कणागी खन्ना ही सृजनशील छायाचित्रकार. अहमदाबादमध्ये तिला सापडली, हॉलीवूड नावाची एक झोपडपट्टी. या वस्तीत राहणाऱ्या महिलांच्या अनागर सौंदर्याने तिच्यातल्या कलावंताला भुरळ घातली. त्यातूनच अमेरिकेतील हॉलीवूडशी बंध शोधणारी छायाचित्र मालिकाच तिने या महिलांवर चित्रित केली. या छायाचित्रांना जाणकारांची दाद मिळाली. विविध प्रदर्शनांत मानाचे स्थान मिळाले. सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चेचा आणि कुतूहलाचा विषय ठरलेल्या, सौंदर्य आणि आनंदाचा अपूर्व मिलाफ असलेल्या उत्सवी वातावरणात मन प्रसन्न करणाऱ्या तिच्या या छायाकृतींची ही रंजक कथा...
जिथे आनंद आहे, तिथेच सौंदर्य आहे आणि जिथे सौंदर्य आहे तिथे आनंदाचा अविरत वाहता झरा आहे... या झऱ्याला ऋतू-नियमांचं बंधन नाही. स्थळ-काळाची आडकाठी नाही. सौंदर्यदृष्टी लाभलेल्यास हा आनंदाचा झरा नजरेस पडतो.भुरळ घालतो. कायमस्वरूपी ठेवा देऊन जातो. असाच मन प्रसन्न करणारा सौंदर्यानंद गवसला कणागी खन्ना या छायाचित्रकार तरुणीस. तोही कुठे तर, सौंदर्यवती स्त्रिया ही ओळख असलेल्या अहमदाबादमधल्या ‘हॉलीवूड’ नामक झोपडपट्टीत...
एरवी गणेशोत्सव, गणपती म्हटलं की, अनेकांच्या अनेकरंगी आठवणी उचंबळून येतात, नवतरुण सृजनशील छायाचित्रकार कणागीला मात्र अहमदाबादची ‘हॉलीवूड’ झोपडपट्टी आणि तिथल्या रूपगर्विता आठवतात... या झोपडपट्टीची गोष्टही तशी भारी आहे. नॅशनल जिओग्राफीसाठी काम करणारी कणागी जेव्हा कधी अहमदाबादला जायची, वडिलांबरोबर मोटरसायकलवर बसून शहरात फेरफटका मारणे हा परिपाठ असायचा. असेच एकदा शहरातून जात असताना एका झोपडपट्टीकडे बोट दाखवूने वडील तिला म्हणाले, ‘तुला माहीत आहे का, याला हॉलीवूड का म्हणतात ते?’ त्यावर तिचा एकच सवाल, ‘सेलिब्रिटी, स्टारडम यापासून कोसो दूर असलेल्या अहमदाबादमधील एका झोपडपट्टीला हॉलीवूड हे नाव पडलेच कसे?’ वडिलांनी मग तिच्या ज्ञानात भर टाकली. ‘गुलबाई टेकरा हे या वस्तीचे मूळ नाव. पण पुढे तिचे ‘हॉलीवूड’ असे नव्याने बारसे झाले. हे सगळे झाले बहुतेक चाळीस वर्षांपूर्वी. या वस्तीतील बायकांचे जे अनागर, पण तरीही मनमोहक सौंदर्य ज्या कोणाला भावले, त्या माणसाला तेथे हॉलीवूड दिसले असावे.’ वडील म्हणाले.
