आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ख-या अर्थाने लोकभाषेत आरोग्य संवाद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आरोग्याच्या विविध प्रश्नांविषयी लोकांना माहिती देणं अत्यावश्यक आहे. ही माहिती शास्त्रशुद्ध हवी, पण ती शास्त्रीय किंवा वैद्यकीय परिभाषेत नको. लोकांना समजेल, रुचेल, आवडेल अशा स्वरूपात, त्यांच्या बोलीभाषेत ही माहिती द्यायला हवी. त्यानुसार डॉ. लिमकर यांनी अनेक नियतकालिकांतून सातत्याने लेख लिहिले. आरोग्याचा कुठलाही प्रश्न त्यांनी यातून वगळला नाही. या लेखांचा संग्रह ख-या अर्थाने आरोग्याचा संवाद झालेला आहे. आरोग्यविषयावरचा तो एक उत्तम दस्तऐवज आहे, असे मला वाटते. घरोघरी संग्रही असावे, असे हे पुस्तक आहे, अशी सुंदर टिप्पणी डॉ. शरच्चंद्र गोखले (अध्यक्ष कास्प, केसरीचे माजी संपादक) यांनी पुस्तकाला दिलेल्या आपल्या प्रस्तावनेतच दिली आहे. हे पुस्तक विद्यार्थ्यांना आरोग्य सेवेतील सर्वांनाच, कुष्ठरोग तंत्रज्ञ, आरोग्य पर्यवेक्षक, नर्सेस, डॉक्टर्स, अभ्यासक व पत्रकार व नागरिकांना निश्चित उपयोगी पडेल. सहा भागांत विभागलेले हे पुस्तक अत्यंत आटोपशीर व शिस्तबद्ध वाटते. पहिल्या आरोग्य संवाद या भागात आरोग्य पत्रकारिता-पत्रकारितेमधील महत्त्वपूर्ण शाखा, सर्वांसाठी आरोग्य - स्वप्न की सत्य, भारतीय चित्रपटातील आरोग्य दर्शन, चांगल्या आरोग्यासाठी प्रभावी आरोग्य संवाद ही प्रकरणे आहेत. पुस्तकाच्या कुटुंब कल्याण या दुस-या भागात कुटुंब नियोजन कार्यक्रमाचा इतिहास, कुटुंब कल्याण विधेयकाचे स्वरूप, पं. नेहरू कन्या कल्याण पारितोषिक योजना, लोकसंख्या रोखण्यास पुरोगामी कृती आवश्यक-भगवान श्री रजनीश, दरवर्षी पाच लाख बायका मारणारी बाळंतपणं, आता ही मजबुरी बदलायलाच हवी, कमी शिक्षण-जास्त अपत्ये ही प्रकरणे आहेत.
पुस्तकाच्या संवर्धनात्मक लेखांच्या तिस-या भागात लस आवश्यक, बाळाची अशी काळजी घ्या, अपघात टाळण्यास सयोग्य वयाचे बंधन आवश्यकच, सौंदर्यासाठी योगासने, मांसाहार की शाकाहार, लठ्ठपणा कसा घालवाल, औषधी, गोळ्यांच्या हानिकारक मा-यास पर्याय, प्लास्टिक सर्जरी, 24 तास तंदुरुस्तीसाठी फक्त 24 मिनिटे व्यायाम आदी प्रकरणे आहेत पुस्तकाच्या महत्त्वाच्या चौथ्या भागात विविध आजार-रोगांपासूनच प्रतिबंधात्मक, उपचारात्मक लेखांचा समावेश असून त्यात मुलांचे आजार-साधे सोपे उपाय, दातांचे आरोग्य, डोळ्यांबाबत डोळस राहा, शुद्ध पाणी, मानसिक स्वास्थ्य, कुष्ठरोग दैवी शाप नव्हे-तो बरा होतो, कर्करोग - एक यक्षप्रश्न, क्षयरोग नियंत्रण - सामाजिक समस्या, ती चूक तुम्हीपण करणार काय, अशी एकाहून एक सरस प्रकरणे आहेत. पुस्तकातील पाचव्या भागात आकाशवाणी, दूरचित्रवाणी-व्हिडिओ माध्यमांसाठी संहिता (स्क्रिप्ट) लेखन तसेच मंगलीचं लगीन, नवस अशी प्रकरणे आहेत. ‘आरोग्य विविधा’ या पुस्तकाच्या अंतिम सहाव्या भागात ‘जीव जिवाचा कैवारी’ हा पुरस्कारप्राप्त लेख तसेच फ्रान्समधील वीर्य बँक - सिकोस, मातृत्वाने स्त्रीच्या कार्यक्षमतेत वाढच, स्वत:साठी स्वत:च्याच रक्ताची पेढी, हृदयविकार व रक्तदाबातही चालणारी अंडी, पोस्टमॉर्टेम का व कशासाठी, डॉक्टर नसेल तेथे, बुद्धिमापन कसे कराल, डॉ. भालचंद्र, डॉ. जोशी, महिला आरोग्य दिन आदी प्रकरणे आहेत.
पुस्तकाचे नाव : आरोग्य संवाद
लेखक : डॉ. सुधाकर लिमकर
प्रकाशन : संवाद प्रकाशन, औरंगाबाद, पृष्ठसंख्या : 184,
मूल्य : 125 रुपये