आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामगारांची मुलं

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
१० जुलैच्या मधुरिमामधील मंजिरी काळवीट यांचा ऊसतोड कामगार व त्यांच्या मुलांवरचा लेख वाचला. समाजातल्या अनेक घटकांची जगण्याची समस्या गंभीर आहे. त्यापैकी ऊसतोड कामगार हा एक घटक आहे. आपलं पूर्ण कुटुंब गाढवावर किंवा बैलगाडीत घेऊन पायपीट करणारी ही माणसं. त्यांच्यासोबत त्यांच्या मुलांचीही परवड होते. मंजिरीच्या लेखात ही माहिती आली आहे.
यावर एक उपाय आहे तो बालगृहांचा. महिला व बालकल्याण खात्यात अशा मुलांची नावं नोंदवली तर त्यांना विविध बालगृहात शासनाकडून पाठवलं जातं. तिथे त्यांचं राहणं, जेवण व मुख्य म्हणजे शाळा या सर्व बाबींकडे लक्ष पुरवलं जातं.
जालन्यात अशी सात बालगृहे आहेत. यातील पाच बालगृहात मी सेवाभावाने काम करते. त्यातील दोन बालगृहे आम्ही मित्र परिवारांनी मिळून बंक बेड, सोलर हीटर, सोलर लाइट, गाद्या, सतरंज्या, वॉटर प्युरिफायर, भांडी व कपडे पुरवून परिपूर्ण केली आहेत. या मुलांशी गप्पा मारणे, त्यांना बोलते करणे, वाढदिवस तिथे जाऊन साजरे करणे असे अनेक उपक्रम तिथे इतरही लोक हळूहळू घेत आहेत. हा ‘कारवाँ’ वाढतोच आहे. आता उर्वरीत बालगृहे सुखसोयींनी परिपूर्ण करण्याचा उद्देश आहे.
खरं तर या विषयांवर चर्चा नको. भगवान बुद्ध म्हणतात त्याप्रमाणे, विचारांतून संवेदनेकडे व संवेदनेतून कृतीकडे जायला हवे.
‘कौन करता है दावा कि भगवान नहीं है
यतीम आँखों में वह छलकेगा यह हमारा वादा है’
दुष्काळग्रस्त मराठवाड्यात अशा कामात सगळ्यांनी पुढे यायला हवे. अशा कामात लहान मुलेही सहभाग नोंदवतात, हे विशेष. केवळ त्यांना पटवून द्यायला हवे. शाळेतल्या मुलांवर आतापासून सामाजिकतेचे संस्कार केले तर मुलेही मदतीला हात पुढे करतात. हा अनुभव आहे. जालन्याच्या सरस्वती भुवन प्रशालेच्या मुलांना बालगृहातील मुलांसाठी गेल्या वर्षीची पुस्तके देण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. तेव्हा या मुलांनी जवळपास दीडशे-दोनशे पुस्तकं जमा केली व ती बालगृहात दिली. हे संस्कार आमच्यावर व मुलांवर व्हायला हवे. हे समाजऋण आहे.
बालगृहात येणाऱ्या मुलांजवळही पंख आहेत. फक्त थोडं मोकळं आकाश मिळायला हवं. आमचं मन ते आकाश होऊ शकतं का, हा प्रश्न आहे. आणि प्रश्न आहेत असं म्हणून उपयोग नाही, त्यावर उत्तरंही आपणच शोधायलाच हवीत.
बातम्या आणखी आहेत...