आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

१२ ऑक्टोबर १८७१ (वीरा राठोड)

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्रिटिशांनी १२ ऑक्टोबर १८७१ला लागू केलेल्या गुन्हेगार जमाती कायद्याने १९८ हून
अधिक जमातींच्या लक्षावधी लोकांचा बळी घेतला. त्यामुळे हा दिवस भटक्या-विमुक्तांसाठी
‘काळा दिवस’ पर्यायाने भारतासाठी, भारतीय लोकशाही आणि संविधानाला मानणाऱ्या, मानवतावादावर विश्वास असणाऱ्या प्रत्येकासाठी.

१२ ऑक्टोबर १८७१ हा दिवस भटक्या विमुक्तांसाठी ‘काळा दिवस’ पर्यायाने भारतासाठी, भारतीय लोकशाही आणि संविधानाला मानणाऱ्या, मानवतावादावर विश्वास असणाऱ्या प्रत्येकासाठी. असे काय घडले होते या दिवशी? भारतीय इतिहासाची स्मरणशक्ती कमी आहे, म्हणून अनेक गोष्टींची आठवण करून द्यावी लागत असते. समाज वर्तमानाला त्या लक्षात न राहिल्याने वा जाणीवपूर्वक न ठेवल्याने सामाजिक न्यायाचे वितरण अजूनही आम्ही अपेक्षित तसे करू शकलो नाही. या पापाचे खापर सर्व शासनकर्ता जमातींवरच फोडावे लागेल.
१२ ऑक्टोबर १८७१ला लागू करण्यात आलेल्या गुन्हेगार जमाती कायद्याने १९८हून अधिक जमातींच्या लक्षावधी लोकांचा बळी घेतला. याच कलंकित इतिहासाला बुधन थिएटरच्या माध्यमातून दक्षिण बजरंगे यांनी ‘बर्थ १८७१’ या डॉक्युमेंट्रीमधून ‘का आम्ही देशातील दुय्यम दर्जाचे नागरिक?’ असा प्रश्न विचारला आहे. विशेष मुक्त झाल्यानंतरही या जमातींमध्ये जन्म घेणे का पाप मानले जाते? या प्रश्नाचे उत्तर केवळ पूर्वग्रहाच्या संशयावरून मारलेले कित्येक निरपराध बुधन सबर, भोगलेल्या फुलनदेवी विचारत आहेत; शिवाय ज्यांनी कधी काळी या देशाच्या वैभवाचे मनोरे उभारले होते तेसुद्धा. जेम्स फिटझेम्स स्टिफन या ब्रिटिश अधिकाऱ्याने माणसांना जन्मजात गुन्हेगार ठरवून गुलाम बनविणारा ‘Criminal Tribes Act 1871’ हा कायदा अस्तित्वात आणला. यापूर्वी चीफ कोर्टाने १८६०मध्ये अशाच प्रकारच्या प्रक्रियेला गैरकायदेशीर ठरवून नाकारले होते, परंतु दुर्दैवाने मद्रास प्रेसिडेन्सीमध्ये १२ ऑक्टोबर १८७१ला हा कायदा लागू करण्यात आला आणि नंतर हळूहळू १८७६पर्यंत संपूर्ण भारतभर लागू करण्यात आला. १८९७, १९११, १९२४ असा त्याचा अधिक जाचक विस्तार होत गेला. स्टिफन याने या कायद्याची रचना करताना असे म्हटले आहे की, “व्यावसायिक पद्धतीने गुन्हेगारी करणाऱ्या अशा जमाती आहेत ज्यांच्या वंशजांनी गुन्हे करण्यासाठी जातीचा वापर केलेला आहे, जे कायद्याच्या विरुद्ध आहे. अशा लोकांचं पुनर्वसन अशक्य आहे. कारण, त्यांचा