आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाल आला तुरा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘लाल आला तुरा गुलमोहरा
हाच प्रीतीचा पहिला इशारा’
या ओळींतून खरंच खूप नेमके भाव व्यक्त होतात. वसंत ऋतूत बहरणारा गुलमोहर हा सौंदर्य संपत्तीने नटलेला वृक्ष आहे. त्याबद्दल काय बोलावे आणि सांगावे? तसे गुलमोहराचे नाते माणसाच्या तिन्ही अवस्थांशी संलग्न आहे. भरभर वाढणारा हा महावृक्ष लहान मुलांना आपल्या छायेत खेळवतो. उन्हाची तिरीपही या लहानग्यांवर पडू नये म्हणून घनदाट सावली तो देतो. या झाडाशी निगडित माझी लहानपणची एक आठवण आहे. माझ्या मामाचे गाव म्हणजे सहकारी साखर कारखान्याची वसाहत होती. परीक्षा संपताच मामा किंवा बाबा (आजोबा) मला घ्यायला यायचे. अगदी पहिलीपासूनच्या सुट्यांमध्ये मामाकडे जाण्याचा माझा शिरस्ताच होता. म्हणून ब-याच मैत्रिणी, माझ्यासारख्याच मामाच्या गावाला आलेल्या, तर काही तिथल्याच होत्या. या सुट्या अगदी मस्तपैकी एंजॉय करायचो. वेगवेगळे क्लासेस सोडाच, पण कुणी शपथ दिली तरी पुस्तक हातात घ्यायचे नाही.
दिवाळीच्या सुटीत कसाबसा ‘होमवर्क’ करायचो पण उन्हाळ्यात जी मैत्रीण निकालाआधी आणि निकालानंतर सुटीत अभ्यास करेल ती खेळातून कट. असा आमचा सकाळी खेळ, दुपारी खेळ संध्याकाळी आठ वाजेपर्यंत खेळ चाले. दिवाळीच्या सुटीत सगळ्या मैत्रिणी मिळून घराच्या भोवती असलेल्या बकाणाच्या फुलांचे गुच्छच्या गुच्छ वेचायच्या. कुणाची जास्त फुलं जमा होतात, याची शर्यत लागायची. खरं तर तेव्हा प्रश्न पडायचा की, या फुलांना मंद-मंद असा वास होता, पण फुलं कुणीच का नेत नाही? पण आम्ही मात्र मनसोक्त गोळा करायचो. त्याच्या देठांना काढून टाकायचे, नुसत्या छोट्या दांडीसह ती एकामागोमाग दो-यात ओवायची. लांबच लांब अशी माळ करायची. दोनपदरी गजरा केसांत माळायचा. कधी कधी हा गजरा केसांपेक्षा लांब व्हायचा. आजी नेहमी सांगायची की, ही फुलं केसांना लावायची नाहीत. त्याने केसांत जुवा होतात; पण एवढ्या मेहनतीने केलेला गजरा आम्हाला लावायचाच असे.
उन्हाळ्यात खेळायला हा गुलमोहर जोडीला असायचा. खरं तर परीक्षा चालू असेपर्यंत गुलमोहराची सगळी पानं गळून जायची. मात्र, त्याच्या शेंगा आम्ही येईपर्यंत तशाच लटकत असायच्या. एप्रिलमध्ये नवी पालवी येऊन मेमध्ये लाल-पिवळ्या फुलांनी हे झाड गच्च भरायचे. दुपारी आजी झोपल्यावर हळूच घराबाहेर पडायचे. तशी बरीच गुलमोहराची झाडं या भागात होती. प्रत्येक झाड धुंडाळून त्याच्या शेंगा गोळा करायच्या, हातात न मावणा-या झाल्या की घरी येऊन पत्र्यावर ठेवायच्या. दुस-या-तिस-या दिवशी त्या वाळल्या की नाही हे बघायचं. चपट लांब शेंग हलवून बघायची, आतल्या बिया वाजल्या तर ती घ्यायची. अशा सगळ्या शेंगा एकत्र दगडाने फरशीवर फोडायच्या. एकजीव करायच्या. त्याचा मध्यम आकाराचा लाडू करायचा, तो एक दिवस परत वाळवायचा आणि मग प्लॅस्टिकच्या पिशवीत टाकून त्याचा बॉल म्हणून खेळायला घ्यायचे. हा बॉल खेळण्यात काही औरच मजा होती.
आता राहते त्या घराच्या खिडकीतून उन्हाळ्यात सायंकाळी पाहिले तर लाल फुलांनी सजलेला गुलमोहर वृक्ष दिसतो. मनाला अगदी प्रसन्न वाटते. थोडे पुढे जाऊन पाहिले की, झाडाखाली पडलेल्या लाल-पिवळ्या फुलांचा सडा, त्या उन्हाळ्याची, सुट्यांची, बालपणाची आठवण करून देतो; पण संसारात उन्हाळ्याच्या सुट्या नसतात ना?