आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रसिकने आम्हाला काय दिले?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परस्परसंवाद हे लोकशाही व्यवस्थेच्या जिवंतपणाचे, यशाचे आणि दीर्घकालीन समृद्धीचे लक्षण मानले जाते. यात सूचना आणि सल्ल्यांची देवाणघेवाण होते, विरोधी तसेच समर्थक वाद-विचारांचे आदान-प्रदान होत राहते. वर्तमानपत्रेदेखील अशाच प्रकारच्या परस्परसंवादांवर आपले अस्तित्व टिकवून असतात. उत्तरोत्तर समाजमनात आपले स्थान पक्के करत असतात. ‘रसिक’नेसुद्धा प्रारंभापासून परस्परसंवादाचे महत्त्व जोखले आहे. त्या अनुषंगाने वर्धापनदिनानिमित्त व्यक्त झालेल्या या निवडक वाचक प्रतिक्रिया आणि मान्यवरांचे अभिप्राय…
निवडक वाचक प्रतिक्रिया आणि मान्यवरांचे अभिप्राय
वाङ्मयीन घडामोडींकडे आस्थेने पाहावे
चंद्रकांत भंडारी, जळगाव
क्रीडा, संगीत, साहित्य, सिनेमा, नाट्य...वगैरे विभागांबरोबरच ‘सामाजिक’ प्रश्नांबाबत ‘रसिक’ ने जे वैचारिक खाद्य दिले, ते तसे नेहमीच ‘वाचनीय’ हाेते, आहे. विविध सदरांच्या माध्यमातून मान्यवरांनी लिहिलेले लेख खरोखरोच त्या-त्यावेळच्या परिस्थितीवर, प्रश्नांवर भाष्य करणारे, प्रसंगी परखड मत मांडणारे होते. साहित्य विश्वातील विविध घडामोडींना ‘रसिक’ने जशी जागा दिली, तशी पुस्तक समीक्षेलाही. पण शिक्षण क्षेत्रातील ताज्या व जिव्हाळ्याच्या विषयांवर तेवढं लेखन ‘रसिक’ने वाचकांसमोर ठेवलं नाही. सिने-नाट्यसृष्टीतील सर्व घडामोडींना स्थान देणाऱ्या ‘रसिक’ने त्यावर उत्तमोत्तम लेख दिले. पण त्यातही थोडी कमतरता होती. साहित्यसृष्टीत, विशेषत: मुंबई-पुण्याबरोबर, जे विविध प्रयोग (लेखन-वाचनाबाबत) चालतात, त्यासंबंधी हवं तसं लिखाण ‘रसिक’ने पुरवलं नाही. क्रिकेटलाही खूपदा ‘महत्त्व’ देत, तिथेही देशी खेळांवर, खेळाडूंवर थोडा अन्यायच केला, असं जाणवलं. जिल्हा वाचनालयं, ग्रंथप्रदर्शन भरविणारी माणसं (संस्था) यांना ‘रसिक’ने जागा द्यायला हवी. नव्या पुस्तकांना प्रसिद्धी जोमदारपणे द्यावी. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरांवरच्या वाङमयीन घडामोडींकडे आस्थेने पाहायला हवं. लेखक, संपादक, प्रुफरिडर, चित्रकार, प्रकाशक, विक्रेते, ग्रंथपाल, समीक्षक, स्तंभलेखक आदींबद्दल दर अंकात एकतरी लेखन यायला हवा. ‘रसिक’ने नवा वाचक तयार करण्यात कोणती ‘भूमिका’ निभावली आहे, निभावणार आहेत, हेही समोर यायला हवे. एकूणातच, ‘रसिक’ने जे दिलेय ते ‘बौद्धिक खाद्य’ रविवारपुरते ‘पुरे’ न ठरता मंगळवार, बुधवारपर्यंत उरावे व त्यावर चर्चा व्हावी, ही अपेक्षा!

