हर कुत्ते के दिन होते है... या वाक्याचा खरोखरीच प्रत्यय यावा, अशी अवस्था सध्या मुंबईच्या गुन्हेगारी विश्वाची झालीय. या विश्वाचा प्रभाव झपाट्याने ओसरत चाललाय. पण खोड गेलेली नाही, त्यामुळे कुणा वेटरला, केटररला किंवा स्ट्रगलर मॉडेलला हाताशी धरून शूटआऊटचे प्रयत्न होताहेत आणि त्यात ते फसताहेत...
एक केटरर, एक वेटर आणि एक मॉडेल. तीन दिशांना तोंड असलेल्या या तीन जणांमध्ये काय साम्य असू शकतं? किंवा असायला हवं? तसं काही ना काही निमित्ताने हे तिघे कुठे तरी एकत्र येऊ शकतात. म्हणजे, जिथे कुठे मॉडेल शूट करतोय तिथे केटररने जेवणाचं कंत्राट घेतलेलं असू शकतं. किंवा ज्या हॉटेलात मॉडेल गेलाय, तिथे या वेटरशी त्याची गाठभेट होऊ शकते किंवा एखाद्या पार्टीच्या निमित्ताने एकाच क्षणी, एकमेकांची ओळखदेख नसलेले तिघे एकमेकांच्या नकळत एकत्र येऊ शकतात. कदाचित त्यांच्यात काही क्षणांपुरता संवादही होऊ शकतो. मग या तिघांत साम्य काय आहे? हे चटकन सांगता यायचं नाही.
पण व्यक्तिमत्त्व, चेहरेपट्टी, व्यवसाय यापैकी काहीही जुळत नसताना शूटआऊट केल्याच्या गुन्ह्याने त्यांना एकत्र आणलेलं आहे. पोलिसांच्या नजरेत हार्डकोअर नसले तरीही ते गुन्हेगार आहेत. हे तिघेही सध्या मुंबई पोलिसांच्या ‘अॅण्टी एक्स्टॉर्शन सेल’च्या ताब्यात आहेत. मुंबई उपनगरातल्या दोन दुकानांवर फायरिंग केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. हा गुन्हा त्यांनी कुणाच्या इशाऱ्यावर केलाय? सुरेश पुजारी. सुरेश पुजारी हा गँगस्टर आहे. दहा वर्षांपूर्वी तो सुरत जेलमध्ये जेरबंद होता. खंडणी, खून, दरोडे आदी गुन्हे त्याच्या नावावर होते, परंतु सध्या तो फरार आहे. दूर कुठेतरी ऑस्ट्रेलिया वा मलेशिया-बँकॉकमध्ये लपून बसल्याचा संशय आहे. या पुजारी गँगच्या सांगण्यावरूनच केटरर-वेटर आणि काश्मीरहून आलेल्या मॉडेलने ओपन फायरिंग केलं आहे. पण, तिघांना पकडल्यानंतर पोलिसांच्या असं लक्षात आलं की, पिस्तुल चालवण्याचा यापैकी एकालाही पूर्वानुभव नाही. यापैकी एकही जण यापूर्वी कुठल्या अंडरवर्ल्ड गँगशी कनेक्टेड नाही. मग तरीही ही सगळी मचमच झाली कशी?
पोलिस म्हणतात, मुंबईत आता अंडरवर्ल्ड गँगचा प्रभाव ओसरल्यात जमा आहे. त्यात पूर्वीसारखे शार्पशूटर्स त्यांच्या दिमतीला नाहीत. पूर्वी बहुतेक सगळ्या गँगमध्ये दोन-चार खतरनाक शार्पशूटर्स असायचेच. त्यांच्यात सगळ्यात फेमस होता, दाऊद गँगचा फिरोज कोकणी. वयाच्या १७व्या वर्षी फिरोज कोकणीने पहिला खून केला होता. ९०च्या दशकातला एके-४७ सारखी सगळ्यांत धोकादायक बंदूक वापरणाऱ्यांमध्ये पहिला गँगस्टरही तोच होता. परंतु खूप जास्त हवेत उडू लागला बघून दाऊदचा हस्तक असलेल्या छोटा शकील आणि त्याच्या भावाने फिरोज कोकणीचा काटा काढला. अगदी अंडरवर्ल्डच्या भाषेत ज्याला "मख्खन की तरह' म्हणतात, तसा.
