आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेगमानव

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जमैकाची राजधानी किंग्स्टन. या किंग्स्टनच्या एका उपनगरात, ट्रेलावनी या भागात तो राहायचा. फुटबॉल आणि क्रिकेट हे त्याचे आवडते खेळ. विल्यम निब हायस्कूलमध्ये शिकत असताना त्याच्या क्रिकेट प्रशिक्षकाच्या लक्षात आले की, या मुलाचा धावण्याचा वेग अचंबित करणारा आहे. त्याने त्याला सल्ला दिला, ‘इथे काय करतोस? अ‍ॅथलेटिक्स ट्रॅकवर जा. जग जिंकशील.’ हे भाकीत करणारा तो प्रशिक्षक सध्या कुठे आहे ते ठाऊक नाही, मात्र ज्या मुलाबद्दल त्याने भाकीत केले होते तो मुलगा युसेन बोल्ट नावाने सध्या जग गाजवतोय.
जमैकाची व्हाइट रम आणि बॉब मालने लोकप्रिय केलेले रेग्गी संगीत जगप्रसिद्ध आहे. या दोन गोष्टींमध्ये आता युसेन बोल्टच्या नावाची भर पडली आहे. जमैकाच्या ‘रम’मध्ये आणि रेग्गी संगीतात जी नशा आहे, तीच झिंग युसेन बोल्टच्या प्रत्येक धावेमध्ये आहे! बोल्टच्या धावेची ती झिंग, ती नशा 2008मध्ये बीजिंगच्या ‘बर्ड्स नेस्ट’मध्ये आणि आता लंडनच्या ऑ लिम्पिक स्टेडियममध्ये मी पुरेपूर अनुभवली आहे. स्टेडियमवर उपस्थित प्रत्येकाच्या हृदयाचे ठोके तो वाढवतोच; पण टेलिव्हिजन पाहणांच्या डोळ्यातून तो हृदयात कधी शिरतो ते कळत नाही. जगातील वेगवान मानव निश्चित करणा या दोन क्षणांचे प्रचंड दडपण बोल्टवर नाही, तर त्याच्या प्रतिस्पर्ध्यांवर आणि प्रेक्षकांवर होते! याचे मुख्य कारण म्हणजे, प्रसिद्धीमाध्यमांनी वाढवलेले दडपण.
याच दडपणातून मार्ग काढायचे तंत्र बोल्टने लहानपणापासून विकसित केले आहे. लहानपणी स्वत: बोल्ट प्रचंड दडपणाखाली ट्रॅकवर यायचा. 2002मध्ये जमैकात स्वत:च्या प्रेक्षकांसमोर ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत तो जेव्हा ट्रॅकवर उतरला, तेव्हा प्रचंड दडपणाखाली वावरत होता. 200 मीटर्स शर्यत होती. तणावाखाली असलेल्या या 15 वर्षीय युवकाने उजव्या पायाचा बूट डाव्या पायात घातला आणि डाव्या पायाचा उजव्या पायात. तरीही त्याने सुवर्णपदक पटकावले. शर्यतीनंतर बहुधा त्याला साक्षात्कार झाला की, जर आपण आपल्या लोकांसमोर, त्यांच्या अपेक्षांचे दडपण घेऊन जिंकू शकतो, तर मग आपण जगात कुठेही जिंकू शकतो! त्या दिवसापासून युसेन बोल्ट कधीही दडपणाखाली धावला नाही. बीजिंग आणि लंडनमध्ये जेव्हा कुणालाही गाठायला कठीण अशी वेळ नोंदवण्याची संधी त्याने हेतुपुरस्सर दवडली, त्यामागे तोच हेतू होता. बोल्ट म्हणत होता, मी शेवटचे 100 किंवा 200 मीटर्स अंतर मागे वळून पाहत धावतो, ते मुद्दामच! प्रत्येक शर्यतीत विक्रम करणे, वेगवान वेग नोंदवणे हा माझा हेतू नसतो. फक्त जिंकणे या एकमेव हेतूने मी शर्यतीत उतरतो. अंतिम रेषेवर पोहोचण्याआधी कोण कुठे आहे ते मान वळवून पाहतो. ती मला लहानपणापासूनच सवय जडली आहे. याचे एकच कारण! मला प्रत्येक वेळी नवी वेगवान वेळ नोंदवायची नसते. तसे केल्यामुळे संपूर्ण जग माझ्याकडून प्रत्येक शर्यतीच्या वेळी ‘रेकॉर्ड ब्रेक’ करण्याची अपेक्षा करेल. त्या अपेक्षांचे दडपण मला माझ्यावर कधीही येऊ द्यायचे नाही. रेकॉर्ड होवो अथवा न होवो, आपोआप झाला तर ठीक आहे, केवळ जिंकणे हेच माझे ध्येय आहे! किंग्स्टनच्या रेसर्स अ‍ॅथलेटिक्स क्लबमध्ये बोल्ट जेव्हा धावायचा, तेव्हा पाब्लो मॅक्निल यांनी त्याला त्याची वेळ कधीही सांगितली नाही. हे पाब्लो मॅक्निल त्याचे प्रारंभीचे प्रशिक्षक. सरावाच्या वेळी ते ‘स्टॉप वॉच’ लपवून ठेवायचे. वेळेचे दडपण त्यांनी बोल्टवर कधीही येऊ दिले नाही. दडपण येऊ न देण्याचा दुसरा मार्ग म्हणजे, खेळकर वृत्ती जी जमैकातल्या किंवा कॅरेबियन बेटांवरच्या प्रत्येकाच्या रक्तात भिनली आहे. उद्याची काळजी न करणा या मनस्वी वृत्तीच्या माणसांचा बोल्ट प्रतिनिधी आहे.
