आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वो सुबह कभी तो आएगी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुजुर्ग नट शशी कपूर यांनी सुरू केलेल्या ‘पृथ्वी थिएटर’ने एरवी अंग चोरून वावरणा-या भारतातील सर्वभाषक रंगकर्मींना आत्मविश्वास दिला. याचमुळे कदाचित ही एक जडत्वप्राप्त संस्था न राहता, प्रवाही अशी सर्वव्यापी चळवळ बनली...

भारतीय भाषांतील नाट्यकलेस लोकाश्रय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावलेल्या ‘पृथ्वी’ची समृद्ध परंपरा आता ‘जुनून’ संस्थेच्या माध्यमातून समर्थपणे सांभाळली जात आहे. जागतिक रंगभूमी दिनानिमित्त संस्थेच्या सर्वेसर्वा संजना कपूर यांचे हे नाट्यविषयक चिंतन...

भारताला हजारो वर्षांपासूनची परंपरा असली आणि कित्येक कला अस्तित्वात असल्या तरी, दूरदृष्टीचा अभाव असल्याने कला उभारणीत जागतिक रंगभूमीच्या तुलनेत आपण मागे पडतो. भारतीय संस्कृती तर अनेकविध कलाप्रकारांनी समृद्ध आहे. रंगभूमीवर तर अवघे मानवी शरीर बोलके होते. भारतीय रंगभूमीवर हसणे, रडणे, वास घेणे, ऐकणे, स्पर्श अशा सर्वच अनुभूतींचा मुक्त वावर असतो, परंतु तरीही इतर देशांच्या तुलनेत भारतीय रंगभूमी अजूनही लहान आहे. जागतिक रंगभूमीच्या परिघात भारतीय रंगभूमीची अवस्था एका अर्भकासारखी आहे, असेही म्हणता येईल. कला जगवण्यासाठी लागणारी मुत्सद्देगिरी, त्यासाठी आवश्यक असलेले बदल आत्मसात करण्यात आपण कुठेतरी कमी पडत आहोत. उदाहरणच सांगायचे, तर 150 वर्षांपूर्वी लंडनच्या जमिनीखालील थिएटरची बांधणी होत होती तेव्हा कला आणि कलावंतांच्या गरजेच्या सर्व सोयीसुविधांचा विचार केला गेला. कलेचे ते साम्राज्य इंटिरिअरची चूक म्हणून पाहून चालणार नाही, तर कला ही मुख्य शहराच्या समाजांवर कसा परिणाम करते, हे तिथे उमजते.

भारताच्या प्रत्येक लहान भागात विविध कला सादर केल्या जातात. कोणत्याही प्रकारची मूलभूत सोय नसताना त्या त्या लोकांनी आपापल्या कला जिवंत ठेवल्या आहेत. मूलभूत सोयी म्हणजे केवळ नाट्यगृह म्हणून उभारलेल्या इमारती नाहीत. आपल्याकडे आधी इमारत उभी केली जाते आणि नंतर त्यात चळवळ उभी करण्याचा प्रयत्न होतो. नाट्यचळवळीला लागणा-या महत्त्वाच्या वातावरणाची मात्र येथे दखलच घेतली जात नाही. आपल्याकडे आज असे एकही केंद्र नाही, जिथे कलेचा मनसोक्त आनंद घेतला जाईल. अशा वेळी असे एखादे केंद्र असावे, जेथे कलाकारांना ट्रेनिंग देण्याच्या सोयी, जाहिरातीसाठी सुसज्ज यंत्रणा, सुरक्षिततेची हमी, अशा सगळ्या गोष्टी त्यात ग्राह्य धरल्या जाव्यात, अशी अपेक्षा आहे. किंबहुना कलाकार, प्रेक्षक, शासन, संस्था अशा सगळ्यांनी एकत्रितपणे अशी एखादी चळवळ उभारायला पाहिजे, जिथे कला आपली जागा शोधेल आणि त्याद्वारे आपले आयुष्य अधिक सुकर करेल. पण कधी महागाई, परवान्यांचा गोंधळ, आड येणारी शासन व्यवस्था, प्रवासात येणा-या अडचणी, अशा बाह्य गैरसोयींपुढे भारतातील रंगभूमी जगण्यासाठी धडपड करताना दिसत आहे. ज्या दिवशी भारतीय रंगभूमी आशय, दर्जा आणि लोकांपर्यंत पोहोचण्याची ताकद या जोरावर ख-या अर्थाने बहरेल, त्या दिवसाचे स्वप्न मी नेहमी पाहत आहे.