वैचारिक जडणघडणीची पुरवणी
डॉ. केशव तुपे, अमरावती

अलीकडे निखळ वाङ‌्मयीन पुरवण्या कमी होत आहेत. त्या तुलनेने "रसिक' ही पुरवणी तो मजकूर देण्याचा प्रयत्न करत आहे. वाचकांची वैचारिक जडणघडण या पुरवणीतून सातत्याने होत आहे. गांभीर्यपूर्ण लेख देण्याचा प्रयत्नही रसिक करते, ही जमेची बाजू आहे. अत्यंत कमी अवधीत वाचकांच्या मनात घर करून प्रयोगशील राहण्याचा प्रयत्न रसिकने केला आहे. वाचनीय सदरे सातत्याने रसिकमध्ये सुरू आहेत. नव्या लेखकांकडून लिहून घेण्याचे काम रसिक करते. यापुढे अनुवादित साहित्य प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम या पुरवणीने करायला हवे, असे वाटते. नोबेल पुरस्कार लेखकांच्या परिचयाचा स्तंभही आपल्याला सुरू करता येईल.

‘रसिक’ एक बौद्धिक मेजवानी
सुरेखा शहा, ज्येष्ठ साहित्यिक, सोलापूर

‘दिव्य मराठी’ची दर रविवारी प्रसिद्ध होणारी ‘रसिक’ पुरवणी वाचकांसाठी बौद्धिक मेजवानी आहे. यातील सर्व सदरे अभ्यासपूर्ण आहेत. देश तसेच विदेशातील घडामोडींचे ज्ञानही यातून मिळते. महिलांविषयक विविध विषयांची हाताळणी पुरवणीत आहे. महिला लेखिकांनाही चांगले स्थान पुरवणीत मिळाले आहे. विशेष म्हणजे, नवलेखकांना राज्यभर संवादाची संधी मिळते आहे. पुरवणीत कलावंत, साहित्यिक, नाटककार यांची ओळख करून देणारे एक साप्ताहिक सदर असावे.

दृष्टीआडच्या जगाचा अचूक वेध
अॅड. विष्णू मदन पाटील, बीड बायपास, आैरंगाबाद

"रसिक'मधील लेख वाचण्याचा छंद जडल्याने "रसिक'शिवाय रविवार ही कल्पनाच करवत नाही. कामानिमित्त रविवारी सकाळी लवकर घर सोडले तर रात्री कितीही उशीर झाला तरी "रसिक' वाचल्याशिवाय राहावत नाही. लोकसंख्यावाढ, तेल समस्या, आतंकवाद, भारतामधील राजकारण, जागतिक राजकारणात भारताचा सहभाग, निसर्ग आणि पर्यावरणाचा सुरू असलेला ऱ्हास यासंबंधीचे सविस्तर विवेचन "रसिक'मध्ये आढळते. केंद्रात पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींच्या वर्षपूर्तीबद्दल संपादक प्रशांत दीक्षित यांनी लििहलेला लेख अधिक वास्तववादी वाटला. याशिवाय उमड-घुमड, उकल-बुकल, कन्फेशन बॉक्स , पुस्तकाची आेळख आदी विषयांवरील लेख नवीन विश्वाची आेळख करून देतात. जग आणि देशात काय सुरू आहे यासंबंधीची झलक अंकात दिसत असली तरी घडामोडींमागे काय आहे , कशामुळे वैश्विक स्तरावर आेढाताण सुरू आहे, याचे नेमके प्रतिबिंब "रसिक'मध्ये दिसते. ही मेजवानी सुरू राहील, ही अपेक्षा.

