आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यवस्था निरगाठ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मी अभ्यास करते आहे माझ्या कक्षात. बाहेर प्रवेशासाठी जमलेल्यांना गप्पा जरा हळू करा म्हणावे, असे शिपायाला सांगून पेपर सोडवायला बसले तितक्यात एक तरुणी ‘एक्स्युज मी, फीडिंग करवाना है, क्या हम अंदर आ के कर सकते हैं?’ म्हणते.


बाप रे की आई गं! इथल्या कोर्स आणि शिकवण्यासंदर्भात आधीच लिहून बाहेर लावलेली माहिती न वाचता येऊन विचारणा-यांना मी व्यत्यय मानत आले आहे. पण आता काय म्हणू? माझ्या परिचयाची नव्हे, माझ्या विभागाशी निगडित हिचे काम नव्हे. माझ्या काळजात कळ. मी मुकाट्याने खुर्चीकडे निर्देश केला. ती आणि तिची सोबती त्या इवल्याशा जिवाला घेऊन कार्यालयात मी काही महत्त्वाचे काम करीत असता. एरवीचा अशा वेळी लोकसंपर्क कटाक्षाने टाळण्याचा नियम मी शिथिल केलेला. माझ्या मनात येते, ती खरेच इथल्या एखाद्या कोर्सला प्रवेश घेईल तेव्हा काय होणार? इतक्या घाईगर्दीच्या स्थळी ती बाळाला घेऊन येऊ शकणार नाही. किंबहुना सकाळपासूनच्या गर्दीत ते बाळ आजीच्या हातात पाहूनच मी कळवळत होते. रोज असला छळ, त्या बाळास ही वेदना माझ्या कल्पनेपलीकडची आहे.
विद्यापीठ अनुदान आयोग पाळणाघर बांधण्यास अनुदान देते. किती महाविद्यालये नि विद्यापीठांनी या योजनेचा लाभ घेतला आहे? विभागांत, महाविद्यालयांत विद्यार्थिनींसाठी प्रसाधन सुविधा हव्यात असे मी मांडत आलेय. नवपरिणीता उच्च शिक्षणासाठी येतील तेव्हा आता अवघड प्रसंगी विश्रांती नि एकांत कक्षसुद्धा हवेतच. आज तिला असा कक्ष न मिळता तर?
माझ्या एका सहकारी शिक्षिकेने तिच्या कक्षात मोठा आरसा बसवून घेतला तेव्हा कुणाला ते खटकले. तसेच कुणी स्वत:च्या कक्षात शीतकपाट, मायक्रोवेव्ह असल्या गोष्टी मांडल्या तेव्हा ते ऐषारामाचे किंचित प्रदर्शन भासले. एका ज्येष्ठ सहकारीने कक्षात चक्क पलंग आणि त्याखाली सामान रचण्यास कपाटे बनवून घेतली तेव्हा तर लोकांना त्याबद्दल बरेच काही म्हणायचे होते. मला मात्र विचारांती त्या प्रत्येकीचे एकेका परीने पटले होते.
माझी प्रतिक्रिया इतरांना विचित्र वाटेल, पण जावे त्याच्या वंशा. तिशीत होते तेव्हा गरज पडली तर पटकन जवळचे स्थळ शोधून मला आवश्यक ती गोष्ट, आरसा की ओव्हन की कॅमेरा की वॉशरूम, ती मिळवता येत असे. माझ्या विभागात सर्वच सुविधा हव्यात असे नाही वाटले. वर्गात शिक्षकाला खुर्ची का लागते हे तासन्तास सलग व्याख्याने देत उभी असताना तेव्हा नाही कळले.
चाळिशीत तसे नाही होत. दोन तास ओळीने असतील तर मला वर्गात खुर्चीचा आधार तर लागतोच, शिवाय केबिनमध्ये आल्याआल्या थोडा वेळ तरी कुणी काही विचारायला न येवो. स्वस्थतेची मागणी तन-मनाची असते. दिवसभर एकसारखे काम असते तेव्हा सतत खुर्चीवर खाली पाय सोडून एकाच स्थितीत बसणे होत नाही. मांडी घालून बसण्याइतकी खुर्ची प्रशस्त हवीच. कधी पाय लांब करून बसता यावे किंवा क्षणकाल पाठ टेकून पुन्हा उभे राहता यावे यासाठी मंचकाची व्यवस्था असणे खरेच उपयुक्त होईल. चारचौघात मुलींनी उभे राहून साधे आळोखे-पिळोखे देणं हे शिष्टसंमत नाही, मग काय करायचं? मुलींनी अशा असंमतीकडे दुर्लक्ष करत आपल्या शरीराला स्वस्थ ठेवण्याला प्राधान्य द्यायचं. शक्य असेल तेव्हा आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून घ्यायच्या. मग घरापासून दूर काम करताना दुपारचे अन्न नीट राहावे म्हणून शीतकपाट नि ओव्हन, देहाला आरामदायी खुर्ची, पलंग, पुरेसे प्रेझेंटेबल दिसतोय ना, याची खात्री करता येण्यासाठी आरसा हे अगदी सहज मागणी करून मिळवायचे. छोट्या बाळांच्या आयांनी बाळासाठी आवश्यक त्या सुविधा कक्षात करून घेणे यात आक्षेप, अवहेलना नको.
