आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rekha Deshpande Article On Dirty Picture Effect On Social

‘डर्टी पिक्चर’: दांभिक दुनियेवर सणसणीत आसूड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चित्रपटाचं नाव ‘डर्टी पिक्चर’ आणि त्यातल्या नायिकेची भूमिका ही चित्रपटसृष्टीत अंग-प्रदर्शन करीत आणि उत्तान अंगविक्षेपांची प्रक्षोभक नृत्यं करणार्‍या डान्सरची. पंधरा-वीस वर्षांपूर्वी कोणत्या निर्मात्या-दिग्दर्शकानं असं धाडस केलं नसतं. विशिष्ट पुरुष प्रेक्षकवर्गाला चाळवण्यासाठी केलेल्या चित्रपटांची संभावना ‘डर्टी पिक्चर’ अशी होत असे आणि नायिका ही तर ‘गंगा जैसी पवित्र’ असली पाहिजे, असा भारतीय चित्रपट-विश्वाचा पारंपरिक संकेत. त्यामुळे 80च्या दशकापर्यंत नायिका ही सोज्वळ, पवित्र असे. मनोरंजनाच्या नावाखाली पुरुष प्रेक्षकांना चाळवण्याची तरतूद म्हणून एखादा कॅब्रे डान्स वगैरे आणि तो करणारी डान्सर. त्या डान्सपुरतीच चित्रपटात येणारी. मिलन लुथरिया या दिग्दर्शकानं ‘डर्टी पिक्चर’ हे धाडस केलंय ते 2011मध्ये. गेल्या पंधरा-वीस वर्षांत चित्रपटातल्या पारंपरिक धारणा मोडून सामाजिक वास्तवाचा वेध घेण्याकडे मुख्य धारेतल्या दिग्दर्शकांचाही कल होऊ लागला, त्या या काळातला हा दिग्दर्शक आहे. तेच यातली नायिकेची भूमिका करणार्‍या विद्या बालन या अभिनेत्रीविषयी म्हणता येईल. किंबहुना गेल्या दीड दशकात चित्रपटसृष्टीतल्या कलावंतांनीही पारंपरिक धारणांच्या कोंडलेपणातून बाहेर पडायला सुरुवात केली आहे.
‘डर्टी पिक्चर’मध्ये वर उल्लेख केलेला ऐंशीच्या दशकातला काळच आलेला आहे. दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीत ऐंशीच्या दशकाच्या पूर्वार्धात सिल्क स्मिता नावाचं एक वादळ येऊन गेलं. एक्स्ट्रा म्हणून चित्रपटसृष्टीत दाखल झालेल्या विजयालक्ष्मी वडलापटी या सामान्य मुलीनं आपल्या शरीरसंपदेच्या, बिनधास्त अंगप्रदर्शक, कामूक अंगविक्षेपप्रधान नृत्याच्या जोरावर ‘सिल्क स्मिता’ म्हणून अफाट ख्याती मिळवली. तिचं चरित्र म्हणजे, चित्रपटसृष्टीत नाव, ग्लॅमर आणि पैसा मिळवू पाहणार्‍या असंख्य तरुणींचीच प्रातिनिधिक कहाणी. चित्रपटसृष्टीचं आणि तिच्या आश्रयदात्या प्रेक्षक मानसिकतेचं हे वास्तवच मिलन लुथरिया सिल्कच्या म्हणजे पूर्वाश्रमीच्या रेशमाच्या रूपात मांडतो. चित्रपटाच्या सुरुवातीला डिस्क्लेमर दिला असला तरी चित्रपटातल्या नायिकेची कहाणी ही सिल्क स्मिताच्या कहाणीवरूनच प्रेरित आहे, हे ओपन सिक्रेट आहे.
छोट्या रेशमाची सिनेमात जाण्याची स्वप्नं आहेत. इथे पडलीस तर आई सावरेल; पण बाहेरच्या जगात पडलीस तर कुणी सावरायला येणार नाही, असा शहाणपणाचा इशारा आई तिला देते. पण बंडखोर रेशमा लग्नाच्या आदल्या रात्रीच पळून जाते, मद्रास (आता चेन्नई) गाठते...