आता गँगवाल्यांकडे मुरलेले शार्पशूटर्स नाहीत. मग अशा दुष्काळी अवस्थेत ते काय करतात? तर नवखी माणसं हेरतात. त्यांना मोठ्या रकमेचं आमिश दाखवतात आणि त्यांच्याकडून हवं ते काम करवून घेतात. मुंबई एटीसीने सुधाकर ख्रिस्तोफरिया या केटररला, राज चव्हाण नावाच्या वेटरला आणि अली अब्बास खान नावाच्या होतकरू मॉडेलला पकडलं. तपास केला तेव्हा त्यांना कळलं, सुरेश पुजारी गँगने फायरिंगच्या बदल्यात त्यांना प्रत्येकी १० लाख रुपयांचा वायदा केला होता. तोही त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा अनुभव वा कौशल्य नसताना. पण पोलिसांच्या म्हणण्यानुसार, गँगस्टर लोकांना आता अशी भुस्कट कामं करवून घेण्यासाठीसुद्धा ५०-१०० इच्छुकांना गाठावं लागतं. एकदा ते गावले की, त्यातल्या अनेकांना थेट सावजावर नव्हे, तर त्याच्या आसपास उदाहरणार्थ, खिडकी वा गाडीच्या काचेवर गोळी चालवायला सांगितली जाते किंवा बंदुकीच्या धाकाने सावजाला गाठून गँगस्टरचा नंबर देऊन पसार व्हायला सांगितलं जातं. अनेकदा तर कुणाला उडवायचं नाही, फक्त दम भरायचाय, या बोलीवर माणसं भाड्याने घेतली जातात. कुणालाही ढगात पाठवायचं नाही, म्हटल्यावर अडलेले राजीही होतात. त्यांना एकेका शूट आऊटचे एक-एक लाख रुपये देण्याचं कबूल केलं जातं.
अंडरवर्ल्डमध्ये चाललेल्या या हयगयीचा पोलिसांनी काढलेला अर्थ एकच आहे. तो म्हणजे, मुंबई अंडरवर्ल्ड पूर्णपणे नेस्तनाबूत झालेलं आहे. शार्पशूटर्सची सद्दी संपलेली आहे. अन्यथा ८०-९०च्या दशकांत जेव्हा अंडरवर्ल्ड गँगची चलती होती, तेव्हा हेच शार्पशूटर्स पोलिसांची सगळ्यात मोठी डोकेदुखी ठरत होते. या शार्पशूटर्सच्या ताकदीवरच गँगस्टर शहरभर दहशत माजवत होते. पण "टाइम हॅज चेंज अँड इट चेंज्ड सो ड्रामॅटिकली, दॅट, गँगस्टर्स आर हायरिंग नट्स दीज डेज...'
दे आर नट्स... आताचे शूटर्स एकदमच चणे-फुटाणे आहेत, असं पोलिस ठामपणे सांगतात. गेल्या वर्षी ठाण्यात सुमीत चक्रवर्ती नावाच्या बिल्डरवर फायरिंग झाल्याची घटना घडली होती. पोलिसांनी त्या वेळी हनुमंत गायकवाड आणि राहुल लोंढे नावाच्या शूटर्सना ताब्यात घेतलं होतं. हे दोघेही मूळचे सोलापूरचे, शेतकरी कुटुंबातले होते. गायकवाडला बहिणीच्या लग्नासाठी पैसे हवे होते. त्यामुळे जेव्हा गँगवाल्यांनी त्यांना हेरलं, ते ताबडतोब राजी झाले.
या घटनेनंतर महिनाभराने पोलिसांनी दोन शूटर्सना अटक केली. अंधेरी-ओशिवरा भागातल्या बिल्डरवर गोळीबार केल्याचा त्यांच्यावर आरोप होता. दोघेही मीरा रोड झोपडपट्टीत राहणारे होते. दोघांना फरार गँगस्टर एजाज लकडावालाच्या गुंडांनी सुपारी दिली होती. त्यातला अंकुश इंदुलकर नावाचा तरुण मोटार गॅरेजमध्ये काम करणारा होता, दुसरा सागर चव्हाण सेल्समन म्हणून एका दुकानात नोकरीला होता.