संग्राह्य पुरवणी
अाबा महाजन (साहित्यिक), जळगाव

‘रसिक’ पुरवणीमध्ये दर्जेदार साहित्याची रेलचेल असते. प्रत्येक रविवारी अाम्हाला ‘रसिक’ची प्रतिक्षा असते. नवीन पुस्तकांचा परिचय, काव्यार्थ सदर, साहित्यिक घडामाेडीविषयक लेख वाचनीय तसेच संग्रह करण्याजाेगे असतात. समाजातील ज्वलंत प्रश्नांवरील घडामाेंडीचा समर्पक अाढावा पुरवणीमध्ये असताे. चाेखंदळ वाचकांची वाचनभूक भागविण्याचे काम ही पुरवणी अाजवर करीत अाली अाहे. केवळ रविवारच नव्हे तर अाठवड्यातील अनेक दिवस या पुरवणीतील सदरे वाचकांना गुंतवून ठेवणारी असतात.

परिवर्तनवादी विचारांची पुरवणी
प्रा. सत्यजित साळवे (साहित्यिक), जळगाव

परिर्वतनवादी विचारांची कास धरून तळागाळातील उपेक्षित, वंचित समूहाच्या व्यथा व वेदना मांडण्यात अाताच्या माध्यमांमध्ये ‘रसिक’पुरवणीचे स्थान सर्वेात्तम अाहे. प्रत्येक अाठवड्याला वेगळा विचार घेवून येणारी ‘रसिक’ पुरवणी वास्तववादी जगाचा साकल्याने विचार करायला लावणारी अाहे. साहित्य, कला, संस्कृती, नृत्य, नाट्य, शिल्प, समीक्षा, प्रवासवर्णन या साऱ्या प्रांगणात या पुरवणीचे याेगदान माेलाचे अाहे. अवघ्या चार वर्षाच्या कालखंडात रविवारच्या सुटीच्या दिवसाची सुरूवात ‘रसिक’ पासून करण्याइतपत या पुरवणीने वाचकांच्या मनात स्थान मिळविले अाहे. अलिकडच्या काळात माध्यमांमुळे माणूस अाणि समाज यांचा अनुबंध अिधक घट्ट हाेत अाहे. त्याचे प्रतिबिंब म्हणजेच ‘रसिक’ हाेय.

रविवारची आतुरतेने वाट पाहायला लावणारी पुरवणी
हनुमान बाेबडे, अमरावती

"रसिक'चा मी सुरुवातीपासून वाचक आहे. यातील एकूण एक सदर वाचनीय असल्याने ही पुरवणी मला खूप आवडते. अभ्यासू लेखक या पुरवणीसाठी सातत्याने लिहितात, त्यामुळे वाचकांना दर्जेदार ‘खाद्य’ मिळते. विविध विषयांचे अभ्यासपूर्ण लेख रसिकमध्ये वाचायला मिळतात. ताज्या घटना -घडामोडींवरील भाष्यही यामध्ये वाचायला मिळते. त्यामुळे ही पुरवणी सर्वसामान्य वाचकांच्या अपेक्षा पूर्ण करणारी आहे, असे वाटते. "रसिक'ची प्रत्येक पुरवणी दर्जेदार, वाचनीय असल्याने रविवारची आतुरतेने वाट पाहावी लागते.

बोलीभाषेचा परिपोष व्हावा
विठ्ठल जाधव, शिरूर कासार, जि. बीड

‘दिव्य मराठी’च्या आगमनापासूनच मी नियमित वाचक आहे. विविध विषयातील तज्ज्ञांनी मांडलेली मते ‘रसिक' पुरवणीमध्ये वाचायला मिळतात. साहित्यिक घडामोडी, नव्या पुस्तकांवरील समीक्षा किंवा अन्य भाषांतील पुस्तकांवरील तसेच साहित्य संमेलनावरील चर्चा खूप वाचनीय असते. मध्यंतरी कवयित्री प्रियंका डहाळे यांचे अपघाती जाणे ही अपरिमित हानी झाली. तिचे लेख आवर्जून वाचले जायचे. सिनेनाट्य, साहित्य संस्कृती, प्रवासवर्णन, अध्यात्म अशा विविध अंगाने "रसिक'मध्ये लेखन प्रकाशित होत आहे. नवोदितांसह नामवंत लेखकाचे लेखन ही वाचकांना पर्वणीच ठरते. ग्रामीण साहित्य, दलित साहित्य तसेच ललित, काव्य यांची समीक्षा वाचनीय असते.
यापुढील काळात कविता, कथााही "रसिक'च्या अंकातून वाचावयास मिळाव्यात तसेच मुंबईसह कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, खानदेश, तसेच बेळगाव, गोवा आणि मध्यप्रदेशातील मराठी भाषिकांसाठी लेखन करणाऱ्या लेखकांना संधी दिली जावी. म्हणजे, त्यांच्या बोलीभाषेचा परिपोष "रसिक'मध्ये होईल आणि अस्सलपणे सर्व स्तरांतील वाचकांपर्यंत पुरवणी पोहोचेल, अशी अपेक्षा.