...तारुण्यात पदार्पण केलेली रेशमा स्टुडिओत एक्स्ट्रा म्हणून प्रवेश करते. एक्स्ट्राचं (आता ज्यांना ‘ज्युनियर आर्टिस्ट’ असं जरा भारदस्त नाव दिलं गेलंय) जगणं म्हणजे अनंतकाळ संधीची वाट पाहात उभं राहणं. पण रेशमा हट्टाला पेटलेली मुलगी आहे. ती प्रॉडक्शनच्या माणसाला पटवू पाहते की, मला अ‍ॅक्ट्रेस बनायचं आहे. पण तो ‘मलाही डायरेक्टर बनायचंय. तुझं काही होणार नाही. बहुत फीकी दिखती है तू।’ असं म्हणून आणि जा, खा काही तरी, म्हणून पाच रुपये हातावर टेकवून तिला वाटेला लावतो. खायला गेलेली रेशमा थिएटरवरचं सूर्याचं पोस्टर पाहते आणि न खाता त्या पैशात सूर्याचा सिनेमा पाहते. सूर्या (नसीरुद्दीन) हा आता वयस्कर झालेला, तरीही रोमँटिक, तरुण नायकाच्या भूमिका करणारा सुपरस्टार असतो. रेशमाच्या स्वप्नांचाही नायक असतो. सिनेमा थिएटरात शेजारचा माणूस तिला वेश्या समजून वीस रुपये देऊ करतो, तेव्हा ती ते वीस रुपये घेऊन त्याला चांगलाच चोप देते. पण ज्या अर्थी आपल्याला तो वीस रुपये देऊ करत होता, त्या अर्थी आपल्यात काहीतरी आकर्षण नक्कीच आहे, ही खूणगाठ चलाख रेशमा बांधते आणि प्रॉडक्शनवाल्याला पैसे परत करत तसं सांगते. त्या पाठोपाठ चाबकाचे फटकारे अंगावर घेत कडकलक्ष्मीचा नाच करण्याचं इतर मुलींनी न केलेलं धाडस ती करते, तिचे कामुक अंगविक्षेप पाहून निर्माता सेल्वगणेश आणि साहाय्यक दिग्दर्शक थक्क होतात. बाजारपेठेचा चोख अंदाज असलेला निर्माता तिची ताकद ओळखतो. पण दिग्दर्शक इब्राहिम (इमरान हाशमी) मात्र तिचं ते अश्लील नृत्य कापून टाकतो. चित्रपटातलं आपलं काम बघायला गेलेली रेशमा हिरमुसते; पण चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रतिसादही थंडाच मिळतो. अनुभवी निर्माता मग ते दिग्दर्शकानं कापून टाकलेलं गाणं पुन्हा जोडून चित्रपट नव्यानं प्रदर्शित करतो. रेशमाच्या नाचामुळे प्रेक्षक चित्रपटाला डोक्यावर घेतात. प्रेक्षकांना विचार करायला लावणारा चित्रपट बनवायचा हट्ट धरणार्‍या दिग्दर्शकाला नारळ देऊन सेल्व चवन्नी छाप प्रेक्षकांना चाळवण्याची, पेटवण्याची ताकद असलेल्या रेशमाला हाताशी धरतो. रुपेरी पडद्यासाठी तिचं ‘सिल्क’ असं नामकरण करतो. रेशमाला प्रसिद्ध नटी व्हायचं आहे, त्यासाठी काहीही करून लोकांचं लक्ष वेधून घ्यायला पाहिजे, हे चाणाक्ष रेशमानंही ओळखलंय. तिची या पुढची सगळी पावलं या उद्दिष्टानंच पडतात.
तिच्या स्वप्नातल्या हीरोबरोबर- सूर्याबरोबर - एक प्रक्षोभक नृत्य करायची संधी तिला लगेचच मिळते. परंतु सुपरस्टार सूर्या या नवोदित मुलीला नर्व्हस करून टाकतो, नाकारतो. जिद्दी सिल्क सरळ त्याच्या मेकअप रूममध्ये शिरून स्वत:ला त्याच्यापुढे ‘वाढते’. थिएटरमध्ये वेश्या समजून तिला वीस रुपये देणार्‍याला चोप देणारी, पहिल्या हिट चित्रपटातला तिचा नाच पाहून तिला मिळवण्यासाठी नव्व्याण्ण्व रुपये घेऊन आलेल्या तरुणाला शांतपणे वाटेला लावणारी सिल्क चित्रपट मिळवण्यासाठी सूर्याबरोबर झोपायलाही तयार होते, ती एक म्हणजे, सूर्या या सुपरस्टारवर ती मनोमन प्रेम करत आलेली असते म्हणून (जसं अनेक तरुणी करत असतात); दुसरं म्हणजे, तिला चित्रपटसृष्टीत स्थान मिळवून द्यायची ताकद खरोखरीच या सुपरस्टारमध्ये असते म्हणून. आणि तरीही ती त्याच्यापुढे आपल्या शरीराचं समर्पणही एक आव्हान देतच करते.