या दोघांचं रेकॉर्ड जेव्हा पोलिसांनी तपासलं, तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की, एका हाणामारीच्या गुन्ह्यात त्यांना यापूर्वी अटक झाली होती. अटकेत असतानाच त्यांचा लकडावाला गँगशी संपर्क आला होता. त्यांची छानछोकी, त्यांचं डेअरिंगबाज वागणं-बोलणं याचा त्यांच्यावर प्रभाव पडला होता. जेलमधून सुटल्यावर ते सहज गँगच्या जाळ्यात आले होते.
आता असेच अननुभवी, फारशी धमक नसलेले शूटर्स टोळ्यांसाठी काम करायला तयार होतात. याचं कारण मकोका. (महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज्ड क्राइम अॅक्ट) पूर्वी शूटआऊट झाला तरीही सहज गुंड सुटून जेलबाहेर येत होते, आता किमान ३ ते ५ वर्षे त्यांना जेलमध्ये काढावी लागतात, त्यामुळे मुरलेल्यांसाठी हा सारा घाटे का सौदा ठरतो. सबब, टोळ्यांना नवशिक्यांवर काम भागवावं लागतं. त्यातही टोळीवाले शक्कल लढवतात. जसं कॉर्पोरेट जगतात एखाद्या महत्त्वाच्या कामावर नवशिक्याबरोबर अनुभवी माणूस देतात, तसं हल्ली गँगवाले शूटआऊट असेल तेव्हा अनुभवी लोकांना त्यांची सोबत तेवढी करायला सांगतात.
ऑल इन ऑल. पोलिसांना हे अज्ञात शापशूटर्स शोधून काढणं थोडंसं अडचणीचं ठरत असलं तरीही अंडरवर्ल्डचं कंबरडं मोडलेलंच आहे, पण शार्पशूटर्स हाताशी नसल्यामुळे उरलासुरला प्रभावही संपत चाललाय. पण विरोधाभास असा की, प्रत्यक्षातलं अंडरवर्ल्ड प्रभवाहीन होत चाललं असताना, बॉलीवूडला अंडरवर्ल्डबद्दल वाटणारं आकर्षण काही आटलेलं नाही. अनुराग कश्यप, रामगोपाल वर्मांसारखे निर्माता-दिग्दर्शक अजूनही अंडरवर्ल्डचा शोध घेताना थकत नाहीयेत. त्यातही रामगोपाल वर्माला अंडरवर्ल्ड आणि त्यातल्या निगेटिव्ह शेडवाल्या व्यक्तिरेखांंचं वाटणारं आकर्षण व्यसन म्हणावं, इतकं सातत्यपूर्ण आहे. गँगस्टरपटांचा मारा करणाऱ्या वर्मानं आता आपला मोर्चा वेबसिरीजकडे वळवलाय. वेबसिरीजच्या माध्यमातून तो अंडरवर्ल्डचं ओबडधोबड तसंच नग्न सत्य प्रेक्षकांपुढ्यात आणू पाहतोय. त्यात शार्पशूटर्स आहेत, त्यांनी केलेले हृदयाचा ठोका चुकवणारे शूटआऊट्स आहेत, त्यांची कल्चरल शॉक देणारी शिवराळ भाषा आहे, सोबतीला सेन्सॉरला न जुमानणारी नग्नताही आहे...
म्हणजे, वास्तवात अंडरवर्ल्ड संपल्यात जमा झालं असलं तरीही छोट्या आणि मोठ्या पडद्यावर ते अधिक तपशीलवार, अधिक उघड्या-वाघड्या रूपात समोर येऊ पाहतंय. भूतकाळ नव्याने जिंवत होतोय. याचमुळे कदाचित अंडरवर्ल्डचं जनसामान्यांमधलं आकर्षणही कायम राहणार आहे...
divyamarathirasik@gmail.com