"रसिक'ने स्वत:ला ओळखायला शिकवले
विजयकुमार भोसले, औरंगाबाद.

‘रसिक'ने आम्हाला काय दिले, असे विचारण्यापेक्षा ‘रसिक'मधून आम्ही काय घेतले? असे विचारा. याचे उत्तर आहे, ‘रसिक'ने आम्हाला काय नाही दिले! ‘रसिक'ने आम्हाला जे जे पाहिजे होते, ते ते सर्व आणि गरजेपेक्षा खूप जास्तच ज्ञान, माहिती, मनोरंजन, मार्गदर्शन व मानसिक, बौद्धिक तथा आत्मिक समाधान दिलेले आहे. अतिशयोक्ती वाटेल,असे हे निव्वळ सत्य आहे. आयुष्याच्या जीवनपथावरून काहीतरी यथार्थ मिळविण्याच्या उद्देशाने भटकंती करणारा पांथःस्थ दुर्गम ठिकाणी भूक व तहानेने व्याकुळ झाला असता त्यास अनपेक्षितरीत्या फळा-फुलांनी बहरलेले व ताज्या पाण्याचा स्रोत असलेले उपवन दिसावे, अशी ही ‘रसिक' पुरवणी. आमच्या दैनंदिन जीवनात दर आठवड्यातून एक दिवस अशा अंतराने नियमित येते व आम्ही त्याचा पुरेपूर उपभोग घेऊन नव्या जोमाने पुढील जीवन-प्रवास सानंद सुरू ठेवतो. ‘दिव्य मराठी’च्या ‘रसिक'ने आम्हा वाचकांनाही नकळतपणे ‘रसिक' बनविले आहे, हे आमचे अहोभाग्य! याबाबत मी माझेच उदाहरण देतो. मी शासकीय सेवेतून नियमानुसार व प्रतिष्ठापूर्वक अधिकारी पदावरून काही वर्षांपूर्वी निवृत्त झालो. निवृत्तीचे जीवन सहजपणे जगणे बहुतेक ज्येष्ठांना अत्यंत कठीण जाते. मला कसलाही साहित्यिक वारसा अथवा तशी पार्श्वभूमी नसूनही मी रचलेल्या कविता माझ्या मित्रांना आवडल्या व त्यांनी सुचवल्यानुसार मी त्या ‘दै. दिव्य-मराठी'कडे पाठविल्या आणि त्या विना-वशिला प्रसिद्धही होत गेल्या. माझे लेखसुद्धा या दैनिकातून प्रसिद्ध होत गेले. यातूनच पुढे ‘भावान्कुर' व ‘चिंतनझुला' ही माझी दोन पुस्तकं अत्यंत थोर साहित्यिक व मान्यवरांच्या हस्ते व त्यांच्या प्रस्तावनेसह प्रकाशित झाली. "दिव्य-मराठी'ने मला एक ‘कवी' व ‘लेखक' अशी नवी ओळख दिली, जणू माझा हा नवीन जन्मच आहे, म्हणून जगण्यात यापुढेही नावीन्य आहे. दै. दिव्य मराठीच्या चौथ्या वर्धापनदिनानिमित्त सर्व परिवारास व वाचकवर्गास अनेक हार्दिक शुभेच्छा!

