आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारूममेटने एकदा गप्पांची आवर्तने सुरू असताना तिच्या धाकट्या बहिणीचा किस्सा सांगितला होता.
ती लहान असताना एकदा सहकुटुंब बसमधून प्रवास सुरू होता. तुडुंब भरलेली बस चालू असतानाच तिच्या धाकट्या बहिणीने बालसुलभ उत्सुकतेने आईला प्रश्न विचारला, ‘हां, आता आपल्या गाडीचा अॅक्सिडंट कधी होणार?’
‘कधी होणार अपघात बुवा?’ ह्या प्रकारची उत्सुकता आणि आतुरता येते ती भीती नसल्याने आणि अर्थात मोठ्ठे झाल्यावर कळायला वगैरे लागते त्या तथाकथित शहाणपणाच्या अभावामुळे.
आपापली लहाणपणे आठवून पाहिली तर त्यात कुठे ‘काय सॉलिड टेन्शन आलं होतं’ किंवा ‘भीतीने बोबडी वळली होती’ असले काही फार आठवत नाही साधारणपणे!
उलट आपले आईवडील आपण कसे काय वाट्टेल ते करायचो, वाट्टेल त्यांच्या पुढे हवे ते जाऊन आगाऊपणे बडबडायचो, लाज काढायचो, कुठेही उंचावर चढायचो, नाकी नऊ आणायचो या प्रकारातले बरेच काही सांगत असतील.
मी एकदा एका पुस्तकात डोळ्यांत तेल घालून तो पहारा देत होता हे वाचून डोळ्यात तेल घातल्यावर जास्त दिसायला लागते असा परस्पर निष्कर्ष काढलेला आणि मग डोळ्यात तेल घालून पहिले होते कसे वाटते ते!
मग पडशील, लागेल, बाऊ होईल, राक्षस येईल अशी भीती घातली जाते नि भीती म्हणजे काही तरी माहीत नसलेले ‘लई डेंजर’ अशी ह्या अभिनव प्रकाराशी तोंडओळख करून देण्यात येते.
वाट्टेल ते करायची उत्सुकता की उत्साह, मग पुढे लागलेल्या ठेचा नि भाजलेल्या जिभांच्या अनुभवातून गमावत जातो, त्या गमावण्याला कमावलेले शहाणपण म्हणतो! बस चुकली तर, बॅट तुटली तर, उत्तर चुकले तर, बाबा ओरडले तर, सचिन आउट झाला तर...पासून बॉस रागावला तर, फोन हरवला तर, बॉयफ्रेंडला पुरेसा वेळ देता आला नाही तर, कर्ज नाही मिळाले तर अशा विविध प्रकारच्या भीतींमध्ये आपण पारंगत होत जातो.
कुठे तरी एका पुस्तकात वाचलेला एक प्रसंग लक्षात आहे.
एकदा एक बाबा घरात येरझा-या घालत होता नोकरी गमावल्यामुळे अस्वस्थ होऊन! त्याचा लहान मुलगा त्याच्यापाशी आला नि त्याने सहज विचारले, ‘काय झाले बाबा?’
बाबा म्हणाला, ‘तुझ्या बाबाला काढून टाकले आॅफिसमधून!’
मुलगा खूप गंभीरपणे म्हणाला, ‘मला पण उद्याच शाळेतून काढून टाकून घ्यायचेय! मग आपण क्रिकेट खेळू बाबा.’ अर्थात मुलाला जबाबदारी नसेल, त्याला गांभीर्य कळणार नसेल, पण उगाच गंभीर, जबाबदारीचे ओझे वगैरे मुळात हवेच कशाला नं? जबाबदारीला कधी ओझ्याचे स्वरूप येत जाते ते कळतही नाही मोठे होता होता.
भीतीचा संस्कार नाही झाला तर जगणं जास्त मोकळंढाकळं होईल असे मला कायम वाटत आलेय.
‘काय होईल, कसे होईल’च्याशिवाय केले गेलेले प्रेम किंव्हा भीतीशिवाय केलेली प्रत्येक गोष्ट जास्त समर्थ असते, कणा मजबूत असतो.
‘हरलो तर काय’ वगैरेशिवाय खेळला गेलेला सामना जिंकण्याची शक्यता नक्की जास्त असेल!
भीतीचे शेत लावत जातो आपण बहुतेक, अगदी व्यवस्थित खतपाणी घालून वगैरे आणि मग जे पीक उगवते नं ते ताकद नाही देत, ते सकस नसते!
अनेकदा आर्थिक असुरक्षितता, घरच्या जबाबदा-या , स्थिरस्थावर व्हायचेय ह्या प्रकारात लोक त्यांना जे छान करता येईल ते न करता वेगळ्याच दुष्टचक्रात अडकतात. कदाचित पैसे मिळत राहतात हीपण मजा टप्प्याटप्प्यात कमी होत जात असेल. खूप उत्तम गायक, वादक, लेखक असलेले तरुण ‘हप्ते भरायचे असतात घराचे’ म्हणून गहाण पडलेले आहेत अनेक कंपन्यांकडे, अनेक मुली खूप वेगवेगळे काम करायची इच्छा असताना ‘आईबाबांना लग्नाचे टेन्शन येतेय’ म्हणून करून टाकते लग्न असा विचार करतात.
खरे तर अनेक वेळेला आकाश कोसळणार नसतेच, पण मधल्या ‘काय होईल देव जाणे’च्या भीतीचा पूल ओलांडायची धास्ती वाटते आणि पुलापलीकडे स्वप्न उरतात.
भीती मग ती नोकरी गमावण्याची असो, किंवा ‘लोक काय म्हणतील, मित्र काय म्हणतील’ची असो, ही भीती निश्चित चांगले काही नाही घडवत. ती खांदे वाकवते, ती निर्णय चुकवते, ती म्हातारे नि यांत्रिक करून टाकते माणसाला! भीतीने सुरू केलेली प्रत्येक गोष्ट डळमळीत होते आणि ती ढासळली की आपण म्हणतो, ‘असेच होणार होते हे माहीत होतेच आधी.’
समहाउ, ‘कर्म कर, फल की चिंता मत कर’मध्ये ‘अपेक्षा’ करू नका म्हटलेय, पण त्यापेक्षा ‘चिंता’ करायची नाही हेच जास्त भावते आणि माझे एक एक ब्रह्मराक्षस गायब व्हायला लागतात!
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.