आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

क्रांतिकारक पथनाट्य चळवळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कॉ. सफदर हाश्मी हा चार दमड्यांसाठी नाटक करणारा धंदेवाईक कलाकार नव्हता. तो राजकीय बांधिलकी मानणारा ‘कमिटेड आर्टिस्ट’ होता. त्याचा मूळ पिंड सांस्कृतिक कार्यकर्त्याचा असल्याने त्याने बड्या पगाराच्या नोक-यांचा त्याग केला होता. कॉ. सफदरच्या मृत्यूपर्यंत एकूण 24 नाटकांचे 43 हजार प्रयोग झाले. जे लाखो प्रेक्षकांनी पाहिले. या प्रयोगांनी देशभर खळबळ उडवून दिली.

कॉ. हाश्मी यांच्या हत्येनंतर त्यांची पत्नी कॉ. माला हाश्मींच्या नेतृत्वाखाली ‘जन नाट्य मंच’ आजही धैर्याने व जिद्दीने सफदरच्या विचारांचा क्रांतिकारी वारसा चालवत आहे.


अभिव्यक्ति के सारे खतरे उठाने ही होंगे
तोडने ही होंगे, मठ और गढ सब!

गजानन माधव मुक्तिबोधांच्या वरील ओळी उच्चरवात गाणारे व अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या, सामाजिक बांधिलकीच्या नावाने गळा काढणारे आपल्या देशात अनेक लेखक, कलावंत, बुद्धिजीवी आहेत. यापैकी काहींना दोन-चार पुरस्कार देऊन, कला, साहित्य-संस्कृती मंडळावर वर्णी लावून त्यांची सामाजिक जाणीव, विद्रोह थंड करण्याचे व लेखणी बोथट करण्याचे काम सत्ताधारी राज्यकर्ते करत असतात. परंतु वरील मोहांना बळी न पडता व जीवनात स्वीकारलेल्या तत्त्वांशी गद्दारी न करता बांधिलकीशी शेवटपर्यंत एकनिष्ठ राहणारे फार कमी लोक असतात. ‘जन नाट्य मंच’ या संस्थेचे संस्थापक कॉम्रेड सफदर हाश्मी त्यापैकीच एक होते.
1973 मध्ये काही वैचारिक मतभेदांमुळे आपल्या पाच सहका-या ंसह ‘इप्टा’मधून बाहेर पडून हाश्मींनी ‘जन नाट्य मंच’ची स्थापना केली. पुढली चार वर्षे सामाजिक, राजकीय व्यवस्थेवर उपहासात्मक शैलीने प्रहार करणारी भारत भाग्य विधाता, फिर लौट आये, बकरी आदी नाटके त्यांनी सादर केली. 1977 मध्ये आणीबाणी उठल्यानंतर राजकीय चळवळींना उधाण आले होते. 1977-78 मध्ये दिल्लीजवळील लहानमोठ्या गावांतील कामगार, शेतकरी, विद्यार्थी जन नाट्य मंचला मोठ्या प्रमाणात नाटक करण्यास बोलावू लागले. त्यामुळे ज.ना.मं.ने बंदिस्त नाट्यगृह सोडून खुल्या रंगमंचावर प्रयोग सुरू केले. परंतु पारंपरिक रंगभूमीच्या मर्यादा जाणवल्यामुळे कॉ. सफदरने ‘सडक नाटक’ (स्ट्रीट प्ले) करण्याचा निर्णय घेतला. प्रेक्षकांनी केवळ बघ्याची भूमिका न घेता त्यांनाही नाटकात सामावून घेतले जावे आणि प्रेक्षकांशी सरळ संवाद व्हावा, या हेतूने 15 आॅक्टोबर 1987 पासून सडक नाटकास प्रारंभ केला.
आणीबाणी उठल्यानंतर देशभर कामगार, कर्मचा-यांच्या संपांची लाट उसळली होती. त्याचाच एक भाग म्हणून दिल्लीजवळील गाझियाबादमधील एका कारखान्यातील कामगार संपावर गेले असता, त्यांच्यावर शासनाने गोळीबार केला. त्यात सहा कामगार शहीद झाले. तेव्हा त्या गाजलेल्या प्रकरणावर व कामगारांच्या समस्येवर कॉ. सफदरने ‘मशीन’ हे पहिले सडक नाटक जन नाट्य मंचतर्फे सादर केले. हे नाटक घाट (फॉर्म) व कलात्मकदृष्ट्या खूप वरच्या स्तरावर असल्यामुळे फार लोकप्रिय झाले. हे नाटक भारतातील सहा-सात भाषांत अनुवादित झाले. त्यांचे बांगलादेश, पाकिस्तान, नेपाळ, श्रीलंका आदी देशांतील नाट्यसंस्थांनीही प्रयोग केले. या सडक नाट्यानंतर स्त्रियांच्या समस्येवरील ‘औरत’, ग्रामीण मजुरांवरील ‘गांव से शहर तक’, शैक्षणिक व बेरोजगारांवरील ‘राजा का बजा बाजा’, जातीय दंग्याविरोधी ‘हत्या अपहरण भाईचारे का’, खलिस्तान समस्येवरील ‘वीर जाग जरा’, जागतिक शांततेवरील ‘जंग के खतरे’, महागाईवरील ‘समर्थ को नहीं दोष घुसाई’, कामगारांच्या लोकशाही हक्कांवर गदा आणणा-या औद्योगिक विधेयकाविरोधी ‘काला कानून’ हे नाटक, अशी सामाजिक-राजकीय पार्श्वभूमीवरील नाटके त्यांनी सादर केली. ‘काला कानून’ हे नाटक 1988 मध्ये दिल्ली