलीतून एखादा असिस्टंट हातातून विविध प्रकारचे विग घेऊन दुसऱ्या खोलीत जातोय... तर कपडेपटवाला शूटिंगसाठी लागणाऱ्या कपड्यांना इमानेइतबारे ‘इस्तारी’ करतोय. तर बाकीचे असिस्टंट सारखे काही ना काही कामात गुंतलेले. अशी सगळी धावपळ-पळापळ सुरू असताना अचानक एका खोलीतून भाऊ कदम बाहेर आला. इथे-तिथे डोकावून पुन्हा आपल्या खोलीत निघून गेला. थोड्या वेळाने भारत गणेशपुरे आपल्या वऱ्हाडी बोलीत कोणाला तरी काही सूचना देऊन घाईघाईने सेटच्या दिशेने मार्गस्थ झाला. पण श्रेया बुगडे मात्र अभ्यासू मुलीसारखी आपल्या खोलीत संवाद पाठ करत बसलेली. थुकरटवाडीची चावडी अजून फुलायची होती. पण त्यातील सगळ्याच गावकऱ्यांचे लक्ष होते, स्टुडिओतील एका खोलीकडे... ती खोली होती, निलेश साबळेची. नुकताच एका आजारातून बरा झालेला निलेश पूर्वीच्याच उत्साहाने कामाला लागल्याचे सेटवर दिसतच होते. पण दुसरीही गोष्ट जाणवत होती. जगात सगळीकडे डॉक्टर इतरांची काळजी घेतात, इथे इतर लोक एका डॉक्टरची मनापासून काळजी घेत होते... 
 
१८ ऑगस्ट २०१४ रोजी ‘चला हवा येऊ द्या’चे प्रसारण सुरू झाले. ‘फू बाई फू’च्या यशानंतर निलेश साकारत असलेला हा दुसरा कार्यक्रम. कार्यक्रमाचा आत्मा फक्त आणि फक्त निखळ विनोदाचा. यात सादरीकरण करण्याआधी काही तालमी होतातच, पण जास्त भर उत्स्फूर्ततेवरच. लेखी स्क्रीप्टपेक्षा अलिखित हावभावांचे महत्त्व अधिक. त्यामुळे पहिल्या काही भागांनंतर या कार्यक्रमाने कधीच मागे वळून बघितले नाही. आतापर्यंत ‘हवा’चे २७८ भाग प्रक्षेपित झालेत. हा म्हटला तर सुखद चमत्कारच. 
 
असे सगळे मनात साठवत निलेश साबळेला आम्ही गाठले. हेतू हा की, ‘रसिक’च्या होळी विशेषांकासाठी थुकरटवाडीत धमाल उडवणाऱ्यांची शाब्दिक अर्कचित्रे त्यांनी रंगवावी. मग काय, ‘चला हवा येऊ द्या’चा एकेक मोहरा... त्यांच्या गमतीजमती, आठवणी, अभिनयाच्या लकबी याबद्दल निलेश भरभरून बोलला आणि त्यातूनच आकारास येत गेली, ‘चला हवा येऊ द्या’ची कुणाच्याही नजरेस न पडणारी अर्कचित्रात्मक दुनिया...
 
पुढील स्लाईडवर वाचा, झोपाळू  भाऊ अभिनयाला जगतो!
 
-  रसिक टीम
व्यक्तिरेखांचे शब्दांकन : समीर परांजपे
बातम्या आणखी आहेत...