आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षणामुळे बदलतेय चित्र

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एलजीबीटी म्हणजे लेस्बियन, गे, बायसेक्शुअल व ट्रान्सजेंडर. समलिंगी स्त्री, पुरुष, हिजडे, लिंगप्रत्यारोपण करणारे अशा सर्वांचा समावेश एलजीबीटीमध्ये आहे. आपल्या भारतात यांची संख्या करोडोंच्या वर आहे. अनादि काळापासून ही मंडळी आपल्या विशेष अस्तित्वाबद्दल विचार करत होती. सरकारने यांची गांभीर्याने दखल घेतली आणि जनगणनेमध्ये तृतीय लिंगी, अन्य किंवा मिक्स या नावाचा रकाना टाकला गेला. त्यांची आधारकार्डं स्पष्टपणे थर्ड जेंडर म्हणूनच काढली गेली. मतदार ओळखपत्र, शाळा-कॉलेजमध्ये प्रवेश, निवडणूक प्रक्रियेत सहभाग यामुळे सुलभ झाला.

हे सगळे काही शक्य झाले फक्त शिक्षणामुळे. आतापर्यंत या थर्ड जेंडरचे संपूर्ण आयुष्य रस्त्यावर नाचगाणी, टाळ्या वाजवून हातवारेे, वस्तीमध्ये शगुन, जोगवा, रेलचे मागण्यातच गेेलेे. कुटुंबापासून दूर, लैंगिक सुखाचे मानसिक असमाधान, यातून समलिंगी सेक्स, नैराश्य, वैफल्य आणि यातूनच लागलेले दारू, सिगरेटचे व्यसन. सतत मनात येणारे नकारात्मक विचार. कोणीच आम्हाला समजून का घेत नाही, ही अंतर्मुख करणारी भावना. पण यावर मागील एका दशकात या लोकांनी मात केली. नव्या अर्थाने त्यांच्या जगण्याला आधार मिळाला तो ही मंडळी शिक्षणाच्या प्रवाहात आल्यामुळे.

यापूर्वी ते फक्त समदु:खी लोकांसोबतच राहायचे. शाळा, कॉलेजमध्ये त्यांना समविचारी लोक मिळाले. यांना सन्मानाचे आयुष्य देण्यामागे प्रसारमाध्यमांचीही मोलाची साथ लाभली. मीडियाने त्यांच्या प्रत्येक घटनांची नोंद घेऊन समाजसंवेदना जागृत करण्याचे काम केलेे. जगप्रसिद्ध ऑक्सफर्ड विद्यापीठात आज अनेक तृतीयपंथी शिक्षण घेत आहेत. आपल्या नावापुढे अभिमानाने आणि आदराने ते मिक्स हे विशेषण लावतात. ऑक्सफर्ड इंग्रजी डिक्शनरीच्या पुढील आवृत्तीत तृतीयपंथींसाठी वापरल्या जाणार्‍या मिक्स या आदरार्थी शब्दाचा समावेश करण्यात येणार आहे.

तीस वर्षांपासून मी थर्ड जेंडरच्या मानवी हक्कांवर काम करते. त्यांची संख्या वाढती आहे. कुणाच्याही पोटी थर्ड जेंडर जन्माला येऊ शकतो. घटनेने या सगळ्यांनाच माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिलेला आहे. आपल्या संविधानाचे ध्येय आहे, ‘समान संधी, समान न्याय.’ म्हणूनच इथून पुढे यांना सन्मानाची वागणूक देणे आपल्या सर्वांची नैतिक जबाबदारी आहे.
आमची एक मैत्रीण मानबी बंदोपाध्याय. ती एम. ए. झाली. तृतीयपंथीयांवरच तिने शोधप्रबंध सादर केला. नुकतीच तिची पश्चिम बंगालमधील क्रिशनगर महाविद्यालयात प्राचार्या म्हणून नियुक्ती झाली आहे. सामाजिक, कौटुंबिक मानापमान सहन करून जिद्दीने शिक्षण पूर्ण करून मानबीने आज यशाचे उंच शिखर गाठले आहे. एक तृतीयपंथी प्राचार्यपदापर्यंत पोहोचण्याची देशातील ही पहिलीच वेळ आहे. लक्ष्मी नारायण तिवारी ही माझी अगदी जवळची सखी. जागतिक थर्ड जेंडर बोर्डाची ती सदस्य आहे. संपूर्ण जगभरात ती भारताचे नेतृत्व करते. हातामध्ये भारताचा तिरंगा झेंडा घेऊन लक्ष्मी जेव्हा रस्त्यावर उतरते, तेव्हा तिला अभिमान वाटतो, आपल्या भारतीय असण्याचा.

आज अनेक विद्यापीठांतून थर्ड जेंडरचे शिक्षण घेण्याचे प्रमाण वाढलेले आहे. विद्यापीठांतून पदवी प्रमाणपत्र घेताना ही मंडळी अभिमानाने परीक्षा विभागाला सांगतात, आमची ओळख मिस्टर किंवा मिस न करता एमएक्स अशी करा. काही दिवसांपूर्वी हैदराबाद येथील नालसर िवद्यापीठातून आनंदिता मुखर्जी यांनी विधी शाखेची पदवी मिळवली. शाश्वत व न्याय अधिकार हा तिचा विषय होता. तिने प्रशासनाला सांगितले, प्रमाणपत्रावर लिंग नमूद करण्याची गरज नाही. एमएक्स हे कायद्याच्या भाषेत मुक्तलिंग आहे. गोव्यातील डायना व देवा या हिजडा. त्यांनी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. शिकताना त्यांना वाटले की, आपल्यासाठी स्वतंत्र बाथरूम असावे. त्यांनी तशी मागणी केली. ती मागणी लवकरच पूर्ण होईल. मात्र ते होईपर्यंत तिथल्या कर्मचारीवर्गाने त्यांना सांगितले, ‘तुम्ही आमची बाथरूम वापरा.’ ही खूप मोठी क्रांती आहे.
रजिया सुलताना, पुणे