त्या प्रसंगानंतर ही वस्ती कणागीच्या मनात ठाण मांडून बसली. त्यात सृजनाची ओढ स्वस्थ बसू देत नसल्याने हॉलीवूड आणि गुलबाई टेकरा या ठिकाणांची चाचपणी करण्याचा निर्णय तिने घेतला. भौगोलिक, आर्थिक, सांस्कृतिक अंगांपेक्षा छायाचित्रणाच्या दृष्टीने तिने हा परिसर पिंजून काढला. रेकी करून ती परतली, आणि रात्री तीन वाजता अहमदाबादमधले हे देशी हॉलीवूड छायाचित्रांकित कसे करायचे, याचा विचार तिने पक्का केला. हॉलीवूड अभिनेत्रींच्या गाजलेल्या पोज असलेल्या छायाचित्रांचे प्रिंट-आऊट्स काढून, त्यांच्या सोबत गुलबाई टेकरा वस्तीतील एकेक बाईचे छायाचित्र घ्यायचे, ही कल्पना तिने निश्चित केली. थोडक्यात, हॉलीवूडच्या नटीने जशी पोज दिली असेल, तशीच पोज या बायकांना द्यायला सांगायची. म्हणजे, अशा प्रत्येक छायाचित्रातील चौकटीत तिला एक नवे चित्रच निर्माण करायचे होते, म्हणा ना.
पण, प्रत्यक्ष कॅमेरा क्लिक करण्याआधी पहिले तीन दिवस कणागी हाती कॅमेरा न घेता तिथल्या बाया-माणसांशी सूर जुळण्यासाठी फक्त हॉलीवूड वस्ती धुंडाळत राहिली. छोट्या-छोट्या गल्ल्यांची ती झोपडपट्टी. तिची निराळी ओळखच तिला या निमित्ताने आकळली. या भटकंतीत सुंदर बायकांची ही वस्ती गणपतींच्या सुबक मूर्ती बनविण्यासाठीही प्रसिद्ध असल्याचं तिला कळलं. या कामात बायकांचाच वाटा मोठा. त्यातल्या काही कलानिपुण बायका मातीची कलाकुसरीची भांडी आणि शोभेच्या वस्तू बनवितात, हेही तिच्या ध्यानात आलं. छायाचित्रांना खास अहमदाबादी हॉलीवूडचा टच देण्यासाठी आवश्यक घटकांची नोंदही अशा रीतीने या निमित्ताने तिच्या मनात होत राहिली.
हा प्रयोग नक्कीच एखाद-दुसऱ्या फोटोपुरता मर्यादित नव्हता; तर ही होती, एक रंजक गोष्ट सांगणारी छायाचित्रांची मालिका. ती छायांकित कशी करायची आहे, ते वस्तीतील बायकांना समजावून सांगणे, त्यांना विश्वासात घेणे, हेे अवघड काम होते. पण तेही यशस्वीपणे पार पडले. आधी कणागीच्या त्यांच्याबरोबर मनमोकळ्या गप्पा झाल्या. बायका रुळत आहेत, असे लक्षात आल्यावर मग छायाचित्र मालिकेची कल्पना उलगडून सांगितली गेली. तेव्हा एकीनेही नकार दिला नाही. उलट, तुम्ही सगळ्या जणी किती सुंदर आहात, असे कौतुक केल्यावर त्या खुलल्या, कणागीला हसून दाद देत गेल्या. पुढे अपेक्षेप्रमाणे कॅमेरासमोर हवी तशी पोज देताना निवडलेल्या सगळ्यांनी आनंद घेतला.इतर वेळी डोक्यावर पदर घेऊन वावरणाऱ्या या बायका इतक्या मनमोकळ्या झाल्या की, काहींनी उत्साहाने हाताला धरून-धरून कणागीला त्यांच्या मुलाबाळांची छायाचित्रे काढण्याचा आग्रह केला.
