आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Rasik, Worlds Theater Days, Articles Of Kishor Kadam

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अलौकिक दुबे थिएटर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पं. सत्यदेव दुबे ही केवळ एक व्यक्ती नव्हती, तर नाट्यजाणिवा समृद्ध करणारी अलौकिक अशी संस्था होती. व्यावसायिक, प्रादेशिक, भाषिक आदी प्रकारच्या रंगभूमीपेक्षाही या संस्थेचे स्वतंत्र अस्तित्व होते. किंबहुना अस्तित्वात असलेल्या प्रवाहांना पुरून उरणारा ‘दुबे प्रवाह’ हिंदी रंगभूमीवर आणण्याची विलक्षण ताकद त्या संस्थेत होती... सांगत आहेत, पं. दुबेंकडे तब्बल 15 वर्षे नाट्यशिक्षण घेतलेले प्रतिभावंत
नट किशोर कदम ऊर्फ कवी सौमित्र...


एका नटाने एका वेळी एकाच नाटकावर एकाग्र होणे आणि पैशांची अपेक्षा न करणे, या दुबेंनी घातलेल्या दोन अटी. त्यांच्याकडे काम करताना शिकणे आणि अभिनेता म्हणून घडणे, याला प्राधान्य दिले जात होते...

गुरू-शिष्य परंपरेत नाटक शिकण्यासाठी संयम लागतो. तो कधी आपणच बाळगलेला असतो. म्हणूनच गुरूंच्या मार्गदर्शनाखाली आपण शिकत जातो. सत्यदेव दुबेंची नाटके मी पाहिली होती. त्यांच्या नाटकांशी मी मला स्वत:ला रिलेट करू शकत होतो. कठोर परिश्रमपूर्वक अभिनयाद्वारे पात्रांमध्ये आलेली सहजता हे गुरुजींच्या नाटकाचे वैशिष्ट्य होते. त्यांच्या नाटकाच्या आशयाचा गाभा हा नेहमीच प्रादेशिकतेतून वैश्विकतेकडे, वैश्विकतेतून प्रादेशिकतेकडे असा प्रवास करणारा असे. याच दृष्टिकोनातून त्यांनी हिंदी थिएटरला आधुनिकतेकडे नेले होते. जागतिक थिएटरची उंची त्यांनी हिंदी नाटकाला मिळवून दिली होती. ‘ययाती’सारख्या गिरीश कर्नाडांच्या नाटकाच्या निर्मितीपासून त्यांनी केलेली सुरुवात थिएटरला एक वेगळा चेहरा देणारी होती. त्यानंतर त्यांनी आपल्याकडील रंगभूमीला एका साचेबद्ध चौकटीतून बाहेर काढत, एका वेगळ्याच वळणावर नेले होते. पगला घोडा, खामोश थिएटर जारी हैं, और तोता बोला यांसारख्या नाटकांतून त्यांनी हिंदी थिएटरला नवे भान दिले होते.

