आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वैश्विक नाट्यभान देणारी कर्नाड शैली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काळाच्या कसोटीवर लेखन उतरवणे हे नाटककाराच्या सर्जनशीलतेचे लक्षण असते, जे कर्नाड यांच्या नाटकांमध्ये दिसते. ‘तुघलक’, ‘हयवदन’सारखी नाटके कितीही जुनी असली तरी ती आजच्या काळाशीदेखील सुसंगत वाटतात, हे कर्नाड यांच्या प्रादेशिकतेकडून वैश्विकतेकडे झेप घेणा-या नाटकांचे मोठे यश आहे. म्हणूनच भारतीय नाटककारांच्या सामर्थ्याचे दर्शन घडवायचे असेल तर कर्नाड यांना पर्याय नाही. त्यांना वगळणे म्हणजे, भारतीय रंगभूमीचा फार मोठा भाग वगळणे आहे...

भारतीय रंगभूमीने आजपर्यंत वेगवेगळी स्थित्यंतरे अनुभवली आहेत. विशेषत: साठ ते सत्तरच्या दशकामध्ये आद्य रंगाचार्य, बादल सरकार, उत्पल दत्त, चंद्रशेखर कंबाल, मोहन राकेश आणि गिरीश कर्नाड या त्या काळातील लेखक-दिग्दर्शकांनी वेगवेगळे नाट्यप्रवाह रुजवले. 1970मध्ये सत्यदेव दुबे व अमोल पालेकरांनी बादल सरकारांचे ‘वल्लभपूरची दंतकथा’ हे नाटक आणले आणि मराठी रंगभूमीचे इतर भाषांमध्ये आदानप्रदान व्हायला लागले. त्यानंतर 1968मध्ये विजय तेंडुलकरांनी ‘शांतता कोर्ट चालू आहे’ हे नाटक आणले ज्याचे हिंदीमध्येदेखील भाषांतर केले गेले. या नाटकास पहिला कमलादेवी चट्टोपाध्याय पुरस्कार मिळाला आणि या आदानप्रदानास एक विशिष्ट प्रकारचे महत्त्व यायला लागले. याच नाटकाची पुढे 14 भाषांमध्ये भाषांतरे करण्यात आली. त्यामुळे नाटकाला विविध भाषांमध्ये प्रादेशिकतेच्या पलीकडे समृद्धता येऊ लागली.

अशी देवाणघेवाण नाट्यक्षेत्रांत चालू असताना गिरीश कर्नाड यांच्या नाटकांनी रंगभूमीला एक नवा आयाम दिला. 1961मध्ये रंगभूमीवर आलेल्या ‘ययाति’ या त्यांच्या नाटकाने भारतीय रंगभूमीला एक खास अशी शैली बहाल केली. त्यानंतर 1964मध्ये त्यांचे ‘तुघलक’ हे नाटक आले. तसेच पुढे 1971मध्ये ‘हयवदन’, 1977मध्ये ‘अंजुमल्लिगे’, 1988मध्ये ‘नागमंडल’ अशी नाटके कर्नाड यांनी रंगभूमीवर आणली. त्यात ‘अग्निवर्षा’ या अलीकडच्या काळात आलेल्या नाटकाने भर घातली. ‘उणे पुरे शहर एक’ हे अगदी आताचे नवीन नाटक म्हणावे लागेल.

साठ-सत्तरच्या दशकातील कर्नाड यांची ही नाटके पाहता रंगभूमीची इतर भाषांमध्ये देवाणघेवाण होण्याबरोबरच नाटकाची तत्कालीन परिभाषा बदलण्यामध्येदेखील ही नाटके महत्त्वाची ठरतात, असे मला वाटते. त्यातल्या त्यात ययाति, हयवदन, तुघलक, नागमंडल, अग्निवर्षा, उणे पुरे शहर एक या नाटकांची मराठीत भाषांतरे व प्रयोगही झालेले आहेत. नाटककार कितीही चांगला असला तरी त्यास चांगला दिग्दर्शक, चांगले नट, चांगली नाट्यसंस्था आवश्यक असते. तरच त्या नाटकाची रंगभूमीवरील अभिव्यक्ती दर्जेदार होऊ शकते. गिरीश कर्नाड यांना सुदैवाने अशा चांगल्या नाट्यसंस्था व तितकेच चांगले कलाकार लाभत गेले. सत्यदेव दुबे, अमोल पालेकर, विजया मेहता, भास्कर चंदावरकर, अमरिश पुरी, नसिरुद्दीन शाह, अरुण शर्मा, ओम पुरी, अरविंद देशपांडे यांनी मराठीतले नाटक दुस-या भाषेत नेले, तर कन्नड व इतर भाषांमधली नाटके आपल्याकडे आणली. त्यातली सर्वाधिक भाषांतरे ही मराठी रंगभूमीवर कर्नाडांच्या नाटकांची झाली आहेत. त्यातील ‘तुघलक’ व ‘हयवदन’ ही आजदेखील अत्यंत महत्त्वाची नाटके आहेत. या नाटकांचे तसेच ‘नागमंडल’सारख्या नाटकांचे प्रयोग पाहिल्यानंतर कर्नाडांच्या नाट्यविषयक कल्पना लोकपुराणकथा, लोककथा यांवरती आधारित आहेत, असे सहजपणे लक्षात येते. पुराण, फॅँटसी, इतिहास यांवर आधारित लेखन करण्याची कर्नाड यांची पद्धत आहे. किंबहुना लोककथा व पुराणातून समकालीन संदर्भ शोधणे हा कर्नाडांचा लेखनस्वभाव आहे.