अर्थात, सबंध फोटोशूट निर्विघ्नपणे पार पडले, असेही झाले नाही. कारण, या कल्पनेला एका महिलेच्या नवऱ्याने ठाम विरोध केला. ज्युिलया रॉबर्ट्सच्या फोटोग्राफच्या शेजारी आपली बायको तशीच पोज देते आहे, हे बघितल्यावर त्याचे तर पित्त खवळले. कारण त्याची बायको असणार होती, मिनी ड्रेसमध्ये... तो थेट काहीच बोलला नाही, पण त्याने बायकोला मनाई केली. अनोळखी जागी उगाच कुणाबरोबर संघर्ष नको, म्हणून मग ते छायाचित्र गंगा नावाच्या दुसऱ्या बाईला घेऊन काढले गेले. पण या प्रसंगापेक्षाही कणागीच्या स्मरणात राहिली, मातीची सुबक भांडी बनविणारी करुणाबेन. ‘ब्रेकफास्ट अॅट िटफनीज’मधील अॉड्री हेपबर्नची ती प्रसिद्ध छबी. काळ्याभोर पेहेरावातली. ब्लॅकहोल्डरमध्ये असलेली सिगरेट हाती धरून असलेल्या हेपबर्नची पोज घेऊन करुणाबेनची छायाचित्रे काढताना तिच्या झोपडीबाहेर ही तोबा गर्दी जमलेली. त्यामुळे करुणाबेन काहीशी गोंधळलेली. पण सरतेशेवटी तिने असे काही रिझल्ट दिले की, सगळेच थक्क झाले. ड्रयू बॅरिमोरच्या पोजमध्ये एकीला टिपताना भेटलेली सविताबेन कणागीच्या मनाचा ठाव घेऊन गेली. ही एका छोट्या दुकानाची मालकीण. छायाचित्रणादरम्यानची मेहनत पाहून ती कणागीला घेऊन गेली तिच्या घरी. तिथे कोल्ड्रिंक प्यायला दिले. भरपूर गप्पाही मारल्या, सुमारे तासभर.
असे अनेक अनुभव आले, जे जोडत जोडत चित्रमालिका पूर्ण झाली. एका प्रसंगात सागरकिनारी असलेल्या अॅव्हा गार्डनरच्या छायाचित्राच्या पार्श्वभूमीवर, वस्तीतील दुर्गा नावाच्या बाईची कणागी छायाचित्रे काढत होती, तेव्हा तिथे एक बकरा अचानक उपटला. पण त्यालाही तिने छायाचित्रात सामावून घेतले. त्यामुळे छायाचित्रात जिवंतपणा आला. आतापर्यंतचा सगळा उपद्व्याप केवळ विश्वासाच्या बळावर सुरू होता. पण एक कृतज्ञता म्हणून इअररिंग्ज, बांगड्या अशा स्वरूपाची आर्टिफिशियल ज्वेलरीची भेट हॉलीवूडमधल्या बायकांना कणागीने देऊ केली. त्यापैकी जे ज्याला आवडेल, ते ते त्यांनी घ्यावे, असे या सांगताच त्या अशिक्षित बायका कमालीच्या सुखावल्या. त्या वेळी प्रत्येकीला मनपसंत गोष्टी निवडताना पाहणे, हे कणागीसाठी मोठे मनोहारी दृश्य ठरले.
वर्षभरापूर्वी कणागीने चित्रित केलेल्या छायाचित्र मालिकेत आहेत, फक्त १३ छायाचित्रे. ती या महिलांना पुरेशी न्याय देणारी आहेत, असे तिला अजिबातच वाटत नाही. त्यामुळे तिची पुन्हा या देशी हॉलीवूडमध्ये परतण्याची इच्छा आहे. तिला पुन्हा एकदा या बायकांची भरपूर छायाचित्रे काढायची आहेत. तीही मूळ कल्पनेची चौकट कायम राखूनच...
ज्युिलया रॉबर्ट्सच्या फोटोग्राफच्या शेजारी आपली बायको तशीच पोज देते आहे, हे बघितल्यावर त्याचे पित्त खवळले. कारण त्याची बायको असणार होती, मिनी ड्रेसमध्ये... तो मला थेट काहीच बोलला नाही, पण त्याने बायकोला मनाई केली. मलाही कोणाशी संघर्ष नकोच होता. मग मी ते छायाचित्र गंगा नावाच्या दुसऱ्या महिलेला घेऊन काढले.
(संदर्भ- http://thebigindianpicture.com)
divyamarathirasik@gmail.com
पुढील स्लाइड्सवर पाहा, काही खास फटोज... जे पाहून तुम्हीही जाल हॉलीवूड नावाच्या एका झोपडपट्टीत....