आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनारकली मिल गई है... (रवीशकुमार)

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खूप पुढारलाय
    आपला सिनेमा. स्त्री ही केवळ उपभोग्य वस्तू नाही, हे तो वेगवेगळ्या नावाने आणि वेगवेगळ्या तऱ्हेने पटवून देतोय, अलीकडे. तिच्या शरीरावर केवळ तिचा आणि तिचाच हक्क आहे. तिच्या मन आणि भावनांची तीच एकमेव मालकीण आहे. सुख कधी हवं, कधी नको, हा सर्वस्वी तिचा अधिकार आहे... या सगळ्याचा पुनरुच्चार ‘अनारकली ऑफ आरा’ नावाच्या नुकत्यात प्रदर्शित सिनेमानेही केलाय. स्त्री शोषण आणि अत्याचाराचा आणखी एक चेहरा अनारकलीने उघड केलाय. 
अत्यंत निकडीच्या वेळी ती समोर आलीय, 
पण असे किती चेहरे अजून उघड व्हायचेत? 
प्रश्न वाटतो तितका बिनमहत्त्वाचा नाही...
 
वेळ निघून गेलेली असते. अनेकदा असंच घडतं. तेव्हा पश्चात्ताप होतो. ‘बला टली’ अशीही भावना मनात येते. कदाचित हा लेख तुमच्या नजरेपुढे येईपर्यंत अनारकलीसुद्धा निघून गेलेली असेल, थिएटरमधून. पण मी सांगतो, केवळ नाही म्हणणं अधोरेखित करणारी ही गोष्ट नाहीए, तर ठामपणे हो म्हणण्याचीही गोष्ट आहे, ‘अनारकली ऑफ आरा’. 
नाच आणि गाणं अनारकलीचं सर्वस्व आहे. ते सारं पुन्हा आपल्या मालकीचं व्हावं, यासाठी ती पुन्हा आरा गावात परतते. हा तिने जगाला कळवलेला मोठा होकार असतो. संगीतासाठीच तिला जगायचं आणि मरायचं असतं. पळपुट्यासारखं तिला गर्दीत गुडूप व्हायचं नसतं, जिथे प्रत्येक नाच-गाणं करणारीचं भागधेय अगोदरच ठरलेलं असतं. संपूर्ण सिनेमात बिहारमधल्या रांगड्या नि रासवट जगण्याला सरावलेली अनारकली अनेक गोष्टींना ठामपणे नकार देताना दिसते. पण गीत-संगीताच्या बाबतीत मात्र तिचा होकार ठरलेला असतो. म्हटलं तर हा हट्टीपणा असतो, ही जिद्द असते. आजचा परंपरावादी, रूढिवादी माहोल पाहता याच तिच्या स्वभावामुळे सिनेमाला एक प्रकारचं राजकीय परिमाणही लाभतं. आणि हा सिनेमा पुढे जाऊन स्थितीवादी समाजवृत्तीला छेदही देतो.

माझं तर हे म्हणणं आहे की, अविनाश दासने दिग्दर्शित केलेल्या या सिनेमाला कुणी फक्त आरा आणि अनारकली अशा दोन चौकटींतून बघूच नये. त्यापेक्षा आजची इंटरनेटची आणि या इंटरनेटने जन्माला घातलेली सोशल मीडियाची चौकट यासाठी उपयोगात आणावी. त्या चौकटीतून या सिनेमाकडे खुशाल बघावं. जिथे राजकीय पक्षांचेे पगारी ट्रोल शिव्याशाप देत तुमची बदनामी, तुमचं चारित्र्यहनन करत चहूदिशांनी रात्रंदिवस हल्ला करत असतात. तुम्हाला आतून संपवून टाकत असतात. वर्तमानपत्रातलं तिला वेश्या ठरवणारं ते कात्रण अनारकलीवर असाच हल्ला करतं. जसे सोशल मीडियावरचे जल्पक शिव्याशाप देत तुम्हाला ही खात्री करून देतात की, या जगात तुमच्याइतका बेईमान आणि बदनाम माणूस दुसरा कुणीही नाही, तसंच इथेही घडतं. पण अनारकली मीडियाने जन्माला घातलेल्या या जल्पकांना त्यांच्याच शस्त्राने गारद करते. म्हणूनही कदाचित पडद्यावर झालेला अनारकलीचा विजय हा आपला विजय आहे, असं मानून प्रेक्षक थिएटरमधून बाहेर पडतो.
 
