आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मधुरिमा कट्टा : माझा चातुर्मास

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पद्धतीत बदल आवश्यक - संध्या परदेशी, औरंगाबाद
चातुर्मास म्हणजे सणांची रेलचेल. मात्र, सर्व सण पारंपरिक पद्धतीने साजरे न करता मी काही नियम केले आहेत. श्रावण सोमवारी महादेवाला बेलाच्या पानांची रास न वाहता एकच पान वाहते. महादेवाच्या पिंडीवर दुधाचा अिभषेक करण्याऐवजी ते दूध दान देते. नागपंचमीला वारुळात दूध, लाह्या न टाकता घरातच मिष्ठान्न बनवून देवापुढे नैवेद्य ठेवते. तो प्रसाद म्हणून आम्ही सर्व जण जेवताना ताटात वाढून घेतो. दरवर्षी मातीचा गणपती बसवून घरातच बादलीभर पाण्यात विसर्जन करतो. हारमिश्रित पाणी झाडांना टाकतो. टाकाऊ वस्तूंपासून आरास बनवतो. नवरात्रात एक दिवस आपल्या सोयीनुसार मोलकरणीला जेवण देऊन साडीचोळीने ओटी भरते. पारंपरिक सण साजरे करण्यात वेळेचा अभाव, महागाई, धावपळ इत्यादी कारणांनी बदल करणे आवश्यक आहे असे मला वाटते.

फ्यूजन चातुर्मास - मेघा कुलकर्णी, नाशिक
श्रावणातील वा चातुर्मासातील उपवासामागे एक शास्त्रीय कारण आहे म्हणूनच आपल्या पूर्वजांनी ते सुरू केले. श्रावणात सुरू असतो पावसाळा. या हंगामात पचनसंस्था क्षीण झालेली असते. सूर्यप्रकाश नसल्याने आजूबाजूचे वातावरण दूषित झालेले असते. रोगराई पसरलेली असते. म्हणून पावसाळ्यातील आहार हलका असावा. आठवड्यातून एकदा लंघन केले जावे, आरोग्य टिकून राहावे हा उपवासामागील प्रमुख हेतू असतो. पण हा हेतू बाजूला ठेवून निरनिराळे साबुदाण्याचे जड पदार्थ खाऊन ‘एकादशी, दुप्पट खाशी’ असे केले जात. काही जण चातुर्मासात लसूण, कांदा त्यागतात. खऱ्या अर्थाने त्याग करायला हवा बाहेरील उघड्यावरील खाद्यपदार्थांचा. घरातील लहानांनाही ते पटवून द्यावे की, घरातील ताजे सकस अन्न पौष्टिक असते. उपवासाच्या दिवशी स्थानिक हंगामी फळ सर्वांत चांगले, त्याचे महत्त्व मुलांना सांगावे. चॉकलेटपेक्षा घरात आईने केलेली गूळदाण्याची चिक्की चांगली ते पटवून द्यावे. या चातुर्मासात आपण सर्वांनी व्रत करूया ते व्यायाम करण्याचे, घरातील ताजा सकस आहार सेवनाचे, मुलांबरोबर लहान होऊन पारंपरिक मैदानी खेळ खेळण्याचे.
काही तरी नवीन करा - शीतल कोठावदे, नाशिक
चातुर्मास सुरू झाला की, बायकांच्या भक्तीला पूर येतो. कुठे फुलांच्या लाखोल्या म्हणून देवावर ओझं टाकतात, तर कधी परंपरेनुसार चालत आलेल्या रूढी टिकून राहाव्यात म्हणून चालत असलेली धडपड. पण ही सगळी भीतीपोटी भक्ती. त्याऐवजी प्रत्येक दिवस माणसासाठी नवा असतो, तेव्हा काही तरी नवीन करावे. पशुसारखे जीवन जगू नये. दिवसातला फक्त थोडासा वेळ भगवंतासाठी द्यावा.