वडील शशी कपूर यांनी सुरू केलेल्या ‘पृथ्वी थिएटर’मध्ये मी 1991 मध्ये कामाला सुरुवात केली. वेगवेगळ्या पातळीवर डिझाइन केलेले कार्यक्रम, वर्कशॉप्स, नाटके यांच्या आधारे पृथ्वी थिएटरच्या कलात्मक वातावरणाला अधिक पोषक करण्याचा प्रयत्न केला. ‘पृथ्वी थिएटर’मध्ये मी 22 वर्षे केलेल्या कामाची पुढील पायरी म्हणून ‘जुनून’कडे मी पाहते. पृथ्वीमधून ‘जुनून’ ही संस्था स्थापन करताना मी आणि माझी सहकारी समीरा अय्यंगारनेही अधिकाधिक कार्यक्रम करण्याचे आणि अधिकाधिक कलांना प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचे ठरवले आहे. ‘शुद्ध हवा, स्वच्छ पाणी, चांगले रस्ते, शाळा, दवाखाने हे एखाद्या समाजाच्या सुदृढतेचे लक्षण असेल, तर कला ही या समाजाचा अविभाज्य घटक आहे.’ हे ‘जुनून’चे ध्येय आहे. ‘जुनून’ स्वत: कोणत्याही नाटकाची निर्मिती करत नाही, पण भारतातील उत्तमोत्तम कलेला जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करते. सादर केल्या जाणा-या प्रत्येक कलेसाठी देशभरातील शहरांत व्यासपीठ उपलब्ध करून देणे, हे मुख्य काम आम्ही जुनूनमध्ये करणार आहोत. आमचे 50 टक्के कार्यक्रम लहान मुलांना अग्रस्थानी ठेवून तयार करण्यात आले आहेत. त्यामुळेच पृथ्वी थिएटरमध्ये 21 वर्षांपासून सुटीच्या काळात राबवत असलेला लहान मुलांसाठीचा कार्यक्रम आता आम्ही ‘जुनून’च्या बॅनरखाली पुढे नेणार आहोत. कळसूत्री बाहुल्या, सर्कस अशा लहान मुलांसाठी खास तयार केल्या गेलेल्या सादरीकरणाच्या कला आपल्याकडे खूप आहेत. मात्र रशिया या बाबतीत सगळ्यात आघाडीवर आहे. रशियातील ‘ग्रीप्स थिएटर’ने पे्ररित झालेल्या अनेक हिंदी आणि मराठी कलाकारांनी ती संस्कृती इथे रुजवण्याचा स्तुत्य प्रयोग केला. मर्यादित जागा आणि आम्ही देत असलेल्या समृद्ध अनुभवामुळे पालक आपल्या मुलांना वर्कशॉप्ससाठी आग्रहाने पाठवू लागले आहेत.

लहानपणी वडील मला सर्कस बघायला घेऊन जायचे. लहान मुलांप्रमाणेच मोठ्यांनाही लळा लावणारी सर्कस आता जगण्यासाठी धडपडते आहे, हे वास्तव मनाला चटका लावत होते. सर्कसमध्ये मानवी शरीराची लवचीकता, भन्नाट विचारांना प्रत्यक्षात आणणारे स्किट्स यांनाच सुपरपावर्स म्हणायला हवे. यांमुळे आपल्या हृदयाची धडधड जाणवते, घाबरवते, हसवते आणि आपल्यातल्या लहान मुलाची जाणीव करून देते. गेली अनेक वर्षे या सर्कससाठी काहीतरी करण्याची आस मनात होती. ‘जुनून’मुळे मला ‘रॅम्बो सर्कस’ला ‘इनडोअर सर्कस’म्हणून रंगभूमीवर आणता आले. भारतात भरवलेल्या इंटरनॅशनल सर्कस फेस्टिव्हलचा तो एक भाग होता. यातून सर्कसला तिची खरी किंमत आणि योग्यता मिळाली.
प्रायोगिक रंगभूमीमध्येच कलाकार ‘रिस्क’ घेण्याची हिंमत दाखवतात आणि प्रेक्षकही त्यांचा हा प्रयोग पाहायच्या उत्सुकतेनेच येतात. दु:खाची गोष्ट म्हणजे भारतात अशा प्रकारच्या मुक्तपणे धाडस करण्याला तितकासा वाव मिळत नाही आणि जागाही मिळत नाही.

‘छबिलदास’ येथे फुललेली प्रायोगिक रंगभूमी उत्तम काम करत होती. पृथ्वी थिएटरलाही असेच मुक्त वातावरण देण्याचा आमचा प्रयत्न होता. पृथ्वीमध्येही आणि आता जुनूनमध्ये आम्ही विविध भाषांच्या कलांना समाविष्ट करतो. मात्र आमचे अधिकाधिक काम हिंदी आणि इंग्रजीत असते; पण या दोन भाषांनाच केवळ प्राधान्य देण्याचे आमच्या मनात नाही. पृथ्वी थिएटरमध्ये असताना मी मराठी रंगभूमीसाठी एक फेस्टिव्हल आखला होता. त्यासाठी महिन्यातले काही ठरावीक दिवस केवळ मराठी रंगभूमीसाठी ठेवले होते, मात्र तो अपेक्षेपेक्षा फारच अपयशी ठरला. मराठी रंगभूमी स्वत:च अडचणीत सापडली आहे, तिच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे, असे मला प्रकर्षाने वाटते. असे असले तरी पृथ्वी थिएटरमध्ये माझ्या फेस्टिव्हलला मच्छिंद्र कांबळी यांनी सादर केलेले ‘वस्त्रहरण’ माझ्या कायम लक्षात राहील!

भारताची संस्कृती 5000 वर्षे जुनी असली तरी कला त्यापेक्षा जुनी आहे. शास्त्रीय कला, लोककला, रंगभूमी अशा सगळ्या पातळीवर आपण जगाच्या नकाशात मात्र मागे आहोत, याबद्दल आता येणा-या नव्या पिढीने विचार करायला हवा. नवी पिढी नव्या संवेदना आणि नवे प्रयोग घेऊन या क्षेत्रात उतरत आहे, त्यामुळे येणारा काळ भारताने जागतिक रंगभूमी दिनाच्या सोहळ्यात सहभागी होण्याचा असेल, हीच अपेक्षा.
शब्दांकन : नम्रता भिंगार्डे