आजवर पाचशे मुलींबरोबर झोपलो असल्याची बढाई मारणार्‍या सूर्याला ती म्हणते, ‘पर क्या आपने एक ही लड़की के साथ पाँच सौ बार ट्युनिंग की है?’ तिची शरीरसंपदा, ती वापरण्याचं तिचं कौशल्य याबरोबरच तिनं सतत आपल्या आत्मविश्वासाची, हजरजबाबीपणाची, बुद्धिमत्तेचीही चुणूक जागोजागी दाखवलेली आहे.
सिल्क चित्रपटाच्या बॉक्स फिस यशाचा हुकमी फॉर्म्युला बनते. लोक तिच्या कामुक नृत्यांवर चेकाळतात, पैसे फेकतात, नृत्य सुरू व्हायच्या आधी सिनेमाहॉलमध्ये येतात आणि नृत्य संपताच बाकीच्या चित्रपटाकडे ढुंकून न बघता बाहेर निघून जातात. सिल्कचा आडाखा बरोबरच निघतो. तिला आणि तिच्या प्रक्षोभक नाचाला ‘घटिया स्टंट’ म्हणणारा दिग्दर्शक इब्राहिम आणि त्याला तेवढ्याच आत्मविश्वासानं, ‘फिल्में सिर्फ़ तीन वजहों से चलती हैं। एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट। और मैं एंटरटेनमेंट हूँ’ असं सुनावणारी सिल्क असा एक संघर्षच चित्रपट उद्योगात सुरू राहतो. त्यात ती आपल्या शारीर आकर्षणाच्या जोरावर सूर्याची साथही मिळवत राहते. सूर्या आता ‘मैंने ही उसे ब्रेक दिया’ म्हणून बढाया मारू लागतो, सिल्क आणि सूर्याचं अफेअर सिनेनियतकालिकं चविष्टपणे चघळू लागतात. सूर्या आपल्या वैवाहिक जीवनात मात्र तिला येऊ देत नाही. त्याच्यावर प्रेम करणारी सिल्क यानं दुखावते. यशाच्या आणि नव्यानं लाभलेल्या श्रीमंतीच्या झगमगाटात सिल्कला आपली होणारी ही किंमत जखमा करू लागते. दुखावलेली, एकाकी सिल्क आपल्या गावी आईकडे जाते, तेव्हा आई तिच्या तोंडावर दरवाजा आपटते. सिल्क आणखी एकाकी होऊन, पण नवं आव्हान घेऊन चित्रपटसृष्टीत परतते. चक्क अवॉडर््स मिळवू लागते.
सिल्क अशी बाजारू सवंगपणात वाहवत जात असली तरी ती सभोवतालच्या जगाला चांगलंच ओळखून आहे. पारंपरिक नैतिक आग्रह धरून इथे काही मिळत नाही, हे तिनं ओळखलेलं आहे. तिची स्वप्नं कुणाला भरकटलेल्या वाटेवरची वाटतील, परंतु तिच्या लेखी त्यांचं मोल सर्वात जास्त आहे. म्हणूनच त्यांच्यापुढे इतर सगळ्या गोष्टी, तथाकथित नैतिकतेचे दांभिक मानदंडदेखील तिला कमी किमतीचे वाटतात. दांभिक जगाचा सामना ती जणू मूर्तिमंत आसूड बनून करते. पण दांभिक समाजाची ताकद इतकी जबरदस्त असते, की त्याचा सूड घेऊ पाहणार्‍याला तो आत्मनाशाच्या मार्गानेच घ्यावा लागतो. सूर्याला धडा शिकवताना ती त्याच्या धाकट्या भावाला- सूर्याच्या सावलीत दबलेल्या रमाकांतला - वापरते. ‘एकीकडे हे दांभिक जग आपले चित्रपट चालावेत म्हणून आपला वापर करतात (तेव्हा ते स्वत: किती घटिया, व्हल्गर, डर्टी होतं, हे ते लक्षात घेत नाही) आणि दुसरीकडे आपल्यालाच घटिया, व्हल्गर, डर्टी म्हणून संबोधतं. पुरुष कुटुंबीयांसमवेत आपले चित्रपट पाहात नाहीत, पण चोरून आपले चित्रपट पाहतात आणि आपल्या कुटुंबाचा विस्तार वाढवतात’, हे ती चांगलं ओळखून आहे. पुरस्कार वितरण समारंभात त्या दांभिक सूर्याच्या हस्ते अवॉर्ड घेतल्यानंतर उत्तरादाखल माइकसमोर बेपर्वाईनं सिगरेट शिलगावणं, हे तिचं कृत्य ही तिची या चित्रपटसृष्टी आणि प्रेक्षकवृंदाला ‘फाट्यावर मारण्याची’ कृती आहे. त्यानंतर पुरस्कार स्वीकारताना केलेल्या भाषणात ती हेच वाभाडे काढते. तिला नेहमी ‘घटिया’ म्हणणारा इब्राहिम प्रेक्षकांत बसलेला आहे. ती अवॉर्ड स्वीकारायला व्यासपीठाकडे जात असताना तो म्हणतो की, ‘ही तर घटिया आहेच, पण हिला अवॉर्ड देणारे तिच्याहूनही अधिक घटिया आहेत.’ खरं तर व्यासपीठावर सिल्कनं जे निवेदन करीत अवॉर्ड देणार्‍यांचे वाभाडे काढले, त्यांचं समर्थन करणारंच इब्राहिमचं हे विधान आहे. फक्त ते येतं तिच्या या तथाकथित शत्रूच्या तोंडून. सिल्क आणि इब्राहिममधल्या संबंधाची हीच गंमत आहे. या जगात सिल्कही एकाकी आहे आणि इब्राहिमही एकाकीच आहे. सिल्कही हट्टी आहे आणि इब्राहिमही हट्टी आहे. दोघांचे मार्ग फक्त वेगळे आहेत.