नाच-गाणं करणाऱ्या मुली-महिलांसाठी ना आराचा समाज बदललाय, ना मुंबईतली चोरीछिपी डान्स बार संस्कृती बदललीय. पण हे सारं अनारकलीला बहुधा ठाऊकच आहे, 
 
तरीही तिला गाणं गाण्यासाठी जिवंत राहायचंय. तिच्या लहानपणी डोळ्यांदेखत बंदुकीच्या नळीत खोचलेल्या नोटेसोबत गोळीही झेलणाऱ्या तिच्या आईच्या वाट्याला आलेलं कुत्र्याचं मरणही तिला तिच्या दृढनिश्चयापासून रोखू शकत नाही. कलेसाठी जीव टाकणारा कुणी अन्वर नावाचा मनस्वी तरुण तिचा पाठलाग करत दाराबाहेर पडून राहतो. त्याच्यातली ऊर्मी पाहून एक दिवस ती त्याला घरात घेते. हा अन्वर ढोलकवर थाप मारतो, तेव्हा मातीशी घट्ट नातं सांगणारी अनारकली देहभान विसरून थिरकू लागते. म्हणूनच पुढे अनारकली आरामधून पळून तर जाते, पण मनाने तिथेच गुंतून पडलेली राहते. पुढे परिस्थितीची नजाकत बघून जशी ती शोषण झालेल्या गावी आरामध्ये परतते, आणि शिक्षणसत्तेचा माज चढलेला स्त्रीलंपट उपकुलगुरू, भ्रष्ट नि लोचट पोलिस अधिकारी आणि मीडियातल्या जमीनदारी मानसिकतेत वावरणाऱ्यांना त्यांचाच खेळ आणि त्यांचेच नियम वापरून नामोहरम करते, तेव्हा हा सिनेमा प्रेक्षकांना खऱ्या अर्थाने दिलासा देतो.
 
आजवर अनारकलीसारख्या अनेक नायिका पडद्यावर हार पत्करताना दिसलेल्या असतात. त्यामुळे प्रेक्षकांमध्येही थोडीफार निराशा असते. मात्र, एकटी अनारकली या हिंस्र व्यवस्थेविरोधात उभी ठाकते. पुरुषी व्यवस्थेला गुडघे टेकायला भाग पाडते. अर्थातच, सिनेमाच्या शेवटाकडे हे सारे घडते. या प्रसंगी ती ज्या प्रकारे नाचते-गाते त्याकडे बारकाईने पाहिले तर काय दिसते? संपूर्ण सिनेमात तो लंपट उपकुलगुरू तिच्यावर झडप घालायला टपलेला असतो, पण त्याही परिस्थितीत ती अत्यंत संयम आणि सभ्यता राखून असते. कुठेही तिच्या नाच-गाण्यांत अश्लीलता डोकावत नाही. मात्र, अत्याचारी मंडळींचा सामना करताना सुरुवातीलाच ती काहीसे अश्लील भासावे, असे हावभाव करते. तसं करून तिला खरं तर समाजाच्या विचारांना जडलेला कॅन्सर उघड करायचा असतो. तो एकदा समोर आला की, तांडवमुद्रा धारण करून ती त्याला मारून टाकते. त्यापुढे खलवृत्तीचा उपकुलगुरू नि:शस्त्र नि नागडा होऊन जातो. तिथेच अनारकली जिंकलेली असते. स्वरा भास्करच्या अभिनयाने पडद्यावरचे ते क्षण अविस्मरणीय करून टाकले असतात. 
आपल्या संस्कृतीत दडपशाही मूल्ये खोलवर रुजलेली आहेत, पण आपण त्याकडे नेहमीच बघून न बघितल्यासारखे करतो. आपण असाही गैरसमज करून घेतो की, केवळ जमीनदारच या दडपशाहीचे उद‌्गाते आहेत. आपण असेही गृहीत धरून चालतो की, संगीत एका विशिष्ट घराण्यात जन्म घेणार आहे आणि घराण्याच्या नावानेच आपले अस्तित्व जपणार आहे. अशा वेळी गीत-संगीताचा विषय निघतो, तेव्हा मात्र तो क्रूर दडपशहा आपल्यासाठी अचानक देवदूत होऊन जातो. सामाजिक स्तरावर आपण त्याला सूट देऊन टाकतो. आराची अनारकली नेमक्या याच वृत्तीचा बदला घेते. ती लोकसंस्कृतीची नव्याने रुजवात करते. ज्याचे नियम पुरुषी अहंकाराचं ढळढळीत प्रतीक बनलेला उपकुलगुरू नव्हे, तर ती स्वत: आखणार असते. त्यामुळे तुमच्यापैकी ज्या वाचकांनी हा सिनेमा बघितलेला नाही, त्यांनी बरंच गमावलेलं आहे, हे मी खात्रीने सांगू शकतो. कारण, हा सिनेमा फक्त एका स्त्रीला, किंवा एका अनारकलीला नव्हे, तर या जगात स्वत:ला नि:शस्त्र नि असहाय्य मानणाऱ्या प्रत्येकाला बळ देतो. अगदी खरं सांगायचं तर, शब्दांना शब्दांनी नव्हे प्रत्यक्ष हिंसेने प्रत्युत्तर देणारा आजचा सामाजिक-राजकीय माहोल पाहता, आपल्या सगळ्यांना एका अनारकलीची सर्वाधिक गरज आहे. माझं म्हणणं असं आहे की, ती अनारकली आपल्याला सापडलीय. सच में अनारकली मिल गई है...
 
ravish@ndtv.com
बातम्या आणखी आहेत...