चाकोरीबाहेरचे विषय हाताळणी
डॉ. इरेश स्वामी, माजी कुलगुरू, सोलापूर विद्यापीठ

‘रसिक’ विविध विषयांच्या अंतर्भावाने वैशिष्ट्यपूर्ण बनली आहे. पानांची संख्या कमी झाली, पण मजकुराच्या दर्जेत तडजोड नाही. आंतरराष्ट्रीय घडामोडीवर आधारित मुख्य फिचर, पेज थ्री मजकूर, ग्लोबल, साहित्य, करमणूक अशा विषयांची केलेली मांडणी रसिकांना आपसूकच भावते. चाकोरीबाहेरचे विषय हाताळणी करणाऱ्या ‘रसिक’मध्ये स्थानिक लेखकांनाही संधी मिळाली, तर आणखी बहार येईल. चटपटीत व वैचारिक असा उत्तम बॅलन्स रसिकने साधला आहे, हे आवर्जून सांगावे लागेल. युवा वर्गाला वाचनसंस्कृतीकडे वळविण्यात रसिकचा हातभार आहे. प्रवासवर्णनापासून वैचारिक साहित्याचा अतर्भाव, वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तींच्या जीवनातील अनुभवप्रवास, साहित्यिकांचे जग अशा विविध लेखांमधूनही वाचकांच्या जाणिवा अधिकाधिक समृद्ध होतात. ‘रसिक’च्या वैचारिक वाटचालीसाठी अविरत कष्ट घेणाऱ्या, निर्मिती प्रक्रियेत सहभागी असणाऱ्या सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा.

विचार करायला शिकवले!
आनंद पाटणे, सोलापूर

वाचक या नात्याने अनेक वर्तमानपत्रांचे वाचन करीत असताना काही वर्तमानपत्रांनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण लेखणीने वाचकांना समाजात जगायला शिकविले. यातच प्रामुख्याने ‘दै.दिव्य मराठी’ या वृत्तपत्राचा विशेष उल्लेख करावासा वाटतो. दर रविवारची ‘रसिक’ ही ‘दिव्य मराठी’ची वैशिष्ट्यपूर्ण पुरवणी सर्व प्रकारच्या ज्ञानात भर घालणारी वाटते. यामध्ये जागतिक पातळीवरील वैशिष्ट्यपूर्ण माहिती, मनाला भावणारे लेख, दुर्मीळ माहिती, विचारमंथन, समाजातील सद्य:प्रश्नावरील सूक्ष्म लेख, साहित्यकृती, जी माहिती कोठेही सहसा वाचनात येत नाही. एखादा मोठा ग्रंथ वाचण्याची गरजदेखील भासणार नाही, अशा पद्धतीने लेखन "रसिक'ने प्रकाशित केले आहे. "रसिक'ने वाचायला शिकवले, लिहिण्यास भाग पाडले आणि विचार करायला शिकविले. असे एकत्र मंथन अन्य कोठेही पाहायला मिळत नाही.
“असतील ज्ञानाची भांडारे मिळतील ज्ञानाची ग्रंथालये
पण शोधावे लागतील ‘रसिक’चेच अंक पुराणे”

