आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

येवल्यातल्या महिला पतंगबाजीत तरबेज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मधुरिमाने नेहमीच महिलांविषयीचे प्रश्न चांगल्या पद्धतीने मांडले आहेत. मधुरिमा वाचताना मला माझ्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं मिळतात, म्हणून मी मधुरिमाची खूप वाट पाहत असते. नेहमीप्रमाणेच १६ जानेवारीचा अंकही छानच होता. परंतु, या अंकात मला एक गोष्ट थोडी खटकली. ती तुमच्यासोबत शेअर करावी म्हणून हे पत्र लिहीत आहे.

या अंकातील तुमचा पतंग उडवणारी मुलगी हा लेख वाचला, तुमच्या मते मुली पतंग उडवीत नाहीत; परंतु हे मला थोडे खटकले. मी नाशिक जिल्ह्यातील येवला या गावात राहते आणि येवला पैठणीइतकंच संक्रांतीसाठीसुद्धा प्रसिद्ध आहे. येवल्यात या सणाचे वैशिष्ट्य म्हणजे संक्रांतीचे तीन दिवस पुरुषांच्या बरोबरीने महिलासुद्धा मोठ्या प्रमाणात पतंग उडविण्याचा आनंद घेतात. विवाहित महिला, तरुण मुली सगळ्याच पतंग उडविण्यात तरबेज आहेत. तसं बघितलं तर आमचं गाव तालुक्याचं असलं तरी इतकं पुढारलेलं नाही; परंतु संक्रांत म्हटली की, इथे हा सण मुलांचा आहे, असा विचार कोणीही करत नाही! हे तीन दिवस महिलांना सगळ्या कामांतून सुटी असते.

सगळ्यांच्याच घरी पाहुणे मंडळी आलेली असतात. म्हणजे त्यांच्या पाहुणचाराची जबाबदारी ओघानेच घरातील महिला वर्गावर येते; परंतु संक्रांतीचे तीन दिवस या पाहुणचाराला सरळ दांडी दिली जाते! आणि सर्व स्वयंपाकाची जबाबदारी आचार्‍यावर सोपवून पतंग उडविण्याचा आनंद सहपरिवार घेतला जातो. पतंगांच्या काटाकाटीचा खेळ खेळण्यात इथल्या महिला-मुली तरबेज आहेत. इतकं सगळं असताना मुली पतंग उडविण्याचा खेळ का खेळत नाहीत, हा तुमचा प्रश्न मला खटकला नसता तरच नवल!