आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लढा स्त्रियांचा स्त्रियांसाठी...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘नो वन किल्ड जेसिका’ या राजकुमार गुप्ता लिखित-दिग्दर्शित चित्रपटाच्या नायिका आहेत तीन. त्यातली एक आपल्या अनुपस्थितीतही संपूर्ण चित्रपटावर अधिराज्य गाजवते. जे जे घडतं ते तिच्या संदर्भात, इतर दोघी जो लढा देतात तो हयात नसलेल्या तिला न्याय मिळवून देण्यासाठी, ती अनुपस्थितीतही तिच्या अंगभूत गुणांनी त्या लढ्यासाठी प्रेरणा बनते आणि तिच्यासाठी दिलेला लढा हा आधुनिक काळातल्या समस्त अत्याचारपीडित स्त्रियांसाठी दिलेला लढा ठरतो. एवढंच नाही; तर सत्तांध, मदांध आणि धनांधांपुढे जनतेला येणार्‍या वैफल्याला चिकाटीनं निपटून टाकण्यासाठी ती एक निमित्त बनते, जेसिका (मायरा). जेसिका खून खटला हा भारतीय न्याय-व्यवस्थेचा अगदी ताजा इतिहास. आम आदमीच्या आंदोलनांना काळानुरूप एक वेगळं रूप देणारा. गेल्या अनेक दशकांत पत्रकारितेच्या हरवलेल्या मूल्याचंही पुनरुज्जीवन करणारा.
जेसिकावरच्या अत्याचाराविरुद्धच्या लढ्याचं नेतृत्व करतात, दोन स्त्रियाच. एक तिचीच धाकटी बहीण साब्रिना (विद्या बालन) आणि दुसरी खासगी टीव्ही वाहिनीची आघाडीची तरुण पत्रकार मीरा (राणी मुखर्जी). साब्रिनाचा लढा एकाकी, तर मीरा तिच्या पार्श्वभूमीमुळे आणि अर्थातच तिच्या अंगभूत धडाडीमुळे अवघ्या देशाला लढ्यात उतरवते.
मध्यरात्री गाढ झोपेत असताना साब्रिनाला फोन येतो- ‘जेसिकाला गोळी लागलीय.’ साब्रिना धावतच बारमध्ये जाते. उच्चभ्रूंच्या उच्चभ्रू पार्ट्यांचं ठिकाण म्हणजे हा दिल्लीतला प्रसिद्ध बार. बार बंद झाल्यामुळे नियमानुसार ड्रिंक द्यायला नकार दिल्यामुळे भडकलेल्या मदांध तरुणानं तिथे नोकरी करणार्‍या जेसिकाला गोळी घातलेली असते. तिथे गेल्यावर हा सगळा प्रकार फ्लॅशबॅकमधून साब्रिनापुढे उलगडण्यात येतो. जखमी जेसिकाला अ‍ॅम्ब्युलन्समधून घेऊन जात असतानाची जेसिका हीच काय ती वर्तमानातली जेसिका. अ‍ॅम्ब्युलन्समध्ये साब्रिनाच्या डोळ्यादेखत तिचा श्वास थांबतो आणि जेसिका कायमची भूतकाळात जाते. फ्लॅशबॅकपुरतीच उरते. तरी ती चित्रपटाच्या अवघ्या अवकाशाला व्यापून उरते. साब्रिनाच्या दु:खात, तिच्या लढ्यात जेसिका फ्लॅश-बॅकमधून अवतरत राहते, ती त्या दोन बहिणींच्या नात्याचे पदर उलगडत आणि जेसिकाच्या धाडसी, नितळ आणि अन्यायाविरुद्ध तत्काळ पेटून उठणार्‍या निर्भीड व्यक्तिरेखेला उलगडत. विसाव्या शतकाच्या अखेरच्या दशकात विशीत आलेल्या आणि शहरी आधुनिक सुशिक्षित घरातल्या या मुली आहेत. करिअर-मांइंडेड आहेत. करिअर निवडण्याचं स्वातंत्र्य असलेल्या आहेत. समाजात निर्भय वावर असणार्‍या आहेत. बहिणींमध्ये घट्ट मैत्री आहे. तशा दोघी एकमेकींपेक्षा अगदी वेगळ्या. जेसिका उत्साही, महत्त्वाकांक्षी, आऊट-गोइंग. साब्रिना काहीशी अंतर्मुख. कोषात असलेली. गर्दी, जल्लोश, धमाल यापासून जरा अंतर राखूनच असणारी आणि जेसिकासारखी धाडसी नाहीच. रस्त्यानं जाताना एखाद्या पोरानं छेड काढली तर चिडली तरी उगीच लफड्यात न पडणारी, पण जेसिका मात्र त्या पोराला धडा शिकवल्याशिवाय न राहणारी. वर बहिणीला सुनावणारी, ‘बहनजी, तू बहनजी बनना छोड़.’