त्या वेळी माझे कॉलेज नुकतेच संपायला आलेले होते आणि मी अभिनेता व्हायचे जवळपास पक्के केले होते. माझ्यातले गुण ओळखणा-या , मला मराठी शिकवणा-या मॅडमनी एक दिवस मला गुरुजींकडे नेले आणि त्यांच्या अ‍ॅक्टिंग स्कूलमध्ये मी दाखल झालो.
गुरुजींना कलाकारातले गुण, उणिवा सहज ओळखता यायच्या. त्यांच्यातील उणिवांनाही सकारात्मकतेने कसे उपयोगात आणता येईल, यावर त्यांचा भर असे. उणिवा आहेत म्हणून एखाद्या कलाकाराला नकारात्मक पद्धतीने वागवणे त्यांना कधीच जमले नाही. माझेच उदाहरण सांगायचे झाल्यास, माझ्यातल्या इन्फिरिआॅरिटी कॉम्प्लेक्सला त्यांनी सुरुवातीलाच ओळखले होते. पण त्याचा बाऊ न करता त्याचा वापर नाटकासाठी कसा करून घ्यायचा, हे फक्त त्यांनाच जमू शकले.
कुठल्याही नाटकात काम करताना वा त्यासाठी शिकताना आपण ज्यांच्याकडे शिकतो आहोत, त्यांच्या काही प्राथमिक अपेक्षा आपल्या शिष्यांकडून असतात. गुरुजींच्यादेखील कलाकाराकडून अशा काही अपेक्षा होत्या. त्यातली एक म्हणजे, सहनशक्ती. कलाकारामध्ये सहनशक्ती खूप असावी, अशी त्यांची अपेक्षा असायची. त्यांच्या शिकवण्याच्या काहीशा आक्रमक पद्धतीला वेगवेगळ्या प्रकारे सहन करणे हीसुद्धा एक परीक्षाच असायची. गुरुजींनी अगदी प्रारंभीच कुठल्याही कलाकाराला स्टेजवर आणले नाही. आधी केवळ बॅकस्टेजला काम करून इतर कलाकारांची कामे, त्यांचा अभिनय याची निरीक्षणे करायची. गुरुजींना वाटले की, आता हा स्टेजवर आत्मविश्वासाने जाऊ शकतो; तरच त्या कलाकाराला स्टेजवर जायला मिळायचे. निरीक्षण म्हणजे नेमके काय असते, तेसुद्धा गुरुजींकडून आम्हाला शिकायला मिळाले. मी स्वत: त्यांच्याकडे शिकत असताना तब्बल चार वर्षांनी त्यांच्या एका नाटकात मला भूमिका मिळाली. तोपर्यंत मी शिकतच होतो, त्यांच्या तालमीत तयार झालेल्या कलाकारांची निरीक्षणे करून समृद्ध होत होतो.
‘संभोग से संन्यास तक’ हे पहिले हिंदी नाटक होते, गुरुजींकडचे. त्यातली माझी कामेश्वरची भूमिका प्रमुख होती; पण गुरुजींचे वैशिष्ट्य असे की, एक भूमिका कधीच एकच कलाकार करायचा नाही. प्रत्येक भूमिकेसाठी एक ‘अंडरस्टडी अ‍ॅक्टर’ असायचा. सगळ्यांना त्यामुळे संधी मिळेल व शिकायला मिळेल, हे त्यामागचे नियोजन असायचे. त्यामुळे गणेश यादवदेखील कामेश्वरची भूमिका तितक्याच ताकदीने करत होता. पुढे याच नाटकामुळे मी गुरुजींच्या शाळेतून रंगभूमीवर पाऊल ठेवले. गुरुजींचा तरुणांवर, त्यांच्या वैचारिक क्षमतेवर विश्वास होता. किंबहुना तरुणच त्यांची ताकद होती, असे ते नेहमी म्हणायचे. याच बळावर त्यांनी जागतिक रंगभूमीच्या तोडीचे प्रवाह हिंदीत आणले. शब्दप्रधान, भरजरी, कमानींच्या रंगभूमीला नाकारून स्वत:ची शैली निर्माण केली. त्याचमुळे मोहन राकेश यांची ‘आधे अधुरे’, ‘अ रेनकोट’ ही नाटके एक वेगळा प्रयोग ठरलीच; शिवाय ‘अंधा युग’ हे धर्मवीर भारतींचे त्यांनी आणलेले ‘रेडिओ प्ले’ पद्धतीचे नाटक रंगभूमीला एक स्थित्यंतर देणारे ठरले. हे संदर्भ मला आजही आठवतात. त्यांची ही प्रयोगशीलता त्यांच्याकडे शिकताना मला सातत्याने अनुभवास आली.
त्यांच्याकडे काम करताना त्यांची कायमच एक अट होती की, एका नटाने एका वेळी एकाच नाटकावर एकाग्र व्हावे. पैशांची अपेक्षा न करणे, ही त्यांनी घातलेली दुसरी अट. त्यामुळे त्यांच्याकडे काम करताना व्यावसायिक रंगभूमी वा इतर कमावण्याची माध्यमे यांपेक्षा शिकणे आणि अभिनेता म्हणून घडणे, याला प्राधान्य दिले जात होते. या बाबतीत एक प्रसंग आठवतो. ‘नटसम्राट’मधील बूटपॉलिशवाल्याची भूमिका मला चालून आली होती.
डॉ. लागूंबरोबर काम करण्याची अत्यंत मोलाची संधी होती ती. गुरुजींना मी या भूमिकेची दीड महिना आधीच कल्पना देऊन ठेवली होती. मात्र, गुरुजी विसरून गेले. ‘नटसम्राट’चा शो आणि गुरुजींकडे त्या वेळी नसिरुद्दीन शाह व रत्ना पाठक शाह बसवत असलेल्या जॉर्ज बर्नाड शॉच्या नाटकाच्या शोची वेळ एकच होती. मी दिलेली पूर्वकल्पना विसरल्याने त्यांनी माझी अक्षरश: शाळाच घेतली. ‘नटसम्राट’मध्ये मी काम करण्यास आदल्या दिवशी ऐन वेळी त्यांनी आक्षेप घेतल्याने मला धक्का बसला. ‘दुबे’ की ‘नटसम्राट’, हा चॉइस त्यांनी माझ्यासमोर ठेवला. मला त्यांच्याकडे शिकायचे होते. जिवावर येऊन, मी एका रात्रीत माझ्या जागी दुस-या ला तयार केला आणि मी गुरुजींकडेच थांबलो. पुढे पाच वर्षे झाल्यानंतर त्यांनी यापुढेही माझ्याकडे शिकणार का, अशी विचारणा केली. पुढील पाच वर्षे फक्त केळी खायला देऊ शकतो, पैसे नाही; पंधरा मिनिटांत कळवा, असा जणू फतवाच काढला. आम्ही थांबायचे कळवले. दुस-या दिवशी, त्यांनी आम्हा तिघांच्या खात्यावर साठ-सत्तर हजार टाकले! फक्त आम्हीच नव्हे, अमोल पालेकर, अमरिश पुरींसारखे अनेक कलाकार त्यांनी घडवले. पिता घेतो तशी काळजी ते घेत. कौतुकदेखील ते वेगळ्या पद्धतीने करत. स्वत:च्या आवाजात बोलावे म्हणजे काय, ऐकणे म्हणजे काय, ते किती महत्त्वाचे आहे, फोकस किती महत्त्वाचा आहे, हे त्यांनी शिकवले. कलाकार म्हणून स्वत:चे अनुभव वापरा; पण कलाकाराची भूमिका दैनंदिन आयुष्यात जगू नका, असे ते निक्षून सांगायचे. ‘प्रतिबिंब’ हे महेश एलकुंचवार, ‘अंधारयात्रा’ या गो. पु. देशपांडेंच्या नाटकांचे प्रयोग मी दुबेजींकडे केले. ही दोन्ही नाटके माझी अत्यंत आवडीची. त्यातील माझी भूमिका व एकूणच दोन्ही नाटके जमून आली होती. रंगभूमी प्रवाहित ठेवण्यासाठी युवा पिढीला योग्य दिशेने घडवावे लागेल, असा आग्रह असणा-या गुरुजींचे जागतिक रंगभूमीचा पट पाहता फार मोठे योगदान भारतीय रंगभूमीत आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही!


शब्दांकन : प्रियांका डहाळे