धर्मच गुन्हा करणे हा आहे.” पहिल्यांदा अशा गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांची यादी करण्यात येऊन, त्यांच्यावर पाळत ठेवण्यात आली. या सर्व जमाती इंग्रजांना कर देत नसत. त्यांचे कायदे पाळत नसत. विशेष करून मीठाच्या व्यापारावरील कर देण्यास नकार दिला. याचा परिणाम कुरुची, कोरवा, लंबाडी(लमाण), येरुकुला यांच्या जगण्यावर झाला. मालवाहतुकीसाठी पुढे इंग्रजांनी रेल्वे, रस्त्यांचे जाळे विणायला सुरुवात केली. यामुळे या व अशा असंख्य जमातींचे व्यवसाय बुडाले. ते देशोधडीला लागले. जगण्यासाठी या जमाती छोट्या-मोठ्या चोरी-गुन्हेगारीकडे वळल्या. इंग्रजांच्या साम्राज्याविरोधात बंड करून उभ्या राहिल्या. इंग्रजांची जंगलात वाटमारी करून लुट करीत, कत्तली केल्या जाऊ लागल्या. १८५७च्या संस्थानिकांच्या उठावाआधीपासून रानावनातल्या या मूळच्या आदिवासी असलेल्या जमातींनी इंग्रजांना भंडावून सोडले होते. या सर्व उपद्व्यापाला त्रासून ब्रिटिशांनी या जमातींना जेरीस आणण्यासाठी एतद्देशीयांना हाताशी घेऊन ‘गुन्हेगार जमाती कायदा १८७१’ व ‘वनकायदा १८७४’ लागू करून या आदिवासी जमातींच्या मुक्त वावरावर बंधने घातली गेली.
१८७१च्या कायद्याचे तीन आधार होते- १) एखाद्या जातीसमूह गटात जन्मलेली व्यक्ती जन्मजात गुन्हेगार बनते, कारण ती आपल्या वडिलांचाच व्यवसाय करते. २) एकदा गुन्हेगार बनलेली व्यक्ती आयुष्यभर गुन्हेगार राहते, कारण तो नियतीने ठरवून दिलेला व्यवसाय आहे व परंपरागत व्यवसाय करणे हा आपला धर्म मानतो. ३) सतत गुन्हेगारी कृत्ये केल्याने अशी व्यक्ती सराईत गुन्हेगार बनते.
अशाप्रकारे त्यांना कठोरात कठोर शिक्षा देण्यासाठी पोलिसांकडून मारझोड होऊ लागली. खोट्यानाट्या गुन्ह्यात अडकवले जाऊ लागले. त्यांच्या शिक्षेत वर्षानुवर्षे वाढच करण्यात आली. त्यांना पाच तारेच्या, तीन तारेच्या सेटलमेंटच्या कुंपणातून बाहेर पडूच दिले गेले नाही. पुनर्वसन आणि सुधारणांच्या नावाखाली जनावरांप्रमाणे राबवून घेतले गेले. नकार दिल्यास हाल हाल करून मारले जाई. लहान मुले, वयस्क म्हातारे, स्त्री-पुरुष सारेच गुन्हेगार ठरवले जात. एवढेच नाही तर गर्भामध्ये वाढत असलेला गोळादेखील गुन्हेगार. स्त्री-पुरुषांच्या अंगात-लिंगात लपून बसलेला जीव धरणारा रेतही गुन्हेगार. या कायद्याने गुन्हेगार जमाती आयुष्यातून उठल्या त्या आजतागायत जीव धरू शकल्या नाहीत. त्यांची प्रचंड निर्भर्त्सना, मानखंडना केली गेली. त्यांचं जगणंच मुळांपासून उपसून भेकण्यात आले. याला जबाबदार कोण?