वाचकांसाठी ज्ञानाचे भंडार
राजुभाई मुलाणी, पंढरपूर

गेली चार वर्षे सातत्याने ‘रसिक’च्या अंकाने आम्हा वाचकांना काय दिले? या प्रश्नापेक्षा काय द्यायचे राहिले, असा स्वत:शी प्रश्न केला, तर ‘रसिक’ने सर्व काही भरभरून दिल्याचेच उत्तर मिळते. दर रविवारी ‘दिव्य मराठी’ हातात पडला की प्रथम ‘रसिक’चा अंक वाचल्याशिवाय आम्हाला चैन पडत नाही. कारण या अंकातील माहिती दुर्मीळ अशीच असते. जो वाचक "रसिक' वाचतो तो जीवनात कधीच, कोठेही अडणार नाही, याची खात्री पटते. ‘रसिक’मधून जागतिक स्तरावरील माहिती वाचण्यास मिळते, त्यामुळे वाचकांच्या ज्ञानाच्या कक्षा नक्कीच रुंदावतात. त्याचबरोबर नामवंत लेखक, देशी-विदेशी साहित्यकार यांचे लेख, त्यांची माहिती वाचून ज्ञानात मोलाची अशी भर पडल्याशिवाय राहात नाही. कला, संस्कृती, साहित्य अशा विविध क्षेत्रांशी संबंधित लेखन असणारा रसिक अंक वाचकांसाठी जणू ज्ञानकलशच भासतो.
रसिकचा अंक हा संग्रही ठेवण्यासारखा वाटतो, कारण यातील ज्ञानवर्धक व उपयुक्त माहिती मानवी जीवन जगत असताना नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. आता पाचव्या वर्षात पदार्पण करतानादेखील ‘रसिक’मधून अशाच प्रकारची ज्ञानवर्धक, उपयुक्त, उद‌्बोधक अशी माहिती मिळावी. रसिकच्या भावी वाटचालीस मन:पूर्वक शुभेच्छा!

सामाजिक भान जागवले
पी. एम. काळे, नाशिक

सर्वप्रथम वर्धापनदिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा! "रसिकने काय दिले?' याचे उत्तर बरेच काही दिले, जे कदाचित शब्दांत व्यक्त न होणारे आहे. वृत्तपत्राची रविवार पुरवणी हे सुटीच्या दिवसाचे आकर्षण असते. ‘रसिक’ने नेहमीच्या साचेबद्ध पद्धतीने मनोरंजन केले नाही. यात विनोद वगैरे फार नसतात. काही वृत्तपत्रे व्हॉट्सअपवरचे विनोद टाकून पाने भरतात. "रसिक'ला हे करण्याची गरज नव्हती. यातील लिखाण वैचारिक अन‌् सामाजिक भान जागवणारे, तसेच जाणिवा रुंदावणारे! यातील काही लेखकांची नावे ऐकली नव्हती; पण त्यांचे लिखाण मनाला भिडणारे! सामाजिक जीवनात अनेक प्रश्न आहेत, त्यांच्या मुळापर्यंत जाणारी ही ‘रसिक’ पुर‌वणी. केवळ रंजक साहित्य देणारी व मनोरंजक गुंगी आणणारी पुरवणी काय कामाची? अनेक घटकांचे प्रश्न तितक्याच तीव्रतेने मांडताना, सामाजिक व्यवस्थेवर ताशेरे मारत, त्याचप्रमाणे राष्ट्रीय व जागतिक घटनांचा वेगळ्या कोनातून वेध घेऊन वाचकांना सजग व सावध करण्याचे काम ‘रसिक’ पुरवणीने केले आहे. त्याचबरोबर आधुनिक धावत्या जगात नवीन विचार, जीवनशैलीतील विसंगती सारे काही ठळकपणे मांडताना वाचकांना विचारप्रवृत्त केले, हे ‘रसिक’चे मोठे यश आहे. या टीमला धन्यवाद व पुढील वाटचालीस शुभेच्छा!