वृक्षारोपणाचा संकल्प - अश्विनी गोरे, सोलापूर
पावसाळ्याच्या दिवसात कोरडा दुष्काळ पडला आहे. जो-तो पावसासाठी देवाकडे साकडे घालत आहे. आपल्या सर्वांसमोर एक भयंकर संकट उभे आहे. त्या संकटावर मात करायचे आहे म्हणूनच सोमवारी सुरू होणाऱ्या चातुर्मासापासून मी आणि माझे कुटुंब वृक्षारोपण करणार आहोत. प्रत्येक जण एक झाड लावणार आहे आणि त्यांची जोपासनादेखील करणार आहे. पाऊस न पडण्याचे कारण म्हणजे वृक्षतोड. आपल्या देशात वृक्षतोड मोठ्या प्रमाणात चालते. ते करू नये म्हणून जनजागृती करणार आहे. पाण्याचे पुनर्भरण खूप महत्त्वाचे आहे. मी माझ्या घरात केले आहे, त्याची तसेच पाण्याची साठवण कशी करायची याबद्दलची माहिती समाजात सांगणार आहे. जेणेकरून आज जे संकट आपल्यावर आले आहे ते पुन्हा येऊ नये. शेतकऱ्यांसाठी काही उपक्रम राबवणार आहे. त्यामध्ये सर्वांना सहभागी करून घेऊन जनजागृती करणार आहे. हा संदेश सर्वांपर्यंत पोहोचवून प्रत्यक्षात कृती करण्याचा प्रयत्न करणार आणि हा वसा चातुर्मासापर्यंत मर्यादित न ठेवता कायमस्वरूपी जोपासणार आहे.
बचतीची सवय लावणार - गायत्री अघोर, सोलापूर
महाराष्ट्रात पावसाळा असूनदेखील पाऊस नाहीये. शेतकरी वर्ग आकाशाला डोळे लावून बसला आहे. आपल्याला पाणी आणि वीज टंचाईलाही सामोरे जावे लागणार आहे. म्हणून चातुर्मासापासून मी आणि माझे कुटुंब रोज पाणी बचत करणार आहोत. तसेच घरात वापरण्यात येणाऱ्या विजेवरदेखील नियंत्रण ठेवून रोजचा विजेचा वापर कमी करणार आहोत. टीव्ही, फ्रिज, पंखा याचा वापर एकदम कमी करायचा विचार आहे. हा नियम मी फक्त चातुर्मासापुरता मर्यादित न ठेवता कायमसाठीही राखायचा प्रयत्न करणार आहे. नैसर्गिक साधन सामग्री योग्य कारणासाठी वापरून बचतीची सवय लावून घेणार आहे.
पर्वणीचा फायदा घ्या - वर्षा बडग, औरंगाबाद
वय पस्तिशीत आणि वजन साठीत असे झाल्यामुळे माझ्या मैत्रिणींनी व मी जिमला जायचे ठरविले. त्यातून आता चातुर्मासाची पर्वणीच मस्तपैकी. फळं, ज्यूस, सॅलड, बिनसाखरेचा चहा, पण एवढं खाऊनही पोटातली कावकाव शांत होईलच याची खात्री नाही. आणि होतही नाही. माझ्या चातुर्मास व्रतामध्ये मी ठरवलंय की, माझ्या शरीराला भार होणाऱ्या कॅलरी मी एखाद्या गरिबाच्या लेकराला देईन. आपल्याला आवडणाऱ्या, खाव्याशा वाटणाऱ्या वस्तू मी गरजूंना देईन! रस्त्यावरच्या एखाद्या गरीब व्यक्तीला भेळ, चाट, पाणीपुरी खाऊ घालीन! कामवाल्या बाईने सुटी घेतली तर बडबड करणार नाही. एखाद्या अनाथआश्रमात जाऊन अनाथ मुलांसोबत, आईबाबांसोबत, आजी-आजोबांसोबत पूर्ण दिवस बोलेन, हसवेन, हसेन, जेवण करीन. सरकारी दवाखान्यातील एकाकी पेशंटला घरचा डबा नेऊन खाऊ घालेन. एखाद्या हॉटेलमधला वेटर आपल्याला आवडीच्या पुरवतो, तेव्हा त्याच्याही पोटात भुकेचा डोंब उसळला असेल. त्याच्यासाठीही एक छानशी डिश मी ऑर्डर करीन!