पण केवळ पुराणातल्या कथा वा लोककथा जशाच्या तशा उचलणे हा कर्नाड यांचा स्वभाव नाही. अशा कथांचे समकालाशी नाते जोडणे, त्यांचे स्वतंत्र अर्थ लावणे, कर्नाड यांना जमले. त्यामुळेच त्यांचे एकासारखे दुसरे नाटक नाही. एकाच छापाची नाटके नाहीत. ‘हयवदन’मध्ये अर्धा घोडा व अर्धा पुरुष असे प्रतीक त्यांनी वापरले होते (स्त्रीला एकाच वेळी बुद्धिमान आणि बलवान पुरुष हवा असतो, अशी संकल्पना असलेल्या या लोककथेत त्यांनी असा घोडा प्रतीक म्हणून वापरण्यात आला होता.) ‘नागमंडल’मध्येही मूळ कथेत त्यांनी कथेशी व कथेच्या आशयाशी सुसंगत असे बदल केले होते. हे बदल त्यांच्या लोककथांना, पुराणकथांना एका वेगळ्याच पातळीवर पाहण्याच्या दृष्टिकोनाचे दर्शक ठरले. ही नाटके कन्नड रंगभूमीपुरतीच मर्यादित राहिली नाहीत. हिंदी व मराठीतही ‘हयवदन’चा अतिशय उत्तम असा प्रयोग झाला. अमरिश पुरी, सुनिला प्रधान, अमोल पालेकरांनी त्यात काम केले. विजया मेहतांनी याच नाटकाचा प्रयोग मराठीमध्ये एनसीपीएसाठी केला. पुढे त्यांनी ‘नागमंडल’देखील केले. गिरीश कर्नाडांना उत्तम मराठी येते. त्यांची अभिनेता, दिग्दर्शक म्हणूनही भारतीय स्तरावरती उत्तुंग प्रतिमा आहे. हयवदन, तुघलक जेव्हा राष्ट्रीय स्तरावर गेले, त्या वेळी त्यांना अर्थातच मान्यता मिळाली आणि प्रादेशिक नाटकाने प्रादेशिकतेच्या पलीकडे रंगभूमीला नेऊन ठेवले. कर्नाटकात ज्ञानपीठ मिळवणारे अनेक दिग्गज आहेत, त्यात कर्नाड महत्त्वाचे मानले जातात. केवळ नाटककार म्हणून त्यांना ज्ञानपीठ मिळणे, ही भारतीय रंगभूमीसाठी अत्यंत सन्मानाची व महत्त्वाची बाब आहे.

त्यांचे बरेच शिक्षण इंग्लंडमध्ये झाले आहे. इंग्रजी अभ्यासाचा विषय असल्याने त्यांची इंग्रजीवरील पकडदेखील उत्तम आहे. युरोपीय आणि प्रादेशिक नाटकांच्या त्यांनी केलेल्या अभ्यासाचे प्रतिबिंब त्यांच्या नाटकांच्या आकृतीबंधात दिसते. नाटकातील अभिजातता, नाटकाची धाटणी यातले नावीन्य त्यांच्या नाटकात असल्याने त्यांचे वेगळेपण टिकून आहे. नुकताच त्यांच्या प्रदीप वैद्य यांनी मराठीत अनुवादित केलेल्या ‘उणे पुरे शहर एक’चा पुण्यात झालेला पहिला प्रयोग पाहिल्यानंतर ‘कानडीत हा प्रयोग होईल, पण मराठीत झाला तो अधिक चांगला झाला.’असे कर्नाड माझ्याशी बोलताना म्हणाले होते. ‘उणे पुरे शहर’ या नाटकाला मात्र पौराणिक कथांचा वा लोककथांचा संदर्भ नाही. अत्यंत आधुनिक धाटणीचे हे नाटक आहे. ग्रामीण आणि शहरी मानसिकतेचा तो संघर्ष आहे. नाटककारावर लेखनाच्या विषयाचा अंकुश नसतो. या नवीन नाटकात दृश्यरचना आहे, ती नेहमीच्या पद्धतीने जाणारी नाही. शहराची प्रवृत्ती कशी बदलत गेली, गावातला माणूस शहरात कसा आला, याचे चित्रण या नाटकात आहे. नायक-नायिका असे नेहमीचे कथानक त्याला नाही. या वेळी त्यांनी हा वेगळा प्रयोग म्हणूनही नाटक लिहिले असावे. सर्जनशील नाटककाराला अमुक एकच विषय का घेतला, असे विचारून चालत नाही. कर्नाड हे स्वत:ची स्वतंत्र भूमिका असणारे लेखक आहेत. ज्याला मागणी आहे, तेच लिहिणा-या तले कर्नाड नाहीत!

काळाच्या कसोटीवर लेखन उतरवणे हे नाटककाराच्या सर्जनशीलतेचे लक्षण असते, जे कर्नाड यांच्या नाटकांमध्ये दिसते. ‘तुघलक’, ‘हयवदन’सारखी नाटके कितीही जुनी असली तरी ती आजच्या काळाशीदेखील सुसंगत वाटतात, हे कर्नाड यांच्या प्रादेशिकतेकडून वैश्विकतेकडे झेप घेणा-या नाटकांचे मोठे यश आहे.
कर्नाडांच्या नाटकांची भाषांतरे इंग्रजीतही झाली आहेत. त्यांनी स्वत: इंग्रजीत नाटके लिहिली आहेत. त्यामुळे जागतिक स्तरावर त्यांच्यासारखे फार कमी लक्षवेधी नाटककार आहेत. म्हणूनच भारतीय नाटककारांच्या सामर्थ्याचे दर्शन घडवायचे असेल तर कर्नाड यांना पर्याय नाही. त्यांना वगळणे म्हणजे, भारतीय रंगभूमीचा फार मोठा भाग वगळणे आहे.

शब्दांकन - प्रियांका डहाळे