३१ ऑगस्ट १९५२ला विमुक्त होऊनसुद्धा हा कायदा पोलिस सैनिकी प्रशिक्षणात, समाजमनातून गेली १४६ वर्षे १९८ विमुक्त जमातींना जाचतोय. या वेदनेच्या जवळ जाण्याचा धाडसी प्रयत्न विभावरी शिरुरकर यांनी ‘बळी’च्या माध्यमातून केला, नाहीतर देशभक्तीचे सोंग घेतलेल्यांनी या जमातींना सतत पाण्यातच पाहिले. स्वराज्याचा आणि स्वातंत्र्याचा प्रचंड सोस असणाऱ्या नि आग्रह धरणाऱ्या लोकमान्य टिळकांनीही स्वातंत्र्यासाठी इंग्रजांविरुद्ध लढल्यामुळे गुन्हेगार ठरलेल्या जमातींबद्दल काढलेले उद‌्गार विचार करायला लावण्यासारखे आहेत. ते म्हणतात, “चोरी करणे हा ज्यांचा धंदा आहे, मार खाणेही ज्यांचा धंदाच आहे, अशा लोकांना सैन्याच्या शिस्तीत कसे घेता येईल.” जुलै १९१८मध्ये भारतीय सैन्यात गुन्हेगार जमातींना भरती करून घेण्यास त्यांनी तीव्र विरोध दर्शविला होता. मात्र या उलट शाहू महाराजांनी आपल्या सैन्यात, सुरक्षा रक्षकांत गुन्हेगार जमातींना प्राधान्य दिले होते. किती परस्पर टोकाचा विरोधाभास जाणवतो दृष्टीत. आणि कालपरवा तर स्वत:ला खूप मोठ्या समाजसेविका, कार्यकर्ता मानणाऱ्या व एका राज्याच्या गव्हर्नर असलेल्या किरण बेदींनी केलेली जातीयवादी मानसिकतेची टिप्पणी ही त्यांच्या मनात या सर्व लोकांबद्दल किती विष अजूनही उफाळतंय, याचंच द्योतक म्हणावं लागेल. काहीच कारण नसताना का बरे ट्विट केलं असेल बेदी मॅडमनी? “Ex-Criminal Tribes are knwon to be very cruel. They are hard professional in committing crime’s rarely caught and/or convicted.” प्रश्न पडतो, गेल्या ३५ वर्षांत वरिष्ठ पोलिस अधिकारी असताना या बाईंनी भटक्या-विमुक्तांसोबत कोणत्या प्रकारचा न्याय केला असेल? एखाद्या राज्याच्या गव्हर्नरने देशातल्या निरपराध नागरिकांबद्दल पूर्वग्रहदूषित मानसिकतेतून गरळ ओकणे देशासाठी, लोकशाहीसाठी, संविधानासाठी लाजिरवाणी व अपमानजनक गोष्ट आहे, असेच रक्षकाच्या वेषात भक्षक उभे राहू लागले तर काय होईल देशाचे, देशाच्या एकात्मतेचे? बेदीबाईंसारखा पूर्वग्रह ज्यांच्या ज्यांच्या मनात काळे ढग तयार करतोय, त्यांना मला एक विचारावेसे वाटते, या जमातींवर ही वेळ कशी आली? व कुणी आणली?
आज भटके-विमुक्त ढोर मेहनत करून, स्वत:ला विकून, भडवे म्हणून, हिजडे म्हणून, रस्त्यावर, बारमध्ये नाच करून, खेळ करून, वेश्यावृत्ती करून जगत असतील. त्यांच्यातला माणूस जिवंत आहे म्हणून ते आज स्वत:लाच विकताहेत, पण ज्या दिवशी त्यांच्यातला माणूस मरेल, सहन करण्याची मर्यादा संपेल, त्या दिवशी वेगळाच इतिहास लिहिला जाईल. आज ज्या नीती आदिवासींना नक्षलवादाच्या खाईत लोटत आहेत, कदाचित उद्या पुन्हा एकदा या माजी गुन्हेगारी जमाती नक्षलवादासारख्या वाटेवरून चालू लागल्यास आपणाला अजिबात आश्चर्य वाटू नये. कारण का तर आम्हीच त्यांना त्या वाटेवर नेऊन पोहोचवत आहोत.
बातम्या आणखी आहेत...