तोच खरा चातुर्मास - प्रिया निकुम, नाशिक
चातुर्मास म्हणजे चार महिने देवांची उपासना, पूजा-अर्चा करण्यासाठी मानला जातो. काही जण कांदा- लसूण खाणं सोडतात, काही एकच वेळ जेवतात. पण खरंच उपाशी राहून देव पावतो का? आपल्या शरीराला वेदना देऊन, भूक मारून त्याला तरी बरं वाटणार आहे? मी उपास करते. पण म्हणून दिवसभर उपाशीच राहायचं हे काही मला पटत नाही. कारण त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. हे फार जणी लक्षात घेत नाही. आता श्रावणी सोमवार येतील त्या दिवशी सगळे लोक पिंडीवर दुधाचा अभिषेक करतात. ते दूध वाया जातं. तिथे ठेवलेली फळंसुध्दा वाया जातात. मी तसं काही करत नाही. उलट तिथे जे गरीब लोक असतात त्यांना ते दूध आणि फळ मी देते. त्याचं भरलेले पोट मनाला खूप समाधान देऊन जातं. मंदिरात आलेल्या सर्वांना मी हे सांगते.
व्रतवैकल्याने मिळते मन:शांती - स्नेहा शिंपी, नाशिक
नुकतीच कांदेनवमी साजरी करून देवशयनी एकादशीपासून चातुर्मास सुरू झाला आणि आहारात कांदा, लसूण वर्ज्य केले गेले. चातुर्मासापासून सात्त्विक आहार सेवन केला जातो. त्याचबरोबर व्रतवैकल्ये, पूजापाठ, अध्यात्म व उपवास करण्याचा काळ. तमोगुणावर विजय मिळवून सात्त्विकतेवर भर दिला जातो. उपवास म्हणजे भगवंताजवळ वास करणे होय. भगवंताला आवडणारे काम करावे. आमचा स्वाध्यायी भगिनी मिळून इतरांकडे भावफेरी करून त्यांना भगवंताच्या कार्यात जोडण्यास प्रयत्न करतो. भगवंताचे विचार घरोघरी जाऊन पोहोचवतो व जोडण्याचे काम करून भगवंताशी नाते घट्ट करतो. खरं तर, भक्ती, श्रध्दा या मनापासून कराव्यात. त्यात अतिशयोक्ती नको. अध्यात्मामुळे मन:शांती व प्रसन्नता मिळते. या सर्व गोष्टी फक्त चारच महिने न करता कायम करावे म्हणजे मन आनंदी, चेतनामय राहील.
चातुर्मासाचा मुहूर्त हवा कशाला? - ज्योती श्रीवास्तव, जळगाव
जुने नियम, परंपरा, व्रत, उपवास हे सर्व आपल्याला आपल्या आई, आजी, सासू आदी ज्येष्ठांनी दिलेली शिदोरी आहे. परंपरा जोपासणे गरजेचे असते.अर्थातच या परंपरा जोपासण्यासाठी ‘चातुर्मास’ या मुहूर्ताचीच गरज आहे, असे मला वाटते. दर चातुर्मासात माझा वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस आिण माझ्या दोन मुलांचाही वाढदिवस येतो. त्यामुळे हे दिवस आमच्यासाठी खास असतात. चातुर्मास पाळण्याची माझीही एक खास पद्धत आहे. दर रविवारी माझ्या दारासमोर भीक मागण्यासाठी येणारे कुणीही उपाशी जात नाही.

कॉलनीतल्या बगिचात मी सासूबाईंच्या स्मृतिप्रीत्यर्थ सिमेंटचे बाक बसवणार आहे. मुलांच्या वाढदिवसाला मंदिराबाहेर बसलेल्या वृद्ध मंडळींना गोड भात, गोड शेवया किंवा पुरणपोळी यापैकी एका पक्वान्नाचे जेवण देईन. ऑगस्टमध्ये गरजू व्यक्तींना छत्र्या, रेनकोट घेऊन देणार आहे. निसर्गाचे उपकार निसर्गातच परत फेडावेत, या हेतूने मी दरवर्षी मुलांच्या हातून काही झाडे लावून घेते. या झाडांचे संगोपन करण्याची जबाबदारीही मी निभावेन.
बातम्या आणखी आहेत...