अशा जेसिकाचा खून होतो आणि साब्रिना दु:खानं, अन्याय झाल्यामुळे क्रोधानं, आई-वडलांच्या काळजीनं ग्रासते, या घटनेमुळे तिच्यासारख्या अंतर्मुख मुलीला मीडियाच्या झोतालाही तोंड द्यावं लागतं. प्रथमच एका झंझावाताला तोंड द्यायची पाळी येते. आता तिची धाडसी बहीण तिच्याबरोबर नसते, तर त्या दिवंगत बहिणीलाच न्याय मिळवून देण्यासाठी तिलाच लढा द्यायचा असतो. खून करणारा माणूस हा मंत्र्याचा मुलगा असतो. तरीही सुरुवातीला टीव्ही वाहिनीच्या कॉमेर्‍यासमोर ती सांगते, की गुन्हेगाराला शिक्षा नक्कीच मिळेल आणि आम्हाला न्याय मिळेल, असा विश्वास आणि आशा आम्हाला आहे. बारमध्ये घटना घडली तेव्हा पार्टी ऐन रंगात होती. तीनशे माणसांनी घटना पाहिली होती. जेसिकाच्या विक्रम या सहकार्‍यासहित सात जणांनी तर घटना अगदी जवळून पाहिली असते. विक्रमनेच पोलिसात एफ.आय.आर.ही नोंदवली असते. या सात जणांनी मंत्रीपुत्राविरुद्ध साक्ष दिली तर कोर्टात त्याचं वाचणं अशक्य आहे, असं मंत्र्याचा बडा वकीलही सांगतो. स्वत: साब्रिना केवळ पोलिस अधिकार्‍यांच्या भेटी घेऊन शांत बसत नाही, तर सातही साक्षीदारांना भेटून त्यांनी कोर्टात खरं तेच सांगावं म्हणून विनंती करते. त्यासाठी एका साक्षीदाराला पैसेही देते, विक्रमला भेटण्यासाठी कलकत्ता गाठते आणि त्याला भेटण्याचा अयशस्वी प्रयत्न करते. तो अयशस्वी अशामुळे ठरतो की, एव्हाना मंत्र्याची सगळी यंत्रणा साक्षीदारांना फितवण्याच्या, विकत घेण्याच्या, धमकावण्याच्या कामाला लागलेली असते. दु:ख बाजूला ठेवून न्याय मिळवण्यासाठी धडपडणार्‍या साब्रिनाला पावला-पावलावर हतबल होण्याचे प्रसंग येतात. मंत्र्याचा मुलगाच गुन्हेगार असल्यामुळे गुन्ह््याचा तपास हिरिरीनं करणार्‍या पोलिस इन्स्पेक्टरला हतबल होताना ती पाहते. टीव्हीवरच्या मुलाखतीत साब्रिना म्हणते, की ‘‘मैंने उसे प्रॉमिस किया है, और खुद को भी कि जब तक इन्साफ नहीं मिलेगा, रोऊँगी नहीं.’ ती टीव्ही कॉमेर्‍यापुढे प्रश्न विचारते, ‘क्या किसी की ज़िंदगी इतनी कम है हमारी कंट्री में? एक ड्रिंक से भी कम?’... ती टीव्हीवरून साक्षीदारांना, जेसिकाच्या दोस्तांना आवाहन करते, की तिला न्याय मिळवून देण्यासाठी कोर्टात खरं बोला. एवढं तरी करा... कोर्टात खटला उभा राहतो. दोन वर्षं जातात. खटला चालूच. हळूहळू कोर्टातली गर्दी कमी होऊ लागते. जनतेच्या स्मृतीतूनही जेसिका खून खटला धूसर होऊ लागतो. साब्रिनाची लढाई कोर्टात, घरी, हॉस्पिटलमध्ये चालूच. सेशन्स कोर्टात सगळेच साक्षीदार फिरतात. मंत्रीपुत्र निर्दोष म्हणून सुटतो. साब्रिनाच्या आईचा हॉस्पिटलमध्ये मृत्यू होतो त्या वेळी मंत्री, मंत्रीपुत्र आणि कंपनी ‘जय माता दी’ म्हणत वैष्णोदेवीला नवस फेडत असतात. आईच्या मृत्यूनंतर वडिलांनाही हॉस्पिटलमध्ये ठेवायची पाळी येते. थकलेली, हरलेली, न्यायव्यवस्थेवरचा, लोकांवरचा विश्वास उडालेली एकाकी साब्रिना पुन्हा कोषात जाते, टीव्हीच्या कॉमेर्‍यांना टाळण्यासाठी घरातून मागच्या दारानं बाहेर पडू लागते. खरं तर न्याय नाकारल्या गेलेल्या असंख्य वैफल्यग्रस्त साब्रिना देशात गेली काही दशकं जगण्याचं ओझं वाहताहेत, त्यांची संख्या वाढत चाललीय.