"रसिक'शिवाय रविवार घालवणे अशक्य
प्रिया भारस्वाडकर-मुंदडा, जाधववाडी, औरंगाबाद

"रसिक' पुरवणीमध्ये सााहित्य, कला, संस्कृती, पर्यटन, राजकीय आणि देश विदेशातील प्रमुख घडामोंडींचा परामर्श घेणाऱ्या लेखांचा भरणा असतो. सर्वसामान्य स्त्री ते कार्पोरेट क्षेत्राात काम करणाऱ्या "वर्किंग वुमेन' यांच्या वाचनाची अभिरूची आेळखून त्या पद्धतीने प्रतिबिंब उमटविण्याचे काम "रसिक'द्वारे होत असते. रविवार हा दिवस वैचाारिक खाद्य पुरविणारा त्यामुळेच ठरतो, हे विशेषत्वाने सांगावे लागेल. सकस भाषा, उत्कृष्ट मांडणी, चित्रांचा यथायोग्य वापर हे वेगळे वैशिष्ट्य "रसिक'मध्ये दृष्टीस पडते. पुरूषलेखक आणि तेवढ्याच तुलनेत स्त्री लेखिकांना प्रतिनिधित्व दिल्यामुळे आमच्या भावविश्वाचे प्रतिबिंब उमटते. "रसिक'मुळे माझ्यासहित माझ्या संपूर्ण कुटुंबियांचा रविवार हा विचारांच्या भाावविश्वात नेणारा ठरतो. "रसिक'मुळे मी सर्व दृष्टीने अपडेट राहते. तद्वतच इतर स्त्रियांशी चर्चा करताना मला स्मार्ट लेडी बनण्याचा मान "रसिक'मुळे तर मिळतो. नवप्रकाशित पुस्तकांचे विवेचन, पर्यटन स्थळांची माहिती, जागतिक व राष्ट्रीय स्तरावरील घडामोडींवर तज्ज्ञांनी केलेले भाष्य, अर्थकारण आदी बाबी इतर दैनिकांच्या पुरवणीच्या तुलनेत "रसिक'मध्ये अधिक प्रभावीपणे मांडलेल्या असतात. त्यामुळे"रसिक'शिवाय रविवार घालवणे अशक्य आहे.

विचारांचे भान दिले
अजय मेधने

"दिव्य मराठी'ला चौथ्या वर्धापनदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. या निमित्ताने भावना व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल आभार. या काळात एकही रविवार असा गेला नाही की, "रसिक' नाही वाचला.सकाळी उठल्याबरोबर चहाची जशी तलफ असते, तशी रविवार सकाळी 'रसिक'ची असते.'रसिक' ने काय दिले तर प्रशांत दीक्षित, डॉ.विश्वंभर चौधरी यांच्या लेखांतून राजकीय, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक विचारांचं भान दिले ,चिंतन आणि विश्लेषण करण्याची जाण दिली,आरोग्य सजग बनवणारे लेख दिले, वैद्य विजय कुलकर्णींचे कामसूत्र विषयावर सखोल व अभ्यासू लेख दिलेत, स्पृहा जोशींचे मुक्त चिंतन, मंगल शहांचे सुंदर आत्मिक समाधान देणारे लेखन, प्रियंका डहाळेची लिखाणातून झालेली ओळख व त्यामुळे तिचे जिवाला चटका लावून जाणे...असे बरेच काही दिले. असा हा 'रसिक'आमच्या घरातलाच सदस्य झालाय.त्याला उदंङ प्रतिसाद लाभो ही सदिच्छा.

रसिक’ने वाचक घडवला
शरद ठाकर सेलू, जि परभणी

‘रसिक’ने वयोवृद्धांपासून तरुणांपर्यंत आपली पकड मजबूत केली, ती दर्जेदार लेखनामुळेच, रसिकमुळे महाराष्ट्राच्या वृत्तपत्र आणि साहित्य क्षेत्रात मोलाची भर पडणार आहे. वर्तमान सामाजिक-राजकीय घडामोडी, आरोग्य, साहित्य, चित्रपट, संगीत, अशा विविध विषयांनी ‘रसिक’ परिपूर्ण असते. जो खरा ‘रसिक’ वाचक आहे, तो संपूर्ण अंक वाचल्याशिवाय राहू शकत नाही. वाचन संस्कृतीपासून दूर जाणारा वाचक वर्ग ‘रसिक’ने पुन्हा तयार केला आहे. ‘रसिक’मुळे नवे साहित्यिक घडायला मदतच होणार आहे. ‘दिव्य मराठी’ला वर्धापन दिनाच्या पुन्हा मन:पूर्वक शुभेच्छा!

(उर्वरित प्रतिक्रिया पुढील अंकात)