सर्वार्थाने सुसाट धावणा बोल्टवर कुणाचेच नियंत्रण नाही. त्याला त्याची प्रेयसी लुबिकादेखील कह्यात ठेवू शकत नाही! फॅशन डिझायनर लुबिका स्लॅवॅकला तर युसेन बोल्टने लंडन ऑ लिम्पिकच्या आधीपासूनच दूर ठेवले होते. ट्रेनिंगवर लक्ष केंद्रित करता यावे म्हणून तिच्यापासून तो कित्येक महिने दूर राहिला. लंडनला तो पूर्णपणे ‘प्लॅनिंग’ करून आला होता. जगासमोर येणारा बोल्ट वेगळा आणि प्रत्यक्षात कसून सराव करणारा बोल्ट वेगळा होता. जमैकन लोकांचे नाव जगात लोकप्रिय करणा बॉब मार्ले किंवा फुटबॉल विश्वात लोकप्रियतेचा कळस गाठणा डेव्हिड बेकहॅमच्या तोडीची प्रतिमा त्याला निर्माण करायची होती. टायगर वूडदेखील त्याचा आदर्श आहे. टेडिंग्टन हेडिंग या लंडनमधील एका शांत उपनगरात ऑ लिम्पिक आधी येऊन बोल्टने प्रशिक्षणाला सुरुवात केली होती. कुणालाही त्याचा ठावठिकाणा ठाऊक नव्हता, एवढा तो स्थानिक जमैकन लोकांत मिसळून गेला होता. दररोज खडतर सराव करायचा. स्थानिक रेस्टॉरंटमध्ये आवडणा पदार्थांवर यथेच्छ ताव मारायचा. संध्याकाळी कोणत्या तरी थिएटरमध्ये जाऊन सिनेमा पाहत बसायचा, असा त्याचा ‘टेन्शनफ्री’ दिनक्रम असायचा. हाच त्याचा गमतीशीर स्वभाव, नकला करण्याची त्याची सवय केवळ त्याचे स्वत:चेच नाही, तर इतरांचे दडपणही दूर करते. 100 मीटर्स शर्यत जिंकून दोन वेळा वेगवान मानव ठरल्यानंतरही पत्रकारांना टिंगलटवाळी, मस्करी करत सामोरा जाणारा असा विश्वविजेता विरळाच! लंडनमध्ये अंतिम रेषेवर जाताना प्राथमिक फेरीतील एका शर्यतीत जेव्हा त्याच्या लक्षात आले की, मागे उभी असलेली महिला स्वयंसेवक फार अस्वस्थ झाली आहे. धावायला सुरुवात होण्याआधी तो तिच्याजवळ गेला. त्याने विचारले, तू अस्वस्थ का आहेस? त्यावर ती म्हणाली, ‘100 मीटर्सच्या या शर्यतीचे दडपण आल्यामुळे मी अस्वस्थ आहे.’ बोल्टने तिला शांतपणे सांगितले, ‘ही नेहमीप्रमाणेच एक रेस आहे, तू काळजी करू नकोस...’ अंतिम रेषेवर आकाशाकडे बोट दाखवून देवाची प्रार्थना करणारा हा अवलिया शर्यत जिंकल्यानंतर काय करणार याचेही सर्वांना कुतूहल असते. लंडनमध्ये त्याने प्राथमिक फेरी, उपान्त्य फेरी यामध्ये पहिल्या क्रमांकावर येण्याचा प्रयत्नही केला नाही. चाहत्यांचे दडपण आपल्यावर येऊ द्यायचे नाही, हे तत्त्व त्याने अखेरपर्यंत असे जपले आहे.