येथील बोट क्लबवर आलेल्या दीड लाख कामगारांनी पाहिले. यापैकी ‘औरत’ व ‘समर्थ को नहीं दोष घुसाई’ सडक नाट्याचे प्रयोग केवळ दिल्लीत नव्हे तर जम्मू, काश्मीर, हरियाणा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, पश्चिम बंगाल, गुजरात, कर्नाटक व महाराष्ट्रातही झाले. कॉ. सफदरच्या मृत्यूपर्यंत एकूण 24 नाटकांचे 43 हजार प्रयोग झाले, जे लाखो प्रेक्षकांनी पाहिले. या सर्व नाटकांनी देशभर खळबळ उडवून दिली होती. हिंदी भाषिक राज्यांत सडक नाट्य चळवळीचे लोण पसरण्यात हाश्मी यांच्या जन नाट्य मंचचा सिंहाचा वाटा होता. परिणामी ही सडक नाट्ये सादर करतेवेळी सत्ताधा-यांनी व हितसंबंधी लोकांनी अडथळे आणले, प्रसंगी कलावंतांना मारहाण व अटकही केली. परंतु ज.ना.मं.च्या कलावंतांनी सामान्य माणसाची असलेली बांधिलकी शेवटपर्यंत सोडली नाही. 1 जानेवारी 1989 रोजी साहेबाबाद येथे हाश्मींवर खुनी हल्ला झाला. परंतु या हल्लेखोरांना जन नाट्य मंच व कॉ. सफदर हाश्मींच्या ख-या व्यक्तिमत्त्वाची ओळखच नव्हती. सफदर हा चार दमड्यांसाठी नाटक करणारा धंदेवाईक कलाकार नव्हता. तो राजकीय बांधिलकी मानणारा ‘कमिटेड आर्टिस्ट’ होता. त्याचा मूळ पिंड सांस्कृतिक कार्यकर्त्याचा असल्याने त्याने बड्या पगाराच्या नोक-या ंचा त्याग केला होता. 1976 मध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा सदस्य होऊन कॉ. शाहीर अमरशेख,
कॉ. अण्णाभाऊ साठे, कॉ. बलराज सहानी, कॉ. उत्पल दत्त, कॉ. ए. के. हंगल या कलावंतांचा राजकीय, सांस्कृतिक वारसा पुढे चालवत होता. सफदरने कलेशी संबंधित जवळपास सर्व माध्यमांना स्पर्श केला होता. त्याने लहान मुलांसाठी अनेक बालगीते व बालनाट्येही लिहिली. तो सृजनशील कवी व गीतकार होता. ‘पढना लिखना सीखो, ओ मेहनत करने वालो। पढना लिखना सीखो, ओ भूख से मरने वालो!’ हे गाणे त्या काळात खूप लोकप्रिय झाले. त्याचा मराठी अनुवादही डॉ. माया पंडित यांनी केला आहे. सफदरची ‘किताबे कुछ कहना चाहती हैं, तुम्हारे पास रहना चाहती हैं’ ही कविताही खूप गाजली. सफदरला बंगाली, उर्दू, पंजाबी, संस्कृत, इंग्रजी व हिंदी भाषा चांगल्या अवगत होत्या. तो ‘इकॉनॉमिक टाइम्स’ व अन्य मासिकांत रंगभूमी व सांस्कृतिक विषयांवर नियमित स्तंभलेखनही करायचा. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर दिल्लीत शिखांचे जे हत्याकांड व 1986 मध्ये ज्या सांप्रदायिक दंगली झाल्या त्या दंगली व हत्याकांडास विरोध करण्यात कॉ. सफदर व ज.ना.मं. आघाडीवर होते. 1988 मध्ये जन नाट्य मंचला राष्ट्रीय एकता व सांप्रदायिक सद्भाव पुरस्कार घोषित झाला. परंतु 1984 च्या शीख हत्याकांडात दोषी असलेल्यांच्या हस्ते तो स्वीकारायचा नाही, या भूमिकेतून कॉ. सफदर व ज.ना.मं.ने त्या पुरस्कारावर बहिष्कार टाकला व पीडित जनतेशी बांधिलकी ठेवली.
1 जानेवारी 1989 रोजीच्या साहेबाबादमधील सफदरवरील हल्ल्याच्या व 2 जानेवारीच्या त्याच्या निधनाच्या वृत्ताने संपूर्ण देशभरातील नाट्य, साहित्य, विद्यार्थी, कामगार, पत्रकार व बुद्धिवंतांमध्ये संतापाची लाट उसळली. अमेरिकेतील ‘टाइम’ पासून देशभरातील वृत्तपत्रांनी या खुनी हल्ल्याचा निषेध केला. ज.ना.मं.च्या कलावंतांनी कॉ. सफदरच्या हत्येचा निषेध आगळ्या पद्धतीने म्हणजे ज्या चौकात सफदरवर हल्ला झाला होता, त्याच चौकात हजारो कामगार, कष्टकरी व बुद्धिवंतांच्या उपस्थितीत बंद पाडलेल्या ‘हल्ला बोल’ नाटकाचा तोच प्रयोग अवघ्या तीन दिवसांत 4 जानेवारीला सादर केला. ज्यात कॉ. सफदरची पत्नी माला हिने आपल्या भावना व दु:खाचा आक्रोश आतल्या आत दाबून नाटकातील भूमिका धैर्याने व जिद्दीने साकार केली आणि भेकड हल्लेखोरांना कृतीनेच सांगितले की, ‘नाटक जारी रहेगा।’ कॉ. माला हाश्मींच्या नेतृत्वाखाली ‘जन नाट्य मंच’ आजही सफदर हाश्मीच्या विचारांचा क्रांतिकारी वारसा चालवत आहे...