तिच्यापासून फटकून वागणार्‍या इब्राहिमच्या प्रथमपुरुषी निवेदनातूनच सिल्कच्या झंझावाती करिअरची आणि तिच्या करुण एकाकी अंताची कथा उलगडत राहते. इब्राहिमचं प्रथमपुरुषी निवेदन हे एक साधन आहे- त्याची तिच्यातली गुंतणूक सुचवणारं. त्याचा तिरस्कार हा प्रत्यक्षात त्याच्या प्रेमाचा प्रकट आविष्कार आहे. आणि तेही ओळखते ती सिल्कच.
बदनाम होऊन का होईना, यशाच्या शिखरावर पोहोचलेल्या पण एकाकी आणि नाकारल्या गेलेल्या, दारूत बुडालेल्या, हट्टानं स्वत:चा चित्रपट बनवू पाहणार्‍या सिल्कची करिअर उतरणीला लागणं, हे स्वाभाविकच असतं. त्यावरची तिची प्रतिक्रिया हीदेखील तिच्यासारख्या मनस्वी मुलीकडून व्हावी तीच होते. सावरण्यासाठी जगापुढे पराभव पत्करायला तिची तयारी नसते, तर ती जगाला आणखी वेडावून दाखवून ती प्रतिक्रिया व्यक्त करत राहते. सिनेपत्रकार नायलाच्या घराबाहेर तिनं केलेला अश्लील तमाशा, तिच्याशी लग्न करू इच्छिणार्‍या रमाकांतला खाली पाहायला लावील असं वर्तन पार्टींत त्याच्या आई-वडिलांसमोर करणं, नव्या उगवू पाहणार्‍या प्रतिस्पर्धी मुलीला अपमानित करणं, या त्या प्रतिक्रिया होत. तू आई-वडिलांसमोर असं वागायला नको होतंस असं म्हणणार्‍या रमाकांतला ती म्हणते, ‘जिस वजह से मैं सिल्क बनी हूँ वह वजह कैसे छोड़ दूँ?’
समांतर रेषेवरून चाललेला इब्राहिम अनावरपणे तिच्या एकाकीपणाच्या फटीतून प्रवेश करतो, पण तेव्हा खूप उशीर झालेला असतो. तिला वाचवण्याची त्याची धडपड वाया जाते, ती वाया जाणारच असते. फक्त एवढंच, की त्या दोघांनी एकमेकांना ओळखलेलं असतं. ‘किस किसने टच किया है तुम्हें?’ या त्याच्या प्रश्नालाच केवळ ती उत्तर देते, की ‘टच कइयों ने किया। छुआ किसीने नहीं।’ ओठ जवळ अंतरावर येतात, पण थकलेलं तिचं मस्तक विश्वासानं विसावतं ते मागे पसरलेल्या त्याच्या आश्वासक दंडावर! शरीराचा उद्दाम उत्सव जगापुढे मांडता मांडता भोवळ आलेल्या सिल्कला प्रथमच (आणि अखेरचं) शरीरापलीकडचं आश्वासन मिळतं. व्यावसायिक मुख्य धारेतल्या ‘डर्टी पिक्चर’चा दिग्दर्शक ते आपल्या प्रेक्षकांसाठी आणखी स्पष्ट करतो ते, ‘तेरे वास्ते मेरा इश्क सूफ़ियाना’ या गीत-दृश्यातून...
deshrekha@yahoo.com