तसेही ब-याच पुरुष सहका-यांच्या कक्षात त्यांना हव्या त्या खाऊपिऊच्या पाकिटांची चवड रचून ठेवताना आपण पाहतोच. त्यांना पाय मोकळे करण्यास, हवा तसा (?) कार्बनचा श्वास घेण्यास, घाईची लागली तर मुक्त होण्यास, आणि वेगवेगळ्या व्यायामासाठी रस्ते, कोपरे, कॉरिडॉर्स हे सहसा आक्षेपार्ह नाही. समाजात हेच सारे स्त्री मुक्तपणे करू शकत नाही तोवर जिला शक्य आहे तिने अशा सुविधा उपलब्ध करून घेतल्या तर आगंतुक बहिणींना वेळप्रसंगी त्यांचा उपयोग होईल.
काही निकडीचे प्रसंग शिक्षिका म्हणून मुलींबरोबर असताना गुदरले तेव्हापासून कार्यालयाजवळ स्त्रीवैद्य असावी, विभागात सेविका असावी असेही वाटत आले आहे. काही अत्यावश्यक सुविधा पुरवणारी व्यवस्था कामाच्या, शिक्षणाच्या स्थळांजवळ असायला हवी. मुलींनी खूप जबाबदारीने वागावे, स्वत:ला लागतीलशा गोष्टीं स्वत:सोबत बाळगाव्या असे कितीही सांगितले नि ऐकले तरी वेळ-काळ सांगून येत नाही हेच खरे. एकदा एका आठवड्यात तीन मुली वर्गात चक्कर येऊन पडल्या. मेंदूच्या आजारापासून मासिक पाळीतील थकवा ते अगदी खिडक्या बंद करण्याने अपुरा आॅक्सिजन अशी विभिन्न कारणे. या तरुणींना कुणाच्याही सोबत आरोग्य केंद्रात पाठवून कसे चालेल? अनपेक्षित अथवा जोराचा रक्तस्राव होऊ शकतो. एकदा सॅनिटरी नॅपकिनसाठी करावी लागलेली धावाधाव माझ्या लक्षात आहे, त्याहून विसरले नाहीये मी तिच्या चेह-यावरचे अनाठायी ओशाळलेपण.
कंपनीत काम करणा-या एका मध्यमवयीन स्त्रीने तिची बॅग तपासायला दिली नाही, अशी सुरक्षा कर्मचा-याची तक्रार आणि मुलींच्या खास वस्तू, प्रौढ झालं तरी पुरुषाला कशा हाताळू द्यायच्या ही तिची अडचण. संख्येने कमी असलेल्या स्त्री कर्मचा-यांसाठी वेगळी व्यवस्था परवडत नाही हा मालकाचा युक्तिवाद कसा पटवून घ्यायचा?
तीन-चार वर्षांच्या मुलांचा कडी घाल-काढ हा खेळ नवा नाही. मुलांना ठेवणार तिथे, तुमच्या कार्यालयात किंवा घरी बाळाला सहजच कडी घालून स्वत:ला अथवा तुम्हाला कोंडता येणार नाही अशी व्यवस्था फार कठीण नसते, ती तशी करून घ्यायला हवी. मला भाभा अणुसंशोधन केंद्राच्या कर्मचा-यांच्या वयोगटानुसार निवासव्यवस्थेचे स्मरण होते नि भाभा कुशलसे बाबाच होते या परिसराचे, हे जाणवून नतमस्तक व्हायला होते. मनात आणलं तर कितीही मोठी झेप घेणा-याचे निर्माण करता येईल असे सांगणारे ‘गरुडाचा जन्म’ हे शिल्प प्रेरणा देते, हवे तिथे बदल घडवण्यास मी तयार व्हावे म्हणून...